मिझो: भारतातील एक प्रसिद्ध पहाडी आदिम जमात.ईशान्य भारातातील मिझोराम या केंद्रशासित प्रदेशातील ऐजाल या शहरात आणि सभोवतालच्या जंगलातून त्यांची वस्ती प्रामुख्याने आढळते. नागालँड,आसाम व मणिपूर यांतही काही प्रमाणात मिझोंची वस्ती आहे. प्रारंभी हे लुशाई या नावाने परिचित होते परंतु लुशाई हा त्यांच्यातील एक प्रमुख पोटभेद आहे. मिझो म्हणजे डोंगराळ प्रदेशात वास्तव्य करणारा माणूस (मि म्हणजे मनुष्य आणि झो म्हणजे पहाडी प्रदेश). हे लोक मंगोल वंशाचे असून ब्रह्मदेशातील चिननामक डोंगर प्रदेशातून ते एकोणिसाव्या शतकात भारतात आले. त्यांची एकूण लोकसंख्या ३,४०,८२६ होती (१९८१). मिझोंचे अनेक पोटभेद आहेत. त्यांपैकी लुशाई,राल्ट,हमार व पोई हे प्रमुख आहेत. मिझो (दुल्हिअन) हीच भाषा ते बोलतात आणि रोमन लिपीत लिहितात. त्यांच्या भाषेला अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे.
मिझो स्त्री-पुरूषांचा पोशाख पूर्वी साधा होता. एकच लांब रंगीबेरंगी कापड किंवा शाल ते खांद्यावरून अंगाभोवती गुंडाळीत. थंडीच्या दिवसांत त्यावर आणखी एक वस्त्र तसेच घालीत. डोक्याला पागोटे आणि काम करताना एक लांब बाह्यांचा कोट किंवा डगला घालीत. स्त्रिया चोळी (कव्रेचेइ) शिवाय असेच वस्त्र (पुनाचेई) गुंडाळीत आणि गुडघ्यार्पंत घागरा नेसीत. कमरेला दोरा किंवा पट्टा बांधीत. शाल व घागरा यांवर भरतकाम केलेले असून त्याची रंगसंगती व आकृतिबंध वेधक असतात. यांची वस्त्रे लोकर, सुत व झाडाच्या सालीचे तंतू यांपासून बनविलेली असतात. घरच्या हातमागावर ते कपडे विणतात. स्त्रिया लांब केस वाढवितात. कर्णफुले वगळल्यास दोघांचे दागिनेही सारखे असतात. स्त्रिया क्वचित हातात बांगड्या घालतात. बारमाही पाणकळीमुळे डोक्यावर इरले घेतात, तर पुरूष बांबूच्या कामट्यांची हॅट घालतात. खंजिरासारखे डीओ हे हत्यार प्रत्येक मिझो पुरुषाजवळ असते. बाबूंची विपुल पैदास या प्रदेशात होत असल्याने त्यांच्या चटया, जेवणाच्या थाळ्या, पाणी भरावयाची भांडी इ. अनेक गृहोपयोगी वस्तू बांबूच्या केलेल्या असतात.
यांची घरे प्रामुख्याने डोंगरमाथ्यावर असून त्याला एकच मोठी खोली असते. जमिनीत खांब पुरून त्यावर ती बांधतात. भिंती बांबूच्या व छप्पर गवताचे असते. सतत उद्भवणाऱ्या वादळ व भूकंप या नैसर्गिक आपत्तीं पासून ती सुरक्षित रहावीत, याची ते काळजी घेतात. घराच्या खालच्या जागेत गुरे व डुकरे असून सभोवती भाजीपाला काढतात. शेती हाच या लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. झूम पद्धतीची शेती ते करतात. याशिवाय शिकार, मच्छीमार, बुरूडकाम, कापडनिर्मिती इ. जोडधंदेही ते करतात. तांदूळ हे मुख्य पीक असून बहुतेक मिझो मांसाहारी आहेत. मद्य ते आवडीने पितात-विशेषतः तांदुळाची बिअर. स्त्रिया,पुरुष,मुले सर्वजण तंबाखू ओढतात.
मुले-मुली आपला जोडीदार स्वतःच निवडतात. बहुपत्नीकत्वाची चाल आहे. देज देण्याची पद्धत आहे. विवाहप्रसंगी जेवणावळ, नृत्यगायन इ. कार्यक्रम होतात. विवाहितेने परपुरुषाशी संबंध ठेवला असता तिला दंड होतो. पती, ‘मी तुला घटस्फोट देतो’ असे म्हणून पत्नीपासून घटस्फोट घेऊ शकतो. ‘थ्लाहुअल’नावाचा विधी केल्यानंतर पुनर्विवाहास संमती मिळतेमात्र पतिनिधनानंतर तीन महिने पत्नीला सासरी रहावे लागते. या जमातीत पितृसत्ताक कुटुंबपद्धती रूढ असून,संपत्तीचा वारसा मात्र कनिष्ठ मुलाकडे जातो.
