मियाँ शौरी : हिंदुस्थानी संगीतातील प्रसिद्ध गायक. त्याच्या जन्ममृत्यूची निश्चित वर्षे उपलब्ध नाहीत, पण त्याचा काळ साधारणपणे १७७५ ते १८१० दरम्यान दर्शवला जातो. त्याचे वास्तव्य लखनौमध्ये होते व त्याच्या काळात आसफ उद्दौला (कार. सु. १७७५–९७) हा लखनौचा नबाब होता. मियाँ शौरी ⇨ टप्पा या गायन प्रकारचा मूळ प्रवर्तक व ख्यालगायनाचा प्रसारक मानला जातो. त्याचे मूळ नाव गुलाम नबी. त्याने ख्यालगायनाचे धडे आपले वडील गुलाम रसूल ह्यांच्याकडे घेतले, परंतु ख्यालातील तानबाजी त्याला अपुरी वाटली, म्हणून आपल्या पातळ व लवलवीत आवाजाला शोभेल अशी टप्पा या नवीन तानप्रधान गायनप्रकाराची त्याने निर्मिती केली (सु. १८१०). टप्प्याला पंजाबी भाषा अनुकूल असल्याने तो पंजाबी शिकला व त्याने त्या भाषेत काही टप्पे रचले. टप्प्यामध्ये लडींनी बांधलेल्या विविध तानबाजीला भरपूर वाव असल्याने हा प्रकार त्याच्या गायकीला पोषक ठरला. शौरी हा साधुवृत्तीने राहात असल्याचे व त्याच्या औदार्याचे उल्लेख आढळतात. लखनौ येथे त्याचे निधन झाले. गम्मू या नावाचा गायक त्याचा पट्टशिष्य होता.

मंगरूळकर, अरविंद