ब्राह्मो समाज : निराकार, सच्चिदानंदरूप, विश्वनिर्माता, विश्वनियन्ता, कल्याणगुणनिधान, प्रेममय, कृपानिधी, परमपवित्र व पतितपावन एकच एक परमेश्वर म्हणजे ब्रह्म त्याच्या उपासनेकरिता म्हणजे ब्राह्म धर्माकरिता स्थापलेली संस्था. ब्रह्मोपासनेची पद्धती म्हणजे ब्राह्म धर्म. या ब्राह्म धर्माच्या आंदोलनात उच्चतम, सर्वव्यापी नीतितत्त्वांचा, मानवी समानतेचा व त्यावर आधारलेल्या समाजसुधारणेचा प्रसार करण्याकरिता आवश्यक अशा कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली. भारताच्या प्रबोधनाची प्रेरणा या समाजापासून प्रथम मिळाली.
२० ऑगस्ट १८२८ या दिनी ⇨ राजा राममोहन रॉय (१७७२ – १८३३) यांनी महाराजा द्वारकानाथ टागोर (ठाकूर), कालिनाथ रॉय आणि मथुरानाथ मलिक या तीन मित्रांच्या सहकाराने कलकत्ता येथे ब्राह्म सभा स्थापिली. या सभेलाच पुढे लवकरच ब्राह्म समाज वा ब्राह्मो समाज म्हणू लागले. नंतर लगेच प्रसन्नकुमार ठाकूर, चंद्रशेखर देव व रामचंद्र विद्यावागीश हे त्यांना येऊन मिळाले. हळूहळू सभेच्या सदस्यांची संख्या वाढत राहिली. सदस्यसंख्या वाढू लागल्यानंतर ब्राह्मो समाजाला स्वतंत्र मंदिराची आवश्यकता भासू लागली. २३ जानेवारी १८३० या दिनांकी या मंदिराचा उद्घाटन समारंभ साजरा झाला. या ब्राह्मो सभेच्या विश्वस्त आलेखात (ट्रस्ट डीडमध्ये) या उपासना- मंदिराचे उद्दिट निर्दिष्ट करण्यात आले आहे ते असे :‘या उपासना मंदिरात सर्व विश्वाचा जनिता व रक्षणकर्ता अशा एका शाश्वत, निर्विकार व अतर्क्य अशा परमेश्वराचीच उपासना केली जाईल. कोणत्याही समाजात एखाद्या विवक्षित नावाने प्रचलित असलेल्या देवाची येथे उपासना होणार नाही. तसेच येथे कोणतीही मूर्ती, चित्र अगर पुतळा अथवा असेच कोणतेही प्रतीक ठेवण्यात येणार नाही. पूजेच्या निमित्ताने किंवा आहारासाठी येथे कोणत्याही जीवाची हत्या होणार नाही किंवा इतर खाद्यपेयादी व्यवहार होणार नाहीत. तसेच कोणाही पंथाच्या वा व्यक्तीच्या उपासना पद्धतीसंबंधी किंवा मूर्तीसंबंधी टीका किंवा निंदा व्यक्त होईल असे भाषण केले जाणार नाही. ज्याच्या योगाने नीती, भूतदया, पावित्र्य, परोपकार इ. सद्गुणांचा विकास होईल आणि सर्व धर्मांचे व पंथांचे लोकांत सलोखा वाढेल असाच उपदेश व संवाद येथे करता येईल.’
सार्वत्रिक एक धर्म निर्माण करणे हे ब्राह्मो समाजाचे उद्दिष्ट ठरले. जगातील सुप्रसिद्ध धर्मसंस्था आज आपापल्या तटबंदीमध्ये एकमेकींपासून विलग व उदासीन राहून वा एकमेकींचा विरोध किंवा हेवा करीत वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक समाजरचना चालवीत आहेत. धर्माचे उच्च नैतिक कर्तव्य म्हणजे मानवा-मानवांमध्ये मैत्री, समता व बंधुता निर्माण करणे हे होय. या कर्तव्याला प्रचलित धर्म व धर्मगुरू विसरले आहेत. सर्व धर्मांचे उच्चतम तत्त्व म्हणजे एकच एक परमेश्वर होय तोच सर्वांचा पिता व माता होय. म्हणून खऱ्या धर्मनिष्ठेतून सगळा मानवसमाज एकच एक विश्वकुटुंब होय, अशा तऱ्येची भावना निर्माण व्हावयास पाहिजे. जगातील सर्व धर्मांचे एकच सार आहे ते म्हणजे एकेश्वर भक्ती. अखिल विश्व हेच परमेशाचे मंदिर आहे. ह्रदय हेच परमेश्वराच्या अनुभवाचे द्वार, विवेकबुद्धी हीच देववाणी, कर्तव्यबुद्धी हे ईश्वरी शासन, सत्य हेच अविनाशी शास्त्र, विश्वव्यापी प्रेम हाच निरपवाद नियम, जीवन हीच प्रगमनशील यात्रा आणि मानवजात हीच विश्वाची शोभा, अशा प्रकारची समृद्ध धर्मनिष्ठा निर्माण करून सर्व धर्मांचे संगमस्थान असे धर्मपीठ व्हावे म्हणून ब्राह्मो समाजाची स्थापना करण्यात आली.
