भटनागर, शांतिस्वरूप : (२१ फेब्रुवारी १८९४-१ जानेवारी १९५५). भारतीय रसायनशास्त्रज्ञ. स्वातंत्र्योत्तर काळात भारताचा औद्योगिक विकास होण्याच्या दृष्टीने भारतात ⇨ राष्ट्रीय प्रयोगशाळांची आणि वैज्ञानिक संशोधन केंद्रांची मालिका स्थापन करण्यात भटनागर यांनी अतिशय बहुमोल कामगिरी केली.
भटनागर यांचा जन्म शाहपूर जिल्ह्यातील (पूर्वी पंजाबातील, आता पाकिस्तानातील) भेडा येथे झाला. लाहोर येथील फोग्मन ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन त्यांनी १९१८ मध्ये एम्.एससी. पदवी संपादन केली. त्या वेळी रूचिराम सहानी व सर जगदीशचंद्र बोस या प्रख्यात शास्त्रज्ञांच्या सान्निध्यात आल्यामुळे त्यांचे विज्ञानप्रेम वृद्धिंगत झाले. फोगमन ख्रिश्चन कॉलेजात काही काळ प्रयोगनिर्देशक म्हणून काम केल्यानंतर १९१९ मध्ये त्या कॉलेजतर्फे त्यांना शिष्यवृत्ती मिळाल्याने ते लंडन विद्यापीठात सर विल्यम रॅम्झी इन्स्टिटयूटमध्ये एफ्. जी. डोनान या रसायनशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करण्याठी गेले. तेथे प्रिव्ही कौन्सिलची एक शिष्यवृत्ती मिळून सुटीच्या काळात त्यांना जर्मनीतील कैसर व्हिल्हेल्म इन्स्टिटयूटमधील व पॅरिस येथील सॉर्वान विद्यापीठातील प्रयोगशाळांत अध्ययन करण्याची संधी मिळाली. काही पायसांच्या (एकमेकांत न मिसळणाऱ्या द्रवांपासून बनणाऱ्या दृढ मिश्रणांच्या) भौतिक-रासयनिक गुणधर्मांसंबंधी संशोधन करून भटनागर यांनी १९२१ मध्ये लंडन विद्यापीठाची डी. एससी. पदवी मिळविली. त्यानंतर ते भारतात परतले व पंडित मदन मोहन मालवीय यांच्या विनंतीवरून त्यांनी बनारस विद्यापीठात हिंदू रसायनशास्त्राचे प्राध्यापकपद स्वीकारले. १९२४ मध्ये ते लाहोर येथील पंजाब विद्यापीठात भौतिकीय रसायनशास्त्राचे प्राध्यापक व तेथील रसायनशास्त्रीय प्रयोगशाळेचे संचालक झाले. १९२६ पासून त्यांनी चुंबकीय रसायनशास्त्रतील (पदार्थाचे स्थूल चुंबकीय गुणधर्म आणि त्याची आणवीय व रेणवीय संरचना यांतील परस्पसंबंधाचा अभ्यास करणाऱ्या रसायनशास्त्राच्या शाखेतील) संशोधनास प्रारंभ केला. या विषयाच्या अभ्यासात उपयुक्त असलेले चुंबकीय व्यतिकरण संतुलनमापक हे उपकरण के. एन्. माथुर यांच्या सहकार्याने त्यांनी तयार केले व त्याचे एकस्व (पेटंट) मिळविले. हे एकस्व त्यांनी अँडम अँड हिल्गर्स या शास्त्रीय उपकरणे तयार करणाऱ्या ब्रिटिश कंपनीला विकले. त्या वेळी चुंबकीय रसायनशास्त्रवर जगातील अनेक प्रयोगशाळांत संशोधन चालू असल्याने या उपकरणाचा पुष्कळच खप झाला. भटनागर व माथुर यांनी लिहिलेला फिजिकल प्रिन्सिपल्स अँड अँप्लिकेशन्स ऑफ मॅग्नेटोकेमिस्ट्री हा चुंबकीय रसायनशास्त्रावरील पहिलाच इंग्रजी ग्रंथ १९३५ मध्ये प्रसिद्ध झाला. पायसे, कागदावरील कार्बनी द्रव्यांचे थर व त्यांचे रासायनिक संघटन वगैरे विविध अभ्यासांत त्यांनी चुंबकीय रसायनशास्त्राचा उपयोग केला. त्यानंतर त्यांनी औद्योगिक संशोधनाकडे आपले लक्ष वळविले. उसाची मळी, ताग व कापूस यांतील कचरा, नारळाच्या करवंटया यांसारख्या निरूपयोगी वस्तूंपासून उपयुक्त द्रव्ये मिळविण्याच्या प्रक्रिया त्यांनी विकसित केल्या. १९३६ मध्ये त्यांनी स्टील ब्रदर्स या व्यापारी कंपनीला खनिज तेलासंबंधीच्या काही औद्योगिक समस्या सोडविण्यात संशोधन करून बहुमोल मदत केली. या कार्याकरिता या कंपनीने दिलेल्या मोबदल्यातून भटनागर यांनी पंजाब विद्यापीठात या कंपनीच्या नावावरून ओळखण्यात येणारा ‘स्टील ब्रदर्स संशोधन प्रकल्प’ कार्यान्वित करण्यासाठी एक खास प्रयोगशाळा स्थापन केली आणि तीमध्ये केरोसिनाचे शुद्धीकरण, गंधहीन मेणाचे उत्पादन, वंगणे व वंगणक्रिया, धातुंच्या क्षरणक्रियेला (झिजणे वा गंजणे या क्रियेला) प्रतिबंध यांसारख्या विविध समस्यांवर संशोधन केले.
दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर तत्कालीन हिंदुस्थान सरकारने एक वैज्ञनिक व औद्योगिक संशोधन मंडळ १९४० मध्ये स्थापन केले. या मंडळाचे पुढे १९४२ मध्ये ⇨ कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या मंडळात रूपांतर झाले आणि भटनागर यांची या मंडळाचे पहिले संचालक म्हणून नेमणूक झाली. १९४४ मध्ये ब्रिटन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा यांसारख्या प्रगत राष्ट्रांचा दौरा करण्यासाठी गेलेल्या भारतीय वैज्ञानिक शिष्टमंडळात भटनागर यांचा समावेश होता. या दौऱ्यावरून परतल्यावर त्यांनी भारतात स्वतंत्रपणे विविध विषयांवरील संशोधनाकरिता स्वंयपूर्ण प्रयोगशाळा स्थापन करण्याचे महत्व सरकारला पटवून दिले. भारत स्वतंत्र झाल्यावर पं. जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदर्शी वैज्ञानिक धोरणामुळे व भटनागर यांच्या प्रदीर्घ प्रयत्नांमुळे क्रमाक्रमाने भारतात १४ राष्ट्रीय प्रयोगशाळांची मालिका निर्माण झाली. अशा प्रकारे भारतात विविध वैज्ञानिक शाखांतील पद्धतशीर संशोधनाला भटनागर यांच्या परिश्रमामुळे बहुमोल चालना मिळाली. पुढे १९५१ मध्ये स्थापन झालेल्या ‘नैसर्गिक साधनसंपत्ती व वैज्ञानिक संशोधन’ या मंत्रालयाचे पहिले सचिव म्हणून त्यांनी नियुक्ती झाली. या पदावर असताना त्यांनी ⇨ विरल मृत्तिका, किरणोत्सर्गी (भेदक किरण वा कण बाहेर टाकणारी) खनिजे. गंधकयुक्त खनिजे, खनिज तेल इत्यादींचे भारतातील साठे शोधण्याच्या कार्याला चालना दिली. अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण मंडळाचे १९५४ मध्ये ते सचिव झाले. विद्यापीठ अनुदान मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. वैज्ञानिक शैक्षणिक क्षेत्रांतील अनेक शासकीय व्याप साभांळून त्यांनी वैयक्तिक संशोधनही चालू ठेवले होते. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी औद्योगिक दृष्टया उपयुक्त अशा विविध द्रव्यांच्या निर्मितीच्या प्रकिया शोधून काढल्या (उदा., विषारी वायूचा वा धुराचा परिणाम न होणारे व कापडावर लेप देता येणारे रोगण, फेसाळ रबराच्या निर्मितीसाठी योग्य असा विद्राव, विस्फोटक द्रव्यांच्या साठवणीसाठी लागणारी विशिष्ट प्रकारची पात्रे. न फुटणारे व काचसदृश गुणधर्म असलेले पदार्थ आणि त्यांपासून उपयुक्त उपकरणे बनविणे, कृषी व्यवसायातील टाकाऊ पदार्थापासून प्लॅस्टिके तयार करणे वगैरे). त्यांना अनेक रासायनिक प्रक्रियांची व उपकरणांची एकस्वे मिळालेली होती.
भटनागर यांना त्यांच्या बहुमोल कार्याबद्दल अनेक सन्मान मिळाले. ब्रिटिश सरकारने १९३६ मध्ये, ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एंपायर’ व १९४१ मध्ये ‘नाइट’ हे किताब देऊन त्यांचा गौरव केला. ऑक्सफर्ड, पाटणा, अलाहाबाद, लखनौ, आग्रा व सागर या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय पदव्या दिल्या. भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’ हा किताब दिला. १९४३ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटी व सोसायटी ऑफ केमिकल इंडस्ट्री या संस्थाचे सदस्य म्हणून निवड होण्याचा त्यांना बहुमान मिळाला. सोसायटी ऑफ केमिकल इंडस्ट्रीचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांची नंतर निवड झाली. इन्स्टिट्यूट ऑफ केमिस्टस ऑफ ग्रेट ब्रिटन या संस्थेचं सदस्यत्व मिळणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ होत. भारतीय विज्ञान परिषदेच्या रसायनशास्त्र शाखेचे १९२८ व १९३८ मध्ये ते अध्यक्ष होते आणि १९४५ साली नागपूर येथे भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यांनी सु. १७० संशोधनात्मक निबंध व लेख लिहीले. त्यांच्या इलमुलवर्क हा विद्यूत शास्त्रावरील उर्दु ग्रंथ व लाजवंती हा उर्दु कवितांचा संग्रह हेही प्रसिद्ध आहेत.
तरूण भारतीय संशोधन व तंत्रज्ञ यांनी केलेल्या लक्षणीय महत्वाच्या संशोधनाला योग्य मान्यता मिळण्यासाठी कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च तर्फे भटनागर यांच्या स्मरणार्थ १९५७ पासून प्रतिवर्षी पाच ते सहा ‘शांतिस्वरूप भटनागर पारितोषिके’ देण्यात येत आहेत. ही पारितोषिके ४५ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या शास्त्रज्ञांना त्यांनी पारितोषिक देण्यात येणाऱ्या वर्षाच्या अगोदरच्या पाच वर्षाच्या काळात केलेल्या भौतिकीय, रासायनिक, जीववैज्ञानिक, अभियांत्रिकीय, वैद्यकीय, गणितीय वा इतर विज्ञानांत केलेल्या महत्वपूर्ण संशोधनाबद्दल देण्यात येतात. ते नवी दिल्ली येथे मृत्यू पावले.
सणस, दि. बा.
“