मेनिस्पर्मेसी : (गुळवेल-गुडूची-कुल). या वनस्पितकुलाचा समावेश फुलझाडांपैकी [→वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ⇨रॅनेलीझ या प्रारंभिक गणात केला असून कुलाचे नाव ग्रीक शब्द मेनिस्कस (म्हणजे चंद्रकोर) व स्पर्मा (म्हणजे बीज) यावरून चंद्रकोरीसारखी बी असणाऱ्या वनस्पती, असे पडले आहे. याला कोणी गुहूच्यादि-कुल म्हणतात कारण गुडूची [→ गुळवेल], काकमारी, वसनवेल, पहाडवेल इ. आपल्याकडे सामान्यपणे आढळणाऱ्या वेलींचा यात समावेश आहे. या कुलात सु. ७० प्रजाती व ४०० जाती (जे. सी. विलिस यांच्या मते ६५ प्रजाती व ३५० जाती ए. बी. रेंडेल यांच्या मजे ७० प्रजाती व ३०० जाती) असून त्या बहुधा सर्व वेली किंवा तशी झुडूपे आहेत. त्या मुख्यतः उष्ण व काही समशीतोष्ण कटिबंधांत पसरल्या असून काहींच्या खोडांत अनित्य अंतर्रचना [ऊतककर व त्यापासून वाहिका वृंदांची पुनःपुन्हा निर्मिती → ऊतककर वाहक वृंद] आढळते कारण खोडांवर अनित्य ताण व दाब पडतात. [→ महालता शा रीर, वनस्पतींचे], त्यांना प्रतिसाद देणे आवश्यक असते. पाने एकाआड एक, साधी, बहुधा छत्राकृती असून कधी कडाखंडीत असते. फुलोरे विविध प्रकारचे असून फुले लहान, सहसा हिरवट, एकलिंगी असतात. परिदले कधी सर्व सारखी व सहा असून पाकळ्या कधी कधी नसतात फुलातील दल मंडल २–४ नर फुलात केसरदले पातळ्यासमोर व संखेने तितकीच, सुटी किंवा जुळलेली असतात. स्त्री पुष्पात-वंध्यकेसर ६ किंवा त्यांचा अभाव असतो किंजदले बहुधा ३ व सुटी बीजके एकाकी फळ अश्मगर्भी (आठळीयुक्त) बिया वाकड्या पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) विविध [→ फुल] भारतात याच्या फक्त ७ प्रजाती आणि ११ जाती आढळतात. गुळवेल, पहाडवेल, काकमारी, वसनवेल इ. वनस्पती औषधी आहेत.
पहा : शारीर वनस्पतींचे.
संदर्भ : 1. Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.
2. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol.II, Cambridge, 1963.
पाटील, शा. दा.