ब्लीक्सन, कारेन: (१५ एप्रिल १८८५—७ सप्टेंबर १९६२). डॅनिश कथालेखिका. ईसाक दीनेसेन ह्या टोपण नावाने लेखन. डेन्मार्कमधील रंगस्टेडलंड येथे एका उमराव कुटुंबात जन्मली. तिचे शिक्षण नियमितपणे झालेले नव्हते. १९१४ मध्ये बॅरन ब्लीक्सन फेनेके ह्याच्याबरोबर तिचा विवाह झाला. पतिसमवेत काही काळ ती केन्यात (आफ्रिका) राहिली. १९२५ मध्ये तिने आपल्या पतीपासून घटस्फोट घेतला. केन्यात तिचा एक कॉफीचा मळा होता. घटस्फोटानंतर ह्या मळ्याची देखभाल करीत ती तेथे राहिलीतथापि प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे हा मळा विकून तिला डेन्मार्कमध्ये परतावे लागले (१९३१). तिचे केन्यातील वास्तव्य संपावयाच्या सुमारास मनावरील ताण विसरण्यासाठी म्हणून ती कथालेखन करू लागली होतीडेन्मार्कमध्ये आल्यानंतरही ते तिने चालूच ठेवले. सेव्हन गॉथिक टेल्स (इंग्रजी कथा – १९३४) हा तिचा पहिला कथासंग्रह. त्यातील कथांचा नंतर तिने स्वतःच डॅनिश भाषांतर करण्याची प्रथा तिने पुढेही चालू ठेविली.

विंटर्स टेल्स (१९४२), लास्ट टेल्स (१९५७) व ॲनिकडोट्स ऑफ डेस्टिनी (१९५८), हे तिचे कथासंग्रह उल्लेखनीय आहेत. आउट ऑफ आफ्रिका (१९३७) आणि शॅडोज ऑन द ग्रास (१९६१) ह्या दोन पुस्तकांत तिने आफ्रिकेतील आपल्या अनुभवांचे दर्शन घडविले आहे. गूढाची, अतिमानुषाची ओढ कल्पनारम्यता आणि अत्यंत परिणामकारक निवेदन शैली ही ब्लीक्सनच्या कथालेखनाची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होत.

इलिअड, ओडिसीसारखी महाकाव्ये, बायबलच्या जुन्या करारातील कथा, अरेबियन नाइट्स आणि स्कँडिनेव्हिअन सागा ह्यांचे संस्कार तिच्या कथेत प्रभावीपणे आळून आल्याचे जाणवते. जीवनानुभवांकडे मिथ्यकथेच्या जाणीवेतून पाहण्याची प्रवृत्ती जागृत करणाऱ्या तिच्या कथांना आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त झाली. नवा आशय आणि अभिव्यक्ती ह्यांच्या शोधात असलेल्या डॅनिश लेखकांच्या तरुण पिढीवरही त्यांनी परिणाम घडवून आणला. आफ्रिकेसंबंधीच्या तिच्या उपर्युक्त पुस्तकांत तिने आफ्रिकनांच्या मनोवृत्तीचे सूक्ष्म, मार्मिक विश्लेषण केलेले आहे. रंगस्टेडलंड येथेच ती निधन पावली.

संदर्भ : Johanneson, Eric O. The World of Isak Dinesen, Washington, 1961.

 

यानसेन, विलेस्कॉव्ह एफ्. जे. (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)