शंभू मित्र

मित्र, शंभू : (२२ ऑगस्ट १९१५ –     ). बंगाली रंगभूमीवरील प्रथितयश व प्रतिभावंत नट,दिग्दर्शक आणि नाटककार. जन्म कलकत्ता येथे व शालेय शिक्षणही कलकत्ता येथील बालीगंज गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये झाले असून उच्च शिक्षणाची सुरुवात सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये झाली पण शिक्षणात फारसा रस न वाटल्यामुळे त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले आणि खाजगी रीत्या वाचन वाढवून स्वतःचे व्यक्तिमत्त्व स्वतः घडविले. १९३९ साली ते बंगाली रंगभूमीवर आले. प्रथम त्यांनी कलकत्त्यातील अनेक व्यावसायिक नाटकमंडळाबरोबर कामे केली. ⇨ शिशिर भादुडी यांच्या अतिशय नावाजलेल्या नाटक कंपनीतही शंभू मित्र यांनी अभिनय केला होता.

पुढे १९४३ साली मात्र त्यांनी व्यावसायिक रंगभूमी सोडली व ते ‘इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन’ (आय्‌ .पी.टी.ए.) चे सदस्य झाले. या काळात त्यांनी आपले नवान्न हे नाटक सादर केले होते. या नाटकाने तत्कालीन नाट्यजगतात एक नवेच चैतन्य आणले. १९४६साली त्यांनी आय्.पी.टी.ए.मधूनही आपले अंग काढून घेतले व स्वतःचा स्वतंत्र नाट्यसंच स्थापन केला. त्यालाच १९४८ साली ‘बहुरूपी’ असे नाव देण्यात आले होते. महर्षी मनोरंजन भट्टाचार्य हे या ‘बहुरूपी’ संस्थेचे अध्यक्ष होते.

शंभू मित्र यांची अभिनयासाठी व दिग्दर्शनासाठी गाजलेली काही नाटके अशी :रक्तकरबी (रवींद्रनाथ टागोर)दशचक्र (इब्सेन यांच्या न एनिमी ऑफ द पीपलचे बंगाली रूपांतर)पुतुल खेला (इब्सेन यांच्या डॉल्स हाऊसचे बंगाली रूपांतर) विसर्जन (रवींद्रनाथ टागोर) राजा (रवींद्रनाथ टागोर) राजा ओयदिपाऊस (सोफोक्लीस यांच्या एडिपस रेक्सया नाटकाचे बंगाली भाषांतर)बाकी इतिहास (बादल सरकार) पागल घोडा (बादल सरकार) इत्यादी.

शंभू मित्र यांनी चित्रपटांचेही दिग्दर्शन केले असून त्यांच्या जागते रहो या हिंदी चित्रपटाला १९५६ साली कारलॉवी व्हारी या महोत्सवात उत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान लाभला होता. तसेच नाट्यदिग्दर्शक म्हणून १९५९ साली संगीत नाटक अकादेमी पुरस्कार आणि १९७० साली त्यांना भारत सरकारतर्फे ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन गौरविण्यात आले होता, तर १९७६ साली त्यांना ‘मागसायसाय अवॉर्ड’ मिळाले होते. त्याचप्रमाणे १९८२ मध्ये त्यांना मध्य प्रदेश शासनाचा ‘कालिदास सन्मान’ (रु. एक लाख) देऊन गौरविण्यात आले होते.

अलीकडे काही वर्षे रवींद्र भारती विद्यापीठाच्या नाट्यविभागाचे विभाग-प्रमुख म्हणून त्यांनी काम सांभाळले असून त्यातून निवृत्त जीवनातही त्यांची अभिनयाची आवड कायमच असल्याचे दिसून येते. जर्मन दिग्दर्शक फ्रिट्स बेनेव्हिट्झ यांच्या दिग्दर्शनाखाली शंभू मित्र यांनी गॅलिलिओ जीवनी (ब्रेक्ट यांच्या गॅलिलिओचे बंगाली भाषांतर) या नाटकात केलेली गॅलिलिओची भूमिका म्हणजे त्यांच्या चिरनूतन अभिनयगुणांची साक्ष आहे.

शंभू मित्र यांची काही प्रकाशित पुस्तके अशी : अभिनय-नाटकमंच (१९५७), पुतुल खेला (१९५८),कांचनरंग (१९६१),धुरणी(१९६७), राजा ओदिपाऊस (१९६९),प्रसंग नाट्य (१९७२) इत्यादी.

नाट्याभ्यासाच्या निमित्ताने शंभू मित्र यांनी अमेरिका, रशिया, यूगोस्लाव्हिया, चेकोस्लोव्हाकिया, पोलंड,प. जर्मनी,पू. जर्मनी व कॅनडा इ. ठिकाणी प्रवास केला आहे.

शंभु मित्र यांच्या पत्नी श्रीमती तृप्ती मित्र (विवाह १९४५) व कन्या सावली मित्र या दोघीही बंगाली रंगभूमीवरील प्रतिथयश अभिनेत्री आहेत. शंभू मित्र हे सध्या कलकत्ता येथे राहतात.

आलासे, वीणा