जगातील सर्व धर्मांचे तुलनात्मक अध्ययन करून राममोहन रॉय व त्यांचे मित्र यांनी सार्वत्रिक एकच धर्म आधुनिक जगाला पवित्र जीवन जगण्याकरता आवश्यक आहे, असे निश्चित केले. वेद, उपनिषदे, बायबल, कुराण इ. धर्मग्रंथांचा तुलनात्मक अभ्यास राममोहन रॉय यांनी केला होता. जगातील कोणताही धर्मग्रंथ साक्षात ईश्वरप्रणीत नाही सगळे धर्मग्रंथ माणसांनीच निर्मिले आहेत. माणसाच्या ह्रदयातील अंतःप्रज्ञा एकच एक विश्वाचा जनक व शास्ता असलेल्या ईश्वराचा अनुभव घेते व नैतिक स्फूर्ती देते. मनुष्याच्या मनात स्वार्थबुद्धी हा दोषही आहे. म्हणून आतापर्यंत मानवी इतिहीसात जे जे हिंदू, ख्रिस्ती, यहुदी, पारशी, मुसलमान यांचे धर्म निर्माण झाले त्यांच्यामध्ये सत्य आणि असत्य यांची मिसळ झाली आहे कारण ते सगळे धर्म मानवनिर्मित आहेत. सत्य व असत्य यांची गल्लत मानवी बुद्धीत होत असते. एकच एक परमेश्वर आहे, अनेक देव नाहीत हे सत्य किंवा सार सार्वत्रिक धर्माचे मुख्य तत्त्व होय. म्हणून निरनिराळे देव मानण्याची गरज नाही बहुदेवतावाद हे एक धार्मिक जीवनातील असत्य आहे. हिंदू, ख्रिस्ती आणि यहुदी धर्मांमध्ये देव पृथ्वीवर अवतार घेतो, असे मानतात परंतु निराकार देव साकार होऊ शकत नाही म्हणून अवतारवाद हे धार्मिक जीवनात शिरलेले असत्य आहे. हिंदू लोक देवाच्या विविध प्रकारच्या प्रतिमा करून त्या प्रतिमांची पूजा करतात व त्या प्रतिमांमध्येच परमेश्वराच्या सर्व शक्ती आहेत, असे प्रतिपादन करतात. ही प्रतिमापूजा किंवा ⇨ मूर्तिपूजा ही हिंदू धर्मात शिरलेली भ्रामक प्रवृत्ती आहे. तिचा त्याग केला पाहिजे.
मूर्तिपूजेचा विरोध आणि सामूहिक उपासना हे ब्राह्मो समाजाचे वैशिष्ट्य असल्यामुळे परंपरागत रूढिनिष्ठ हिंदू धर्मीयांना व त्यांच्या नेत्यांना असे वाटू लागले, की ब्राह्मो समाज हा ख्रिस्ती धर्माच्या अनुकरणातून उत्पन्न झाला आहे. प्रत्येक सप्ताहाच्या शेवटी संध्याकाळी एकत्र जमून सामूहिक प्रार्थना, प्रवचन, ध्यान आणि भक्तिपर संगीत या गोष्टींना ब्राह्मो समाजाच्या कार्यक्रमामध्ये मध्यवर्ती स्थान मिळाले. त्याचप्रमाणे ब्राह्मो समाजाचे संस्थापक राममोहन रॉय व त्यांच्यानंतर झालेले ब्राह्मो समाजाचे थोर प्रचारक ⇨ केशवचंद्र सेन यांनी ख्रिस्त चरित्र व ख्रिस्ताचा उपदेश यांची RAJमहती सांगणारी पुस्तके लिहिली भाषणे केली. भारतीयांना विशेषतः हिंदूंनी ख्रिस्ती न बनता, ख्रिस्ती धर्माची दीक्षा न घेता ख्रिस्ताचा व त्याच्या उपदेशाचा स्वीकार करावा, कारण मानवजातीला आदर्श धार्मिक जीवनाचे उदाहरण घालून देणारा ख्रिस्त हा देव नव्हे, तर श्रेष्ठ संत म्हणून हिंदूंना ख्रिस्ताची गरज आहे, असे राममोहन रॉय यांनी प्रतिपादन केले. राममोहनांनी रोमक कॅथलिक ख्रिस्ती संप्रदायातील पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या त्रयीच्या किंवा तीन देवांच्या संबंधी खंडनात्मक विचार मांडले आहेत. त्याच्या उलट केशवचंद्र सेन यांनी या त्रयीचे म्हणजे तीन देवांचे तात्त्विक समर्थन केले आहे. ख्रिस्ती धर्माकडे कललेल्या ब्राह्मी समाजी उपदेशकांच्या प्रतिपादनावरून परंपरागत हिंदूंचा आणि हिंदू नेत्यांचा असा समज झाला, की हिंदू धर्माला ख्रिस्ती धर्माचे रूप देण्याचा प्रच्छन्नपणे चालवलेला हा प्रयत्न होयपरंतु तुलनात्मक धर्मांच्या अध्ययनाच्या प्रवृत्तीमधील एक भाग ख्रिस्त व ख्रिस्ती धर्म यांच्या संबंधी ब्राह्मो समाजीयानी केलेला हा विचार होय. वस्तुतः हिंदू धर्मालाच विशुद्ध करून सार्वत्रिक धर्माचे रूप प्राप्त व्हावे या दृष्टीने ब्राह्मो समाजीय संस्थापकांनी आणि पुरस्कर्त्यांनी ख्रिस्ती धर्माचे चिंतन प्रकटपणे केले, असे म्हणावे लागते. या चिंतनामध्ये ख्रिस्ती धर्मातील अनेक अग्राह्य, विसंवादी व अनिष्ट गोष्टींचाही निर्देश राममोहनांनी केला आहे. राममोहन रॉय यांचे एक मित्र द्वारकानाथ टागोर हे होते. त्यांचे पुत्र देवेंद्रनाथ टागोर ब्राह्मो सामाजाचे प्रधान आचार्य होते. ह्यांचे असे मत होते, की हिंदू धर्माचे विशुद्ध स्वरूप हे स्वयंपूर्ण आहे. त्याला ख्रिस्ती धर्मातून घेण्यासारखे असे काही नाही.
ब्राह्मो समाजाचे मुख्य संस्थापक राजा राममोहन रॉय यांनी इस्लाम धर्माचा प्रथम अभ्यास केला. त्याचा परिणाम म्हणजे त्यांचा मूर्तिपूजाविरोध होय. लहानपणी त्यांनी बंगाली, पर्शियन व अरेबिक या तीन भाषांचा उत्कृष्ट अभ्यास केला. पर्शियन व अरेबिक यांच्या अध्ययनामुळे त्यांचा इस्लामी विचारसरणीशी संबंध आला. त्यांनी इस्लामी धर्माचे सर्वांगीण अध्ययन केले. मोठमोठ्या मौलवी-मुल्लांनासुद्धा त्यांचे पांडित्य चकित करीत होते. तिबेटात जाऊन त्यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास केला व वाराणसीला जाऊन संस्कृत शिकून हिंदू धर्मात पारंगत झाले. त्यानंतर त्यांनी इंग्रजीचा उत्कृष्ट अभ्यास केला. जगातील १७ भाषा त्यांना मातृभाषेसारख्या अवगत होत्या.
