सादिआ बेन जोझफ : (८८२– ? सप्टेंबर९४२). ज्यू धर्मविवेचक, तत्त्वज्ञ आणि वादपटू. त्याच्या नावाचे अरबी रुप, सइद इब्न युसुफ अल फाय्यूमी. जन्म अल्-फाय्यूम (ईजिप्त) येथील दिलाझ येथे. त्याच्या आरंभीच्या जीवनाविषयी फारसे तपशील मिळत नाहीत तथापि आपली पत्नी, दोन मुलगे आणि निष्ठावंत विद्यार्थी ह्यांना मागे ठेवून वयाच्या तेविसाव्या वर्षी तो ईजिप्तबाहेर पडला. त्यावेळी त्याने हिब्रू-अरबी शब्दकोशाची रचना केली होती. ईजिप्त सोडल्यानंतर तो पॅलेस्टाइनमध्ये आला. तेथे ⇨ टॅलमुड (बायबलमधील जुन्या कराराला पूरक असलेला प्राचीन धर्मग्रंथ) नाकारणाऱ्या पाखंडी ज्यूंची (केअराइट्स वा कराइम) संख्या वाढत असल्याचे त्याला दिसले. त्या ठिकाणी तो रमला नाही म्हणून तो बॅबिलोनियात आला. तेथेही टॅलमुड नाकारणारे ज्यू होतेच परंतु ईश्वराचे सर्वसाक्षित्व, सर्वज्ञत्व आणि सर्वशक्तिमानत्व हे नाकारणारेही लोक होते. त्यांनी निर्माण केलेले आव्हान स्वीकारुन त्याने धर्म आणि ज्यू परंपरा ह्यांचा खंबीरपणे पुरस्कार केला. पाखंडी पंथीयांचा प्रतिवाद करण्यासाठी त्याने ग्रंथ लिहिले. ९२१ मध्ये पुन्हा त्याच्या विद्वत्तेची कसोटी लागली. पॅलेस्टाइनमधल्या आरन बिन मेयर ह्या टॅलमुडच्या अभ्यासकाने ज्यूंच्या पंचांगामध्ये (कॅलेंडर) दूरगामी परिणाम घडवून आणणारे बदल सुचविले होते. त्यातून संघर्ष निर्माण झाला. ह्या प्रसंगी बॅबिलोनियामधील ज्यू विद्वानांचे नेतृत्व करून त्याने आरन बिन मेयरला प्रखर विरोध केला. ह्या वादात कोणत्याही बाजूला निर्विवाद विजय मिळाला नाही तथापि त्याची विद्वत्ता आणि युक्तिवादाचे अनन्यसाधारण सामर्थ्य ह्यांचा प्रत्यय आला. ह्या काळात त्याने टॅलमुड नाकारणाऱ्या केअराइट पंथीयांच्या विरोधात लेखनाच्या माध्यमातून सातत्याने प्रचार केला. ९२८ मध्ये बॅबिलोनियाच्या सूरा अकादेमीचा प्रमुख म्हणून त्याला नेमले गेले (ह्या वेळी ही अकादेमी बगदादला हलवली गेली होती) तथापि हे प्रमुखपद प्राप्त झाल्यानंतर त्याची वृत्ती काहीशी ताठर झाल्यामुळे त्याचे काही सहकारी त्याच्यापासून दूर गेले. बॅबिलोनिया येथील ज्यू जमातीच्या प्रमुखाशी त्याचे संबंध चांगले राहिले नाहीत. परिणामतः ९३२ साली त्याला सूराअकादेमीच्या प्रमुखपदावरुन दूर व्हावे लागले. ९३६ किंवा ९३७ मध्ये बॅबिलोनियातील ज्यूंचा प्रमुख आणि सादिआ ह्यांच्यात तडजोड होऊन सादिआ पुन्हा एकदा सूराच्या अकादेमीचा प्रमुख झाला व सूरा (बॅबिलोनिया) येथे त्याचे निधन होईपर्यंत त्या पदावर राहिला.

सादिआने आपले अनेक ग्रंथ अरबी भाषेत लिहिलेले आहेत कारण पौर्वात्य ज्यूंची ती भाषा होती. सादिआचे किमान वीस महत्त्वपूर्ण ग्रंथ उपलब्ध आहेत. त्याने केलेली भाषांतरे– उदा., बायबलच्या जुन्या कराराचे त्याने केलेले अरबी भाषांतर – तसेच लिहिलेली भाष्ये आहेत ती वेगळीच. त्याच्या ग्रंथांत ‘ द बुक ऑफ बिलीफ्स अँड ओपिनिअन्स’ (९३५) हा तात्त्विक स्वरुपाचा ग्रंथ आहे. ज्यू तत्त्वज्ञानावर असलेला भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रभाव ह्या ग्रंथातून स्पष्ट होतो. ‘ रेफ्युटेशन ऑफ अनान’ हा केअराइटांच्या पाखंडी पंथाचा संस्थापक अनान बेन दाविद (आठवे शतक) ह्याच्या विचारांच्या खंडनार्थ लिहिलेला ग्रंथ ‘ बुक ऑफ डिसर्नमेंट’ (९२८) हा पारंपरिक पंचांगाच्या समर्थनार्थ लिहिलेला ग्रंथ ‘बुक ऑन द लॉज ऑफ इन्हेरिटन्स’ ‘द लॉज ऑन डिपॉझिट्स’ ‘ बुक कन्सर्निंग टेस्टिमनी अँड डॉक्यूंट्स’ हे कायदे-विषयक ग्रंथ (सर्व इं.शी.) इ. ग्रंथही त्याने लिहिले. ‘ रेफ्यूटेशन ऑफ अनान’ हा ग्रंथ मात्र आज उपलब्ध नाही तथापि केअराइटांच्या विरोधात त्याने लिहिलेले काही अन्य ग्रंथ मिळतात. उदा., ‘ बुक कन्सर्निंग द सोअर्सिस ऑफ द इरॅशनल लॉज’, ‘ द बुक ऑफ बिलिफ्स अँड ओपिनिअन्स’ (इं.शी.) हे त्याचे तात्त्विक ग्रंथ विशेष उल्लेखनीय आहेत. ग्री क तत्त्वज्ञानात आणि तत्त्वज्ञानाच्या प्रभावातून आपल्या विचारांना व्यक्त करणाऱ्या ⇨ मुतझिला ह्या इस्लामी धर्मपंथाचे विचार ह्यांचा प्रभाव ह्या ग्रंथावर दिसून येतो.

ज्यू धर्म आणि ज्यू साहित्य ह्यांचा सातव्या ते दहाव्या शतकांच्या काळात घडून आलेला आंतरिक विकास सादिआच्या ग्रंथांतून प्रत्ययास येतो.

पहा : ज्यू तत्त्वज्ञान.

संदर्भ : 1. Cohen, Boaz, Ed. Saadia Anniversary Volume, 1943.

2. Druck, David, Trans., Saadya Gaon : Scholar, Philosopher, Champion of daism, 1942.

3. Neuman, Abraham A. Zeitlin, Soloman, Eds., Saadia Studies, 1943.

कुलकर्णी, अ. र.