मूल्यनिर्धारण यंत्रणा : कोणत्याही समाजव्यवस्थेतील घटक, वस्तूंचे उत्पादन व उपभोग अशी आर्थिक स्वरूपाची कार्ये करीत असतात. अगदी प्राथमिक अर्थव्यवस्थेत प्रत्येकाचे उत्पादन त्याच्या व त्याच्या कुटंबियांच्या गरजा भागविण्यापुरते मर्यादित असते. परंतु वस्तुविनिमयीमुळे होणाऱ्या लाभांचे महत्त्व पटू लागले की, अशी स्वयंपूर्णता नष्ट होऊ लागते व उत्पादन बाजारपेठेसाठी करण्याची प्रवृत्ती वाढते. विनिमयामुळे श्रमविभाग व कार्यकौशल्य यांची वृद्धी होऊन उत्पादनात विविधता आणि उत्पादकतेत व उत्पादनपरिमाणांत वाढ झाल्यामुळे अर्थव्यवस्थेची प्रगती होते. तसेच त्यामुळे उत्पादनाचे वितरण उपभोक्त्यांच्या दृष्टीने अधिक समाधानकारक होते.
विनिमयाधारित अर्थव्यवस्थेत मूल्यनिर्धारण यंत्रणेची कार्ये पुढील पाच प्रकारची असतात : (१) वेगवेगळ्या वस्तू व सेवा यांच्या उत्पादनाची परिणामे ठरविणे, (२) त्यासाठी उत्पादक सामग्रीचे उत्पादकांमध्ये योग्य वितरण करणे, (३) अल्पावधीत उत्पादनात बदल घडविणे अशक्य असल्याने उपभोगाचे समायोजना उत्पादनाच्या परिमाणाशी करणे, (४) वेगवेगळ्या घटकांच्या कोणत्या गरजा किती प्रमाणात भागवावयाच्या ते ठरविणे व (५) अर्थव्यवस्था टिकवून तिची वृद्धी करण्यासाठी कोणती व कशी तरतूद करावयाची, हे ठरविणे. ज्या अर्थव्यवस्थेत उद्योजकांना मुक्तद्वार असते, तेथे ही यंत्रणा ही कार्ये प्रभावीपणे पार पाडू शकते. शासनाद्वारा नियोजित अर्थव्यवस्थेत तिचा प्रभाव कमी असला, तरीसुद्धा महत्त्वाचा असतो कारण मूल्यनिर्धारणाच्या योग्यायोग्यतेवर नियोजनाचे यशापयश बव्हंशी अवलंबून असते.
अर्थव्यवस्थांच्या सुरुवातीला वस्तू व सेवा यांची प्रत्यक्ष देवाणघेवाण या स्वरूपात विनिमय होत असे. याला ‘वस्तुविनिमय’ म्हणतात. भारतातील खेडोपाडी पूर्वी प्रचलित असलेली बलुतेदारी, हे याचेच एक उदाहरण आहे. वस्तुविनिमयात दोन प्रमुख गैरसोई आहेत. देवाणघेवाण होणाऱ्या वस्तूंच्या परिमाणांत दोन्ही बाजूंच्या गरजांचा दुहेरी संपात साधण्याची अडचण, ही एक गैरसोय व निरनिराळ्या वस्तूंची विभाज्यता निरनिराळी असल्याने होणारी दुसरी गैरसोय.
या गैरसोयींतून मार्ग काढण्यासाठी समाजाच्या दृष्टिने स्थिरमूल्य व सर्वमान्य अशा वस्तूंचा विनिमयसाधन व मूल्यमापनसाधन म्हणून वापर होऊ लागला आणि त्यांना ‘पैसा’ हे नामाभिधान प्राप्त झाले. नानाविध वस्तूंचा यासाठी वापर केला गेलेला आहे. उदा., गाई, धातूंचे तुकडे, कातडी, कवड्या, दगड, तंबाखू, मिठाच्या कांड्या, मध इत्यादी. यांपैका बऱ्याच वस्तू इतर दृष्टींनी उपयुक्त असल्याने त्यांना स्वतःचे असे मूल्य होते. कालांतराने मोठमोठ्या रकमा बाळगणे व इकडून तिकडे त्यांची ने-आण करणे, यांच्या सोईसाठी प्रथम नाणी, नंतर कागदी चलन व शेवटी धनादेशद्वारा हस्तांतरणीय अशा चालू खात्यातील बँक ठेवी, असे पैशाचे स्वरूप झाले आहे. [⟶ चलन].
