ब्राउन, कार्ल फेर्डिनांट : (६ जून १८५०-२० एप्रिल १९१८). जर्मन भौतिकीविज्ञ. बिनतारी तारायंत्रविद्येच्या विकासात महत्त्वाची कामगिरी केल्याबद्दल ब्राउन यांना ⇨ गूल्येल्मो मार्कोनी यांच्याबरोबर १९०९ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा सन्मान मिळाला.
ब्राउन यांचा जन्म जर्मनीतील फुल्डा येथे झाला. त्यांचे शिक्षण मारबुर्ख व बर्लिन येथील विद्यापीठांत झाले. १८७२ मध्ये त्यांनी स्थितिस्थापक (विकृती निर्माण करणारी प्रेरणा काढून घेतल्यावर मूळ आकार पुन्हा प्राप्त होणाऱ्या) तारांच्या आंदोलनांसंबंधी निबंध लिहून पदवी संपादन केली. त्यानंतर वुर्टस्बर्ग विद्यापीठात जी. डब्ल्यू. क्विंव्हके यांचे साहाय्यक म्हणून काही काळ काम केल्यावर १८७४ मध्ये लाइपसिक येथील सेंट टॉमस जिम्नॅशियममध्ये (माध्यमिक शाळेत) त्यांनी अध्यापनाचे काम पत्करले. दोन वर्षांनंतर मारबुर्ख विद्यापीठात सैद्धांतिक भौतिकीच्या प्राध्यापकपदावर व मग १८८० मध्ये स्ट्रॅसबर्ग विद्यापीठात अशाच पदावर त्यांची नेमणूक झाली. १८८३ साली कार्लझ्रूए येथील तंत्रनिकेतनात व १८८५ मध्ये ट्यूबिंगेन विद्यापीठात जे भौतिकीचे प्राध्यापक झाले. ट्यूबिंगेन येथे त्यांनी नवीन भौतिकी संस्था स्थापन करण्यात महत्त्वाचे कार्य केले. दहा वर्षानंतर अखेरीस ते स्ट्रॅसबर्ग येथील भौतिकी संस्थेत संचालक व भौतिकीचे प्राध्यापक झाले.
ब्राउन यांनी सुरुवातीला स्थितिस्थापक तारा व दंड यांची आंदोलने आणि ऊष्मागतिकी (उष्णता आणि यांत्रिक व अन्य ऊर्जा यांतील संबंधांचे गणितीय विवरण करणारे शास्त्र) यांविषयी संशोधन केले. त्यांनी विद्युत् विषयक केलेल्या कार्यात ओहम नियमापासून [ ⟶ एकदिश विद्युत् प्रवाह] होणाऱ्या विचलनाविषयीचे संशोधन व ब्राउन विद्युत् मापक या नावाने ओळखण्यात येणाऱ्या उपकरणाचा शोध यांचा समावेश होतो. १८९७ मध्ये त्यांनी उच्च कंप्रता (दर सेकंदास होणाऱ्या कंपनांची संख्या उच्च असलेल्या) प्रत्यावर्ती (मूल्य व दिशा दर सेकंदात वारंवार उलटसुलट बदलणाऱ्या) प्रवाहांचा अभ्यास करण्यासाठी सुधारित ⇨ ऋण किरण नलिकेच्या आतच इलेक्ट्रॉन शलाकेची हालचाल होईल अशा प्रकारे प्रत्यावर्ती विद्युत् दाब वापरला. ही नलिका ‘ब्राउन नलिका’ या नावाने ओळखण्यात येते. ऋण किरण नलिकेच्या तोंडावरील अनुस्फुरक (एखाद्या विशिष्ट तरंगलांबीच्या किरणांचे शोषण करून जास्त तरंगलांबीच्या दृश्य प्रकाशाचे उत्सर्जन करणाऱ्या) द्रव्याचा लेप दिलेल्या पडद्यावर गतिमान इलेक्ट्रॉन शलाका पडल्यामुळे विद्युत् प्रवाहाच्या दाबाच्या होणाऱ्या तरंगाकृती रूपातील रेखनाचे निरीक्षण करता येते. नंतर या रेखनाचा आलेख ब्राउन यांनी फिरत्या आरशाच्या साहाय्याने मिळविला. ब्राउन नलिकेत पुढे सुधारणा करण्यात येऊन तयार करण्यात आलेले ऋण किरण दोलदर्शक ⟶ इलेक्ट्रॉनीय मापन] हे उपकरण प्रयोगशाळेतील एक अतिशय महत्त्वाचे उपकरण ठरले आहे. प्रत्यावर्ती दाबाद्वारे इलेक्ट्रॉन शलाकेला गती देणे या ब्राउन नलिकेच्या तत्त्वाचा पुढे दूरचित्रवाणीतील चित्रनलिकेत उपयोग करण्यात आला [ ⟶ दूरचित्रवाणी].
