मित्सुई : दुसऱ्या महायुद्धापर्यंत जपानच्या तीन शतकांमधील आर्थिक प्रगतीचा मोठ्या प्रमाणात हातभार लावणाऱ्या तसेच देशाची अर्थव्यवस्था नियंत्रित करण्याऱ्या झैबात्सूंमधील (एक कुटुंबीय नियंत्रण व संचालन असलेल्या कार्टेलस्वरूपी मोठ्या भांडवलशाही व्यावसायिक कंपन्या) सर्वांत मोठी व्यापारी,औद्योगिक व वित्तीय संघटना. हिचा पूर्वीच्या अतिशय धनवान व्यापारी कुटुंबामधून विकास झाला. मित्सुई घराण्याची सुरुवात सातव्या शतकातील फुजीवारा नो कामातारी ह्या मुत्सद्यापासून होते, असे मानतात. सोळाव्या शतकाच्या पुढे मित्सुई ताकायासूचा मुलगा सोकुबेई ह्याने आसवनीउद्योग सुरू केला. सोकुबेईचा सर्वांत धाकटा मुलगा ताकातोशी (१६२२–९४) हा मित्सुई उद्योगसमूहाचा संस्थापक मानतात. आपल्या भावाच्या टोकिओमधील वस्त्रभूषेच्या दुकानात त्याने कामाला प्रारंभ केला काही काळाने तो आपल्या गावी परतला आणि तेथे त्याने ‘हाचिरोबेई’ ह्या नावाने सावकारी सुरू केली. ५१ व्या वर्षी सावकारी सोडून त्याने येडो (टोकिओचे जुने नाव) येथे वस्त्रभूषेचे दुकान थाटलेपुढे क्योटो व ओसाका शहरीही त्याने अशीच दुकाने उघडली. त्याने आपल्या धंद्यात ‘एकच किंमत व रोख पैसे’ हा अभिनव पायंडा पाडला. त्याला लष्करी शासनाकरिता (शोगुनेट) कपडे पुरविण्याचे कंत्राट मिळाले. १६८६ मध्ये येडोच्या नाणेबाजारात ताकातोशीने एक विनिमयकेंद्र स्थापन केले अशीच केंद्रे त्याने क्योटो व ओसाका येथेही उघडली. १६९१ मध्ये टोकुगावा या लष्करी शासनाने नेमलेल्या बारा राजकोषीय अधिकाऱ्यांपैकी दोन मित्सुई घराण्यातील होते. ताकातोशीला पंधरा मुले होती त्यांच्याकडे त्याने आपल्या उद्योगसमुहातील विविध विभाग सोपविले आणि उद्योगधंद्याचा विस्तार आणखी वाढविला. त्याच्या मृत्युपत्रातील शर्ती व नियम ह्यांनुसार मित्सुई घराण्याची एक घटना बनविण्यात येऊन तीनुसार मित्सुई कुटुंबातील अकरा प्रातिनिधिक व्यक्तींचे एक मंडळ (ओमोटोकाटा) स्थापण्यात आले व ते मित्सुई उद्योगसमूह चालवू लागले.
मित्सुईंनी १७०८ मध्ये परदेशी व्यापारात प्रथम प्रवेश केला नागासाकी शहरी त्यांनी परदेशी व्यापार-प्रतिनिधी नेमला त्यानंतर जपानच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय व्यापारात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. १८६८ मध्ये मेजी राज्यसत्तेच्या पुनः स्थापनेनंतर,मित्सुईकडे राजसैन्याकरिता वित्तप्रबंधाचे व शासनाला कर्ज उभारणीमध्ये सहकार्य देण्याचे कामही सोपविण्यात आले. १८७६ मध्ये देशात पहिली खाजगी बँ क उघडण्याचा मान मित्सुईंनी मिळविला,स्वतः च्या बँ क व्यवसायाचे देशभर जाळे पसरवून आणि नवनवीन उद्योगधंदे उभारून जपानच्या जलद औद्योगिकीकरणास मित्सुईंनी चालना दिली. १८८२ मध्ये बॅंक ऑफ जपानच्या स्थापनेनंतर मित्सईंनी राजकोषीय कार्य बंद केले. १९३२मध्ये मँ चुरियास जपान सरकारने मोठ्या प्रमाणावर पुरविलेल्या कर्जात मित्सुई-उद्योगसमूहाचा सिंहाचा वाटा होता. साउथ मँचुरिया रेल्वेच्या उभारणीत ह्या समुहाने मोठे भांडवल गुंतविले. १९४१ मध्ये मित्सुई-समुहाचा अवाढव्य पसारा कित्येक अब्ज येन होता. मित्सुई उद्योगसमूहात जहाजबांधणी,यंत्रोद्योग,बॅंकिंग,खाणउद्योग, विमा,वस्त्रनिर्माण, साखर, अन्नपदार्थप्रक्रिया,वखारव्यवसाय,मळे,लोखंड आणि पोलाद असे विविध उद्योग तसेच अंतर्गत व विदेश-व्यापार यांचा अंतर्भाव होतो.
दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस जपानच्या शरणागतीनंतर, १९४६मध्ये दोस्तराष्ट्रांनी मित्सुई समूहाचे ,इतर झैबात्सूंप्रमाणेच, विघटन करण्याचा आदेश दिला. त्यावेळी मित्सुई उद्योगाचे प्रचंड स्वरूप होते. एक सूत्रधारी कंपनी व २७३ संलग्न कंपन्या असून भरणा भांडवल ३५०कोटी येन होते. त्यामागे मूलभूत आर्थिक क्रियांची मालकी लोकशाहीच्या तत्त्वानुसार अनेकजणांत विभागली जावी,हा प्रमुख हेतू होता. १९५१ मध्ये जपानने शांतता करारावर सह्या केल्यानंतर,देशात झैबात्सू संघटनेप्रमाणेच उद्योगधंद्यांचे पुनर्गठन करण्याची प्रवृत्ती जोर धरू लागली. ती मागे जागतिक बाजारपेठेत जपानची स्पर्धाक्षमता अधिक वाढेल असा विश्वास होता. ह्यानुसार मित्सुई,मित्सुबिशी, सुमिटोमो वगैरेंसारख्या उद्योगांनी आपल्या हाती आजही बऱ्याच प्रमाणात आर्थिक सत्ता एकवटल्याचे आणि विविध उद्योगांचे जाळे विखुरल्याचे दिसून येते.
सांप्रत जपानमधील प्रमुख उद्योगसमूहांमध्ये मित्सुई समूहाचा समावेश केला जातो. या समूहाचे चौदा विविध प्रकारचे उद्योग असून बॅंकिंगपासून ते प्लॅस्टिकपर्यंतच्या सर्व प्रकारच्या उत्पादनांत हा समूह गुंतलेला आहे. ‘मित्सुई अँड कंपनी’(स्था. १८७६)ही व्यापारी कंपनी असून विविध प्रकारच्या वस्तूंच्या व्यापार-उलाढालीं त (आयात-निर्यात) ती गुंतलेली आहे. तिच्या उलाढालीत धातू (३१%) यंत्रे (१५%),रसायने (१३%) यांचे प्रमाण सतत वाढत आहे. जपानचा १० टक्क्यां हून अधिक व्यापार या कंपनीमार्फत चालतो. सर्व मित्सुई उद्योगांचे संयोजन,सूत्रसंचालन तसेच नव्या उद्योगांच्या उभारणीस व चालू उद्योगांच्या विस्तारास हातभार, हे ध्येयधोरण पुढे ठेवून मित्सुई उद्योगांचे संयोजन, सूत्रचालन तसेच नव्या उद्योगांच्या उभारणीस व चालू उद्योगांच्या विस्तारास हातभार,हे ध्येयधोरण पुढे ठेवून मित्सुई अँड कंपनीचा कारभार चालू असतो. समुद्रपार कार्यालये, कचेऱ्या, शाखा इत्यादींच्या रूपाने या कंपनीच्या अखत्यारीत १४९ घटकसंस्था येतात. ‘मित्सुई बॅंक’ हा मित्सुई समूहातील महत्त्वाचा व्यवसाय असून देशाच्या खाजगी क्षेत्रातील १३ मोठ्या बँकांमध्ये तिची गणना होते. १९८२ मध्ये ठेवींनुसार तिचा सहावा क्रमांक होता. या बँ केच्या समुद्रपार विस्तारामध्ये दहा शाखा कार्यालये,एक अभिकरणसंस्था, १३प्रातिनिधिक कार्यालये, मित्सुईच्या मालकीचे चार उपक्रम, १८ संयुक्त प्रकल्प आणि ८७८ समाशोधन कार्यालये कार्य करीत होती (१९८२). १९६५ मध्ये या बँ केने सर्वप्रथम संगणक यंत्रणेचा वापर सुरू केला. ‘मित्सुई कन्स्ट्रक्शन कंपनी’(स्था. १८९०) या कंपनीने १९६८ मध्ये ‘एम्सीएस्’ (मित्सुई चेकर्ड सिस्टिम) अशी बांधकाम उद्योगातील एक वैशिष्ट्यपूर्ण रचनापद्धती शोधून काढली तिचा मध्यम व उत्तुंग इमारतींच्या बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. या कंपनीने जमिनीचा विकास व बांधकाम या क्षेत्रात संगणक, स्वयंचलित आरेखन व संख्यात्मक नियंत्रण उपकरणे यांचा