मूल्यनिर्धारण यंत्रणेची कार्ये तीन प्रकारच्या प्रक्रियांद्वारा पार पाडली जातात: (१) कोणत्याही एका वस्तूच्या वा सेवेच्या मूल्यनिर्धारणाची प्रक्रिया, (२) निरनिराळ्या वस्तू व सेवा यांच्या सापेक्ष मूल्यांच्या निर्धारणाची प्रक्रिया व (३) मूल्यपातळीनिर्धारण प्रक्रिया. जेव्हा या प्रक्रियांद्वारा अर्थव्यवस्थेत समतोल साधतो, तेव्हा यंत्रणेची कार्ये इष्टतम स्वरूपात होत असतात, म्हणून या प्रक्रियांचा विचार समतोलाच्या दृष्टिकोनातून करतात. समतोलाच्या विचारात किती कालावधीच्या संदर्भात तो मानावयाच्या हे महत्त्वाचे आहे व या दृष्टीने विख्यात अर्थशास्त्रज्ञ अल्फ्रेड मार्शल यांनी तीन प्रकारचे कालखंड कल्पिले आहेत: ‘तात्कालिक’ म्हणजे ज्यात वस्तुपुरवठ्यात बदल होऊ शकत नाही (याला ‘बाजारातील’ असेही म्हणतात) ‘अल्प कालीन’, ज्यात उत्पादकांची संख्या व साधनसामग्री ह्यांत बदल होत नाही, परंतु आहे त्या सामग्रीचा कमीअधिक वापर करून उत्पादक पुरवठ्यांत बदल घडवू शकतात व ‘दीर्घकालीन’, ज्यात त्यांची संख्या व सामग्री या दोहोंत बदल होऊ शकतात.
कालखंडाप्रमाणेच अर्थव्यवस्था स्थितिशील आहे की गतिशील आहे, याचा विचार करणेही महत्त्वाचे ठरते स्थितिशील अर्थव्यवस्थेत उपभोक्त्यांची संख्या, त्यांच्या आवडीनिवडी व त्यांची क्रयशक्ती तसेच उत्पादकांची संख्या,साधनसामग्री व उत्पादनतंत्र यांत काहीही फरक होत नाहीत, तर गतिशील अर्थव्यवस्थेत एका कालखंडातील परिस्थितीचा पुढील कालखंडावर परिणाम होऊन या निर्णायकांमध्ये बदल होत असतात.
समतोलाच्या तीन प्रवृत्ती आहेत स्थिर, अस्थिर व तटस्थ. समतोलावस्था काही कारणाने ढळली व ते कारण संपुष्टात आल्यावर जर तिच्यात पूर्वावस्थेला येण्याची प्रवृत्ती असेल, तर तो स्थिर समतोल पूर्वावस्थेपासून दुरावत जाण्याची असेल, तर अस्थिर आणि नवीन स्थितीतही समतोल राखण्याची असेल, तर तटस्थ प्रवृत्तीचा समतोल समजतात. तटस्थ समतोल सहसा आढळत नाही. उरलेल्या दोन्हींत स्थिर समतोल इष्ट मानलेला आहे.
कोणत्याही एका वस्तूच्या वा सेवेच्या मूल्यनिर्धारण प्रक्रियेचा अभ्यास मार्शल यांच्या आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीने करता येतो. या पद्धतीत विचाराधीन वस्तूचे वा सेवेचे मागणी व पुरवठा परिणाम आणि मूल्य यांव्यतिरिक्त अन्य संबंधित गोष्टी, उदा., खरेदीदाराची क्रयशक्ती, आवडीनिवडी, स्पर्धक किंवा संपूरक वस्तूंची मूल्ये, उत्पादनतंत्र इत्यादींमध्ये बदल होत नाहीत, असे गृहीत धरतात. अशा परिस्थितीत खरेदीदाराची मागणी अनुसूची म्हणजे वेगवेगळ्या किंमतींना जो ज्या परिमाणांत खरेदी करण्यास तयार असतो, ते किंमत-परिमाण कोष्टक (वक्ररेषा) व विक्रेत्याची अशा प्रकारची पुरवठा अनुसूची (वक्ररेषा) यांची एकवाक्यता ज्या किंमतीवर होते तेथे समतोल साधतो आणि ती किंमत समतोल मूल्य असते. निरनिराळ्या खरेदीदारांच्या मागणी अनुसूचींची व विक्रेत्यांच्या पुरवठा अनुसूचींची बेरीज करून त्या वस्तूच्या वा सेवेच्या बाजारपेठेतील मागणी व पुरवठा अनुसूची मिळतात व ज्या कालखंडाच्या संदर्भात त्या असतात, त्यांत त्यांनी निश्चित केलेल्या मूल्यावर समतोल साधतो.
