ब्रॉयर, मार्सेल: (२१ मे १९०२ -). हंगेरियन अमेरिकन वास्तुकार व फर्निचर- अभिकल्पक. हंगेरीमधील पेच येथे जन्म. सुरुवातीचे शिक्षण व्हिएन्ना येथे झाले. वायमार येथे नव्यानेच स्थापन झालेल्या ⇨बौहाउसमध्ये १९२० ते २४ च्या दरम्यान शिक्षण घेतले व तेथेच फर्निचर विभागाचा प्रमुख म्हणून काम केले (१९२५ – २८). बौहाउसचे देसौ येथे स्थलांतर झाल्यावर नवीन इमारतींमधील फर्निचरचे आकृतिबंध त्यानेच तयार केले. या काळात त्याने फर्निचरच्या आकृतिबंधांमध्ये वाकवलेल्या पोलादी नळ्या वापरून विविध प्रयोग केले. त्याने तयार केलेली पोलादी नळ्या, लाकूड व ॲल्युमिनियमची इंग्रजी ‘एस्’ या अक्षराच्या आकाराची खुर्ची ही आज सर्वत्र वापरात आढळते.

१९२९ ते ३३ पर्यंत तो बर्लिनमध्ये वास्तुकार व गृहशोभनकार म्हणून व्यवसाय करीत होता. त्यानंतर त्याने इंग्लंडला प्रयाण केले व लंडनमध्ये एफ्. आर्. एस्. यॉर्क ह्या वास्तुकाराच्या भागीदारीत व्यवसाय केला (१९३३-३७). पण लवकरच तो ग्रोपिअसच्या आमंत्रणावरून अमेरिकेतील ‘हार्व्हर्ड स्कूल ऑफ आर्किटेक्चर’मध्ये अध्यापनाचे काम करण्यास गेला. याच काळात त्याने ग्रोपिअसच्या भागीदारीत स्वतंत्र व्यवसायही केला (१९३८-४१). परंपरागत शैली व आकृतिबंध यांवर विसंबून न राहता सर्जनशील व नावीन्यपूर्ण अशा स्वतंत्र कल्पनांचा आविष्कार घडविण्याबाबत त्याचा आपल्या शिष्यांना आग्रह असे. त्याच्या मतप्रणालीने अमेरिकन वास्तुकारांची एक पिढीच प्रभावित झाली. त्याच्या शिष्यांमध्ये फिलिप जॉन्सन, पॉल रूडॉल्फ, जॉन योहान्स इ. आघाडीचे अमेरिकन वास्तुकार आहेत.

दुसऱ्या महायुद्धानंतर १९४६ पासून त्याने न्यूयॉर्कमध्ये राहून वास्तु-व्यवसाय केला. त्याने अनेक वास्तुकल्प तयार केले प्येअर नेर्वी व झेरफस यांच्या समवेत पॅरिसमधील यूनेस्कोची वास्तू (१९५३-५८) तसेच स्वतंत्र रीत्या कॉलेजव्हिल, मिनेसोटा येथील ‘सेंट जॉन्स ॲबी’(१९५३-६१ पहा मराठी विश्वकोश : २, चित्रपत्र ११), ‘लिचफिल्ड हायस्कूल जिग्नॅशियम’(१९५४-५६), न्यूयॉर्कमधील ‘‘व्हिटनी म्यूझीयम’ (१९६६) इत्यादी. ह्या इमारती त्याच्या प्रयोगशीलतेची साक्ष देतात. बौहाउसमधील कार्यवादी वास्तुकलेचे तत्व आणि वास्तुकलेतील बांधणीच्या नवनवीन कल्पना त्याने विविध प्रकारचे साहित्य वापरून प्रत्यक्षात आणल्या. त्याने लिहिलेले सन अँड शॅडो, द फिलॉसॉफी ऑफ ॲन आर्क्टिटेक्ट हे पुस्तक १९५६ मध्ये प्रकाशित झाले.

संदर्भ: 1. Blake, Peter, Marcel Breuer,Architect and Designer, New York, 1949.

          2. Jones, Cranston, Ed. Marcel Breuer : Buildings and Projects, London, 1962.

जगताप, नंदा