मनुष्याला खरेखुरे धर्मज्ञान नैसर्गिक अंतःप्रज्ञेतूनच मिळते. प्रस्थापित धर्मांच्या ग्रंथांतून निराकार कल्याणगुणनिधान ईश्वराचे ज्ञान चांगले होत नाही, असा विचार त्यांनी १८०४ साली एका पर्शियन भाषेत लिहिलेल्या पुस्तिकेच्या द्वारे मांडला. ख्रिस्ती मिशनऱ्यांचा बंगालीत बायबलच्या नव्या कराराचे भाषांतर कसे करावे ह्याचे मार्गदर्शन त्यांनी केले आहे. त्यांनी एक छापखाना स्थापला आणि एकेश्वरमतवादाच्या प्रचाराकरिता अनेक पुस्तके छापून प्रकाशित केली. संवाद कौमुदी हे नियतकालिकही सुरू केले. १८२८ मध्ये ब्राह्म सभेची म्हणजे ब्राह्मो समाजाची स्थापना केल्यावर प्रत्येक आठवड्याला सामुदायिक उपासना सुरू केली. त्या उपासनेच्या कार्यक्रमाचे चार भाग केले होते : (१) वैदिक मंत्रांचे पठण, (२) उपनिषदांतील वेचक भागांचे वाचन आणि बंगालीत त्यांचा अनुवाद, (३) नंतर त्यावर प्रवचन व (४) सामुदायिक संगीतमय भजन.या सामुदायिक उपासनेला सुशिक्षित लोकांकडून उत्तम प्रतिसाद मिळू लागला.⇨ हिंदू धर्मालाच अधिक विशुद्ध स्वरूप देण्याचा हा प्रयत्न होता. त्यामुळे सनातनी परंपरावादी हिंदूंकडून व्यापक प्रमाणात विरोध व प्रतिकार सुरू झाला. राममोहन रॉय हे या समाजाच्या वतीने सामाजिक सुधारणेचेही आंदोलन मोठ्या जिद्दीने उभारू लागले. स्त्री पुरुषांचे समानत्व हा सिद्धांत नैतिक दृष्ट्या मूलभूत तत्व म्हणून त्यांनी स्वीकारला व स्त्रीदास्यविमुक्तीचे आंदोलन उभारले. सतीची चाल सर्व देशभर पसरली होती. या क्रूर व अमानुष चालीच्या कायदेशीर बंदीकरिता त्यांनी त्यावेळच्या इंग्रजी राजवटीला कायदा करण्यास भाग पाडले. त्यावेळचे व्हॉइसरॉय लॉर्ड बेंटिंग यांनी ४ डिसेंबर १८२९ रोजी सतीच्या चालीच्या बंदीचा हुकूम काढला. सामाजिक सुधारणेची प्रेरणा आधुनिक इंग्रजी शिक्षणा शिवाय दुबळी राहील व भारत मागासलेलाच राहील हे लक्षात घेऊन, त्यांनी इंग्लिश शिक्षणाचा पुरस्कार केला. त्याकरिता महाविद्यालय स्थापन केले. परंतु त्याबरोबर संस्कृत विद्येच्या, विशेषतः वेदान्ताच्या अभ्यासातही वेदान्त महाविद्यालयही स्थापले.
नोव्हेंबर १८३० मध्ये त्यांनी इंग्लंडला प्रयाण केले. त्याच्या अगोदर त्यांनी महाराजा रामनाथ टागोर, कालिनाथ मुनशी आणि स्वतःचा पुत्र राधाप्रसाद यांना ब्राह्मो समाजाचे विश्वस्त म्हणून नेमले. २७ सप्टेंबर १८३३ या दिनांकी राममोहन रॉय हे इंग्लंडमध्ये असतानाच निवर्तले. त्यानंतर या ब्राह्मो समाजाच्या आंदोलनाला काही काळ उतरती कळा लागली. १८४१ साली राजा द्वारकानाथांचे तरुण पुत्र देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्राह्मो समाजाची धुरा आपल्या अंगावर घेतली. या समाजाच्या आंदोलनाला पुन्हा बहर येऊ लागला ब्राह्मो समाजामध्ये प्रविष्ट होण्याच्या अगोदर ‘तत्त्वबोधिनी सभा’ नावाची संस्था देवेंद्रनाथांनी स्थापिली होती. ती त्यांनी ब्राह्मो समाजापासून वेगळी ठेवली. १८४३ साली तत्वबोधिनी पत्रिका नावाचे नियतकालिक देवेंद्रनाथांच्या एका मित्रांनी म्हणजे ⇨ अक्षयकुमार दत्त (१८२० – ८६) ह्यांनी सुरू केले. बंगाली आधुनिक गद्य साहित्याचा पाया ब्राह्मो समाजाच्या अध्वर्यूंनी घातला, त्याच्यात चैतन्य आणले. बंगाली भाषेचे पहिले व्याकरण इंग्लिशमध्ये राममोहन रॉय यांनी लिहून प्रसिद्ध केले आणि आधुनिक विचारांचा आविष्कार करणारे बंगाली गद्य त्यांच्या लेखणीतून बाहेर येऊ लागले.या बंगाली गद्याला उत्कृष्ट आविष्कारसामर्थ्य तत्त्वबोधिनी पत्रिकेने दिले. अक्षयकुमार दत्त हे बंगाली गद्याच्या श्रेष्ठ लेखकांमध्ये गणले जातात. देवेंद्रनाथांनी ब्राह्म धर्माचे प्रचारक शिकवून तयार करण्याकरिता तत्त्वबोधिनी पाठशाला स्थापन केली. असे प्रचारक तयार करण्याच्या पाठीमागे ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराला पायबंद घालणारे प्रचारक तयार व्हावेत असा हेतू होता. देवेंद्रांनी १८४३ साली ब्राह्मो समाजाच्या सदस्यांना बंधनकारक अशी नियमावली तयार केली. त्यात मूर्तिपूजेला बंदी होती. रामचंद्र विद्यावागीश यांना समाजाचे आचार्य म्हणून नियुक्त केले. स्वतः देवेंद्र व त्यांचे दुसरे २० मित्र यांनी ही नियमावली आचरणात आणण्याची शपथ घेतली. मूर्तिपूजेचे सणावारांच्या निमित्ताने विविध प्रकार प्रतिष्ठित हिंदू घराण्यांमध्ये वर्षभर सुरू असतात. हीच स्थिती देवेंद्रनाथांच्या घराण्यातही होती. देवेंद्रनाथांना मूर्तिपूजा विरोधाकरिता गृहत्याग करावा लागला. देवेंद्रनाथ व त्यांनी स्थापलेल्या पाठशाळेत तयार झालेले अनेक प्रचारक ब्राह्म धर्माच्या प्रसाराकरिता पंजाबपासून पूर्व बंगालपर्यंतची निरनिराळी प्रमुख शहरे व तीर्थस्थाने या ठिकाणी वारंवार जात होते.
