ब्राहूई भाषा : प्रमुख द्राविड भाषांच्या भारताच्या दक्षिणेकडील क्षेत्रापासून शेकडो मैल दूर, भारताच्या वायव्येला, इंडो इराणी भाषांच्या महासागराने वेढलेले एक छोटेसे द्राविड भाषिक बेट आहे. त्या भाषेचे नाव ब्राहूई किंवा बिराहूई आहे व ती बलुचिस्तानच्या सरवान व झालावन या भागांत, तसेच लगतच्या सिंधच्या प्रदेशात बोलली जाते. जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी तिच्या भाषिकांची म्हणजे ब्राहोंची संख्या फक्त २,२५,००० असून त्यातले २,०७,०००च स्वभाषेचा उपयोग करणारे होते. तिच्यावर (विशेषतः तिच्या शब्दसंग्रहावर) इराणी व इंडो आर्यन यांचा इतका प्रभाव पडला आहे, की ती एक द्राविड भाषा आहे याची जाणीव व्हायला तिचा बराच अभ्यास करावा लागला.
ब्राहूई ही केवळ बोलबाषा असून शास्त्रज्ञांनी तिचे रोमन लिपीत लेखन केले आहे. तिची उच्चारपद्धती बऱ्याच अंशी हिंदोस्तानी सारखी आहे.
ध्वनिविचार : ब्राहूईत पुढील ध्वनी आहेत :
स्वर : अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ
व्यंजने : क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न
प फ (घर्षक) ब भ म य र ल व ष स झ (घर्षक) ख
(घर्षक) घ (घर्षक).
व्याकरण : नाम : नामात लिंगभेद नाही. एकवचन व अनेकवचन आहेत पण पुष्कळदा अनेकवचन केले जात नाही. अनेकवचनाचा प्रत्यय आक् आहे. विभक्तिप्रत्यय पुढीलप्रमाणे : द्वि. व च. ए, इन् तृ, अट् पं. आन् ष. ए. व. ना, अ. व. आ स. आए. टी.
विशेषण: विशेषण नेहेमी विकाररहित असते आणि नामापूर्वी येते. तुलनात्मक रूप नामाची पंचमी वापरून साधले जाते.
संख्याविशेषणातली पहिली तीन निश्चित द्राविड आहेत, तर ‘चार’ पासून पुढची आर्य भाषांतून घेतली आहेत. क्रमवाचक विशेषण मूळ संख्येला मीको किंवा वीको हा प्रत्यय लावून होते : चार ‘चार’ चारवीको ‘चौथा’.
सर्वनाम : पुरुषवाचक सर्वनामे ई ‘मी’ नी ‘तू’ ओ, ओद् ‘तो, ती ते’ नन् ‘आम्ही’ नुम् ‘तुम्ही’ ओफक् ‘ते, त्या, ती’ ही आहेत. तेन् (अट्) ‘स्वतः’, देर ‘कोण’, ही इतर सर्वनामे आहेत.
क्रियापद : क्रियावाचक नामाशेवटी इंग् हा प्रत्यय येतो. धातूच आज्ञार्थी रूप म्हणून वापरला जातो. त्याला बो हा प्रत्यय लावून अनेकवचनी रूप मिळते. धातूची इतर काळातील रूपे वेगवेगळे प्रत्यय लावून होतात. नकारार्थी रूपे स्वतंत्रपणे बनवली जातात.
नमुना : बदघसे इरा मार अस्सुर. ओफ्तिआन चुनका मार तेना बावए पारे कि…… ‘एका माणसाला दोन मुलगे होते. त्यातला धाकटा मुलगा बापाला म्हणाला की……’
संदर्भ:1. Bloch. J. Structure grammaticale des langues deavidiennes, Paris, 1946.
2. Grierson, G. Ed. Linguistic Survey of India, Vol. IV, (reprint) Delhi, 1967.
कालेलकर, ना. गो.
“