मुळा : (हिं. मुरो, मूली गु. मुरा क. मुळंगी सं. हस्तिदंत, मूलक इं. रॅडिश लॅ. रॅफॅनस सटाव्हस कुल-क्रुसीफेरी). मांसल व मोठी प्रधान मुळे धारण करणारी ही वर्षायू किंवा द्विवर्षायू (एका किंवा दोन हंगामात जीवनक्रम पूर्ण होणारी) वनस्पती भाजीकरिता पिकविली जाते व त्याकरिता मुळे, पाने व शेंगा यांचा उपयोग करतात. तिचा प्रसार जगभर असून रॅफॅनस या तिच्या प्रजातीत एकूण दहा जाती आहेत बहुतेक जाती भूमध्य सामूहिक प्रदेशातील असून रॅ. सटाव्हस ही जाती तेथूनच भारतात आणली गेली असावी असे मानतात. काही शास्त्रज्ञांच्या मताप्रमाणे मुळ्याचे मूलस्थान मध्य व पश्चिम चीन आणि भारत या भागात असावे. इतिहासपूर्व कालात तेथे मुळ्याचा खाद्यान्न म्हणून वापर होत होता. महाभारत, कौटिलीय अर्थशास्त्र, चरकसंहिता इ. संस्कृत ग्रंथांत ‘मूलक’ या नावाने मुळ्याचे उल्लेख आढळतात. खोड साधे अथवा शाखायुक्त, उन्नत, २०–१०० सेंमी तळाकडील पाने लांब वीणाकृती, पिच्छाकृती अथवा अपूर्ण पिच्छाकृती, दातेरी स्कंधोद्‌भवी पाने साधी, रेषानुसारी फुले अग्रस्थ लांब मंजरीवर फिकट लाल अथवा पांढरी फळ सार्षप (शेंगा अथवा डिंगऱ्या) २५ ते ९० मिमि. लांब फुगीर व निमुळत्या लांब चोचीयुक्त असून अनियमितपणे जागोजागी संकुचित असते, अथवा मुळीच संकुचित नसते. प्रत्येक फळात २ ते ८ गोलसर पिवळ्या किंवा तपकिरी बिया असतात. मुळांचा आकार, रंग, आकारमान, पेरणीपासून काढणीपर्यंतचा कालावधी, चव या बाबतींत भिन्न असे अनेक प्रकार या जातीत आढळून येतात. मुळा कच्चा अथवा भाजी करून खातात. कच्चा मुळा खाल्ल्यास भूक वाढते व पचन सुधारते. लघवीचे विकार, मूळव्याध, यकृताचे विकार, वाढलेली प्लीहा (पानथरी) व कावीळ यांवर मुळा गुणकारी आहे. पानांचा रस व बी लघवी साफ करणारे असतात. मुळे, पाने, फुले व शेंगा यांचा ग्रॅमव्यक्त (ग्रॅम यांच्या रंजक क्रियेने तयार होणारा जांभळटसर रंग टिकून राहणाऱ्या) सूक्ष्मजंतूंवर प्रतिकूल परिणाम होतो. या वनस्पतीची सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ क्रुसीफेरी कुलात (मोहरी कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.

क्षीरसागर, ब. ग. परांडेकर, शं. आ.

मुळ्याची भारतात सर्वत्र लागवड होते व मोठ्या शहरांच्या आसपास ती मोठ्या प्रमाणावर आढळून येते, समुद्रसपाटीपासून ३,००० मी. उंचीवरील हिमालयातील डोंगराळ भागात हे पीक वाढू शकते. हे थंड हवामानातील पीक आहे परंतु काही स्थानिक प्रकारांची वर्षभर लागवड करता येते. दक्षिण भारतात हे पीक वर्षभर लागवडीत असते. उत्तर भारतातील सपाटी प्रदेशात देशी प्रकार ऑगस्टपासून जानेवारीपर्यंत व यूरोपियन प्रकार सप्टेंबरपासून मार्चपर्यंत पेरतात. डोंगराळ भागात मार्च ते जुलैपर्यंत पेरणी करतात. दक्षिण भारतातील डोंगराळ भागात पेरणीसाठी एप्रिल ते जून हा कालावधी सर्वांत चांगला असतो आणि सपाटीच्या प्रदेशात तो ऑक्टोबर ते डिसेंबर हा असतो. हे जलद वाढणारे पीक असून प्रकाराप्रमाणे पेरणीपासून ३० ते ५० दिवसांत तयार होते. १०° ते १५° से. तापमानात पोसलेल्या मुळ्यांचा स्वाद आणि गाभ्याची रचना चांगली असून त्यांचे आकारमानही चांगले असते.

