मिर्टेसी : (म. जंबुल कुल). फुलझाडांचे जंबुल गणातील [⟶ मिर्टेलीझ] एक मोठे वनस्पती कुल. यात सु. ७६ प्रजाती व १,८०० वर जाती (जी. एच्. एम्. लॉरेन्स यांच्या मते ८० प्रजाती व ३,००० जाती ए. बी. रेंडेल यांच्या मते ७३ प्रजाती व २,७५० जाती) आहेत. त्यांचा प्रसार उष्ण व उपोष्ण कटिबंधात आहे. मिर्टॉइडी व लेप्टोस्पर्मॉइडी या दोन उपकुलांत त्या जाती विभागल्या आहेत. यांपैकी काही अमेरिकेतील व ऑस्ट्रेलियातील असून काही भारतातील व भूमध्यसामुद्रिक प्रदेशातील आहेत. बहुतेक वनस्पती सदापर्णी वृक्ष आणि झुडपे, क्वचित ⇨ ओषधी आहेत. पाने साधी, समोरासमोर, जाडसर, चिवट असून त्यांत उडून जाणाऱ्या तेलाचे ठिपके दिसतात. उपपर्णे (पानांच्या तळाशी असलेली लहान उपांगे) बारीक किंवा नसतात. फुले नियमित, द्विलिंगी, परिकिंज किंवा अपिकिंज, एकेकटी अथवा फुलोऱ्यात येतात. संवर्त (पाकळ्यांखालचा भाग) खाली पेल्यासारखा असून किंजपुटास अंशतः किंवा पूर्णतः वेढून राहतो. पुष्पमुकुट संदलाइतक्याच दलांचा (पाकळ्यांचा) असतो किंवा कधी नसतोच संवर्ताच्या पेल्यात वलयाकार बिंब (कडे) असून पाकळ्या तेथूनच उगवलेल्या आणि सुट्या असतात क्वचित खाली जुळून असतात व पुढे वरचा सर्वच पुष्पमुकुटाचा भाग सुटून पडतो (उदा., यूकॅलिप्टस). संवर्त पतिष्णू (गळून पडणारा) किंवा सतत [उदा., ⟶ डाळिंब पेरू] राहतो. केसरदले अनेक व बिंबावर किंवा आत पुष्पस्थलीस चिकटून राहतात क्वचित ती खाली जुळलेली अथवा पाकळ्यांसमोर गटाने उगवलेली असतात. किजपुट पूर्ण (उदा., पेरू) किंवा अर्धवट अधःस्थ, एक किंवा अनेक कप्प्यांचा असतो. [⟶ फूल]. फळ मुदुफळ (उदा., जांभूळ, पेरू, जांब इ.) अश्मगर्भी (आठळीफळ) किंवा शुष्क बोंड पुटकभिदूर (उभे कप्पावर तडकणारे) प्रकारचे असते. बीज एक किंवा अनेक . केसरदले (उदा., बॉटल ब्रश, जांब, कुंभा) किंवा भडक रंगाच्या पाकळ्या (उदा., डाळींब) यांमुळे कीटक आकर्षिले जाऊन त्यांच्यामार्फत ⇨ परागण घडून येते. फळे, लाकूड, औषधे, शोभा इत्यादींसाठी यातील अनेक झाडे लागवडीत आहेत.
संदर्भ : 1. Mitra, J. N. Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.
2. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. II. Cambridge, 1963.