भादुडी, शिशिर : (२ ऑक्टोबर १८८९ – ३० जून १९५९). बंगाली रंगभूमीवरील प्रख्यात नट व दिग्दर्शक. जन्म मेदिनीपुर येथे खानदानी बंगाली कुटुंबात झाला. १९१३ साली प्रेसिडेन्सी कॉलेजमधून इंग्रजी विषय घेऊन ते एम्. ए. झाले. महाविद्यालयात शिकत असताना १९०८ साली त्यांनी ज्युलियस सीझर या नाटकात काम केले. जुलै १९१४ ते जुलै १९२१ या काळात कलकत्त्याच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिटयूशन (विद्यमान विद्यासागर कॉलेज) मध्ये इंग्रजी विषयाचे त्यांनी अध्यापन केले. याच काळात त्यांनी प्रायोगिक रंगभूमीवरील नाट्यप्रयोगात भाग घेतला. १९२१ साली नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर नट म्हणून प्रवेश केला. जे. एफ्. मादन नावाच्या पारशी व्यक्तीने बेंगाली थिएट्रिकल असोशिएशन नावाची कंपनी काढली होती. या कंपनीतर्फे पंडित क्षीरोदप्रसाद विद्याविनोदलिखित आलमगीर नाटकाचा प्रयोग करण्यात आला. त्यात शिशिर भादुडींनी आलमगीरची भूमिका केली.
या कंपनीच्या चालकांशी १९२२ साली मतभेद झाल्यामुळे त्यांनी कंपनी सोडली आणि चित्रपटव्यवसायात प्रवेश करून दिग्दर्शक व नट या दुहेरी भूमिका समर्थपणे हाताळल्या आणि सहा चित्रपटांची निर्मितीही केली त्यांपैकी शरत्चंद्र चतर्जीलिखित कादंबऱ्यांवरील आँधार आलो व चंद्रनाथ हे चित्रपट लोकप्रियही ठरले पण शिशिरकुमारांच्या मुक्त अभिनयप्रवृत्तीला चित्रपटमाध्यम फारसे मानवले नाही. त्यामुळे ६ ऑगस्ट १९२४ रोजी त्यांनी स्वतःचाच नाट्यमंदिर नावाचा संच जमवून कलकत्त्याच्या ईडन गार्डनमध्ये भरलेल्या प्रदर्शनात द्विजेंद्रलाल रायलिखित सीता या नाटकाचे प्रयोग केले. यातील शिशिरकुमारांची श्रीरामचंद्राची भूमिका बंगाली नाट्यभिनयाच्या इतिहासात अजरामर झाली. आपल्या अभिनय कौशल्याने पुढील तीस वर्षे त्यांनी बंगाली रंगभूमी गाजवली. त्यांच्या प्रसिद्ध भूमिकांपैकी द्विजेंद्रलाल यांचे पाषाणी, गिरीशचंद्र घोषलिखित जना, प्रफुल्ल व बलिदान दीनबंधू मित्रलिखित सधवार एकादशी व शरत्चंद्र चतर्जी यांच्या देनापावना या कादंबरीवरील षोडशी इ. नाटकांमधील शिशिरकुमारांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या. त्यांनी रवींद्रनाथ टागोरलिखित ६७ आणि अन्य लेखकांच्या ८० नाटकांतून विविध भूमिका केल्या. बंगाली व इंग्रजी शब्दांच्या सुरेल उच्चारांमुळे श्रोत्यांची मने ते भारून टाकीत. १९३० साली सीता हे नाटक करण्यासाठी शिशिरकुमारांना अमेरिकेहून आमंत्रण आले होते. त्यावेळी न्यूयॉर्कमधील व्हँडरबिल्ट थिएटरात सीता नाटकाचा प्रयोग खूप गाजला (१२ जानेवारी १९३१). पण आर्थिक दृष्ट्या हा दौरा फलदायी ठरला नाही. कफल्लक होऊन त्यांना परतावे लागले. रीतिमत नाटक या खेळात त्यांनी शेवटची भूमिका १० मे १९५९ रोजी केली होती. १९५९ साली त्यांना भारत सरकारतर्फे पद्मभूषण हा किताबही देऊ करण्यात आला होता पण तोदेखील त्यांनी नाकारला.
शिशिरकुमारांमुळे अनेक तरुण मंडळींना नाट्यलेखन, अभिनय, नेपथ्य इ. क्षेत्रांमध्ये शिरण्याची प्रेरणा मिळाली व बंगाली रंगभूमीचे जनक गिरीशचंद्र घोष यांच्यानंतर अवकळलेल्या रंगभूमीमध्ये चैतन्य आले. नाट्यव्यवसायाला प्रतिष्ठा लाभली. त्यांचा पल्लेदार आवाज, प्रभावी व्यक्तिमत्त्व व समर्थ अभिनय यांमुळे बंगाली रंगभूमी समृद्ध झाली त्यांच्या आयुष्याची अखेरची वर्षे हलाखीत गेली. कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले.
सरचौधरी, देवव्रत आलासे, वीणा
“