भद्रक : (भद्राक्ष, इं. फॅन फ्लॉवर, मलेराइस – पेपर प्लँट, लॅ. स्कीव्होला फ्रुटेसन्स , स्की. कोएनिजी कुल-गुडेनिएसी) सुमारे ३-५ मी. उंच व पसरट फांद्यांचा हा सदापर्णी लहान वृक्ष मुख्यतः आँस्ट्रेलियात व पॉलिनीशियात आढळतो भारतात व श्रीलंकेत समुद्र किनाऱ्याजवळ सर्वत्र आणि अंदमान बेटांतही हा आढळतो शिवाय शोभेकरिता हा लावतात. खोड व फांद्या कोनीय, मजबूत, गुळगळीत वा फिकट हिरव्या असतात. पाने साधी, मोठी (११.५-२० X ४-९ सेंमी) एकाआड एक, मांसल, व्यस्त अंडाकृती (तळाशी निमुळती व टोकाकडे रुंदट व गोलसर), बिनदेठाची, गुळगुळीत व अनेक असून ती फांद्याच्या टोकांस गर्दीने वाढतात. द्विशाखी वल्लरी प्रकारचे फुलोरे [⟶ पुष्पबंध] पानांपेक्षा बरेच लहान असून त्यांवर पांढरी, सुवासिक, २.५-३.२ सेंमी. लांब फुले येतात. संदले ५, लवदार, पुष्पमुकुट नळीसारखा, पाकळ्या पाच व आतून केसाळ, नळी तिरपी व पाठीवर चिरलेली, केसरदले ५, जुळलेल्या पाकळ्यांच्या तळाशी पुष्पासनास चिकटलेली व त्यांच्याशी एकाआड एक, परागकोश सुटे, किंजपुट बहुधा अधःस्थ, एक किंवा दोन कप्प्यांचा व त्यात १-२ सरळ बीजके, किंजल वाकडा, लांब, केसाळ, किंजल्क केसाळ, पेल्यासारख्या आच्छादनाने वेढलेला व दुभंगलेला [⟶ फूल]. आठळी फल गोलसर, काहीसे द्विखंडी, पांढरे, २ सेंमी. व्यासाचे, मांसल व त्यावर संवर्त कायम राहिलेला दिसतो.

भद्रक : (१) फुलांफळांसह फांदी, (२) पुष्पमुकुट, (३) पाकळ्या काढलेले फूल,(४) फळ, (५) फळाचा आडवा छेद, (६) आटळी.

भद्रकाची पाने व साल यांचा काढा बेरीबेरी रोगावर देतात, कारण तो हृद्याच्या अतिजलद स्पंदनाला प्रतिरोध करतो त्यामुळे नाडीचे ठोक दर मिनिटास शंभरावर गेले असल्यास कमी होतात.⇨ डिजिटॅलीस पुर्पुरियाऐवजी हे औषध अधिक पसंत करतात. ते मूत्रल (लघवी साफ करणारे) असते. पाने कडू असून पचनक्रियेत सुधारणा करण्यास देतात. पानांचे पोटीस डोकेदुखी, अर्बुद (पेशींच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण झालेली शरीरास निरुपयोगी गाठ) व पायावर आलेली सूज यांवर उपयुक्त. पानांची भाजी करतात व ती तंबाखूप्रमाणे ओढण्यास वापरतात. डोळे आल्यास मांसल फळांचा रस डोळ्यांत घालतात फळांचे पोटीस अर्बुदावर बांधतात ते पोटात घेतल्यास स्त्रियांना ऋतुस्त्राव (विटाळ) सुरू होतो. मुळांचा काढा उपदंश व आमांश यांवर देतात. खोडातील भेंड अतिसारावर उपयुक्त असते. पानांत व खोडाच्या सालीत कडू द्रव्य व दोन ग्लायकोसाइडे असतात. झाडाच्या बुंघ्याजवळचे लाकूड टणक असून ते खाऱ्या पाण्यातही टिकते म्हणून मलेशियात त्याचे खिळे व खुंटया करून नावांकरिता वापरतात. भेंड व जाड फांद्या रंगद्रव्ये लवकर शोषून घेतात, त्यामुळे त्यांचा उपयोग कृत्रिम रंगीत वस्तू (उदा., फुले, फळे, पक्षी इ.) तयार करण्यास करतात. वनस्पतींच्या अवयवांचे अभ्यासाकरिता काप काढण्यास एल्डरच्या भेंडाऐवजी ते वापरतात. या भेंडाला इंग्रजीत ‘टाकाडा पिथ’ म्हणतात. भेंड सपाट करून विशिष्ट प्रकारचा कागद (राइस पेपर) बनवितात. समुद्रकाठच्या जमिनीची धूप थांबविण्यासाठी ही झाडे लावतात. ⇨ राइस-पेपर प्लॅंट हे इंग्रजी नाव दुसऱ्या एका वनस्पतीसही (फॅटसिया पॅपिरिफेरा) वापरले आहे.

संदर्भः  1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. IX. New Delhi, 1972.

           2. Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. II, Delhi, 1975.

चिन्मळगुंद, वासंती रा.