ब्राह्म धर्माचे मुख्य पवित्र पुस्तक वेदच होय, असे प्रथम ब्राह्मो समाजीयांनी गृहीत धरले देवेंद्रनाथ व त्यांचे सहकारी प्रचारक यांनी तसे जाहीर केले. त्यांनी वेद आणि उपनिषदे यांचे व्यवस्थित अध्ययन करण्याकरिता वाराणसीला चार विद्यार्थी रवाना केले.देवेंद्रनाथांनी १८५० साली उपनिषदांतील निवडक वेचे हे उपासनेचे पुस्तक म्हणून प्रसिद्ध केले. त्याबरोबर वेदांवर व उपनिषदांवर खूप चर्चा सुरू झाली. परंतु त्याचा परिणाम असा झाला, की वेदसुद्धा संपूर्ण प्रमाण पवित्र ग्रंथ म्हणून स्वीकारता येत नाहीत, असे त्या चर्चेतून निष्पन्न झाले. हा निर्णय १८५० साली घेण्यात आला. ब्राह्म धर्माच्या मूलभूत सिद्धांतांना अंतःप्रेरणा आणि निसर्गाचे अवलोकन हेच दोन आधार होत, हीच दोन प्रमाणे होत, असे निश्चित झाले. हे सिद्धांत पुढीलप्रमाणे सहा कलमांमध्ये म्हणजे विधानांमध्ये मांडण्यात आले : (१) ईश्वर व्यक्तिरूपाने अस्तित्वात असणारे सत्य आहे. त्याच्या ठिकाणी अत्युत्तम नैतिक गुण आहेत. (२) ईश्वर कधीही अवतार घेत नाही. (३) ईश्वर प्रार्थना ऐकतो व प्रार्थनेला पावतो. (४) ईश्वराची मानसिक पूजाच करावी. हिंदू संन्यास मार्ग किंवा वानप्रस्थ, देवालये आणि पूजेची कर्मकांडे अनावश्यक आहेत. सगळ्या जातिजमातींची व वंशांची माणसे देवाच्या पूजेची अधिकारी आहेत. (५) पश्चात्ताप आणि पापनिवृत्ती यांच्या योगानेच देव क्षमा करतो आणि मोक्ष देतो. (६) निसर्ग व अंतःप्रेरणा ह्यातून देवाचे ज्ञान होऊ शकते. कोणताही ग्रंथ धर्माचे शुद्ध व पूर्ण प्रमाण म्हणून मानता येत नाही.
हे ब्राह्म धर्माचे आंदोलन प्रगत होत गेले. ह्याच्या प्रगतीला वेग आला. १८५७ मध्ये केशवचंद्र सेन हा तरुण मनुष्य ब्राह्मो समाजाला येऊन मिळाला. बंगालमधील वैद्य या नावाच्या जातीत तो जन्मला तो ब्राह्मण नव्हता. त्याचे घराणे वैष्णव संप्रदायी होते. त्याचे मन नेहमी खिन्न असे. परंतु ब्राह्मो समाजातील उपासनेच्या योगाने त्याच्या मनाला शांती मिळाली व मन उत्साहित झाले.१८५९ सालापासून त्याने समाजाच्या कार्यात जोमाने उडी घेतली. परंपरागत वैष्णव संप्रदायापासून फटकून निघाल्यामुळे त्याला फार कष्ट भोगावे लागले त्याचा छळ झाला. देवेंद्रनाथांना केशवचंद्र सेन म्हणजे एक अलौकिक ईश्वरी देणगीच वाटली. ब्राह्मविद्यालय नावाचे धर्माध्ययनाचे अनौपचारिक शिक्षणकेंद्र देवेंद्रांनी सुरू केले होते. या विद्यालयात केशवचंद्र सेन धार्मिक तत्त्वज्ञानावर व्याख्याने देत आणि देवेंद्र बंगालीमध्ये धर्मविषयक चर्चा करीत. केशवचंद्र सेनांनी देशभर भारतातील मोठ मोठ्या शहरी भेटी देऊन इंग्लिशमध्ये ब्राह्म धर्माचा प्रभावीपणे प्रचार केला. १८६० साली सामाजिक सुधारणेला वाहून घेणार्या मित्रांची एक संघटना ‘संगत सभा’या नावाने स्थापन केली. देवेंद्रांनी ब्राह्मो समाजीयांकरिता अनुष्ठान पद्धती म्हणून ब्राह्म आचरण पद्धतीवर एक पुस्तक प्रसिद्ध केले. संगत सभेच्या अनेक सदस्यांनी स्वार्थत्यागाची दीक्षा घेतली व समाजसेवेचे व्रत चालविले. विशेषतः त्यात दुष्काळपीडित लोकांना अन्नदान करण्याकरिता ही मंडळी खूप खपली. या मंडळींमध्ये प्रतापचंद्र मजुमदार हे प्रामुख्याने गणले जात. इंडियन मिरर नावाचे इंग्लिश नियतकालिकही या मंडळींनी सुरू केले. कलकत्ता कॉलेज ही संस्था याच मंडळींनी स्थापली. इंग्लिश शिक्षणाचा जास्तीत जास्त प्रचार व्हावा, हा त्या मागील हेतू होता.