पूर्वी हे लोक जडप्राणवादी असून भुतांखेतांची पूजा करीत. सर्वशक्तिमान भुताला ते ‘पथिअन’ म्हणतात. भुताला कोंबडे,डुक्कर,बकरे आदींचा बळी देतात. मृतात्म्यांवर त्यांचा विश्वास आहे. हे मृतांना पुरतात. तीन महिन्यांनंतर ‘तिथिन’ नावाचा विधी करतात. अलीकडे बहुसंख्य मिझोंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे त्यांच्या धार्मिक चालीरीती बदलल्या आहेत. ख्रिस्ती धर्मप्रसार व आधुनिकीकरण यांमुळे त्यांच्या पारंपरिक राहणीमानात आमूलाग्र बदल झाला आहे. पोशाखाबरोबरच पाश्चात्त्य नृत्यसंगीत त्यांच्या समारंभां तून प्रविष्ट झाले आहे. बहुतेक मिझो हे शिक्षित असून, कुटिरोद्योग आणि सोपान शेती यांत विलक्षण प्रगती झाली आहे.
ब्रिटिशांनी १९४७ पर्यंत मिझोंना भारतापासून अलिप्त ठेवून भारतीय संस्कृतीत कधीच एकरूप होऊ दिले नाही. विधिमंडळात त्यांना प्रतिनिधित्व दिले नाही,तसेच कोणत्याही परप्रांतीय भारतीयास परवान्याशिवाय मिझोराममध्ये जाण्यास बंदी घातली होती. परिणामतःआपण भारतीय आहोत, ही भावना त्यांच्यात निर्माण होऊ शकली नाही. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात, आपण भारतीय गणराज्यात सुरक्षित आहोत,ही भावना अद्यापि मिझोंत दृढतर झाली नाही. साहजिकच वांशिक,भाषिक व सांस्कृतिक दृष्ट्या भिन्न आलेल्या मिझोंनी भारतातून फुटून बाहेर पडण्यासाठी संघटित आंदोलनाचा मार्ग ‘मिझो नॅशनल फ्रन्ट’ च्या द्वारे १९६६ पासून अंगीकारला. त्याला शिक्षित तरूणांनी साथ देऊन सशस्त्र संघटित सैन्याची उभारणी केली. लालडेंगा,लाल नूनमविया,सैंघका इ. त्यांचे नेते परदेशातून, विशेषतः पाकिस्तान-ब्रह्मदेशातून, शस्त्रास्त्रांची जमवाजमव करीत असून प्रशिक्षण आणि आर्थिक साहाय्य घेत आहेत. मिझोरामच्या भूराजनैतिक स्वरूपामुळे ब्रह्मदेश (४३७ किमी.) आणि बांगला देश (२५६ किमी.) सरहद्द यांचा या आंदोलनाला फायदा मिळाला. १९६६ ते १९८५ या दीर्घकाळात मिझोराममध्ये १९८०–८२ हा काळ वगळता सरकारी आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या हत्या,शासकीय मालमत्तेची लुटालू ट आणि दंगेधोपे यांचा जोर वाढला. तेथील संपूर्ण जीवन विस्कळीत झाले. सीमा प्रदेशातील ही स्थिती भारताच्या संरक्षणव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आणि जोखमीची ठरते. त्यामुळे तिथे सुरक्षादलाला मदत करण्यासाठी अखेर सैन्य धाडणे भाग पडले. नोव्हेंबर १९८५ मध्ये चकमा आणि मिझो या दोन जमातींत चकमकी उडाल्या आणि ‘मिझो कन्व्हेन्शन’ चा (एक प्रादेशिक पक्ष) नेता वनललहुअया याने एक इंचही जमीन चकमांना देणार नाही, असे घोषित केले. त्यावेळी केंद्रीय गृहसचिव राम प्रधान यांना लालडेंगाशी बोलणी करण्यासाठी पाठविले. यातून काहीतरी समझोता भविष्यकाळात होईल,अशी आशा करण्यात येते.
संदर्भ :1. Barkataki, S. Comp. Tribes at Assam, New Delhi, 1969.
2. Baveja, J. D. New Horizones of North East, Gauhati, 1982.
3. Dalton, E.T. Tribal History of Eastern India, New Delhi, 1978.
देशपांडे, सु. र.
“