विल्यम ब्लॅकस्टोन

ब्लॅकस्टोन, विल्यम : (१० जुलै १७२३ – १४ फेब्रुवारी १७८०). प्रसिद्ध ब्रिटिश विधिवेत्ता. जन्म चीपसाइड (लंडन) येथे. त्याचे वडील चार्ल्‌स ब्लॅकस्टोन हे एक व्यापारी होते. विल्यम ब्लॅकस्टोनचे शिक्षण ऑक्सफर्डच्या चार्टरहाउस शाळेत झाल्यानंतर त्याने लंडनच्या ‘मिडल टेम्पल’ मध्ये प्रवेश घेतला (१७४०). १७४४ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ‘ऑल सोल्स महाविद्यालया’त अधिछात्र म्हणून त्याची निवड झाली व १७४५ मध्ये त्याला दिवाणी कायद्यातील पदवी मिळाली. १७४६ मध्ये त्याने वकिलीस प्रारंभ केला पण तीत तो फारसा यशस्वी न झाल्याने त्याने निरनिराळ्या विद्यापीठांत इंग्लिश विधीचा अधिव्याख्याता म्हणून काम केले. १७५० साली त्याने कायद्याची डॉक्टरेट पदवी मिळविली. नंतर ऑक्सफर्ड येथे नव्याने स्थापन झालेल्या ‘चार्ल्‌स व्हायनर अध्यासना’वर त्याची इंग्रजी कायद्याचा प्राध्यापक म्हणून निवड झाली (१७५८). १७६१ मध्ये त्याची संसदेवर निवड झाली व ब्रिटनच्या राणीचा महाधिवक्ता म्हणून त्याने काम केले. या पदाचा त्याने १७६६ मध्ये राजीनामा दिला. नंतर त्याची ‘कोर्ट ऑफ कॉमन प्लीज’ यावर न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली (१७७०). या पदावर त्याने आमरण काम केले. उत्तर आयुष्यात त्याने तुरुंग सुधारणा करण्याच्या कार्यात पुढाकार घेतला.

ब्लॅकस्टोनचा प्रख्यात ग्रंथ म्हणजे कॉमेंटरिज ऑन द लॉज ऑफ इंग्लंड (४ खंड, १७६५ – ६९) हा होय. इंग्लिश कायद्याचा समग्र आणि सर्वांगीण असा हा पहिल्यांदाच केलेला अभ्यास असून त्याचे महत्व इंग्लिश कायद्याच्या इतिहासात अनन्यसाधारण आहे. इंग्लिश विधी हा रोमन विधी आणि यूरोपीय दिवाणी विधी यांच्याच तोडीचा आहे, असे ब्लॅकस्टोनने आपल्या या प्रचंड ग्रंथाद्वारे दाखवून दिले. इंग्लंडमधील व अमेरिकेतील विधिव्यवसाय आणि विधिशिक्षण यांच्यावर या ग्रंथाचा फार मोठा परिणाम झाला. अठराव्या शतकातील रूढ असलेला कायदेविषयक दृष्टिकोन या ग्रंथातून ठळकपणे जाणवतो. तथापि न्यायशास्त्रविषयक चिकित्सेचा त्यात अभाव आहे, असे म्हटले जाते. तथापि ओघवती आणि रंजक लेखनशैली व इतर वाङ्‌मयीन गुणवत्ता यांमुळे एक अभिजात ग्रंथ म्हणून तो प्रसिद्ध आहे. इंग्लिश विधी मुळातच परिपूर्ण असून त्यात मूलभूत सुधारणांना फारसा वाव नाही, असा ब्लॅकस्टोनचा विश्वास होता. परिणामतः इंग्लिश विधीच्या उत्क्रांतीत ज्या सामाजिक आणि ऐतिहासिक घटकांचा प्रभाव पडला, त्यांचे विश्लेषण ब्लॅकस्टोनने केले नाही. त्यामुळे त्याचा दृष्टिकोन परंपरावादी व कर्मठ आहे, असा आक्षेप जेरेमी बेंथॅम व इतर समकालीन विधिज्ञांनी घेतला. तथापि ब्रिटिश नागरिकांचे स्वातंत्र्य व हक्क यांचे रक्षण करणे हा ब्लॅकस्टोनच्या दृष्टिकोनाचा गाभा असल्याने त्यास सर्वथा कर्मठ म्हणता येणार नाही. ब्लॅकस्टोनने कायदाविषयक इतरही निबंध प्रसिद्ध केले. लंडन येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ : 1. Danlel, J. B. The Mysterious Science of Law : An Essay on Blackstone’s Commentaries,     Gloucester (Mass). 1961.

           2. Everelt, C. W. Ed. A Commnet on the Commentaries, Oxford, 1928.

           3. Lockmiller, David A. Sir William Blackstone, Chapel Hill (N. C.), 1938.

         

रूपवते, दा. ता.