केशवचंद्र सेन यांची छाप, त्यांचे शील, निष्ठा आणि प्रज्ञा यांमुळे सुशिक्षितांवर फार चांगली पडली. देवेंद्र हे समाजाचे प्रधान आचार्य होते. त्यांनी हे आचार्यपद स्वतःहून केशवचंद्रांना बहाल केले. समाजामध्ये आतापर्यंत स्त्रियांना प्रवेश नव्हता. केशवचंद्रांनी आपली तरुण पत्नी सामुदायिक उपासनेमध्ये सामील करून घेतली. त्या काळी हे एक साहसच मानले गेले. केशवचंद्रांचे अनुकरण इतरांनीही सुरू केले. देवेंद्रांना समाजसुधारणा मान्य होती परंतु इतर अनेक ब्राह्मो समाजीयांना फार मोठ्या समाजसुधारणांचा कार्यक्रम अंमलात आणण्याची आवश्यकता वाटली. त्यांनी विधवाविवाह व आंतरजातीय विवाह यांचा पुरस्कार केला. केशवचंद्र सेन यांनी ब्राह्म धर्माच्या प्रसाराकरता सबंध भारताची यात्रा सुरू केली. तेव्हा त्यांच्या गैरहजेरीत परंपरानिष्ठ मंडळी पुढे आली. समाजसुधारणेला प्राधान्य देऊ नये, केवळ एकेश्वरवादी ब्राह्मोपासनेचाच महिमा स्थापन करावा, अशा मताची परंपरावादी मंडळी केशवचंद्र सेनांच्या गैरहजेरीत समाजाच्या आंदोलनावर नियंत्रण ठेऊ लागली.
ब्राह्मो समाजीयांनी यज्ञोपवीत म्हणजे जानवे घालून प्रार्थना करावी, असा परंपरावादी मंडळींचा हट्ट होता. अशा अनेक मुद्यांवर मतभेद होऊन केशवचंद्र सेन आणि त्यांचे पाठीराखे समाजातून बाहेर पडले. यावेळी केशवचंद्र सेन २७ वर्षांचे होते. इंडियन मिरर हे इंग्लिश नियतकालिक केशवचंद्र सेनांच्याच हाती राहिले. त्याबरोबरच धर्मतत्व नावाचे नियतकालिकही त्यांनी बंगालीत सुरू केले.
या बाहेर पडलेल्या मंडळींनी ११ नोव्हेंबर १८६६ या दिनांकी ‘भारतवर्षीय ब्राह्मो समाज’ या संस्थेची स्थापना केली. या दिवशीच्या सामूहिक प्रार्थनेमध्ये हिंदू धर्मातील स्तोत्रांबरोबरच ख्रिस्ती, मुसलमान, पारशी आणि चिनी धर्मग्रंथांतील वचनांचे व स्तोत्रांचे पठण केले. सामाजिक आणि बौद्धिक स्वातंत्र्य या तत्त्वास मान्यता देणाऱ्या केशवचंद्र सेनांनी चिटणीसपद स्वीकरले. या समाजस्थापनेच्या वेळी जे अनेक प्रस्ताव संमत झाले त्यात अखेरीस देवेंद्रनाथांच्या धर्मसेवेचा निर्देश करून त्यांना धन्यवाद देण्यात आले. या वेळेपासून एका ब्राह्मो समाजाच्या दोन स्वतंत्र संघटना दिसू लागल्या. देवेंद्रनाथ ज्या संघटनेचे प्रधान आचार्य होते त्याला ‘आदि ब्राह्मो समाज’व केशवचंद्रांच्या संघटनेला ‘भारतवर्षीय ब्राह्मो समाज’ही संज्ञा प्राप्त झाली. केशवचंद्र सेनांच्या या संघटनेमध्ये तरुण उत्साही मंडळींचा मोठा भरणा झाला. ब्राह्मो समाजात सामील न झालेला असा भारतातील मोठा सुशिक्षित वर्ग केशवचंद्र सेनांचा चाहता बनला. जगातील निरनिराळ्या धर्मग्रंथांच्या परिशीलनातून निवडलेल्या वचनांचा संग्रह १८६६ साली प्रसिद्ध केला. यांत हिंदू, बौद्ध, यहुदी, ख्रिस्ती, मुसलमान, चिनी इ. समाजांच्या धर्मग्रंथांतील वचनांचा संग्रह समाविष्ट केला आहे. उपासनेचा दिवस रविवार हा ठरविला.आदि ब्राह्मो समाजाशी सहानुभूती ठेवूनच या नव्या समाजाची सदस्यमंडळी ब्राह्म धर्माचा प्रसार करू लागली. मतभेद होते परंतु मत्सर नव्हता, त्यात भावभावनांचा प्रक्षोभ नव्हता. प्रेमाचेच संबंध कायम राहिले. केशवचंद्रांनी स्थापन केलेल्या संगत सभा या संघटनेमध्ये सामील झालेले अनेक तरुण मित्र ब्राह्म धर्माकरिता सर्वस्व अर्पण करण्यास तयार झालेले प्रचारक बनले. दारिद्र्य, कठीण परिश्रम आणि छळ सोसण्यास त्यांचे मन तयार झाले होते. मतभेद होत व भांडणेही टाळणे कठीण होते. आदि ब्राह्मो समाजापासून बाहेर पडल्यानंतर त्यांना देवेंद्रांचा विरह जाणवू लागला. देवाशिवाय कोणी आधार नाही अशी निराधारतेची भावना केशवचंद्रांना अस्वस्थ करीत होती. स्वतःच्या घराण्यातील वैष्णव भक्तिसंप्रदायाला उजळा देऊन त्याला नवा आकार त्यांनी दिला. मन प्रसन्न झाले. भक्तिमार्ग हाच ईश्वरदर्शनाचा खराखुरा उपाय होय, अशी श्रद्धा उत्पन्न झाली. परमेश्वरावर श्रद्धा आणि परमप्रीती या दोन गोष्टी भक्तीमध्ये अंतर्भूत होतात. गौरांगप्रभू चैतन्यांचा भक्तिमार्गी एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे नगरकीर्तन. हा सामान्यजनांना आवडणाऱ्या पूजापद्धतीचा भाग झाला. वीणा, मृदंग, झांज इ. वाद्यांची साथ घेऊन भक्तिगीते गात देवाच्या जयजयकाराचे नारे लावत नगरातून वा गावातून फेरी करणे, म्हणजे नगरकीर्तन होय. या मिरवणुकीत सामान्यजन मोठ्या उत्साहाने भाग घेऊ लागले. अनेक वार्षिक उत्सव साजरे होऊ लागले. २ नोव्हेंबर १८६७ मध्ये माघोत्सवास म्हणजे वार्षिक ब्रह्मोत्सवास सुरुवात झाली. राममोहनांच्या ब्रह्ममंदिराचे ज्या तारखेस उद्घाटन झाले होते, तीच तारीख ब्रह्मोत्सवाची ठरविली. २२ ऑगस्ट १८६९ या दिनांकी भारतवर्षीय ब्राह्मो समाजाच्या मंदिराचे उद्घाटन झाले. तो दिवस वार्षिक भाद्रोत्सवाचा ठरविला.
