मिथेन : वायुरूप कार्बनी संयुग. पॅराफीन हायड्रोकार्बन [⟶ हायड्रोकार्बने] श्रेणीतील पहिले व साधे संयुग. रेणवीय सू त्र (पदार्थाच्या रेणूत असलेले अणुप्रकार व त्यांच्या संख्या दर्शविणारे सूत्र) CH4 संरचनासूत्र (रेणूमध्ये अणू एकमेकांना कसे जोडले आहेत हे दाखविणारी रचना)

                                                                                                                                                 H 

                                                                                                                                                  | 

H – C – H 

                                                                                                                                                  |

H

‘मार्श वायू’, ‘फायरडॅम्प’ व मिथिल हायड्राइड व नावांनीही मिथेन ओळखले जाते. गुरू, शनी, प्रजापती व वरुण या ग्रहांवर मिथेन मोठ्या प्रमाणावर आहे. ⇨ नैसर्गिक वायूचा हा प्रमुख घटक असून त्यात याचे वजनी प्रमाण सु. ७५% इतके असते. दलदलीच्या प्रदेशातील वनस्पतिज व तत्सम पदार्थांचे ऑक्सजनविरहित स्थितीत सूक्ष्मजंतूंच्या क्रियेने अपघटन होऊन (रेणूचे तुकडे होऊन) मिथेन वायू तयार होतो. दगडी कोळशाच्या खाणीत हा वायू कोळशात दाबाखाली कोंडलेला असतो व खाणकाम करताना तो वायू वेगळा होतो. ⇨ प्रोड्यूसर वायू, ⇨ कोल गॅस, ⇨ पाणवायू, शहरी वायू,जैव वायू इ. संश्लेषित वायूंत मिथेनाचे प्रमाण जास्त असते.

मिथेन वायू १८५६ मध्ये प्येअर बर्थेलॉट यांनी कार्बन बायसल्फाइड व हायड्रोजन सल्फाईड यांचे मिश्रण तापलेल्या तांब्यावरून नेऊन प्रथम तयार केला. कार्बन व हायड्रोजन यांचा १,२००°से. तापमानाला संयोग होऊन मिथेन वायू तयार होतो. प्रयोगशाळेत निर्जल सोडियम ॲसिटेट व सोडा लाईम यांचे मिश्रण तापवून, ॲल्युमिनियम कॉर्बाइडावर पाण्याची-विक्रिया करून, मिथिल मॅग्नेशियम आयोडाइडाचे पाण्याने अपघटन करून, मिथिल आयोडाइडाचे ⇨ क्षपण करून इ. विक्रियांनी मिथेन वायू तयार करतात.

शुद्ध मिथेन वायू रंगहीन,रुचिहीन व वासहीन असतो. रेणूभार १६·०४ १०० वातावरणीय दाबाखाली ०° से. ला त्याचे द्रवीकरण होते. वितळबिंदू -१८२°·६ से.उकळबिंदू -१६१°·४ से.हवेपेक्षा हलका वि. गु. (१६४° से.ला) ०·४१५. पाण्यात विरघळत नाही अल्कोहा ल व ईथरमध्ये साधारण प्रमाणात विरघळतो. ज्वलनास मदत करीत नाही मात्र हा हवेत जळतो व याची ज्योत मंद, कमी दीप्तिमान आणि अतितप्त असते. शुद्ध वायू जळताना फिकट निळसर व अदीप्त ज्योत मिळते आणि कार्बन डॉय-ऑक्साइड व पाणी तयार होते. हवा व मिथेन अथवा हवा आणि ऑक्सि जन यांचे मिश्रण स्फोटक असते. रासायनिक दृष्ट्या मिथेन स्थिर असून त्याच्यावर पोटॅशियमपरमँगॅनेट , पोटॅशियम डायक्रोमेट, सल्फ्यूरिक आम्ल, वाफाळ नायट्रिक आम्ल, क्षारक (अल्कली) आदि विक्रियाकारकांचा (विक्रिया घडवून आणणाऱ्या पदार्थाचा) काहीही परिणाम होत नाही. मिथेन व क्लोरिन यांच्या विक्रियेमुळे मिथिल क्लोराईड (CH3Cl), मिथिलीन डायक्लोराइड (CH2Cl2), क्लोरोफॉर्म (CHCl3) व कार्बन टेट्राक्लोराइड (CCl4) ही संयुगे तयार होतात. जास्त प्रमाणात क्लोरीन (वा ब्रोमीन) व मिथेन यांचे मिश्रण सूर्यप्रकाशात ठेवल्यास त्याचा स्फोट होतो.

मिथेन हा एक महत्त्वाचा इंधन वायू आहे. मिथेन जास्त असलेला नैसर्गिक वायू इतर पदार्थ बनविण्यासाठी सरळ वापरतात. अशा नैसर्गिक वायुतून मिथेन वेगळा करून वापरीत नाहीत. या वायूची पाण्याबरोबर विक्रिया करून संश्लेषित वायू प्रथम मिळवितात व पुढे त्यापासून अमोनिया, मिथिल अल्कोहॉल, ॲसिटिलिन, कार्बन मोनॉक्साइड, ओलेफिने इ. रसायने मिळवितात. मिथेन वायूचे हवेबरोबर अपूर्ण ज्वलन होऊन ⇨ काजळी हा औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचा पदार्थ मिळतो.

दगडी कोळशाच्या खाणीत कामगारांना स्फोटाद्वारे इजा होऊ नये म्हणून तेथील मिथेन वायू बाहेर काढतात. मिथेन वायू जर नळांवाटे घरगुती वापरासाठी दिला,तर इंधनाची बरीच बचत होईल. या दृष्टीने सध्या प्रयोग चालू आहेत. वाहितमल,मैला,कचरा, शेण यांचे हवेशिवाय किण्वन (सूक्ष्मजीवांद्वारे हळूहळू होणारे अपघटन) केल्यास मिळणाऱ्या वायूत ६०% मिथेन व ४०% कार्बनडाय-ऑक्साइड हे वायू असतात. या वायूतील मिथेनाचे प्रमाण वाढविता येते व कार्बन डाय-ऑक्साईड वायूपासून शुष्क बर्फ हा उपपदार्थ मिळतो. कॉर्नेल विद्यापीठातील टी.गोल्ड यांनी भूकंपापूर्वी, भूकंप होताना व नंतर केलेल्या निरीक्षणांच्या आधारे पृथ्वीच्या आत मिथेन वायूचा भरपूर साठा आहे,असे प्रतिपादले असून यावर संशोधन चालू आहे.

पहा : इंधन गोबर वायु.

देशपांडे, ज्ञा. मा.