मुकर्जी, आशुतोष : (२९जून १८६४–२५ मे १९२४). प्रसिद्ध शिक्षणशास्त्रज्ञ. कलकत्ता येथे गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्म. चौदाव्या वर्षी शालान्त परीक्षा उत्तीर्ण. महाविद्यालयीन शिक्षण प्रेसीडेन्सी कॉलेज, कलकत्ता येथे. विसाव्या वर्षी बी. ए. परीक्षेत सर्वप्रथम, एम्. ए. परीक्षेत गणित विषयात प्रथम श्रेणीत प्रथम तसेच चोवीसाव्या वर्षी बी. एल्. ही पदवी मिळवून ते तीन वर्षे टागोर सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. लॉ ऑफ परपेच्युइटीज हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ. पाली, फ्रेंच, रशियन इ. भाषाही त्यांना अवगत होत्या.
आशुतोष यांना अष्टपैलू बुद्धिमत्तेचे लेणे लाभले होते. त्यांनी गणित विषयात संशोधन केले. या संशोधनात अंतर्भूत असलेल्या प्रमेयांचा केंब्रिज विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झाला. उत्तम अध्यापक, वकील, वादविवादपटू व न्यायाधीश म्हणून त्यांचा लौकिक होता, त्याचप्रमाणे शिक्षणशास्त्रज्ञ म्हणूनही ते प्रसिद्ध होते. मार्च १९१९ मध्ये सॅडलर आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालाशी संबंधित असलेल्या सहा सदस्यांपैकी ते एक होते. कलकत्ता विद्यापीठाचे ते उपकुलगुरू होते. (१९०४–१८ १९२१–२३). या काळात कलकत्ता विद्यापीठाला प्राचीन नालंदा विद्यापीठासारखे स्वरूप देण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. प्रौढ शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी बहुमोल कार्य केले. सी. एस्. आय्. (१९०७) व नाइट (१९११) ह्या पदव्या शासनातर्फे त्यांना देण्यात आल्या. पाटणा येथे त्यांचे निधन झाले.
मिसार, म. व्यं.