धर्मविज्ञानाचे निसर्ग व अंतःप्रज्ञा हे दोन आधार देवेंद्रांनी सांगितले. जगातील श्रेष्ठ धर्मसंस्थापक आणि सिद्ध महापुरुष यांच्यातर्फेही देव धर्मज्ञान देत असतो म्हणजे देव बोलत असतो असा हा तिसरा धर्माचा ऐतिहासिक आधार केशवचंद्रांनी उपदेशिला. उत्कृष्ट वक्तृत्व, पावित्र्याची गंभीर भावना आणि भक्तिसंप्रदायाची प्रचारसाधना या तीन गोष्टींमुळे केवशचंद्र सेन हे एक थोर धर्मगुरू म्हणून मान्यता पावले. ह्याचा अर्थ ब्राह्म धर्मामध्ये गुरुपूजेचा अंतर्भाव झाला. १८६९ मध्ये केशवचंद्र सेन यांनी इंग्लंडला भेट दिली. तेथे त्यांचे सुशिक्षित इंग्लिश समाजाकडून फार चांगले स्वागत झाले. महाराणी व्हिक्टोरियाची भेट घडून आली. त्यांनी इंग्लंडहून परत आल्यानंतर ‘द इंडियन रिफॉर्म असोसिएशन’ स्थापून समाजसुधारणेची विविध कार्ये सुरू केली. मुलींच्याकरिता माध्यमिक पाठशाळा, प्रौढ स्त्रियांकरिता व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूशन, मुलांकरिता उद्योगप्रशाला आणि सुलभ समाचार हे बंगाली साप्ताहिक यांची स्थापना केली. आंतरजातीय विवाह आणि विधवाविवाह या दोन सुधारणांना कायदेशीर पाठिंबा मिळावा म्हणून १८७२ साली ‘ब्राह्म मॅरेज ॲक्ट’ ब्रिटिश शासनातर्फे संमत करून घेतला. केशवचंद्रांचे एक महत्त्वाचे सहकारी प्रतापचंद मजुमदार यांनी १८७३ मध्ये ओरिएंटल क्राइस्टनामक ग्रंथ लिहून प्रकाशित केला. त्या पुस्तकाची फार वाखाणणी झाली. केशवचंद्र सेनांची सर्वत्र ख्याती होत असताना त्यांना वाटू लागले, की ईश्वर त्यांना आदेश देत असतो, ईश्वर आणि आपण यांच्यामध्ये संवाद वारंवार होतो, ईश्वराचा आदेश आपल्याला मिळतो असे ते सांगू लागल्यामुळे अनेक सहकाऱ्यांना ते दुरावले.केशवचंद्रांच्या आयुष्यात त्यांच्या हातून ब्राह्म धर्मविरोधी अपराध झाला. कुचबिहार संस्थानच्या १५ वर्षांच्या राजपुत्राला आपली १३ वर्षांची कन्या दिली आणि हा बाल विवाह समारंभही परंपरागत हिंदू पद्धतीने घडून आला. परंपरागत पद्धतीच्या हिंदू सुशिक्षितांना त्यांचे हे व्यंग सापडलेत्यामुळे सर्वत्र निंदा होऊ लागली आणि एवढ्यावरच न थांबता अनेक ब्राह्मो समाजी कार्यकर्ते आणि विद्वान प्रचारक त्यांच्यापासून वेगळे झाले.
केशवचंद्रांपासून १८७८ मध्ये अनेक सहकारी आणि मित्र हे दुरावले गेले. त्यांनी एका नव्या संस्थेची म्हणजे‘साधारण ब्राह्मो समाजा’ची स्थापना केली. केशवचंद्राच्या संघटनेमध्ये केशवचंद्र सेनांचे संपूर्ण आधिपत्य होते. त्यांना सदस्यांच्या अनुमतीची गरज नसे. कोणा एका व्यक्तीचा सर्वाधिकार चालू देऊ नये म्हणून साधारण ब्राह्मो समाजाची स्थापना झाली. २२ जानेवारी १८८१ रोजी साधारण ब्राह्मो समाजाच्या मंदिराचे कलकत्ता येथे उद्घाटन झाले.पंडित ⇨ शिवनाथ शास्त्री यांनी या समाजाचे नेतृत्व केले. त्यात सर्वसंमती वा समान दृष्टिकोन याशिवाय नवा कोणताही कार्यक्रम स्वीकारला जात नव्हता. या साधारण ब्राह्मो समाजाने स्त्रीशिक्षणावर भर दिला होता. आदि ब्राह्मो समाजाचे वर जे सहा सिद्धांत सांगितले आहेत, त्यांच्यात आणखी तीन सिद्धांताची भर पडली. ते असे : (७) ईश्वर हा सर्व मानवांचा पिता होय आणि सगळे मानव हे बंधू होत. (८) आत्मा अमर आहे आणि त्याची प्रगती सतत होत असते. (९) देव पुण्याचरणाने प्रसन्न होतो, कृपा करतो आणि पापाचे दंडन करतो. परंतु पापाचा दंड म्हणून अनंत कालपर्यंत तो दंड भोगावा लागत नाही. कारण देव दंडन करतो ते सुधारण्याकरिता.⇨ रामकृष्ण परमहंसांच्या मैत्रीमुळे ईश्वर केवळ पिता म्हणून निर्दिष्ट न करता माता म्हणूनही निर्दिष्ट करण्यास केशवचंद्रांनी प्रारंभ केला. १८८१ च्या जानेवरीमधील वार्षिक समारंभामध्ये लाल झेंडा उभारून ‘नवविधान’म्हणजे नव्या आदेशाची आणि साधनेची द्वाही केशवचंद्रांनी फिरवली. समोर ठेवलेल्या टेबलावर हिंदू, बौद्ध, ख्रिस्ती आणि मुसलमान यांचे धर्मग्रंथ श्रद्धापूर्वक मांडले आणि या चार धर्मांच्या पुढची पायरी म्हणजे ब्राह्मो समाज होय, असा ईश्वरी संकेत केशवचंद्रानी उद्घोषित केला. सगळ्या धर्मांचा पूर्ण समन्वय या ब्राह्म धर्मात झाला आहे, असेही सांगून टाकले.
