मिक्झोबॅक्टिरिएलीझ : सूक्ष्मजंतूंच्या शिझोमायसीटीझ या वर्गातील दहा गणांपैकी एक गण याला ‘मिक्झोबॅक्टर्स’ असेही म्हणतात. या गणातील सूक्ष्मजंतूंना ‘श्लेष्मल सूक्ष्मजंतू’ (स्लाइम बॅक्टिरिया) या अर्थाचे इंग्रजी नाव आहे, कारण त्यांचे समूह श्लेष्मल (बुळबुळीत द्रव्ययुक्त) असून त्यात ते मोठ्या संख्येने असतात. हे सूक्ष्मजंतू स्थलवासी असून जमिनीचा वरचा थर, जीर्ण व कुजणारे लाकूड, पालापाचोळा, शेणखत इ. कार्बनी पदार्थावर आढळतात. यांच्या कोशिका (पेशी) शलाकाकार (बारीक काड्यासारख्या) १–२ मायक्रॉन X ३–५ मायक्रॉन (१ मायक्रॉन = १०-६ मी.) असून त्यांच्या दोन अवस्था आढळतात : (१) सचेष्ट अवस्था व (२) पुटीय अवस्था. सचेष्ट अवस्थेत कोशिका लवचिक व नाजूक असून त्यांचे आवरण पातळ असल्याने प्राण्यांच्या कोशिकांशी त्यांचे साम्य असते. कोशिकांची संख्या विभाजनाने वाढत जाऊन सर्व नवीन कोशिकांचे श्लेष्मल समूह बनतात त्यांना कशाभिका (कोशिकांपासून निघालेल्या चाबकाच्या दोरीसारख्या, लांब, नाजूक व बारीक जीवद्रव्यीय-मूलभूत अत्यावश्यक सजीव द्रव्याच्या बनलेल्या-संरचना) नसतात तथापि संवर्धकाच्या (वाढीकरिता वापरण्यात येणाऱ्या पोषक द्रव्याच्या) पृष्ठावर त्यांचे स्थलांतर सामूहिक आणि वैशिष्ट्यपूर्ण सरकत जाण्याचे (‘विसर्पी’ प्रकारचे) असते ही अवस्था एक दिवस ते एक आठवडा टिकते. (२) त्यानंतर दुसरी पुटीय अवस्था आढळते हीमध्ये कोशिका श्लेष्मल पदार्थातून समूहाने एकत्र होतात व तो पदार्थ वाळल्याने त्यांचा आकार संकुचित होतो व त्या सुप्त वा विश्रामी असून पुटीय होतात. बहुतेक मिक्झोबॅटरांमध्ये सुप्त कोशिका अधिक आखूड व जाड असतात त्यांना ‘सूक्ष्म पुटी’ म्हणतात (अपवाद : सायटोफॅगा). मिक्झोकॉकेसीमध्ये ही पुटी गोलसर व दृढ आवरणयुक्त असते. अनेक सूक्ष्म पुटी एका मोठ्या पुटीत असू शकतात. पुटी शुष्क किंवा विपरीत परिस्थितीत सुद्धा तग धरू शकतात. अनेकदा असंख्य सचेष्ट कोशिका एकत्र येऊन चित्रविचित्र आकाराचे समूह बनवितात, त्यांना ‘फलनकाय’ म्हणतात त्यांमध्ये अनेक सूक्ष्म पुटी असतात.

हे सूक्ष्मजंतू सेल्युलोज, कायटिन (शृंगद्रव्य) व प्रथिने यांचे अपघटन करतात (रेणूचे तुकडे करतात). त्यांचा एकलनाकरिता (अलग करण्यास) ओल्या मातीमध्ये सशाची विष्ठा निर्जंतुक करून ठेवतात व काही दिवसांनी त्यांची विष्ठेवर वाढ झालेली आढळते. त्यांचे आकारमान विभाजनाने होणारी संख्यावाढ, कोशिकेतील साधा केंद्रक (कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारा गोलसर पुंज) इ. बाबतींत त्यांचे इतर सूक्ष्म जंतू आणि नीलहरित शैवले [→ शैवले] यांच्याशी साम्य असते परंतु विसर्पी हालचाल, कशाभिकांचा अभाव आणि कोशिकावरण इ. बाबतींत ते इतर सूक्ष्मजंतूंपेक्षा भिन्न असतात. बेगियाटोएलीझ या गणातील गंधकयुक्त सूक्ष्मजंतूशी मिक्झोबॅक्टिरिएलीझच्या सूक्ष्मजंतूंचे काही बाबतींत साम्य असले, तरी पुटीय अवस्था व फलनकाय ही प्रामुख्याने यांच्यातच आढळतात. मिक्झोमायसिटीज [मायसिटोझोआ श्लेष्म कवक → कवक] व मिक्झोबॅक्टिरिएलीझ या दोन गटांतही काही बाबतींत साम्य आढळते. हे सर्वच प्रारंभिक असल्याने त्यांच्यातील साम्ये त्यांचे आप्तभाव द्योतक आहेत.

वर्गीकरण: ह्या गणात खालील पाच कुले व तेरा प्रजाती आहेत.

(१) सायटोफॅगेसी: पुटी नसते शलाकाकार कोशिका लवचिक, क्वचित टोकदार असून विसर्पी स्थलांतर आढळते उदा.,सायटोफॅगा सेल्युलोज व कायटिन यांचे अपघटन करतात.

(२) आर्‌कँजिएसी: शलाकाकार कोशिका संकुचित असून सूक्ष्म पुटी आवरणयुक्त व गोलाकार नसतात आणि पुटीतही नसतात. फलनकाय असतात.

(३) सोरँजिएसी: पुटीय अवस्था कोनाकार व तीत आवरणयुक्त, गोलाकार सूक्ष्मपुटी अवस्था असतात. अनेक सूक्ष्म पुटींना एकच आवरण असते फलनकाय असतात.

(४) पॉलिअँजिएसी: सूक्ष्म पुटी गोलाकार किंवा आवरणयुक्त नसतात. त्यांचा समूह गोलसर किंवा लंबगोल पुटीत असतो जटिल (गुंतागुंतीचे रचना असलेले) फलनकाय असतात.

(५) मिक्झोकॉकेसी: गोलाकार व जाड आवरणाची सूक्ष्म पुटी असते परंतु पुटीय अवस्था कधी नसते आणि कधी असते. साध्या फलनकाय बहुधा असतात. (अपवाद : स्पोरोसायटोफॅगा).

पहा : कवक सूक्ष्मजंतुविज्ञान.

संदर्भ : 1. Frobisher, M. Fundamentals of Microbiology, Tokyo, 1961.

2. Pelczar, M. J. Reid, R. D. Microbiology, New York, 1965.

कुलकर्णी, नी. बा. परांडेकर, शं. आ.