ब्राउन यांनी १८९८ मध्ये उच्च कंप्रता विद्युत् प्रवाहाद्वारे पाण्यातून मॉर्स संकेत प्रेषित करण्याचा प्रयत्न केला. १८९९ मध्ये त्यांनी बिनतारी संदेशवहनाची एक पद्धत विकसित केली आणि ती मार्कोनी यांच्या १८९७ सालच्या पद्धतीपेक्षा पुष्कळच सुधारित स्वरूपाची होती. ब्राउन यांची पद्धत १९०३ सालापर्यंत यूरोपात विस्तृत प्रमाणात प्रचारात आली. या पद्धतीत प्रेषक (विद्युत् तरंग पाठविणारे साधन) व ग्राही (विद्युत् तरंग ग्रहण करणारे साधन) या दोहोंमध्ये मेलनासाठी युग्मित अनुस्पंदित मंडलांचा [ ⟶ अनुस्पंदन] उपयोग केलेला होता. या पद्धतीमुळे प्रेषणाचा पल्ला व कार्यक्षमता वाढवण्याबरोबरच लगतच्या प्रेषण केंद्रांमध्ये एकमेकांना होणारा व्यत्ययही कमी झाला. या पद्धतीचा उपयोग नंतर रेडिओ, रडार, दूरचित्रवाणी यांसारख्या सर्व प्रकारच्या प्रेषणासाठी करण्यात येऊ लागला. एका निश्चित दिशेने विद्युत् तरंग प्रेषित करण्याकरिता व निश्चित दिशा दिलेले तरंग ग्रहण करण्याकरिता विशिष्ट प्रकारचे आकाशक (अँटेना) बनविण्यात त्यांनी यश मिळविले. १७८४ साली खनिज धातवीय सल्फाइडांवर संशोधन करीत असताना हे खनिज स्फटिक फक्त एकाच दिशेने विद्युत् प्रवाहाचे संवहन करतात असे ब्राउन यांना आढळून आले. पुढे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला रेडिओ ग्राहींमध्ये अशा स्फटिकांचा एकदिशीकरण (प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाहाचे एका दिशेने वाहणाऱ्या प्रवाहात रूपांतर करणे) करण्यासाठी उपयोग करण्यात आला.
ब्राउन यांचे बिनतारी तारायंत्रविद्येसंबंधीचे निबंध १९०१ मध्ये Drahtlose Telegraphie durch Wasser und Luft या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाले. १९१५ मध्ये रेडिओ प्रेषणासंबंधीच्या एका खटल्यात साक्ष देण्यासाठी त्यांना अमेरिकेत बोलावण्यात आले. त्याच वेळी अमेरिका पहिल्या महायुद्धात सामील झाल्यामुळे ब्राउन यांना जर्मन नागरिक म्हणून स्थानबद्ध करण्यात आले. पुढे ते न्यूयॉर्क येथे मृत्यू पावले.
भदे, व. ग.