सामान्य जनांकरता आकर्षक असे धार्मिक समारंभ हिंदू आणि ख्रिस्ती परंपरेतून निवडून काढले. ब्राह्म मंदिरात हिंदू पद्धतीचे होमहवन, पूजाप्रकार होऊ लागले. त्यांचे गूढवादी विवरणही त्याच ठिकाणी प्रवचनद्वारा सांगितले जात होते. सदस्य ख्रिस्ती धर्माप्रमाणे बाप्तिस्माही घेऊ लागले. ख्रिस्ती प्रभुभोजनाचाही समारंभ गांभीर्यपूर्वक सुरू केला. अवतारांना महत्त्व आले. संतांच्या उत्सवाचे पंचांग बनविण्यात आले. भक्तिनृत्याला चांगली गर्दी जमू लागली. कॅथलिक ख्रिश्चनांच्या देवत्रयीचा नवा अर्थ व महिमा विस्ताराने केशवचंद्र सांगू लागले. एकाच परमेश्वराच्या प्राप्तीकरिता हिंदू धर्मातील बहुदेवतावादातील कोणताही एक इष्ट देव स्वीकारून उपानसा करणे मान्य झाले. आदि ब्राह्मो समाज व साधारण ब्राह्मो समजा यांच्या वर निर्दिष्ट केलेल्या एकंदर नऊ तत्त्वांमध्ये केशवचंद्रांच्या या संप्रदायाने अधिक तीन सिद्धांताची भर घातली. ते सिद्धांत असे : (१०) पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या त्रयीचे एकसंघ स्वरूप म्हणजे ईश्वर होय. ईश्वर, पिता आणि माता असा आहे. (११) ब्राह्म धर्म हा नवा धर्म आहे. तो सर्व धर्मांचे सार असून तो विश्वधर्म आहे. ईश्वराचे सगळ्यात अलीकडचे प्रकटन म्हणजे ब्राह्मो समाज होय. नव्या आदेशाचे प्रचारक हे देवाचे साक्षात शिष्य आहेत. (१२) निसर्ग, अंतःप्रज्ञा आणि प्रतिभासंपन्न व्यक्ती यांच्यापासून ईश्वराचे ज्ञान मिळते. देवाची इच्छा आदेशाच्या रूपाने त्या त्या सेवकांच्या ह्रदयात प्रकट होत असते.
केशवचंद्र सेन ८ जानेवारी १८४४ रोजी दिवंगत झाले. त्यांच्यानंतर त्यांच्या संस्थेला उतरती कळा लागली. केशवचंद्रांचे स्थान घेण्यास कोणीही दुसरा पात्र नाही, असे अनेकांना वाटू लागले. म्हणून त्यांचे स्थान रिकामे ठेवले. साधारण ब्राह्मो समाजाची प्रगती मात्र अकुंठितपणे होत राहिली. कारण त्यात कोणा एकास सर्वाधिकार प्राप्त झाला नव्हता.
भारतीय ब्राह्मो समाजाचेच साधारण ब्राह्मो समाज आणि केशवचंद्र सेनांचा ‘नवविधान समाज’ असे दोन भाग झाले. केशवचंद्र सेनांच्या नवविधान पंथाने धार्मिक उपासनामार्गाला प्राधान्य दिले व साधारण ब्राह्मो समाजाने समाजसेवा आणि समाजसुधारणा या मुद्यांवर जास्त भर दिला. ब्राह्म इतिहासकार पंडित शिवनाथ शास्त्री (१८४७ – १९१७) व आनंदमोहन बोस (१८४७ – १९०६) या दोन अतिशय बुद्धिमान, विद्वान, देशभक्त आणि स्वार्थत्यागी व्यक्तींचे नेतृत्व साधारण ब्राह्मो समाजास लाभले.
अगोदरच्या पिढीतील ब्राह्मो समाजी ⇨ ईश्वरचंद्र विद्यासागरांची समाजसुधारणेची परंपरा अधिक समर्थपणे ह्यांनी चालविली लोकक्षोभाची पर्वा केली नाही. यज्ञोपविताचा त्याग केला. शिवनाथ शास्त्री यांनी धर्मप्रचारक या नात्याने भारतभर अनेक वेळा संचार केला. श्रीरामकृष्ण परमहंसांचा केशवचंद्र सेनांच्या मनावर जसा प्रभाव पडला, तसा त्यांच्यावर मात्र पडला नाही. श्रीरामकृष्ण यांची केव्हा कोठेही समाधी लागेल याचा नियम नव्हता. रामकृष्णांची ही भावसमाधी एक मेंदूची विकृती आहे, असे निदान शिवनाथ शास्त्री यांनी केले होते. योगाभ्यासापेक्षा स्त्री पुरुष समानतेच्या तत्त्वावर आधारलेला म्हणजे पतिपत्नीमैत्रीवर नांदणारा गृहस्थाश्रमच ब्राह्म धर्माचे खरे अधिष्ठान होय, अशी शिवनाथ बाबूंची धारणा होती. साधारण ब्राह्मो समाजाचे सभासद होण्यास तीन अटी पाळाव्या लागत. १८ वर्षांहून अधिक वयोमान, दैनंदिन उपासना आणि मूर्तिपूजा व जात यांचा त्याग. साधारण ब्राह्मो समाजाच्या कार्यविस्ताराचे प्रमुख तीन भाग होते आध्यात्मिक, सामाजिक व शैक्षणिक. अध्यात्मामध्ये उपासना, तत्वचिंतन आणि धर्मप्रचार या तीन बाबी समाविष्ट होत. सामाजिक बाबतीत ब्राह्मो समाजाची मुखपत्रे चालविणे, साधनाश्रमाच्या द्वारे आदिवासी, मागासलेल्या व दलित जातींत सुधारणेचा कार्यक्रम करणारी मंडळी समाजसेवक म्हणून काम करीत होती. साधारण ब्राह्मो समाजाचे शैक्षणिक कार्यक्षेत्र फार मोठे विस्तृत होते. कामकरी वर्गाच्या धार्मिक आणि नैतिक शिक्षणासाठी शशीपद इन्स्टिट्यूटनामक संस्था स्थापली. बंगाल व आसाम यांमध्ये मागासलेल्या जातींकरिता शेकडो शाळा स्थापन केल्या. डाक्क्याला विधवाश्रम, केरळमध्ये सेवासदन या दोन संस्था काढल्या. साधारण ब्राह्मो समाजाचे प्रचारक म्हणून विठ्ठल रामजी शिंदे ह्यांना धर्मशिक्षणार्थ इंग्लंडमध्ये पाठविण्यात आले होते. भारतात परतल्यावर शिंदे यांनी महाराष्ट्रात दलितांच्या सेवेचे कार्य सर्वस्व अर्पण करून केले.
