मेंडेल्स झोन, मोझेस : (६ सप्टेंबर १७२९–४ जानेवारी १७८६) जर्मन ज्यू तत्त्वज्ञ. फेलिक्स मेंडेल्सझोन ह्या विख्यात संगीतकाराचा आजा. देसौ येथे एका गरीब कुटुंबात जन्मला. १७४३ मध्ये तो बर्लिनला आला. साहित्य, गणित, तत्त्वज्ञान इ. विषयांचा अभ्यास त्याने तेथे केला. १७५४ साली गोटहोल्ट एफ्राइम लेसिंग ह्या प्रसिद्ध जर्मन नाटककाराशी त्याची भेट झाली व दोघांची मैत्री झाली. एक उमदे, आदर्श असे ज्यू धर्मीय व्यक्तिमत्त्व लेसिंगला मेंडेल्सझोनमध्ये दिसले. नाथन दवाइज (१७७९, इं. भा. १७८१) ह्या नाटकातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा त्याने मेंडेल्सझोनवरून घेतली.
‘फिलॉसॉफिकल स्पीचीझ’ (१७५५, इं.शी.) हा मेंडेल्सझोनचा पहिला ग्रंथ. ह्या ग्रंथाने तत्त्वज्ञ म्हणून त्याचा लौकिक झाला. त्यानंतर ‘फीडो ऑर ऑन द इमॉर्टॅलिटी ऑफ द सोल’ (१७६७, इं.शी.), जेरूसलेम ए ट्रिटाइज ऑन रिलिजस पॉवर अँड जूडाइझम (१७८३, इं.भा. १८५२), ‘मॉर्निंग अवर्स’ (१७८५, इं.शी) ह्यांसारखे त्याचे ग्रंथ प्रसिद्ध झाले. जर्मन सॉक्रेटीस वा ज्यूइश सॉक्रेटीस म्हणून तो ओळखला जातो.
ज्यूंच्या धार्मिक परंपरेचे जर्मन संस्कृतीशी नाते जुळावे ज्यू आणि जर्मन ह्यांच्यात सांस्कृतिक समावेशनाची प्रक्रिया व्हावी, ह्यासाठी मेंडेल्सझोनने आस्थापूर्वक कार्य केले. ह्या कार्याचाच एक भाग म्हणून त्याने पेंटाट्यूकचे (बायबलच्या जुन्या कराराचे पहिले पाच भाग) आणि बुक ऑफ साम्सचे भाषांतर केले.
धार्मिक वादंगे त्याला आवडत नसत. कोणाला बहिष्कृत करण्यालाही त्याचा विरोध होता. राज्यसंस्था माणसाच्या कृतींवर नियंत्रण ठेवू शकेल परंतु विचारांना राज्यसंस्था किंवा चर्च धक्का लावू शकणार नाही, अशी त्याची धारणा होती.
बर्लिन येथेच तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.
“