मुक्तेश्वर : (?-?). श्रेष्ठ मराठी कवी. संत एकनाथांचा तो नातू होय. मुक्तेश्वरासंबंधी अनेक प्रकारचे मतभेद आहेत. पहिला मतभेद त्याच्या जन्मकाळाचा. या संबंधात मुख्यतः पुढील दोन शकवर्षांचा वाद आहे. शके १५३१ आणि शके १४९५–९६. पैकी पहिले शकवर्ष मुक्तेश्वराचे जन्मवर्ष म्हणून महाराष्ट्र सारस्वतकारांनी मानले, तर दुसरे प्रा. द. सी. पंगूंनी. हा प्रश्न अद्याप अनिर्णित आहे. दुसरा वाद मुक्तेश्वराच्या नावाचा. त्याचे मुक्तेश्वर हे नाव व्यक्तिनाम की मुद्रानाम असा प्रश्न आहे. पण ते व्यक्तिनामच दिसते. त्याच्या काव्यात येणारी विश्वंभर आणि लीलाविश्वंभऱ ही पदेही वादग्रस्त ठरली आहेत. लीलाविश्वंभर त्याचे मातापिते की गुरू असा हा प्रश्न. वरील वादग्रस्त प्रश्न वगळल्यास मुक्तेश्वराविषयी पुढील गोष्टी सर्वमान्य आहेत. त्या अशा : तो संत एकनाथांच्या मुलीचा मुलगा, त्याच्या पित्याचे नाव चिंतामणी, गोत्र अत्री, आराध्य दैवत दत्त, कुलस्वामिनी कोल्हापूरची महालक्ष्मी व कुलदैवत सोनारीचा भैरव आणि त्याचे वास्तव्य गोदातीरी पैठण येथे. या सर्व गोष्टीही पूर्णपणे सत्य आहेतच असे नाही, असे अ. का. प्रियोळकरांनी त्याच्या आदिपर्वाच्या संपादनाच्या निमित्ताने लिहिलेल्या ‘मुक्तेश्वराचा शोध’ या निबंधावरून दिसते. मुक्तेश्वराचे मृत्यूस्थळ तेरवाड परंतु त्याचा मृत्युकाळही अज्ञातच आहे.
मुक्तेश्वराची ग्रंथरचना पुढीलप्रमाणे आहे : (१) संक्षेप रामायण (२) स्फुट काव्ये (३) भारताची पर्वे. रचनेचा क्रमही वरीलप्रमाणेच दिसतो. प्रथम त्याने संक्षेपरामायण लिहिले. १,७२२ ओव्यांचे हे सात कांडी रामायण मुख्यतः एकनाथांच्या भावार्थ रामायणावर आधारलेले असून त्या बृहद्ग्रंथाच्या मानाने हे खूपच आटोपशीर आहे. ते लिहिताना मुक्तेश्वरांपुढे संस्कृत पंचमहाकाव्यांचा आदर्श असावा, असे त्यातील कांडात्मकता किंवा सर्गयुक्तता, वर्णने, वृत्तयोजना, अलंकार-प्राचुर्य, पदलालित्य इत्यादींवरून वाटते. त्याने ते विविध अक्षरगणवृत्तांत रचिले असून यमक, अनुप्रास. श्लेष इ. शब्दालंकारांवर त्याचा भर आहे. त्यावरूनही त्याचे प्रथमत्व जाणवते.
मुक्तेश्वराच्या स्फुट काव्यांत शुकरंभासंवाद, गजेंद्रमोक्ष, हनुमंताख्यान, विश्वामित्रभोजन, हरिश्चंद्राख्यान इ. पौराणिक आख्याने येतात. यांशिवाय त्याने एकनाथचरित्र लिहिले असून भगवद्गीतेचा श्लोकबद्ध अनुवादही त्याने केला आहे. मूर्खाची लक्षणे या नावाचे एक लहानसे प्रकरणही त्याच्या नावावर आहे. याला आधार महाभारताच्या उद्योगपर्वात विदुराने धृतराष्ट्राला दहा श्लोकांत मूढलक्षणे सांगितली आहेत, त्याचा आहे. त्याशिवाय पदे, आरत्या वगैरे आहेत त्या निराळ्याच. या सर्व स्फुटरचनेची ग्रंथसंख्या अडीच हजारांच्या घरात जाते. ही सर्व काव्ये आकाराने लहान असली, तरी त्यांतूनही त्याचे अस्सल कवित्व जाणवते.