स्त्रीशिक्षण हा ब्राह्मो समाजाचा आवडीचा विषय होय. स्त्री स्वातंत्र्य व मिश्र विवाह यांस त्यांनी प्राधान्य दिले.तत्वकौमुदी, इंडियन मेसेंजर, संजीवनी, वामबोधिनी, मुकुल, मॉडर्न रिव्ह्यू, प्रवासी, सुप्रभात, सेवक, महिला, सोपानइ. नियतकालिकांच्या द्वारे लोकशिक्षणाचे कार्य चालविले. या देशात प्रथम ब्राह्मो समाजाने नियतकालिकांचे महत्त्व स्थापित केले. ब्राह्मो समाजाचे मूळ प्रणेते राममोहन रॉय हे वृत्तपत्रस्वातंत्र्याचे पहिले पुरस्कर्ते होत, असे इतिहास सांगतो. कृष्णकुमार मित्र, पं. सीतानाथ तत्त्वभूषण, नगेंद्रनाथ चतर्जी, धीरेंद्रनाथ चौधरी, हेमचंद्र सरकार यांच्यासारख्या शेकडो ब्राह्म विद्वानांनी चरित्रात्मक, ऐतिहासिक, धार्मिक आणि तात्त्विक वाङ्मय प्रसिद्ध केले. त्याच्या योगाने बंगाली साहित्य संपन्न झाले. रवींद्रनाथ टागोर हे ब्राह्मो समाजी प्रतिभावंत कवी विश्वविख्यात झाले.
ब्राह्मो समाजाच्या ध्येयवादाने आणि विचारसरणीने प्रेरित झालेल्या एकेश्वरवादी, धर्मसुधारक आणि समाज सुधारक महाराष्ट्रीयांनी ⇨ प्रार्थनासमाज या संस्थेची ३१ मार्च १८६७ या दिनांकी हिंदू पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य एकादशी म्हणजे पापमोचनी एकादशीच्या दिवशी मुंबई येथे स्थापना केली. ब्राह्मो समाजाच्या अनेक शाखा त्या वेळच्या मुंबई इलाख्यात म्हणजे आजच्या महाराष्ट्रात व गुजरातेत स्थापन झाल्या. थोर इतिहासज्ञ रामकृष्ण गोपाळ भांडारकर, आधुनिक भारताचे द्रष्टे महादेव गोविंद रानडे इ. मंडळी प्रार्थना समाजाचे पुरस्कर्ते होते.
जगातील सर्व धर्मांचा समन्वय करून व त्यातील सारभूत असे एकेश्वर उपासनेचे तत्त्व स्वीकारून सर्व मानवी समाजांचे, जगातील सर्व राष्ट्रांमध्ये मानवी बंधुतेच्या तत्वावर सामंजस्य घडवून आणणे व तदनुसारे सामाजिक संस्थांमध्ये सुधारणा करणे अशा ध्येयवादाने प्रेरित झालेले ब्राह्मो समाजाचे हे आंदोलन एकोणिसाव्या शतकात बंगाल व पूर्व भारतामध्ये फार मोठे समाजप्रबोधनाचे कार्य करीत राहिले. आधुनिक भारताच्या आधुनिक विचारसरणीचे मूल उगमस्थान ब्राह्मो समाजाच्या आंदोलनामध्येच सापडते. मानवी समाजाचे थोर भवितव्य सिद्ध व्हावयाचे तर ही ब्राह्मो समाजाची वैचारिक प्रेरणाच यशस्वी व्हायला पाहिजे. ब्राह्मो समाजाच्या आंदोलनाला विसाव्या शतकात उतरती कळा लागली आहे. हिंदू धर्मापेक्षा ब्राह्म धर्म हा निराळा विश्वधर्म आहे, अशा तऱ्हेची भावना तत्कालीन अनेक ब्राह्मो समाजी व रूढिवादी हिंदूंमध्ये प्रसुत झाली होती. परंतु ब्राह्म धर्म हा हिंदू धर्मावरच तुलनात्मक धर्मशास्त्राच्या द्वारे संस्कार केलेला असा विश्वबंधुत्ववादी धर्म असल्यामुळे जगातील धार्मिक संघर्ष नष्ट करण्याची स्फूर्ती त्याच्या मुळाशी होती, हेही नितान्त मूलभूत रहस्य लक्षात ठेवले पाहिजे.
संदर्भ :1. Majumdar, J. K. Raja Rammohan Roy and Progressive Movements in India, Calcutta, 1941.2. Rai Bahadur Ramprasad chanda Majumdar, J. K. Ed. Selections From Official Letters and Documents Relating to the Life of Raja Rammohan Roy, Vol. 1. 1979 – 1830, Calcutta,1938.3. देसाई, प. स. अनु. पंडित शिवनाथ शास्त्री यांचे आत्मचरित्र, मुंबई, १९७३.4. फडके, सदाशिव कृष्ण, नवयुगधर्म, प्रथम खंड, बाह्य समाज व देव समाज, पुणे, १९२७.5. वैद्य, द्वारकानाथ गोविंद, प्रार्थनासमाजाचा इतिहास, मुंबई, १९२७.
जोशी, लक्ष्मणशास्री
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..