ब्रॅटन, वॉल्टर हौझर : (१० फेब्रुवारी १९०२ – ). अमेरिकन भौतिकीविज्ञ. ⇨ अर्धसंवाहक (ज्याची विद्युत् संवाहकता धातू व निरोधक यांच्या दरम्यान असते अशा) पदार्थासंबंधीचे संशोधन व ट्रँझिस्टर परिणामाचा शोध या कार्याबद्दल ब्रॅटन यांना ⇨ जॉन बारडीन व ⇨ विल्यम ब्रॅडफोर्ड शॉक्ली यांच्या समवेत १९५६ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.
ब्रॅटन यांचा जन्म चीनमधील ॲमॉय येथे झाला. वॉशिंग्टन येथील व्हिटमन कॉलेजमध्ये गणित व भौतिकी या विषयांचा अभ्यास करून त्यांनी १९२४ मध्ये बी. एस्. पदवी मिळविली. त्यानंतर ऑरेगन विद्यापीठाची एम्. ए. (१९२६) व मिनेसोटा विद्यापीठाची पीएच्. डी. (१९२९) या पदव्या त्यांनी संपादन केल्या. त्यांनी वॉशिंग्टन येथील नॅशनल ब्यूरो ऑफ स्टँडर्डस या संस्थेच्या रेडिओ विभागात एक वर्ष (१९२८ – २९) संशोधक भौतिकीविज्ञ म्हणून काम केले. १९२९ मध्ये ते बेल टेलिफोन लॅबोरेटरीजमध्ये संशोधक भौतिकीविज्ञ या पदावर रुजू झाले आणि १९६७ मध्ये ते तेथून सेवानिवृत्त झाले. १९६२—७२ या काळात त्यांनी व्हिटमन कॉलेजमध्ये अधूनमधून अध्यापनाचे काम केले व १९७२ पासून ते तेथे गुणश्री पर्यवेक्षक म्हणून काम करीत आहेत. दुसऱ्या महायुद्धकाळात ते कोलंबिया विद्यापीठाच्या राष्ट्रीय संरक्षण संशोधन समितीशी संबंधित होते (१९४२-४३) व तेथे त्यांनी पाणबुड्यांच्या चुंबकीय अभिज्ञानाविषयी (चुंबकीय पद्धतीने अस्तित्व ओळखण्याविषयी) संशोधन केले.
ब्रॅटन यांनी प्रामुख्याने घन पदार्थांच्या पृष्ठीय गुणधर्मासंबंधी (विशेषतः या पदार्थांच्या पृष्ठभागाजवळील आणवीय संरचनेविषयी) संशोधन केले. त्यांचे सुरुवातीचे कार्य तापायनिक उत्सर्जन (निर्वातामध्ये धातू वा तत्सम घन पदार्थ तापविला असता त्याच्या पृष्ठभागापासून इलेक्ट्रॉन बाहेर पडणे) व टंगस्टनाच्या पृष्ठभागावरील अधिशोषित (अन्य पदार्थाचे अणु-रेणूसारखे घटक पृष्ठभागावर आकर्षित करून साचवून तयार झालेले) थर यांविषयी होते. त्यानंतर त्यांनी अर्धसंवाहकाच्या पृष्ठभागावर होणारे एकदिशीकरण (प्रत्यावर्ती-मूल्य व दिशा एका सेकंदास वारंवार उलटसुलट बदलणाऱ्या-विद्युत् प्रवाहाचे एकाच दिशेने वाहणाऱ्या प्रवाहात रूपांतर होण्याची क्रिया) व प्रकाशाचे परिणाम यांसंबंधी संशोधन केले. या संदर्भात त्यांनी क्युप्रस ऑक्साइड, सिलिकॉन, जर्मेनियम वगैरे अर्धसंवाहकांच्या पृष्ठभागांचा अभ्यास केला.
⇨ घन अवस्था भौतिकीतील ब्रॅटन यांचे प्रमुख कार्य म्हणजे त्यांनी अर्धसंवाहकांच्या मुक्त पृष्ठभागावरील प्रकाशीय परिणामाचा लावलेला शोध, बारडीन यांच्या समवेत जर्मेनियमाच्या चकतीतील विद्युत् शक्ती विवर्धनाचा परिणाम प्रयोगाद्वारे दाखवून देऊन नंतर त्यातून बिंदु-स्पर्श ट्रँझिस्टर [→ इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ती] या पहिल्या ट्रँझिस्टराचा लावलेला शोध आणि अर्धसंवाहकांच्या पृष्ठभागाच्या गुणधर्मांचे अधिक चांगल्या प्रकारे आकलन होण्याच्या दृष्टीने बारडीन, सी. जी. बी. गॅरेट व इतरांबरोबर केलेले संशोधन, हे होय. ट्रँझिस्टराच्या शोधानंतर अनेक उपकरणांतील मोठ्या आकारमानाच्या निर्वात नलिकांची जागा ट्रँझिस्टरांनी घेतली आणि इलेक्ट्रॉनीय मंडलांत पुढे झालेल्या सूक्ष्मी करणाची ही सुरुवात ठरली. १९६५ नंतर ब्रॅटन यांनी डेव्हिड फ्रास्को व डी. आर्. कॉकवॉर्फ यांच्या सहकार्याने जिवंत कोशिकांच्या (पेशींच्या) पृष्ठभागाची प्रतिकृती या दृष्टीने फॉस्फोलिपिडाच्या द्विस्तरांसंबंधी संशोधन केले.
नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना बारडीन यांच्या समवेत फ्रँक्लिन इन्स्टिट्यूटचे स्ट्यूअर्ट बॅलेंटाइन (१९५२) व जॉन स्कॉट पदक (१९५५) हे सन्मान मिळाले. ब्रॅटन यांना पोर्टलँड विद्यापीठ, व्हिटमन कॉलेज, युनियन कॉलेज, मिनेसोटा विद्यापीठ इ. संस्थांनी सन्माननीय डॉक्टरेट पदव्या बहाल केल्या. ते नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस, फ्रँक्लिन इन्स्टिट्यूट आणि अमेरिकन ॲसोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थांचे सदस्य आहेत. यांखेरीज ते इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड फिजिक्स या संस्थेच्या अर्धसंवाहकविषयक समितीचे सदस्य आहेत. घन अवस्था भौतिकीवरील त्यांचे अनेक निबंध प्रसिद्ध झालेले आहेत.
भदे, व. ग.