तात्कालिक कालखंडात पुरवठा परिमाण बदलत नसल्यामुळे मागणीत वाढ झाली, तर तिचा परिणाम मागणी-लवचिकतेद्वारा किंमतीवर होऊन समतोल मूल्य वाढते. अल्पकालीन कालखंडात उत्पादक पुरवठा वाढवू शकतात म्हणून या कालखंडातील समतोल-मूल्य तात्कालिक समतोल-मूल्यापेक्षा कमी असते. दीर्घकालीन समतोल-मूल्य याहीपेक्षा कमी असते, कारण या कालखंडात नवीन साधनसामग्रीमुळे पुरवठा आणखी वाढू शकतो. मागणी कमी होत असली, तर याउलट परिस्थिती असते.
खरेदी होणाऱ्या वस्तूची किंमत, तिला स्पर्धक आणि संपूरक अशा वस्तूंच्या किंमती, व्यक्तीचे उत्पन्न व कर्ज काढून वा मत्ता विकून पैसा उभारण्याची शक्यता आणि व्यक्तीच्या आवडीनिवडी यांवर व्यक्तीगत मागणी अनुसूची अवलंबून असते. व्यक्तीगत पुरवठा अनुसूचीही त्या वस्तूच्या तसेच तिला स्पर्धक आणि संपूरक वस्तूच्या पुरवठाखर्चावर अवलंबून असते. दोन्ही प्रकारच्या बाजारपेठांच्या अनुसूची खरेदीदार किंवा उत्पादक यांच्या आपापसांतील मक्तेदारी किंवा स्पर्धा यांच्या प्रमाणावर अवलंबून असतात. मागणी अनुसूचीच्या मुळाशी प्रत्येक किंमतीला जे परिमाण खरेदीदार खरीदतो, त्यामुळे त्याला त्या परिस्थितीत अधिकतम समाधान प्राप्त होते व पुरवठा अनुसूचीत प्रत्येक किंमतीला ज्या परिमाणाचा पुरवठा होतो, त्यामुळे विक्रेत्याला अधिकतम लाभ होतो असे तत्त्व असते. वस्तूंचे सापेक्ष मूल्यनिर्धारण कसे होते, हे समजण्यासाठी नामवंत फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ लेआँ व्हालरा यांनी सर्वसाधारण समतोल विश्लेषण पद्धती निर्मिली. हिच्यामध्ये असे गृहीत असते की, कालखंडाच्या सुरुवातीला अर्थव्यवस्थेतील व्यक्तींकडे असलेली वेगवेगळ्या वस्तूंची परिमाणे विनिमयाद्वारा बदलून त्यांना समाधानाचा उच्चांक गाठता येतो. अशा विनिमयातील सापेक्ष मूल्ये ही समतोल सापेक्ष मूल्ये असतात. या पद्धतीत व्यक्तीसंख्या x वस्तुसंख्या + वस्तुसंख्या- १ इतकी समीकरणे मांडावी लागतात. ही पद्धती केवळ तात्त्विक स्वरूपाची असून तिच्यात गणितशास्त्राच्या दृष्टीने काही अवघड प्रश्न आहेत.
आंशिक व सर्वसाधारण समतोलांच्या या पद्धती सूक्ष्म अर्थशास्त्रात मोडतात. यांत विनिमयाचे साधन म्हणून आधुनिक स्वरूपाच्या पैशाची जरूरी नाही. कोणत्याही वस्तूचा त्यासाठी उपयोग करता येतो. याचे कारण या पद्धतींचे जनक व वापर करणारे अभिजात अर्थशास्त्रज्ञ यांच्या मते आर्थिक व्यवहार मूलतः वस्तू व सेवा यांच्या विनिमयासंबंधी असतात व त्यांत पैशाची भूमिका विनिमय माध्यम व मूल्यमापन साधन यांपुरती म्हणजे तटस्थ आहे. प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ आर्थर सेसिल पिगू (१८७७–१९५९) यांनी म्हटल्याप्रमाणे ‘पैसा हा या व्यवहारांवरचा बुरखा आहे’. त्यामुळे चलनवाढ किंवा घट झाली, तर विख्यात अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ अर्व्हिंग फिशर (१८६७–१९४७) यांच्या चलन-परिमाण सिद्धांताप्रमाणे मूल्यपातळी तितक्याच प्रमाणात वर किंवा खाली जाते. तसेच मूल्यनिर्धारणाबद्दलचे सिद्धांत श्रमबाजाराला लावून ते असे प्रतिपादन करीत की, निरंकुश अर्थव्यवस्थेत नेहमीच पूर्ण-सेवायोजन समतोल साधला जाईल म्हणजे उपलब्ध सर्व श्रमिकांना रोजगार मिळेल, अशा प्रकारचे मूल्यनिर्धारण होते. वेतन व मूल्यनिर्धारण यंत्रणा ही लवचिक आहे, हे यात अभिप्रेत आहे.
