ब्रौवर, ल्यूइटझेन एखबेर्टस यान : (२० फेब्रुवारी १८८१ – २ डिसेंबर १९६६). डच गणितात. त्यांनी गणितीय अंतःप्रज्ञावादाची स्थापना केली[⟶ गणिताचा तात्त्विक पाया] आणि ⇨संस्थितिविज्ञानातील त्यांच्या महत्वपूर्ण कार्यामुळे त्या विषयाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.

ब्रौवर यांचा जन्म नेदर्लंड्समधील ओव्हर्‌स्खी येथे झाला. त्यांनी ॲम्स्टरडॅम विद्यापीठात गणिताचे शिक्षण घेतले व १९०७ मध्ये गणिताच्या तात्त्विक पायावर प्रबंध लिहून डॉक्टरेट पदवी मिळविली. ॲम्स्टरडॅम विद्यापीठात त्यांनी १९०९ पासून विनावेतन अध्यापक व १९१२ पासून ते १९५१ मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केले.

जर्मन गणितज्ञ डाव्हीट हिल्बर्ट यांच्या कार्याचा १९०७ पासून अभ्यास करून ब्रौवर यांनी त्याच्या संदर्भात कार्टेशियन प्रतलाच्या संस्थितिक चित्रणाचे वैशिष्ट्य असलेल्या प्रतल स्थलांतरण प्रमेयाचा शोध लावला. त्यांनतर त्यांनी ⇨अवकल समीकरणे व ⇨खेळ सिद्धांत यांसारख्या गणितीय शास्त्रांमधीलही काही मूलभूत प्रमेये प्रस्थापित करण्यात महत्त्वाचे असलेले संस्थितिविज्ञानातील स्थिर बिंदू प्रमेय मांडले. संस्थितिक विन्यासात (भूमितीय वस्तूंच्या रचनेत) काही कृत्यांमुळे बदल घडून आले, तरी त्याचे काही विशिष्ट गुणधर्म बदलत नाहीत, हे संस्थितिक निश्चलतेचे महत्वाचे प्रमेय ब्रौवर यांनी १९११ मध्ये प्रतिपादिले. संस्थितिक अवकाशाच्या मितींची संख्या संतत रूपांतरणात निश्चल रहाते, असे त्यांनी सिद्ध केले. ‘ कोणत्याही साध्या बंद वक्राने प्रतलाचे दोन भाग होतात’ या कामीय झॉर्दा यांच्या संस्थितिविज्ञानातील प्रमेयाच्या प-मितीय अवकाशाकरिताच्या व्यापकीकरणाची सिद्धता १९१२ साली ब्रौवर यांनी दिली. याखेरीज त्यांनी गेओर्क कँटर यांनी विकसित केलेल्या संच सिद्धांतातील पद्धतींचे संस्थिती विश्लेषणातील (संस्थितीविज्ञान पूर्वी ज्या नावाने Analysis situs ओळखले जात होते त्या विषयातील) पद्धतींबरोबर एकत्रीकरण केले. संस्थितीविज्ञानात ब्रौवर यांनी केलेल्या महत्वपूर्ण कार्यामुळे कित्येक गणितज्ञ त्यांना संस्थितिविज्ञानाचे संस्थापक म्हणून मानतात.

डॉक्टरेटसाठी त्यांनी सादर केलेल्या प्रबंधात गणिताच्या तार्किक पायावर प्रखर टीका करून त्यांनी अंतःप्रज्ञावादी संप्रदायाला प्रारंभिक रूप दिले. बर्ट्रंड रसेल व इतरांनी सुचविल्याप्रमाणे गणित ही तर्कशास्त्राची शाखा नसून नैसर्गिक संख्यांच्या [⟶ संख्या] अंतःप्रेरित आकलनावर आधारित अशी गणितज्ञांनी अंगीकारलेली ती एक क्रिया आहे, असा दृष्टिकोन ब्रौवर यांनी मांडला. रसेल व जे. एच. प्वँकारे यांच्यातील गणिताच्या पायाभूत तत्वांविषयीच्या वादात ब्रौवर यांनी प्वँकारे यांची बाजू ग्राह्य मानली. हिल्बर्ट यांच्या स्वयंसिद्धकानुसारी (गृहीततत्वानुसारी) पद्धतीला त्यांचा विरोध होता. १९०८ साली त्यांनी गणितीय सिद्धांतामध्ये तर्कशास्त्रातील विमध्य नियमाचा उपयोग करणे अग्राह्य असल्याचे प्रतिपादन केले. या नियमानुसार प्रत्येक गणितीय विधान हे सत्य तरी असते किंवा असत्य असते याखेरीज इतर कोणतीही शक्यता अस्वीकार्य ठरते.विमध्य नियमाचा उपयोग न करता त्यांनी १९१८ मध्ये एक संच सिद्धांत, पुढील वर्षी एक माप सिद्धांत [⟶ माप व समाकलन] आणि १९२३ च्या सुमारास एक फलन सिद्धांत [⟶ फलन] असे निरनिराळे सिद्धांत विकसित केले. त्यांच्या विचारांचा जरी विस्तृत प्रमाणात स्वीकार झाला नाही, तरी १९५४ सालापर्यंत त्यांनी आपले संशोधन कार्य चालू ठेवले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रामुख्याने एस्. सी. क्लीन यांच्या मूलभूत कार्यामुळे अंतःप्रज्ञावादाकडे पुन्हा गणितज्ञांचे लक्ष वेधले.

ब्रौवर यांना गणितज्ञांना आपल्या विचारप्रणालीकडे वळविण्यात फारसे यश लाभले नसले, तरी त्यांच्या कार्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली होती. ऑस्लो, केंब्रिज वगैरे विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय पदव्या दिल्या. रॉयल नेदर्लंड्स ॲकॅडेमी ऑफ सायन्स (१९१२) जर्मन ॲकॅडेमी ऑफ सायन्स, बर्लिन (१९१९) अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी, फिलाडेल्फिया (१९४३) रॉयल सोसायटी, लंडन इ. अनेक शास्त्रीय संस्थांचे ते सदस्य होते. त्यांनी संस्थितिविज्ञान व गणिताचा तात्त्विक पाया या विषयांवर अनेक निबंध विविध नियतकालिकांतून लिहिले. मानवी क्रियाशीलता व समाज यांविषयीचा त्यांचा दृष्टिकोन प्रतिपादन करणारा Leven, Kunst, en Mystiek (१९०५) हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. ते नेदर्लंड्समधील ब्लॅरीकम येथे मृत्यू पावले.

ओक, स. ज. भदे, व. ग.