मिंटो, गिल्बर्ट जॉन एलियट : (९ जुलै १८४५–१ मार्च १९१४). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा व्हाइसरॉय (कार. १९०५–१०). लॉर्ड मिंटोचा पणतू. त्याचा जन्म लंडनमध्ये झाला. ईटन आणि ट्रिनिटी महाविद्यालयांत (केंब्रिज विद्यापीठ) शिक्षण घेऊन त्याने काही वर्षे स्कॉट्सगार्ड्‌समध्ये काम केले (१८६७–७०). पुढे वृत्तपत्राचा प्रतिनिधी म्हणून त्याने स्पेन, तुर्कस्तान आदी देशांत काम केले. दुसऱ्या इंग्रज अफगाण युद्धात (१८७९) आणि ईजिप्तवरील स्वारींत (१८८३) त्याने भाग घेतला. त्यानंतर पुढे त्याची कॅनडात गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती झाली (१८८९–१९०५). तिथून तो भारतात व्हाइसरॉय म्हणून आला. भारतमंत्री ⇨ जॉन मोर्ले व व्हाइसरॉय मिंटो या दोघांनी केलेले सुधारणाविषयक कायदे (१९०९) मोर्ले-मिंटो सुधारणा कायदे म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे शासनात भारतीयांचे प्रतिनिधित्व वाढले पण हिंदू व मुसलमान यांचे स्वतंत्र मतदारसंघ निर्माण झाले. पुढे त्याने मुस्लिम लीगच्या स्थापनेस उत्तेजन दिले आणि भारतीय राजकारणात दुहीचे बीज पेरले. सशस्त्र क्रांतिकारकांविरुद्ध त्याने कडक धोरण अवलंबिले. निवृत्तीनंतर लवकरच त्याचे लंडन येथे निधन झाले.

देशपांडे, सु. र.