कार्ल मेंगरमेंगर, कार्ल : (२३ फेब्रुवारी १८४० – २६फेब्रुवारी १९२१). सीमान्त उपयोगिता विश्लेषण करणाऱ्या अर्थशास्त्रातील ऑस्ट्रियन संप्रदायाचा जनक. पोलंडच्या गॅलिशिया प्रांतातील नॉव्ही सोंच या गावी जन्म. कार्लचे वडील विधिज्ञ होते. कार्ल व त्याचे दोन भाऊ अशा तिघांनाही लहान वयातच सामाजिक व आर्थिक समस्यांबाबतच्या साहित्याची ओळख त्यांच्या वडिलांचा समृद्ध ग्रंथालयामुळे होणे सुलभ झाले. कार्लचाएक भाऊ अँटन हा पुढे विधिविषयक तत्त्ववेत्ता व समाजवादी सिद्धांताचा इतिहासज्ञ म्हणून मान्यता पावला.

कार्ल मेंगरचे विधिशिक्षण व्हिएन्ना व प्राग या विद्यापीठांतून झाले, मात्र त्याने कायद्यातील डॉक्टरेट क्रेको विद्यापीठातून १८६७ मध्ये मिळविली. कायद्याची पदवी घेण्यापूर्वी मेंगरने व्हिएन्ना व लेंबर्ग या शहरांत वृत्तपत्रीय कामाचा अनुभव मिळविला होता त्यानंतर तो ऑस्ट्रियन पंतप्रधानांच्या कचेरीतील वृत्तपत्र विभागातही काम करू लागला. या ठिकाणी बाजार अहवाल लिहिण्याच्या सवयीतून मेंगरला किंमत सिद्धांतामध्ये रुची निर्माण झाली. 

मेंगरने केलेल्या अभ्यासाचे फलित म्हणजे १८७१ मध्ये प्रसिद्ध झालेला आणि ज्यावर मुख्यतः त्याची ख्याती सुप्रतिष्ठित आहे असा प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हा ग्रंथ होय! ‘आर्थिक सिद्धांतावरील तयार करण्यात आलेला पहिला भाग’ असे या ग्रंथाचे वर्णन केले जाते. ह्या ग्रंथात उपयोगिता, मूल्य आणि किंमत यांमधील परस्परसंबंधांचा विस्तृत ऊहापोह करण्यात आला असून याच सुमारास प्रसिद्ध झालेल्या सीमान्त विश्लेषण सिद्धांताविषयीच्या जेव्हन्झ वा व्हालरा यांच्या ग्रंथांपेक्षाही मेंगरचा ग्रंथ अधिक समाधानकारक समजण्यात येतो.

 या ग्रंथामुळे मेंगरची व्हिएन्ना विद्यापीठामध्ये प्रथम अधिव्याख्याता म्हणून व १८७३ साली विशेष प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. १८७६ मध्ये आर्चडयूक रूडॉल्फ या अठरावर्षीय ऑस्ट्रियन युवराजाचा शिक्षक म्हणून मेंगरची नियुक्ती करण्यात आली. रूडॉल्फबरोबर मेंगरने जर्मनी, फ्रान्स व ग्रेट ब्रिटन या देशांत दोन वर्षे भ्रमंती केली. व्हिएन्ना विद्यापीठात १८७९ मध्ये मेंगरीच पूर्ण प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९०३ मध्ये त्याने अध्यापन सोडले व अर्थशास्त्रीय संशोधनास वाहून घेतले. १८८३ मध्ये त्याचा इन्क्वायरीज इण्टू द मेथड्स ऑफ सोशल सायन्सेस पर्टिक्युलर्ली पोलिटिकल इकॉनॉमी हा दुसरा महत्त्वाचा ग्रंथ प्रसिद्ध झाला. या ग्रंथात मेंगरने सामाजिक शास्त्रांमध्ये सिद्धांताच्या महत्त्वाचे समर्थन केले आहे. द एरर्स ऑफ हिस्टॉरिसिझम न जर्मन पॉलिटिकल इकॉनॉमी (१८४४) व ऑन द थिअरी ऑफ कॅपिटल (१८८८) हे मेंगरचे अन्य उल्लेखनीय ग्रंथ होत. त्याचे व्हिएन्ना येथे निधन झाले.

