मेनेंदेथ ई पेलायो, मारसेलीनो : (३ नोव्हेंबर १८५६–१९ मे १९१२). स्पॅनिश साहित्यसमिक्षक आणि इतिहासकार. स्पेनमधील सांतादे र येथे जन्मला. बार्सेलोना आणि व्हॅल्लादोलीड विद्यापीठांत त्याचे शिक्षण झाले. माद्रिद विद्यापीठातून त्याने डॉक्टरेट घेतली आणि तेथेच स्पॅनिश साहित्याचे त्याने अध्यापनही केले. (१८७८–९८). १८८१ मध्ये स्पॅनिश अकादमीवर त्याची निवड झाली आणि स्पेनच्या राष्ट्रीय ग्रंथालयाच्या संचालकपदी त्याची १८९८ साली नेमणूक झाली. स्पॅनिश साहित्याचा त्याने सखोल अभ्यास केला होता. डौलदार आणि लवचिक गद्यशैली हे त्याच्या ग्रं थांचे एक लक्षणीय वैशिष्ट्य त्याच्या उल्लेखनीय. ग्रंथांपैकी काही असे : Laciencia espanola (३ खंड १८७६–८८), Historia de los heterodoxos espanoles (२ खंड, १८८०–८२), Historia delas ideas esteticas en Espana (९ खंड अपूर्ण १८८३–९१) आणि Origenes de la novela (१९०५–१९१०).

स्पेनच्या राष्ट्रीय भूतकाळाचा सर्जनशील वृत्तीने शोध घेणारा एक अभ्यासू साहित्यिक म्हणून तो ओळखला जातो. La ciencia… मध्ये त्याने स्पॅनिश वैचारिकतेच्या अनेक विस्मृत पैलूंना पश्चिमी तत्त्वज्ञान आणि विज्ञान ह्यांचा संदर्भात उजाळा देण्याचा प्रयत्न केला. Historia de los heterodoxos ह्या ग्रंथात सनातनी कॅथलिक पंथीयांच्या दृष्टिकोणातून त्याने स्पेनमधील विचारेतिहासाचा वेधक परामर्श घेतला आहे. Historia de los ideas… मध्ये मेनेंदेथमधला मानवतावादी समीक्षक प्रत्ययास येतो. स्पॅनिश-अमेरिकन भावकवितेचा समावेश असलेले एक काव्यसंकलनही त्याने संपादिले : Antologia de poetas liricos castellanos (१३ खंड, अपूर्ण १८९०–१९०६).

कुलकर्णी, अ. र.