भागीदारी : (पार्ट्‍नशिप). कोणत्याही किफायतशीर व्यापार उद्योग करण्यासाठी जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ति एकत्र येऊन आपली संपत्ती, अंगमेहनत अगर कसब एकत्र करून त्या व्यापार उद्योगात होणारा नफा मान्य प्रमाणात वाटून घेण्याचा करार करतात, तेव्हा कायद्याच्या परिभाषेत अशा व्यक्तींमधील संबंधास भागीदारी असे म्हणतात. भागीदारीच्या सर्व भागीदारांना संयुक्तपणे फर्म, व्यवसाय-संघ किंवा भागीदारी पेढी या नावांनी आणि व्यक्तिशः भागीदार असे संबोधतात.

भागीदारासंबंधीच्या कायदेशीर तरतुदी भारतीय भागीदारी अधिनियम (१९३२) मध्ये नमूद केलेल्या आहेत. तथापि हा अधिनियम होण्यापूर्वी भारतीय करार अधिनियम (१८७२) मधील अकराव्या भागातील तरतुदींनुसार भागीदारीची अंमलबजावणी होत होती. अज्ञान व्यक्तिस भागीदारी पेढीचा सभासद (भागीदार) होता येत नाही. परंतु भागीदारीचा फायदा मिळण्यासाठी त्यास सामील करून घेता येते. भागीदारंचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास अशी अंज्ञान व्यक्ती त्या नुकसानीस व्यक्तिशः जबाबदार असत नाही. परंतु अशा अज्ञान व्यक्तिचा भागीदारी पेढीतील नफ्याचा आणि मालमत्तेचा हिस्सा भागीदारी पेढीचे नुकसान, कर्जे व देणी फेडण्यास जबाबदार राहतो. कोणत्याही एका भागीदाराच्या निष्काळजीमुळे अगर लबाडीने त्रयस्थ इसमाचे नुकसान झाल्यास त्यानुकसानीची जबाबदारी सर्व भागीदारांवर सामुदायिक रीत्या व स्वतंत्र रीत्या येते. कारण प्रत्येक भागीदार हा इतर भागीदारांचा व पेढीचा प्रतिनिधी असतो. त्यामुळे कोणत्याही भागीदाराने केलेल्या व्यवहाराची बरीवाईट सर्व जबाबदारी सर्व भागीदारांवर तसेच भागीदारीवर येते.

भागीदारीत गुंतवलेले भांडवल तसेच त्या भांडवलातून अगर नफ्यातून भागीदारीच्या नावे खरेदी केलेली मिळकत, या सर्वात सर्व भागीदारांचा करारात ठरविल्याप्रमाणे हिस्सा असतो. एकंदर मिळकतीस भागीदारीची मिळकत असेच म्हणतात. भागीदारीत झालेल्या नफ्यात व तोट्यात प्रत्येक भागीदाराचा करारात ठरविल्याप्रमाणे समान वा असमान हिस्सा असतो. तसेच प्रत्येक भागीदारास भागीदारीच्या व्यवस्थेत भाग घेण्याचा अधिकार आहे. प्रत्येक भागीदाराने भागीदारीचा व्यवहार मनःपूर्वक व विश्वासाने केला पाहिजे आणि त्याबद्दल मेहनताना मागता येत नाही. विशिष्ट कराराने मेहनताना ठरला असल्यास ते निराळे.

रोजच्या सामान्य व्यवहारात वाद उत्पन्न झाल्यास भागीदार बहुमताने निकाल करतात. मात्र भागीदारीतील खास व्यवहाराबद्दल वाद असल्यास त्याचा निकाल सार्वमतानेच केला जातो. भागीदारीच्या करारपत्रात नमूद केल्यास भागीदारीसंबंधाचा कोणताही वाद सोडविण्यास लवाद नेमता येतो. तसेच नवीन भागीदार करून घ्यावयाचा असल्यास हा सर्वांची संमती लागते.

कोणत्याही भागीदारास भागीदारीतून केव्हाही निवृत्त होता येते. विशिष्ट मुदतीसाठी ठरलेल्या भागीदारीतून मात्र याप्रमाणे निवृत्त होता येत नाही. त्यासाठी सर्वांची संमती लागते. मुदतीच्या भागीदारीतून न्यालयाच्या हुकूमाशिवाय कोणत्याही भागीदारास काढून टाकता येत नाही. मुदतीच्या अगर साध्या भागीदारातील कोणताही इसम मृत्यू पावल्यास त्याची भागीदारी नष्ट होते किंवा मोडते.

भागीदाराने दावा केल्यास पुढील कारणांनी भागीदारी संपुष्टात आणता येते : (१) कोणताही इतर भागीदार नादार अगर वेडा झाल्यास, (२) भागीदाराने आपले हितसंबंध त्रयस्थास खरेदी दिल्यास, (३) भागीदारास भागीदारीच्या कराराप्रमाणे वागणे अशक्य झाल्यास, (४) भागीदाराने भागीदारीशी अगर त्या प्रकारच्या व्यवहारांत गैरकृत्य केल्यास आणि (५) भागीदारीचे व्यवहार पुढे चालविण्यात तोटाच होईल अशी खात्री झाल्यास.

भागीदारांनी एकमेकांशी प्रामाणिकपणे वागले पाहिजे व सर्वांच्या फायद्यासाठी जास्तीत जास्त झटले पाहिजे. तसेच भागीदाराने त्याच प्रकारचा धंदा स्वतंत्रपणे करून भागीदाराशी चढाओढ करावयाची नाही, असा दंडक आहे.

पटवर्धन, वि. भा. कुलकर्णी, स. वि.