सीमान्त उपयोगिता सिद्धांत मांडून अर्थशास्त्रीय विचारांत क्रांती करणाऱ्या विल्यम स्टॅन्ली जेव्हन्झ (१८२५–१९१०) व लेआँ व्हालरा (१८३४–१९१०) या दोन इंग्रज व फ्रेंच समकालीन अर्थशास्त्रज्ञांसमवेत मेंगरची गणना करण्यात येते. या तिघांनी नवसनातनवादी चळवळ सुरू केली. या तिघांच्याही विश्लेषण –विचारांमधील नावीन्य हे की, त्यांनी श्रममूल्यसिद्धांताऐजी आत्मनिष्ठ सीमान्त उपयोगिता मूल्य सिद्धांत मांडला. सीमान्त उपयोगिता सिद्धांताचे महत्त्व हे की, कमा ल समाधान साध्य होण्याच्या दृष्टीने गृहीत साधनांचे वाटप करण्याची जी सर्वसाधारण समस्या आहे, तिची उकल या सिद्धांतामुळे करणे शक्य झाले. लवकरच सीमान्त विश्लेषण पद्धती व्यक्तीऐवजी उत्पादनसंस्थेला, म्हणजे सेवनसिद्धांताऐवजी उत्पादन सिद्धांताला लावण्यात येऊ लागली. आतापर्यंत उपयोगिता सिद्धांतामुळे अर्थशास्त्रीय विचारांची प्रगती होत गेली, तथापि सीमान्त विश्लेषण पद्धतीचा वापर सुरू करण्यात आल्याने सनातन (अभिजात) अर्थशास्त्र व आधुनिक अर्थशास्त्र या दोहोंमधील फरक स्पष्ट झाला. उत्पादकांच्या वस्तूचे महत्त्व उपभोक्त्यांच्या सेवनावर निर्धारित असल्याचे मेंगरने दाखविले. उदा., लोकांनी पावाचे सेवन थांबविले, तर पावभट्टी पिठाची गिरणी आणि शेत यांचे आर्थिक वस्तू म्हणून महत्त्व कमी होईल, असे त्याचे म्हणणे  होते. मेंगरच्या मते एकाच वस्तूबाबत निरनिराळ्या व्यक्तींना आत्मनिष्ठ मूल्य निरनिराळे वाटत असल्यामुळे विनिमयाचा उद्‌भव होतो. घटत्या सीमान्त उपयोगितेचा सिद्धांत हा उत्पादन व सेवन (उपभोग) या दोन्ही सिद्धांतांचा मिलाफ करणारा ठरला. मेंगरने मूल्यसिद्धांतामध्ये उपभोगप्रवृत्त मागणीवर अधिक भर दिला असल्याचे, तर सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी उत्पादनप्रवृत्त पुरवठ्यावर भर दिला असल्याचे आढळून येते.

ऑस्ट्रियन चलनपद्धतीमध्ये सुधारणा करण्याविषयी भरविण्यात आलेल्या एका चर्चासत्रामध्ये मेंगरने भाग घेतला (१८९२) त्याच सुमारास जर्मन विश्वकोशाकरिता ‘पैसा’ (मनी) यासंबंधी एक प्रदीर्घ लेख तयार करण्यात तो गुंतला होता. या प्रबंधवजा लेखात पैशाचा उद्‌भव, ज्या घटकांच्या योगे व्यक्ती आपल्याजवळ पैसा बाळगतात त्या घटकांचे विश्लेषण असून या प्रबंधाच्या योगे पैशाच्या मूल्यविषयक सिद्धांताचा पायाच घातला गेला त्यामुळेच फ्रीड्रिख फोन व्हीझर (१८५१–१९२६), लूटव्हिख फोन मीझेस (१८८१–१९७३) यांसारख्या अर्थशास्त्रज्ञांना आपले सैद्धांतिक विवेचन करणे शक्य झाले. त्याचप्रमाणे ऑस्ट्रियन चलन आयोगापुढे मेंगरने दिलेली साक्ष व आयोगाला दिलेले ज्ञापन यांवरून पैशाच्या क्रयशक्तीविषयी त्याचे विचार स्पष्ट होतात. अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी विगमन पद्धतीहून निगमन पद्धत अधिक उपयुक्त आहे सैद्धांतिक विश्लेषणासाठी ऐतिहासिक संशोधन साहाय्यभूत ठरते या आपल्या मतांचा मेंगरने हिरिरीने पाठपुरावा केला. मेंगरच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाने त्याची हस्तलिखिते एकत्र करून ती प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये समाविष्ट केली (१९२३).

मेंगरने आपल्या हयातीत सामाजिक शास्त्रविषयक ग्रंथांचे एक प्रचंड खाजगी ग्रंथालय उभे केले १९११ मध्ये त्या ग्रंथालयातील ग्रंथांची संख्या सु. २५,००० एवढी होती. सामाजिक शास्त्रे व मानवशास्त्र या विभागांतील ग्रंथसंपदा मेंगरच्या मृत्यूनंतर टोकिओमधील हितोत्सुबाशी विद्यापीठाला विकण्यात आली. या विद्यापीठाने त्यासंबंधीची ग्रंथसूची १९२६ व १९५५ मध्ये दोन भागांत प्रसिद्ध केली.

रिखार्ट टूर्नव्हाल्ट (१८६९–१९५४) हा जर्मन समाजशास्त्रज्ञ-मानवशास्त्रज्ञ मेंगरचा विद्यार्थी होता त्याच्यावर आपल्या गुरूचा मोठा प्रभाव पडला असून त्याच्या ग्रंथामध्ये मेंगरच्या समाजशास्त्रविषयक संकल्पना समाविष्ट करण्यात आल्याचे दिसून येते.

संदर्भ : 1. Howey, Richard S. The Rise of the Marginal Utility School: 1870-1889, Lawrence, 1960.

            2. Schumpeter, Joseph, A. Ten Great Economists: From Marx to Keynes, London, 1956.

गद्रे, वि.रा.