या विचारसरणीला विख्यात अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स (१८८३–१९४६) यांनी आपल्या ‘सेवायोजन, व्याज व चलन यांचे सर्वसाधरण सिद्धांत’ (द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी ) या १९३६ साली प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात जोराचे आव्हान दिले. त्यांनी १९३०–३४ या काळातील गंभीर व प्रदीर्घ जागतिक मंदीचा सखोल विचार करून असे प्रतिपादिले की, अर्थव्यवस्था आपोआप पूर्ण-सेवायोजन समतोलात येत नाही. विशेषतः वेतने व किंमती जितक्या सहज वर जाऊ शकतात, तितक्या सहजपणे त्यांच्यातील ताठरपणामुळे त्याखाली येत नाहीत, यामुळे अर्थव्यवस्था अपूर्ण सेवायोजन समतोलावस्थेत राहू शकते व ही अवस्था टाळण्यासाठी शासनाने चलनवाढ करून स्वतः विनियोगकृत्ये केली पाहिजेत.
या ग्रंथात केन्सनी एक अभिनव विश्लेषण पद्धती वापरून अर्थव्यवस्थेतील वस्तू व सेवा, चलन व श्रमबाजार या प्रमूख बाजारपेठांमधील परस्परसंबंध काय असतात, यांविषयी निष्कर्ष काढले. या पद्धतीला ‘साकलिक अर्थशास्त्र’ (मॅक्रो इकॉनॉमिक्स) म्हणतात. ही पद्धत आता नवाभिजात अर्थशास्त्रज्ञांनीही स्वीकारली आहे, परंतु त्यांच्यांत व केन्स यांच्या अनुयायांत तिच्यातून निघणाऱ्या निष्कर्षांबाबत मतभेद आहेत.
या पद्धतीप्रमाणे अर्थव्यवस्थेतील एकूण बचत म्हणजे एकूण उत्पन्न उणे उपभोगासाठी वापरलेले उत्पन्न. उपभोग हा उत्पन्नावर अवलंबून असतो. बचत विनियोगासाठी वापरली जाते. त्यामुळे कोणत्याही कालखंडाच्या शेवटी विनियोग बचतीबरोबर असतो. परंतु जेव्हा उत्पादकांचा कोणत्याही कालखंडातील पूर्व-नियोजित विनियोग व उपभोक्त्यांची पूर्व-नियोजित बचत ही समान असतात, तेव्हा त्या कालखंडात वस्तू व सेवा यांच्या बाजारपेठेत समतोल साधतो. विनियोगामुळे उत्पन्न त्याच्या काही पटींत वाढते. विनियोग-नियोजन करताना उत्पादक त्यामुळे उपयोगात आणता येणाऱ्या भांडवल सामग्रीची सीमान्त कार्यक्षमता लक्षात घेऊन ज्या विनियोगामुळे त्यांना भविष्यकाळात मिळणाऱ्या प्राप्तीचा कसर काढलेल्या रोकड प्रवाहाचा सीमान्त दर व्याजाच्या चालू दराबरोबर आहे, तो नियोजित करतात. हा सीमान्त दर काढताना भांडवलसामग्रीची किंमत, ती सुस्थितीत ठेवण्याचा व चालविण्याचा खर्च व तिच्या आयुष्यभर वेळावेळी मिळणाऱ्या उत्पादनाच्या मूल्याविषयीच्या अपेक्षा, हे सर्व विचारात घ्यावे लागते.
श्रमबाजारात मागणी एकूण उत्पन्न आणि श्रमिकांची उत्पादकता यांवर अवलंबून असते, तर पुरवठा केन्स व त्यांचे अनुयायी यांच्या मते वेतन दराच्या रकमेवर अवलंबून असतो. अभिजात अर्थशास्त्रज्ञांच्या मते तो वेतनाने मिळणाऱ्या वस्तूंच्या परिमाणावर म्हणजे खऱ्या वेतनावर अवलंबून असतो. ज्या वेतनावर मागणी व पुरवठा बरोबर होतील, त्या वेतनावर समतोल होतो. परंतु हा समतोल पूर्ण-सेवायोजन समतोल असेल असे नाही, असे केन्स व त्यांचे अनुयायी यांचे मत आहे.
