मृदूतक : (लॅ. पॅरेंकायमा). काही थोडे अपवाद वगळल्यास, बहुतेक सर्व अनेक कोशिकांनी (पेशींनी) बनलेल्या वनस्पतींत सामान्यपणे आढळणारे मूलभूत, साधे, सापेक्षतः पातळ भित्ती असलेल्या व सजीव कोशिकांचे ऊतक (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचा समूह). ⇨ शैवलेवक व शैवाक यांसारख्या साध्या व खालच्या दर्जाच्या वनस्पतींत [⟶ कायक वनस्पति] आणि त्यांपेक्षा अधिक प्रगत ⇨ शेवाळीवनस्पतींत शारीरिक अवयवांत व घटकांत विशेषीकरण झालेले नसते कारण त्या वनस्पती क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) दृष्टीने प्रारंभिक आहेत. त्यांच्या शरीरातील बहुतेक भाग या प्रारंभिक व साध्या ऊतकाचा बनलेला असतो. क्रमविकासात अशा ऊतकात वेळोवेळी परिस्थितीनुसार फरक पडून प्रभेदन (विशेषीकरणाने फरक पडण्याची प्रक्रिया) झाले असून अधिक विकसित वनस्पतींत भिन्न प्रकारची ऊतके निर्माण झाली आहेत [⟶ ऊतके, वनस्पतींतील]. त्यामुळे वरच्या दर्जाच्या म्हणजे अन्नपाण्याची नेआण करणारे विशेष प्रकारचे शरीर घटक (वाहिका, वाहिन्या इ.) असणाऱ्या वनस्पतींत मृदुतकाखेरीज अन्य ऊतके कमीजास्त प्रमाणात आढळतात. मुळे व खोडे यांच्या टोकाशी असलेल्या वृद्धिक्षेत्रात [सतत कोशिका विभाजन होऊन नवीन ऊतके निर्माण होत असलेल्या भागात →विभज्या] मृदूतकांचा भरणा अधिक असून त्यांमध्ये होणाऱ्या बदलामुळे भिन्न प्रकारची ऊतके बनतात म्हणजेच जातिविकासाप्रमाणेच व्यक्तिविकासातही मृदूतक आरंभापासून आढळते. काही कायक वनस्पतींत प्रारंभी सुट्या असलेल्या कोशिका किंवा तंतू नंतर एकत्र येऊन आभासी ऊतक बनते, त्याला आभासी मृदूतक म्हणतात (उदा., काही शैवले व कवके). मृदूतक हे सामान्यपणे स्थायी (कायम स्वरूपाचे) ऊतक असते तथापि विशेषीकरणाच्या अभावामुळे त्याचे कधीकधी विभज्येत रूपांतर झालेले आढळते [⟶ऊतककर त्वक्षा].

मृदूतकाचे प्रकार : (१) आंतरकोशिकी पोकळ्या असलेले व काही कोशिकांत स्टार्चाचे कण असलेले मृदूतक, (२) जाड भित्तीच्या कोशिका व त्यांपैकी काहिंत स्टार्चाचे कण व काहींत स्फटिक असलेले मृदूतक, (३) पोकळ्या फार कमी असलेले मृदूतकचा आडवा छेद व, (४) उभा छेद, (१) व (२) मध्ये आडवा छेद दाखविला आहे. परिकल व त्यांतील कोशिकांगे दर्शविलेली नाहीत फक्त स्टार्चाचे कण व स्फटिक दर्शविले आहेत.प्रगत (उच्च दर्जाच्या) वनस्पतींच्या बहुतेक सर्व अवयवांतील (खोड, मूळ, पाने, मुळे, बिया इ.) ⇨ मध्यत्वचा, ⇨ परिरंभ, ⇨ मेंड (निकाष्ठ), निकाष्ठ-किरण, फळातील मगज (गर), पानांतील मध्योतक, ⇨ वाहक वृंद (पाणी व अन्न यांची ने-आण करणारा ऊतकांचा संच) इत्यादींत मृदूतक आढळते. निरनिराळ्या वनस्पतींत इतर प्रकारच्या ऊतकांची मांडणी भिन्न प्रकारे या ऊतकामध्ये केली जात असल्याने याला तल्पोतक (आधारभूत ऊतक) असेही म्हणतात. प्रगत वनस्पतींच्या प्राथमिक वाढीत पहिल्याने होणाऱ्या व कोवळेपणी आढळणाऱ्या संरचनेत अग्रस्थ विभज्येपासून व नंतर होणाऱ्या वाढीत (द्वितीयक वाढीत) वाहक वृंदातील ऊतककरापासून आणि बाहेरची साल बनविणाऱ्या ऊतकापासून (त्वक्षाकरापासून) मृदूतक बनते. यातील कोशिका बहुधा समान व्यासाच्या व बाहुभुजी असून प्रत्येक कोशिका बाजूच्या दुसऱ्या १४ कोशिकांची संलग्न असते. या कोशिकांच्या दरम्यान हवायुक्त अंतर कोशिकी अवकाश (कोशिकांच्या मधून असलेल्या पोकळ्या) असतात. त्या पोकळ्या मोठ्या असल्यास कोशिकांच्या बाजू कमी असतात. काही वनस्पतींत गोल, लोलकासारख्या, तारकाकृती किंवा खंडयुक्त अशा स्वरूपाच्या कोशिका आढळतात. वाहक ऊतकातील या कोशिका लांबट असतात [→ प्रकाष्ठ परिकाष्ठ].