हे पीक कोणत्याही जमिनीत वाढते. सुपीक व वाळूमिश्रित दुमट जमिनीत ते चांगले येते. फार भारी जमिनीत मुळांचा आकार वेडावाकडा होतो.

प्रकार : भारताच्या वेगवेगळ्या भागांत मुळ्यांचे देशी व विदेशी प्रकार लागवडीत आहेत. विदेशी प्रकारात आशियाई व यूरोपियन असे भेद आहेत. सर्वसामान्य लागवडीत असलेले देशी प्रकार पांढऱ्या रंगाचे ३·५ ते ५ सेंमी. व्यासाचे, शंक्वाकार, २५–४० सेंमी. लांबीचे आणि यूरोपियन प्रकारांपेक्षा जास्त तिखट असतात. यूरोपियन प्रकारांत तांबडे, जांभळे अथवा शेंदरी मुळे आढळून येतात. परंतु पांढऱ्या लांब मुळ्याप्रमाणे ते सर्वसामान्य लागवडीत नाहीत.

देशी प्रकार : लागवडीतील जुने व सुधारित देशी प्रकार पुढीलप्रमाणे आहेत : (१) बारामासी : या प्रकारची वर्षभर लागवड करता येते. (२) जौनपुरी अथवा नेवारी : या प्रकाराचे मुळे प्रचंड आकारमानाचे (७५–९० सेंमी. लांब व ५०–६० सेंमी. घेराचे) असून त्यांचे वजन ५ पासून १५ किग्रॅ. अथवा जास्तही असते. जौनपूर (उत्तर प्रदेश) भागात आढळून येणाऱ्या मचूळ पाण्यावरच हा प्रकार चांगल्या प्रकारे वाढतो असे म्हणतात. (३) पुसा चेतकी : ४०–४५ दिवसांत तयार होणाऱ्या पांढऱ्या मुळाच्या, सौम्य प्रमाणात तिखट असलेल्या प्रकाराचे हेक्टरी सरासरी उत्पादन २०० ते ३०० क्विटंल असते. (४) पुसा देशी : मुळे ३०–४५ सेंमी. लांब, टोकाकडे निमुळते व तिखट असून खोडाकडील टोक हिरवे असते. (५) व्हाइट –५ : हा प्रकार पुसा देशीप्रमाणेच असतो व ६० ते ७० दिवसांत तयार होतो. (६) पुसा रेशमी : मुळे पुसा देशीप्रमाणे परंतु पेरल्यापासून फक्त ३०–३५ दिवसांत तयार होणारा हा प्रकार आहे. (७) सिलेक्शन – २७१ : ३०–४० सेंमी. लांब, स्वच्छ, पांढरे व सौम्य तिखटपणा असलेले मुळे या प्रकारात असून हेक्टरी ३०० क्विंटल उत्पादन मिळते. या प्रकाराचे वैशिष्ट्य म्हणजे मुळे शेतातून काढल्यावर सु. १० दिवसांपर्यंत खाद्य असतात. याशिवाय तांबडा लांब, जांभळा लांब, कनौजी, मुंबई लाल, लखनवी वगैरे देशी प्रकार लागडीत आहेत.

आशियाई प्रकार : या प्रकारांचे मुळे गुळगुळीत, कुरकुरीत, भरलेले व सौम्य तिखट असतात. ते सर्वसाधारणपणे ३·५–५ सेंमी व्यासाचे व २२–३० सेंमी लांब असतात. उदा., जॅपनीज व्हाइट (४५ दिवसांत तयार होणारा) मुळा स्वच्छ पांढरा व ३० ते ४५ सेंमी लांब असतो. आय एच आर १–१ (५५ दिवसांत तयार होणारा) आणि सकुराजुमा हे इतर प्रकार आहेत.

