मीर जुम्ला : ( ?–१ एप्रिल १६६३). मोगल काळातील एक धूर्त मुत्सद्दी आणि व्यापारी. त्याच्या पूर्वायुष्याबद्दल फारशी माहिती ज्ञात नाही. त्याचे पूर्ण नाव मीर जुम्ला मीर मुहम्मद सय्यद. त्याचे वडील इराणात तेलाचा धंदा करीत होते. १६३० मध्ये मीर जुम्ला व्यवसायानिमित्त भारतात आला आणि गोवळकोंड्यात स्थायिक झाला. तिथे तो जडजवाहिरांचा धंदा करू लागला. पुढे त्याने सुलतान अब्दुल कुत्बशाह (कार.१६२६–७२) याजकडे नोकरी धरली. हळूहळू तो मंत्रिपदावर चढला. मीर जुम्लाने यूरोपियन पलटणी नोकरीस ठेवून आपला व्यापार वाढविला आणि कडप्पा, गंडीकोटासारखे किल्ले व हिऱ्यांच्या खाणी ताब्यात घेतल्या. व्यापारानिमित्त त्याची जहाजे पश्चिम आशियात संचार करीत. त्यामुळे तो अत्यंत श्रीमंत झाला. कुत्बशाहला त्याची संपत्ती, प्रतिष्ठा व सत्ता यांबद्दल मत्सर निर्माण झाला. तेव्हा त्याने त्याची कुटुंबीय मंडळी तुरुंगात टाकली आणि संपत्ती जप्त केली (१६५५). मीरने मोगलांशी संगनमत करून अखेर गोवळकोंड्याविरुद्ध कारस्थानाला प्रारंभ केला आणि शाहजहानची नोकरी पतकरली (१६५६). शाहजहानने त्याला मुख्य वजीर केले. या सुमारास शाहजहानच्या आजारपणामुळे त्याच्या मुलांत वारसा युद्धाला तोंड फुटले. मीर जुम्लाने नाइलाजाने औरंगजेबाची बाजू घेतली आणि धर्मतच्या युद्धात त्याला विजय मिळवून दिला. औरंगजेबाने त्याची शुजाविरुद्ध नेमणूक केली. पुढे तो बंगालचा सुभेदार झाला (१६६०). औरंगजेबास कुचबिहार व आसाम प्रांत त्याने जिंकून दिले. आसाममध्ये तेथील हवामान व डोंगराळ प्रदेश यांमुळे मोगल सैन्याचे फार हाल झाले. या हवामानाने मीर जुम्ला अखेर आजारी पडला आणि त्यातच त्याचे डाक्का येथे निधन झाले. त्याचा मुलगा महंमद अमीन काही दिवस दिल्ली येथे होता.
संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. The Mughal Empire, Bombay, 1974.
२. बेंद्रे, वा, सी. गोवळकोंड्याची कुत्बशाही. पुणे, १९३४.
देवधर, य. ना.