सर्वप्रथम उपयोग व वापर केला आहे.‘मित्सुई वेअरहाऊस कंपनी’ (१९०९) ही गुदामव्यवस्था तसेच बंदरव्यवस्थापन व रस्तावाहतूक यांमध्ये आहे. ‘मित्सुई इंजिनिअरिंग अँड शिपबिल्डिंग कंपनी’ (मित्सुई झोसेन) ही १९१७मध्ये मित्सुई कंपनीची शाखा व १९३७ मध्ये मित्सुई उद्योगसमूहातील स्वतंत्र कंपनी बनली. जहाजबांधणी व दुरूस्ती, पोलादयंत्रे व अवजारे, रसायनोद्योगांची सयंत्रे,औद्योगिक यंत्रावजारे अशी अवजड उद्योगांना लागणाऱ्या यंत्रांची निर्मिती ही कंपनी करते. स्वयंचलित जहाजे तसेच ट्रिपल-एंजिन, ट्रिपल-स्क्रू, अति वेगवान डीझेलवाहू जहाजे यांची निर्मिती करणारी ही जगातील पहिली कंपनी म्हणून ओळखली जाते. निर्क्षारक्ष यंत्रे व विद्युत्निर्मिती संयंत्रे यांचे उत्पादन सांप्रत या कंपनीमार्फत चालू आहे. ‘मित्सुई ट्रस्ट अँड बँ किंग कंपनी’ (१९२४) ही कंपनी दीर्घमुदती वित्तप्रबंध, बँ किंग सेवा, आंतरराष्ट्रीय व्यापारव्यवसाय, स्थावरसंपदा इ. कार्ये करते. ‘मित्सुई माइनिंग अँड स्मे ल्टिंग कंपनी’ ही प्रथम मित्सुई माइनिंग कंपनीची एक शाखा होती, ती १९५० मध्ये मित्सुई समूहातील एक स्वतंत्र कंपनी म्हणून काम करू लागली. अलोह धातुंचे व जस्ताचे उत्पादन व प्रगलन करणारी ती जगातील मोठी कंपनी समजण्यात येते. सांप्रत ती अलोह धातूंचे खनन,प्रगलन, धातुप्रक्रिया व बांधकाम सामग्रीचे उत्पादन करते. ‘मित्सुई माइनिंग कंपनी’ (१८७४) देशांतर्गत कोळसा खाणीं च्या प्रचालन विकास कार्यात गुंतलेली असून सांप्रत ती खनिज तेल,कोक, सिमेंट,बांधकाम सामग्री यांची विक्री करते. १९७७ मध्ये ‘मित्सुई माइनिंग ओव्हरसीज कंपनी’ अशी सागरपार खाणकाम प्रक्रिया करणारी तसेच तांत्रिक सल्ला देणारी कंपनी स्थापन करण्यात आली. ही कंपनी सांप्रत जल-प्रेरित कोळसा खाण उत्पादन या अद्ययावत तंत्राचा वापर करण्यात गुंतलेली आहे. ‘मित्सुई ओ. एस्. के. लाइन्स’(१९६४) ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची जहाज वाहतू क कंपनी आहे. १९६५ मध्ये या कंपनीने केवळ मोटारगाड्यांची वाहतूक करणाऱ्या जपानमधील पहिल्या जहाजाचे उत्पादन केले. १९७१ मध्ये कंपनीने पहिला संगणक-प्रचलित स्वयंचलित टँकर वापरात आणला. ‘मित्सुई पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज’ (१९५५) ही कंपनी खनिज तेल व तज्जन्य पदार्थां चे उत्पादन करते. ‘मित्सुई शुगर कंपनी’ (१९७०) ही जपानमधील सर्वांत मोठी साखर उत्पादक कंपनी समजली जाते.‘मित्सुई तोआत्सू केमिकल्स’ (१९६८) -मित्सुई केमिकल इंडस्ट्रीज व टोयो कोआत्सू इंडस्ट्रीज या दोन मित्सुई समूहातील कंपन्यांच्या विलीनीकरणातून अस्तित्वात आलेली कंपनी. ही कंपनी खनिज तेल रसायने,रसायने,औद्योगिक रसायने,प्लॉस्टिके,उर्वरके,खते, औषधे इत्यादींचे उत्पादन करते. ‘मित्सुई रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड इकॉनॉमिक हिस्टरी’ हे मित्सुई उद्योगसमूहाचे ग्रंथालय व संग्रहालय असून त्यात मित्सुई घराण्याच्या स्थापनेपासून आर्थिक, औद्योगिक विकासाची जुनी व अद्ययावत कागदपत्रे,दस्तऐवज यांचा संग्रह आढळतो.
गद्रे, वि.रा.