चलनबाजारात मागणीचे दोन घटक आहेत. पैकी एकाचा संबंध उत्पन्नाशी व दुसऱ्याचा व्याजाचा दर व मूल्यपातळी यांच्याशी आहे. चलन पुरवठा मध्यवर्ती बँकेच्या धोरणानुसार बँक यंत्रणेद्वारा होतो. मागणी व पुरवठा जर जुळले, तर अर्थव्यवस्थेचे उत्पन्नाच्या वाढीबद्दलचे ध्येय साध्य होते व व्याजाचा दर आणि मूल्यपातळी स्थिर राहतात. पुरवठा कमी झाला, तर व्याजाचे दर वाढतात, तसेच मूल्यपातळी खाली येते व उत्पादकांच्या लाभाविषयीच्या अपेक्षा खालावतात, म्हणून विनियोगाचे परिमाण तसेच उत्पन्न आणि सेवायोजन कमी होऊन अर्थव्यवस्था अपूर्ण समतोलावस्थेत येते. पुरवठा अधिक असला, तर याच्या उलट प्रक्रिया पूर्ण-सेवायोजन होईपर्यत होत राहते. पण हा टप्पा जसजसा जवळ येतो, तसतसा मूल्यपातळीवर सापेक्षाने अधिकाधिक परिणाम होऊ लागतो व चलनवाढ तशीच चालू ठेवली, तर आत्यंतिक चलन फुगवटा परिस्थिती निर्माण होते व मूल्यपातळी सर्वस्वी चलन परिमाण सिद्धांतानुसार वाढू लागते.
वरील विवेचन बाह्य घडोमोडींपासून अलिप्त अर्थव्यवस्थेच्या संदर्भात जरी असेल, तरी खुल्या अर्थव्यवस्थेला याच विश्लेषण पद्धती लावता येतात. मात्र त्यात अर्थव्यवस्थेतील घडामोडींचे परराष्ट्र व्यापारावर व हुंडणावळीच्या दरावर होणारे परिणाम लक्षात घ्यावे लागतात. विशेषतः मागणी वा मूल्यपातळी वर गेल्यास आयात वाढते व निर्यात कमी होते. त्यामुळे राष्ट्रातील उत्पादन, अधिदान शेष व हुंडणावळीचा दर यांच्यावर प्रतिकूल परिणाम होतात.
मूल्यनिर्धारण यंत्रणा जरी याप्रमाणे उपभोक्त्यांच्या मागणीचा प्रमाणाला व विविधतेला अनुरूप उत्पादन घडविण्याचे कार्य करीत असते, तरी जर अर्थव्यवस्थेत संपत्ती व उत्पन्न यांत तीव्र विषमता असेल, तर हे उत्पादन व त्याची वितरणव्यवस्था समाजस्थैर्याला प्रतिकूल असते. विशेषतः अविकसित अर्थव्यवस्थांत त्यामुळे साधणारा समतोल निकृष्ट पातळीवरचा असतो. ही परिस्थिती सुधारण्यासाठी शासन मूल्य व उत्पादन नियंत्रण, चैनीच्या वस्तूंवर कर व आवश्यक वस्तूंच्या उत्पादनांसाठी अनुदाने, आवश्यक वस्तूंच्या उत्पदनावर किंमतींतील चढउतारांमुळे अनिष्ट परिणाम होऊ नयेत यासाठी किमान किंमत योजना, मूल्यभेदन इ. वेगवेगळ्या प्रकारे सापेक्ष मूल्य व मूल्यपातळी यांच्यामध्ये इष्ट बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करीत असते. तसेच काही वस्तू वा सेवा यांच्या उत्पादनाची किंवा वितरणाची जबाबदारी स्वतःवर घेऊन, विनियोगाचे प्रमाण वाढवून उत्पन्न व सेवायोजन वाढविण्याचाही शासन प्रयत्न करते. असे जरी असेल, तरी शासनाला मूल्यनिर्धारण यंत्रणा आपल्या हालचालींद्वारा अर्थव्यवस्थेच्या समतोलाच्या संदर्भात देत असलेले इशारे विचारात घेणे आवश्यक ठरते.
संदर्भ : 1. Allen, R. G. D. Micro-Economic Theory, Delhi, 1979.
2. Asimakopulos, A. An Introduction to Economic Theory : Micro-Economics, Bombay, 1979.
3. Keynes, John Maynard, The General Theory of Employment, Interest and Money, London, 1936.
4. Marshall, Alfred, Principles of Economics, London, 1930.
5. Samuelson, Paul A. Economics, Tokyo, 1973.
6. Stigler, George Joseph The Theory of Price, New York, 1947.
पेंढारकर, वि. गो.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..