यूरोपियन प्रकार : देशी प्रकाराइतके हे प्रकार भारतात लोकप्रिय नाहीत. ते आकारमानाने लहान असून तयार झाल्यावर काही दिवसांतच आतून भेंडासारखे बनतात. तयार झाल्यावर ताबडतोब खाल्ल्यास चवीला फार चांगले व गोड असतात.

(१) व्हाइट आइसीकल : हा प्रकार स्वच्छ, पांढरा बारीक व नाजुक असून पेरल्यापासून ३० दिवसांत तयार होतो. (२) रॅपिड रेड व्हाइट टिप्ड : हा प्रकार पेरणीपासून फक्त २५ दिवसांत तयार होतो. मुळे गर्द लाल रंगाचे व गोलाकार असतात. टोक पांढरे असते. मगज (गर) पांढरा, कुरकुरीत व चवीला तिखट असतो. पुसा हिमानी, स्कार्लेट ग्लोब, फ्रेंच ब्रेकफास्ट हे इतर यूरोपियन प्रकार आहेत.

लागवड : मुळे जमिनीत वाढत असल्यामुळे जमिनीची पूर्व मशागत चांगल्या प्रकारे करतात. हेक्टरी ४० टन शेणखत मशागतीच्या वेळी जमिनीत मिसळतात. सरीच्या वरंब्याच्या बगलेत २६ सेंमी. उंचीवर बी टोकतात. दोन सऱ्यांत सु. ५० सेंमी. अंतर ठेवतात. मुळ्याची लागवड सपाट वाफ्यातही ३० X १५ सेंमी. अंतरावर बी लावून करतात. मिश्र पीक घेतलेले असेल तेव्हा वाफ्याच्या बांधावर १५–२० सेंमी. अंतरावर बी टोकतात. रोपे वाढू लागल्यावर विरळणी करून दोन झाडांतील अंतर १० सेंमी. अथवा जास्त ठेवतात. हेक्टरी १०० किग्रॅ. नायट्रोजन, ५० किग्रॅ. फॉस्फोरिक अम्ल आणि ७० किग्रॅ. पोटॅश देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. या पिकाला भरपूर पाणी लागते. सौम्य प्रमाणात तिखट, मऊ आणि आकर्षक मुळे तयार होण्यासाठी पिकाची वाढ जलद गतीने होणे जरूर असते. मोठ्या आकारमानाच्या मुळ्यांना निदान एकदा मातीची भर देतात.

रोग व किडी : या पिकावर विशेष नुकसानकारक रोग आढळून येत नाहीत. किडींमध्ये ⇨ मावा व ⇨ काळी माशी  या महत्त्वाच्या आहेत.


काढणी व उत्पादन : खाण्यासाठी मुळे कोवळे व कुरकुरीत असतानाच काढतात. उशीर झाल्यास ते चिवट, पोकळ, व भेंडासारखे बनतात. पेरणीपासून प्रकाराप्रमाणे ३० ते ५० दिवसांत मुळे तयार होतात. मुळा जमिनीतच वाढू दिल्यास पुढे त्याला जमिनीवर फुलोरा येतो आणि नंतर लहान शेंगा (डिंगऱ्या) येतात. कोवळेपणी त्यांचीही भाजी करतात. देशी प्रकारांचे हेक्टरी १५० ते २०० क्विंटल (मुळे) व यूरोपियन प्रकारांचे ७५ क्विंटल उत्पादन मिळते. 