मृदूतकातील कोशिकांच्या भित्ती पातळ असून त्यात सेल्युलोज, हेमीसेल्युलोज व पेक्टीन यांचे कमीजास्त प्रमाण असते. प्रकाष्ठाशी (जलवाहक घटकांशी) संलग्न असलेल्या मृदूतकात कोशिकाभित्ती जाड, दृढ व लिग्निनयुक्त असते. कोशिकाभित्तीच्या आतील बाजूस परिकलाचा (सजीव पातळ द्रव पदार्थाचा) थर आणि त्यात रिक्तिका (पोकळी) असून त्यात कोशिकारस असतो. परिकलात हरितकण (हिरवे कण) आढळतात, तेव्हा मृदूतकाला हरिमोतक असे नाव देतात हिरव्या पानात हरिमोतक कधीकधी दोन प्रकारचे (स्कंभोतक व विरलोतक) असते [→ शारीर, वनस्पतींचे]. भिन्न भिन्न कार्यांच्या संदर्भात मृदूतकातील काही कोशिकांत स्टार्चाचे कण व कॅल्शियम ऑक्झॅलेटाचे विविध आकारांचे स्फटिक आढळतात. फुले व फळे यांतील मृदूतकामध्ये परिकलात लाल किंवा पिवळे वर्णकणू (रंगधारक कण) किंवा रिक्तिकांत निळे किंवा जांभळे अँथोसायनिनाचे पातळ थेंब आढळतात. प्रकाशातील अन्ननिर्मिती, श्वसन, संचय, स्त्रवण, उत्सर्ग (निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकणे) इ. सजीव कोशिकांची प्रमुख जीवनकार्ये मृदूतकातच होत असतात. मुळांच्या टोकातील मृदूतकाकडून लवणे व पाणी शोषले जातात. स्त्रावक ⇨ प्रपिंडा भोवतीही (विशिष्ट द्रव पाझरून टाकणाऱ्या संरचनाही) मृदूतकीय कोशिका असतात. हवा खेळविण्यास मोठ्या पोकळ्या असलेल्या मृदूतकास ⇨ वायूतक म्हणतात व हे ऊतक ⇨ जलवनस्पतीत विशेषेकरून आढळते. मनुष्याच्या रोजच्या खाण्यात येणाऱ्या पदार्थात उपयुक्त अशा फळे, भाज्या इ. वनस्पतिजन्य अवयवांत मृदूतकाचे प्रमाण भरपूर असते. खाद्य धान्यांच्या बियांतील स्टार्च, प्रथिने व मेद यांसारखे मूलभूत अन्न वनस्पतींनी मृदूतकातच साठविलेले असते इतकेच नव्हे, तर प्रत्यक्ष अन्ननिर्मिती व संचय मृदूतकातच होतात.

पहा : ऊतके, वनस्पतींतील शारीर, वनस्पतींचे.

संदर्भ : 1. Eames, A. J. MacDaniels, L. H. An Introduction to Plant Anatomy, Tokyo, 1953.

            2. Esau, K. Plant Anatomy, London, 1960.

घन, सुशीला प. परांडेकर, शं.आ.