मीनीझ : (इ. स. पू. सु. ३१६८–३१४१). प्राचीन ईजिप्शियन संस्कृतींमधील पहिल्या राजवंशातील पहिला राजा. त्याची माहिती ऐतिहासिक पुराव्यांतून थोडीबहुत मिळते. ईजिप्शियन इतिहासकार मॅनेथो (इ. स. पू. तिसरे शतक) त्याला मेनी म्हणतो तर ग्रीक इतिहासकार हीरोडोटस (इ. स. पू. पाचवे शतक) त्याला मिन म्हणतो. ईजिप्शियन राजांच्या एकोणिसाव्या वंशाच्या (इ. स. पू. तेरावे शतक) दप्तरात त्याचा मेनी असा उल्लेख आहे. काही आधुनिक इतिहासकार आर्षकालातील स्कॉर्पिअन, नर्मर व आह ही नावे दर्शविणारे राजे म्हणजेच परंपरागत राजा मीनीझ मानतात. काही पुराभिलेखतज्ञांच्या मते नर्मर म्हणजेच मीनीझ असून, कैरो वस्तुसंग्रहालयातील प्राचीन अलंकृत मृत्पात्रावर या राजाच्या पांढऱ्या व तांबड्या रंगांचे मुकुट धारण केलेल्या मुद्रा आढळतात. हे दोन राजमुकुट उतर-दक्षिण राज्यांच्या एकत्रीकरणाचे प्रतीक असावेत. ऐतिहासिक परंपरेनुसार याने दक्षिण आणि उत्तर ईजिप्त या दोन स्वतंत्र राज्यांचे एकत्रीकरण करून एक बलाढ्य राज्य स्थापन केले आणि सरहद्दीवर त्याची राजधानी उभारली. हेच शहर पुढे मेंफिस या नावाने प्रसिद्धीस आले. या शहराला तटबंदी करून त्याने तेथे एक मंदिर बांधले आणि त्यात प्रजापती प्ताह या देवतेची प्रतिष्ठापना केली. पुढे त्याच्या वारसांनी या शहराचा विस्तार केला. मीनीझ आणि त्याच्या मुलांची थडगी राजधानीजवळच्या आबायडॉस किंवा सकारा या शहरात आढळतात. मॅनेथोच्या मते मीनीझने ६२ वर्षे राज्य केले आणि पाणघोड्याने त्याला ठार मारले.

देशपांडे, सु. र.