रासायनिक संघटन : पांढऱ्या देशी मुळ्यात ९४·४% जलांश, ०·७% प्रथिने, ०·१% वसा (स्निग्ध पदार्थ), ३·४ % कार्बोहायड्रेटे आणि ०·६% लवणे असतात. यांशिवाय त्यात अनेक सुक्ष्म पोषक द्रव्ये असतात. गुलाबी मुळ्यांत जलांश कमी (९०·८ %) आणि कार्बोहायड्रेटे जास्त (६·८%) असतात. इतर घटकांचे प्रमाण स्थूलमानाने पांढऱ्या मुळ्यांप्रमाणेच असते. मुळ्यात अ व क ही जीवनसत्त्वे असतात. गुलाबी सालीच्या प्रकारात ते पांढऱ्या मुळ्यापेक्षा जास्त असते आणि ते मुख्यत्वेकरून सालीत असते. मुळ्याच्या पाल्यात अ व क ही जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम व लोह पुष्कळ प्रमाणात असतात. अ जीवनसत्त्वाच्या बाबतीत समृद्ध असलेल्या पालेभाज्यांत मुळ्यांच्या पाल्याचा अंतर्भाव होतो. साठवणीमध्ये, शिजविताना अथवा वाळविल्यावर क जीवनसत्व पुष्कळ प्रमाणात कमी होते. बियांत ३० ते ५०% तेल असते व त्याचा साबण तयार करण्यासाठी, दिव्यात जाळण्यासाठी अथवा खाद्य तेल म्हणून वापर करता येणे शक्य आहे.

मोगरीच्या शेंगा

बीजोत्पादन : मुळ्यांच्या देशी व काही परदेशी प्रकारांचे बीजोत्पादन सपाटीवरील प्रदेशात करता येते परंतु समशीतोष्ण हवामानातील यूरोपियन प्रकारांचे बीजोत्पादन जेथे तापमान सतत दीड ते दोन महिने ५° से. च्या आसपास असते, अशा काही टेकड्यांमध्येच करता येते. हिमाचल प्रदेशातील कुलू खोऱ्यात अशा परदेशी प्रकारांचे बीजोत्पादन केले जाते. बीजोत्पादनाच्या एका पद्धतीत मुळ्याचे पीक मुळे न काढता शेतातच राहू देतात व त्याला फुले व शेंगा धरतात. पूर्ण वाळलेल्या शेंगा बडवून बी काढले जाते. दुसऱ्या पद्धतीत तयार झालेले मूळ काढून त्यांतील निवडक मुळे, त्यांचा खालचा काही भाग कापून पुन्हा शेतात लावतात व त्यांवर फुले व शेंगा धरतात. पहिली पद्धत बियांचे जास्त उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने चांगली आहे व उत्तम प्रतीचे बी उत्पादन करण्यासाठी दुसरी पद्धत चांगली आहे. मुळ्याचे पीक परपरागित असून परागणात कीटकांचा महत्त्वाचा भाग असतो [⟶ परागण]

मोगरी : (हि. सुं ग्रा. सिंप्री. मुग्रा इं. रॅटटेल रॅडिश लॅ. रॅ. कॉडेटस). ही वर्षायू वनस्पती उत्तर व पश्चिम भारतात लागवडीत आहे. जाभळट रंगाचे खोड प्रथम उन्नत असते. नंतर ते जमिनीवर लोळते. पाने आणि फुले सामान्य मुळ्याप्रमाणे असतात परंतु जमिनीत लठ्ठ मुळे न येता झाडाला जांभळट रंगाच्या ७५ सेंमी. पर्यंत लांबीच्या व बारीक आकारमानाच्या शेंगा (सार्षप) येतात. त्यांचे जागोजागी संकुचनामुळे फुगीर झालेले भाग मण्यांमध्ये दिसतात. त्या कच्च्या अथवा भाजी करून खातात. स्थानिक बाजारात २०–२५ सेंमी. लांबीच्या शेंगा मिळतात परंतु ६०–७५ सेंमी पेक्षाही लांब शेंगा असलेले प्रकार लागवडीत आहेत. 

संदर्भ : 1. Chauhan, D. V. S. Vegetable Production in India, Agra 1972.

      2. Choudhary. B. Vegetables, New Delhi, 1967.

      3. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VIII, New Delhi, 1969.

      4. I. C. A. R. Handbook of Agriculture, New Delhi, 1980.

पाटील, ह. चिं. गोखले, वा. पु.

मुळ्याचे काही प्रकार : (१) पुसा देशी व्हाईट, (२) रॅपिड रेड लाँग, (३) स्कार्लेट ग्लोब, (४) जॅपनीज व्हाईट, (५) रॅपिड रेड राऊंड.