भांडीक : भांडीक किंवा ज्याला सामान्य भांडीक म्हणतात तो हिरंडिनिडी कुलातील पक्षी आहे. याचे शास्त्रीय नाव हिरंडो रस्टिका असे आहे. हा भारतात कायमचा राहणारा नाही. सप्टेंबर-ऑक्टोबरपासून हा हिमालयाच्या परिसरातून किंवा त्याच्याही पलीकडून भारतात येतो आणि एप्रिल-मेच्या सुमारास आपल्या मूळ ठिकाणी परत जातो. हिवाळ्यात भारताच्या सगळ्या भागांत हा आढळतो.

भांडीक : (अ) सामान्य भांडीक (हिरंडो रस्टिका) (आ) तंतुपुच्छ भांडीक (हिरंडो स्मिथाय).

भांडीक साधारपणे चिमणीएवढा असतो. शरीराची वरची बाजू तकतकीत काळसर निळी किंवा जांभळट निळी असते खालची बाजू पांढरी पण त्यात गुलाबी छटा, कपाळ तांबूस काळसर हनुवटी व गळा तांबूस पिंगट पंख बरेच लांब शेपूट खोलवर दुभागलेले व प्रत्येक भाग जाड काडीसारखा लांब असतो. नर व मादी यांत फरक नसतो. या पक्ष्यांचे थवे असतात आणि तारायंत्रांच्या तारांवर ते बसलेले दिसतात.

माश्या, घुंगुरटी (चिलटे) आणि इतर उडणारे किडे उडत असतानाच पकडून हे खातात. यांचे मोठाले थवे बोरूच्या बेटात किंवा झाऊच्या झुडपात रात्री विश्रांती घेतात.

यांच्या विणीचा हंगाम एप्रिलपासून जुलैपर्यत असून या काळात यांच्या पाठोपाठ दोन विणी होतात. भारतात यांची वीण फक्त हिमालयात काश्मीरपासून आसामपर्यंत होते. घरटे बशीच्या आकाराचे व चिखलाचे बनविलेले असते. त्याला गवत आणि मऊ पिसांचे अस्तर असते. त्यात मादी ४-५ पांढरी अंडी घालते. घरटे बांधणे, अंडी उबविणे व पिल्लांना भरविणे ही कामे दोघेही करतात.

भांडीकाची आणखी एक जात भारतात नेहमी आढळते हिला ‘तंतुपुच्छ भांडीक’ (हिरंडो स्मिथाय) म्हणतात. हा भारतात कायम राहणारा आहे. पाठीचा रंग तकतकीत काळसर निळा असतो खालची बाजू तकतकीत पांढरी डोक्याचा माथा तांबूस काळसर शेपटी दुभागलेली असून तिचे दोन्ही भाग बारीक तारेसारखे आणि बरेच लांब असतात मादीच्या तारा नराच्यापेक्षा आखूड असतात. हा पक्षी नेहमी पाण्याच्या जवळपास राहणारा आहे. याच्या सवयी सामान्य भांडिकासारख्याच असतात. विणीचा हंगाम मुख्यतः मार्च ते सप्टेंबर असतो. घरटी चिखलाची बनविलेली व रूंद तोंडाच्या उथळ बोळक्यांसारखी असतात. ती फुलांच्या कमानीला, पाण्याजवळ असणाऱ्या खडकांना किंवा खोल विहीरींच्या भिंतींना चिकटविलेली असतात. पिल्लांना उडता येऊ लागले म्हणजे ती उडत असतानाच आईबाप त्यांना खाऊ घालतात.

कर्वे, ज. नी.