मुहलेनबेकिया : ही पॉलिगोनेसीतील (चुका कुलातील) एक वनस्पति-प्रजाती असून हिचे मुहलेनबेकिया हे नाव स्विस डॉक्टर एच्. जी. मुहलेनबेक यांच्या नावावरून देण्यात आले आहे. या प्रजातीत सु. पंधरा जाती असून त्यांचा प्रसार दक्षिण समशीतोष्ण कटिबंधात आहे. या सर्व आरोही (आधारावर चढणाऱ्या) किंवा सरळ उभ्या वाढणाऱ्या सामान्यतः काहीशा झुडुपवजा व शोभेच्या वनस्पती आहेत. त्यांची पाने एकाआड एक असतात व त्यांच्या तळाला आवरक (वेढणारी) उपपर्णे (लहान उपांगे) असतात. फुले एकलिंगी, लहान असून पानांच्या बगलेत झुपक्याने येतात. परिदल मंडल पाच, जवळजवळ समान खंडांचे (भागांचे) बनलेले असते. केसरदले आठ किंजपुट एककोशिक (एकाच पेशीचे बनलेले) व त्यात एकच बीजक असते आणि आणि किंजल तीन असतात. [⟶ फूल]. कृत्स्नफल [शुष्क एकबीजी फळ ⟶ फळ], विशालकोनी किंवा लघुकोनी, त्रिकोनी, कवचीयुक्त व रसाळ परिदलमंडलाएवढे असते.
मुहलेनबेकिया प्लॅटिक्लॅडा : (इं. सेंटिपीड प्लँट लॅ. होमॅनोक्लॅडियम प्लॅटिक्लॅडम, कोकोलोबा प्लॅटिक्लॅडा कुल-पॉलिगोनेसी). ही या प्रजातीतील आकर्षक, उभी झुडपांसारखी वनस्पती शोभेसाठी बागेत लावतात. ही मूळची दक्षिण समशीतोष्ण कटिबंधातील (सॉलोमन बेटे) असून हल्ली इतर अनेक प्रदेशात लावली जाते. हिचे खोड व फांद्या हिरव्या, रुंद, पसरट फितीसारख्या, गुळगुळीत, चकचकीत असून त्यावर खोबणीसारख्या बारीक रेषा असतात. शास्त्रीय दृष्ट्या पानासारख्या दिसणाऱ्या अशा खोडांना किंवा फांद्यांना ‘पर्णक्षोड’ म्हणतात [⟶ खोड]. पाने फारच कमी, लवकर गळून पडणारी, साधी, पातळ, एकाआड एक, आयत-खड्गाकृती किंवा भाल्यासारखी असतात. फुले लहान, एकलिंगी, पांढरी असून त्यांचे लहान झुबके सपाट फांद्यांच्या किनारीवर सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये येतात. परिदले ५, केसरदले ८, किंजकुटात एकच कप्पा व त्यात एकच बीज असते. कृत्स्नफल त्रिकोनी व मांसल, परिदलांनी सतत वेढलेले व पिकल्यावर गर्द तांबडे किंवा जांभळट लाल आणि आकर्षक दिसते. हिची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ पॉलिगोनेसीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे असतात. खोडाचे तुकडे लावून हिची लागवड करतात.
पहा : खोड.
जमदाडे, ज. वि.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..