मिश्र, बिनायक : (२ सप्टेंबर १८९४–१९७१). प्रसिद्ध ओडिया भाषा-साहित्येतिहासकार, समीक्षक, इतिहाससंशोधक व विद्वान. जन्म पुरी जिल्ह्यातील सरांकुल ह्या गावी. औपचारिक शिक्षण केवळ माध्यमिक शाळेच्या पातळीपर्यंत झाले असूनही त्यांनी इंग्रजी तसेच इतर भाषांचे सखोल अध्ययन करून एक गाढे पंडित म्हणून लौकिक मिळवला. कलकत्ता विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात ते ओडिया भाषा-साहित्याचे अधिव्यासंख्याते होते. त्यांच्या प्रगाढ विद्वत्तेमुळे ते ‘पंडित बिनायक मिश्र’ या नावाने ओळखले जात. ओरिसाच्या इतिहासात त्यांनी आपल्या सखोल संशोधनाने मोलाची भर घातली.
त्यांचे महत्त्वाचे ओडिया ग्रंथ पुढीलप्रमाणे : ओडिया भाषार इतिहास (१९२७), ओडिया साहित्यर इतिहास (१९२८), नूतन ओडिया ब्याकरण (१९४६), वर्णमाळ (काव्य–१९४७), भारतीय दर्शन–प्रवेशिका (भारतीय तत्त्वज्ञानपर ग्रंथ–१९४७), ओडिया साहित्यप्रकाश (समीक्षा, २ खंड, १९४९), महामानब गांधी (चरित्र-१९५०), आधुनिक ओडिया साहित्य (समीक्षा), ओडिया भाषार पुरातत्त्व (१९६५) इत्यादी. यांशिवाय त्यांनी इंग्रजीत डायनॅस्टिज ऑफ मेडिएव्हल ओरिसा (१९३३) आणि ओरिसा अंडर भौम किंग्ज (१९३४) हे दोन दर्जेदार संशोधनपर इतिहासग्रंथही लिहिले आहेत.
एक सखोल संशोधक, भाषा-साहित्येतिहासकार, साक्षेपी समीक्षक, चरित्रकार व चिंतनशील गद्यशैलीकार म्हणून त्यांना ओडिया साहित्यात महत्त्वपूर्ण स्थान आहे.
दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) सुर्वे, भा.ग. (म.)