मुंजे, बाळकृष्ण शिवराम : (१२ डिसेंबर १८७२–३ मार्च १९४८). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक नेते, हिंदुमहासभेचे अध्यक्ष आणि निष्ठावान टिळकानुयायी. त्यांचा जन्म मध्य प्रांतातील बिलासपूर या गावी सामान्य ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांचे वडील महसूल खात्यात काम करीत. बाळकृष्णांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण बिलासपूरला झाले. शारीरिक कसरती, पोहणे आणि घोड्यावर बसणे हे त्यांचे लहानपणापासूनचे आवडते छंद. मॅट्रिकला असताना त्यांचा विवाह डॉ. कृष्णराव पारधी यांच्या बहिणीबरोबर झाला (१८९१). त्यांचे नाव कृष्णाबाई. हिस्लॉप महाविद्यालयातून (नागपूर) ते इंटरमीजिएटची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि ग्रँट मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून त्यांनी एल्. एम्. अँड एस्. ही वैद्यकातील पदवी घेतली (१८९८). त्यानंतर दोन वर्षे त्यांनी मुंबईत महापालिकेच्या प्लेग उपचार विभागात नोकरी केली. नंतर बोअर युद्धाच्या वेळी ते वैद्यकीय सेवाकार्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील ब्रिटिश सैन्यात दाखल झाले (१९००). दर्बानमध्ये ते आठवडाभर गांधीजींजवळ राहिले होते. नंतर त्यांची पीटर मॉरिट्बर्ग व रूईपॉइंट येथील लष्करी छावण्यांत अनुक्रमे नेमणूक झाली. भारतात परतल्यानंतर त्यांनी कलकत्ता, बनारस, प्रयाग, कानपूर, पेशावर आदी शहरांना भेटी दिल्या आणि नंतर नागपूरला वैद्यकीय व्यवसायास सुरुवात केली (१९०१). लवकरच त्यांनी नेत्रतज्ञ म्हणून नावलौकिक मिळविला. ‘स्मिथ थिअरी’ या नावाने प्रसिद्ध असणारी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेची अभिनव पद्धत त्यांनी शोधून काढली. पुढे आयुर्वेदावरील प्राचीन ग्रंथाचा अभ्यास करून त्यांनी नेत्रचिकित्सा नावाचा ग्रंथ संस्कृत भाषेत प्रसिद्ध केला (१९३०).
रायगडला शिवजयंती उत्सवाच्या वेळी त्यांचा लोकमान्य टिळकांशी परिचय झाली (१८९८). मुंबईच्या १९०४ च्या काँग्रेस अधिवेशनाला ते हजर राहिले. त्यांचा लो. टिळकांशी दाट परिचय झाला. त्यांनी हिंदू सामाजिक सुधारणांसंबंधीची आपली टिपणे टिळकांना दाखविली. टिळकांनी ती प्रकाशित करावीत, असे सुचविले. यानंतर लोकमान्यांना त्यांनी आपले राजकीय गुरू मानले व टिळकप्रणीत सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांत ते हिरिरीने भाग घेऊ लागले. राष्ट्रसेवेसाठी त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सोडला आणि काँग्रेसने पुरस्कारलेल्या चतुःसूत्रांच्या प्रसार-प्रचार कार्यात ते सहभागी झाले. त्यांनी मध्य प्रांतात गणेशोत्सव आणि शिवजयंती यांसारखे उत्सव सुरू केले. नागपूरला त्यांनी स्वदेशी वस्तूंचे दुकान काढले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी टिळकांनी होमरूल लीगची चळवळ सुरू केली. मुंजे तीत सामील झाले. याच सुमारास भारतीय सांस्कृतिक परस्परांचे जतन व्हावे, म्हणून त्यांनी नागपूरला कीर्तनकारांची परिषद बोलाविली (१९१७). टिळकांच्या मृत्युनंतर मुंज्यांनी गांधीजींच्या असहकार आंदोलनात भाग घेतला (१९२१). पुढे जंगल सत्याग्रहात त्यांना दोनदा अटक झाली. त्यांनी स्वराज्य पक्षातही काही दिवस काम केले. नंतर हिंदुमहासभेत ते सामील झाले आणि अखेरपर्यंत या पक्षातच राहिले. त्यांची हिंदुमहासभेचे अध्यक्ष म्हणून तसेच मध्यवर्ती कायदेमंडळावर निवड झाली (१९२६). ते गोलमेज परिषदेला महासभेचे प्रतिनिधी म्हणून इंग्लंडमध्ये उपस्थित होते. हरिजनांच्या मागण्यांसंबंधी एम्. सी. राजा यांच्याबरोबर त्यांनी करार केला. तो राजा-मुंजे करार या नावाने प्रसिद्ध आहे. पुढे हिंदुमहासभेच्या वतीने संसद समितीत त्यांना प्रतिनिधित्व मिळाले (१९३३). मुंजे प्रथमपासून लष्करी शिक्षणाचे पुरस्कर्ते होते आणि त्याशिवाय देशाला तरणोपाय नाही, असे त्यांचे मत होते. म्हणून त्यांनी नागपूर येथे रायफल असोसिएशन काढली आणि पुढे मध्यवर्ती हिंदू लष्करी संस्था स्थापून नासिकजवळ भोंसला मिलिटरी स्कूलची उभारणी केली (१९३७). हिंदू कायद्यात कालोचित पुरोगामी दृष्टीने सुधारणा घडविण्यासाठी त्यांनी नवीन मनुस्मृती लिहिली पण ती अप्रकाशित राहिली. उर्वरित आयुष्य त्यांनी हिंदुमहासभा व भोंसला मिलिटरी स्कूल यांच्या सेवाकार्यात व्यतीत केले. त्यांच्या धार्मिक कार्याबद्दल त्यांना ‘धर्मवीर’ असा किताब लोकांनी दिला होता.
वृद्धापकाळाने त्यांचे नागपूर येथे निधन झाले.
संदर्भ : १. हरदास, बाळशास्त्री, धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचे चरित्र भाग २, पुणे, १९६६.
देशपांडे, सु. र.