मुक्तेश्वराची कीर्ती त्याच्या भारतीय पर्वामुळे आहे. आतापर्यंत त्याची आदि, सभा, वन, विराट आणि सौप्तिक ही पाच पर्वे उपलब्ध झाली असून त्याने तेवढीच लिहिली असे वाटते. मूळ संस्कृत महाभारत पुढे ठेऊन त्याने ही पाच भारतीय पर्वे रचली. तसेच त्याच्या पूर्वी झालेले प्राकृत भारतीय ग्रंथ त्याने पाहिले होते आणि प्रसंगविशेषी जे महाभारतात नाही तेही मुक्तेश्वराने सांगितले आहे. आपल्या भारतासाठी त्याने ओवीछंद योजिला असून त्याची ओवी लवचिक आणि गतिमान आहे. ज्ञानेश्वरीनंतर इतकी सुंदर आणि अर्थवाही ओवी मुक्तेश्वराचीच आढळते. त्याचा आत्मविश्वास दांडगा असून
‘मुक्तेश्वराचा वाग्विलास । देशभाषा परि संतोष ।
मानूनिया साक्षीलागी व्यास । उभा असे जवळिके ।।’
असे तो आत्मप्रत्ययाने म्हणू शकतो. त्याची ही भारतीय पर्वे म्हणजे सुंदर आख्यानक कवितेची खाणच असून दुष्यन्त-शुकुंतला, नल-दमयंती आणि सावित्री यांची त्याने गायिलेली आख्याने ही, त्या खाणीतील निवडक रत्ने आहेत. मुक्तेश्वर सर्व लोकांत मिसळणारा कवी असला पाहिजे. त्याच्या भारतात तत्कालीन समाजस्थितीचे प्रतिबिंब पडले आहे. लोकांच्या चालीरीती, वस्त्रेपात्रे, आहारविहार, व्यापारटापार इ. सामाजिक व्यवहारातील तपशील मुक्तेश्वर सहजपणे सांगून जातो. त्याबरोबरच त्याच्या या हव्यासामुळे त्याच्या काव्यात कालविपर्यास व अनौचित्य हे दोषही निर्माण झाले आहेत. दुष्यन्ताने जिंकलेल्या राजांमध्ये फिरंगी, इंग्रज ह्यांसारख्याचा समावेश करण्याची त्याला दिक्कत वाटत नाही. पण हे दोष किरकोळ असून त्यांमुळे त्याच्या रससिद्धत्वाला कोणत्याही प्रकारे बाध येत नाही. रसोत्कटता, निवेदनशैली, वर्णनकौशल्य, व्यक्तिचित्रण, अलंकारयोजना ही त्याच्या आख्यानक कवितेची वैशिष्ट्ये आहेत. परंपरित सांग रूपके तो कौशल्याने योजतो.
मुक्तेश्वर स्वतः व्यासंगी ग्रंथकार असूनही त्याची बहुश्रुतता त्याच्या काव्याच्या आड आलेली नाही. पांडित्य आणि रसिकता यांचा संगम त्याच्या ठिकाणी दिसून येतो. पण स्थायिभाव शृंगाराचा असल्यामुळे व कोठे थांबावे याचा विवेक क्वचिच सुटल्यामुळे त्याच्या हातून काही ठिकाण उत्तान, उच्छृंखल रचनाही झाली आहे. पण त्याची शैलीच इतकी मोहक आहे, की ती अश्लीलावरही काव्यात्मकतेचे पांघरूण घालू शकते. पण त्यामुळे संयमाचा आणि युक्तायुक्त विचाराचा अभाव हा दोष झाकला जात नाही. त्याचे एकूण काव्य पाहता ‘अध्यात्माचे वाङ्मयावरील जोखड फेकून देणारा पहिला कवी’ हे त्याचे रा. श्री. जोग यांनी केलेले वर्णन सार्थ वाटते.
संदर्भ : १. नांदापूरकर, मा. गो. मुक्तमयूरांची भारते, हैदराबाद, १९५६.
२. पांगारकर, ल. रा. कविवर्य मुक्तेश्वर, पुणे, १९२२.
३. प्रियोळकर, अ. का. मुक्तेश्वराचा शोध, प्रस्ता. आदिपर्व, खंड १, मुंबई, १९५१.
४. भिडे, बा. अ. मुक्तेश्वर, मुंबई, १९२६.
तुळपुळे, शं. गो.