मेकॉलेचा खलिता : भारतातील शिक्षण कशा प्रकारचे असावे या बद्दल ब्रिटिश संसदेने १८१३ साली एक कायदा केला. त्या कायद्याप्रमाणे मिशनऱ्यांना भारतात स्थायिक होऊन तेथील रहिवाशांना धार्मिक शिक्षणासह पाश्चात्य शिक्षण देण्याची परवानगी दिली होती. मात्र त्याचबरोबर ब्रिटिशांच्या ताब्यातील भारतातील लोकांमध्ये वाङ्मयाचा आणि शास्त्रांचा प्रसार होण्यासाठी दरवर्षी एक लाख रुपये खर्च करावेत, अशी तरतूद होती. या तरतुदीचा अर्थ लावण्याबाबत हिंदुस्थानचा तत्कालीन गव्हर्नर जनरल याच्या शिक्षण विषयक समितीमध्ये मतभेद झाले. त्यातील एका गटाचे म्हणणे असे-वाङ्मयाचा प्रसार म्हणजे हिंदुस्थानातील दोन प्रमुख धर्मियांच्या म्हणजे हिंदू आणि मुसलमान यांच्या, संस्कृत आणि अरबी भाषांतील वाङ्मयाचा प्रसार. शास्त्राच्या प्रसाराबाबत त्यांचे म्हणणे असे, की भारतीयांमध्ये युरोपियन ज्ञानाबद्दल पूर्वग्रह आहेत आणि हे ज्ञान त्यांच्या ज्ञानभाषेतून (अध्ययन भाषेतून) दिल्याखेरीज ते घेण्यास तयार होणार नाहीत. या मतामुळे या गटाने चांगल्या इंग्रजी पुस्तकांचे संस्कृत आणि अरबीमध्ये भाषांतर करण्याचा आणि संस्कृत-अरबी शिकविणाऱ्या जुन्या संस्था जतन करण्याचा आग्रह धरला. दुसऱ्या गटाचे म्हणणे असे, की वाङ्मयाचा प्रसार म्हणजे इंग्रजी वाङ्मयाचा प्रसार तसेच शास्त्रांचा प्रसार म्हणजे पाश्चात्य शास्त्रांचा इंग्रजी माध्यमातून प्रसार. गव्हर्नर जनरलच्या शिक्षणविषयक समितीत याबाबतीत पराकोटीचे मतभेद होते आणि दोन्ही बाजू अगदी तुल्यबळ होत्या. कोणताही शिक्षणविषयक प्रश्न याच मुद्यावर येऊन त्या समितीत कामकाज होणे अशक्य झाले होते. या बाबीचा निकाल लावण्यासाठी गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाचा एक सदस्य लॉर्ड मेकॉले याने २ फेब्रुवारी १८३५ रोजी गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेटिंग यास एक अहवाल सादर केला. त्यामध्ये त्याने भारतीयांना पाश्चात्य वाङ्मय आणि शास्त्रीय ज्ञान शिकवावे, शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असावे तसेच संस्कृत आणि अरबी या भाषा शिकविणाऱ्या संस्था हळूहळू बंद कराव्यात असे सुचविले. लॉर्ड विल्यम बेंटिंकने मेकॉलेचे हे मत आपणास मान्य असल्याचे सुचविले. अर्थातच विरोधी मताच्या मंडळींनी याबाबत जोरदार तक्रार केली. ७ मार्च १८३५ रोजी याबाबत सरकारचा जो ठराव प्रसिद्ध झाला, त्यामध्ये (१) भारतीयांना पाश्चात्य वाङ्मय आणि शास्त्र हे विषय इंग्रजी माध्यामातून शिकवावेत. (२) संस्कृत आणि अरबी शिकविणारी विद्यालये बंद करू नयेत, मात्र या विद्यालयांना नवे अनुदान आणि तेथील अभ्यासकांना नव्या शिष्यवृत्त्या देऊ नयेत. (३) पारंपरिक ग्रंथछपाईसाठी अधिक पैसे खर्च करू नयेत आणि (४) यापुढे उपलब्ध असलेला निधी पाश्चात्त्य वाङ्मय आणि शास्त्रे शिकविण्यासाठी खर्च करावा.
मेकॉलेच्या खलित्याबद्दल अभ्यासकांनी उलटसुलट मते मांडली आहेत. काहींना तो भारतातील नव्या मनूचा प्रणेता वाटतो, काहींना सध्याच्या राजकीय असंतोषाचे कारण त्याच्या सूचनांत सापडते. भारतीय भाषा, धर्म आणि संस्कृती यांना तुच्छ लेखल्याबद्दल काहींना त्याचा संताप येतो, तर भारतीय भाषांऐवजी इंग्रजी भाषेचा माध्यम म्हणून त्याने पुरस्कार केल्यामुळे अनेकजण त्याला दूषण देतात. वरील सर्वच मते अतिशयोक्त आहेत. मेकॉलेने त्याचा खलिता लिहिण्यापूर्वीच अनेक भारतीयांनी इंग्रजी भाषा आणि पाश्चात्य शास्त्रे शिकण्यास सुरुवात केली होती. नंतरच्या राजकीय असंतोषास त्यास जबाबदार धरणे पोरकटपणाचे आहे. मात्र भारतीय भाषा आणि संस्कृती यांबद्दल माहिती करून न घेता त्याने जे अनुदार उद्गार काढले, ते निखालस बरोबर नव्हते. त्याचबरोबर मातृभाषेऐवजी इंग्रजी भाषेचा माध्यम म्हणून त्याने केलेला पुरस्कारही योग्य नव्हता.
मेकॉलेने फेब्रुवारी १८३५ मध्ये लिहिलेला खलिता इंग्लंडमध्ये पुढे १९३८ साली प्रसिद्ध झाला. मेकॉलेने १८५३ मध्ये सी. एच्. कॅमेरॉन याच्याजवळ त्याचा उल्लेख केला. मद्रासचे डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन यांनी १८५५ मध्ये आणि वुड्रो यांनी १८६२ मध्ये तो प्रसिद्ध केला.
संदर्भ : 1. Bhatt, B. D. Aggrawal, J. C. Educational Documents in India (1813-1877), Delhi, 1977.
2. Biswas, Arbinda Aggarwal, Suren, Indian Educationa Documents since Independence, New Delhi, 1971.
3. Govenmnet of India, National Archives of India, Selections from Educational Record Part I, 1781-1839, Calcutta, 1920.
4. Nurullah, Syed Naik, J. P. History of Education in India, Bombay, 1943.
गोगटे, श्री. ब.
“