बोस, सर जगदीशचंद्र : (३० नोव्हेंबर १८५८- २३ नोव्हेंबर १९३७). भारतीय भौतिकीविज्ञ व वनस्पती शरीरक्रिया- वैज्ञानिक. वनस्पतींच्या वृद्धीचे व प्रकाश, विद्युत्, स्पर्श यांसारख्या बाह्य उद्दीपनांना मिळणाऱ्या वनस्पतींच्या प्रतिसादांचे मापन करण्याकरिता त्यांनी केलेल्या आद्य कार्याकरिता जगप्रसिद्ध.
बोस यांचा जन्म बंगालमधील (आता बांगला देशातील) मैमनसिंग येथे झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण
कलकत्ता येथील सेंट झेवियर कॉलेजमध्ये झाले. कलकत्ता विद्यापीठाची बी.ए. पदवी मिळविल्यानंतर ते वैद्यकाचा अभ्यास करण्यासाठी लंडन विद्यापीठात गेले. तथापि शिष्यवृत्ती मिळाल्याने ते केंब्रिज विद्यापीठात निसर्गविज्ञानाचा अभ्यास करण्याकरिता गेले. तेथे लॉर्ड रॅली या सुप्रसिद्ध भौतिकीविज्ञांच्या मार्गदर्शनाचा त्यांना लाभ मिळाला. १८८४ मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची पदवी संपादन केली. त्यानंतर १८८५ मध्ये कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये भौतिकीच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली. या पदावर नेमणूक होणारे ते पहिलेच भारतीय असल्यामुळे सुरुवातीला त्यांना वर्णभेदाला तोंड द्यावे लागले पण काही वर्षांनंतर त्यांची योग्यता ओळखल्यावर असामान्य शास्त्रज्ञांत त्यांची गणना होऊ लागली. १९१५ मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर कलकत्ता विद्यापीठात गुणश्री प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९१७ साली कलकत्ता येथे त्यांनी बोस रिसर्च इन्स्टिट्यूट ही संशोधन संस्था स्थापन केली आणि मृत्यूपावेतो तिचे संचालक म्हणून त्यांनी काम केले.
बोस यांनी १८९५ मध्ये अतिशय लघू तरंगलांबी असलेल्या रेडिओ तरंगांच्या प्रकाशसदृश गुणधर्मांसंबंधी [प्रणमन व ध्रुवण ⟶ प्रकाशकी] काटेकोर प्रयोग केले व त्यामुळे त्यांची किर्ती सर्वत्र पसरली. विद्युत् ऊर्जा प्रेषणासंबंधी त्यांनी केलेले कार्य जे. सी. मॅक्सवेल व एच्. आर्.हर्ट्झ यांच्या कार्याचा विस्तार करणारे होते. या कार्यातून रेडिओ संदेशवहनाच्या शक्यतेत त्यांना रस निर्माण झाला आणि त्यांनी याबाबत केलेले काही प्रयोग एम्.जी. मार्कोनी यांच्या प्रयोगांशी समकालीनही होते. १८९५ मध्ये त्यांनी कलकत्त्यात रेडिओ संदेशवहनाचे प्रात्यक्षिकही करून दाखविले होते, असे म्हटले जाते. या प्रयत्नांतून त्यांनी त्या काळी रेडिओ तरंगांच्या अभिज्ञानासाठी (अस्तित्व ओळखण्यासाठी) वापरण्यात येणाऱ्या लोहचूर्णयुक्त नलिकाकार उपकरणात सुधारणा केल्या. या सुधारणा ⇨घन अवस्था भौतिकीच्या विकासात महत्त्वाच्या ठरल्या आहेत.
काही अजव पदार्थ विविध उद्दीपनांना देत असलेल्या प्रतिसादांचे जैव प्रतिसादांशी असलेले साम्य बोस यांच्या लक्षात आले. या निरीक्षणावरून प्राणी व वनस्पती यांच्या ऊतकांच्या (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहांच्या) वर्तनांची तुलना करण्याकडे त्यांचे लक्ष ओढले गेले आणि उर्वरित आयुष्यात त्यांनी याच्याच अभ्यासावर विशेष भर दिला. त्यांनी या विषयावर लिहिलेल्या निबंधांना व दिलेल्या व्याख्यानांना व्यापक मान्यता मात्र मिळाली नाही. १९०१ मध्ये व १९०४ मध्ये त्यांन लंडनच्या रॉयल सोसायटीला सादर केलेले या विषयावरील निबंध स्वीकारण्यात आले नाहीत. याचे अंशतः कारण म्हणजे त्यांनी या निबंधात विषयाचे तत्त्वज्ञानात्मक विवरण केलेले होते. तथापि वनस्पतींच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी योजलेल्या वनस्पतींच्या अतिसूक्ष्म हालचालींची नोंद करणाऱ्या अतिशय संवेदनशील स्वयंचलित उपकरणांबद्दल आणि या उपकरणांच्या साहाय्याने त्यांनी विविध उद्दीपनांमुळे होणाऱ्या वनस्पतींतील सूक्ष्म बदलांविषयी सातत्याने जमा केलेल्या माहितीबद्दल त्यांची किर्ती जगभर पसरली. वनस्पतींच्या वाढीचे एक कोटी पट विवर्धन करू शकणारे क्रेस्कोग्राफ हे स्वयंचलित उपकरण त्यांनी तयार केले होते. या उपकरणाच्या साहाय्याने बोस यांनी वनस्पतींनाही संवेदनाग्रहणक्षमता (उदा., इजा झालेल्या वनस्पतींचे थरथरणे) असते, असे प्रयोगांनी दाखवून दिले. यावरून आधुनिक जीवभौतिकीविज्ञांना आता आढळलेल्या वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या ऊतकांतील संवेदनाग्रहणातील साम्यासंबंधी बोस यांना अगोदरच अंदाज आलेला होता, असे दिसून येते.
केंब्रिज विद्यापीठाने त्यांना १८९६ मध्ये सन्माननीय डी.एस्सी. पदवी दिली व रॉयल सोसायटीने त्यांना १९२० मध्ये सदस्यत्व बहाल केले. ब्रिटिश सरकारने १९१७ साली त्यांना ‘नाइट’ हा किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी युरोप व अमेरिकेत दौरे करून अनेक व्याख्याने दिली. त्यांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथांपैकी रिस्पॉन्स इन द लिव्हिंग अँड नॉन-लिव्हिंग (१९०२), प्लँट रिस्पॉन्स ॲज ए मीन्स ऑफ फिजिऑलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन (१९०६), द मोटर मेकॅनिझम ऑफ प्लँट्स (१९२८) वगैरे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांचे संशोधनपर निबंध कलेक्टेड फिजिकल पेपर्स या शीर्षकाखाली त्यांनीच स्वतः संकलित करून १९२७ मध्ये प्रसिद्ध केले. ते अतिशय देशाभिमानी होते व भारतीयांनी आपल्या महान सांस्कृतिक परंपरेत वैज्ञानिक संशोधन करून भर घालावी, अशी त्यांची उत्कट इच्छा होती. त्यांनी कलकत्ता विद्यापीठात आणि नंतर बोस रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनाला अतिशय प्रोत्साहन दिले. ते बंगालमधील (आता बिहारमधील) गिरिडी येथे मृत्यू पावले.
संदर्भ : 1. Geddes. P. The Life and Work of Sir Jagadis C. Bose, London, 1920. 2. Gupta, M. Jagadishchandra Bose : A Biography, Bombay, 1964.
भदे व. ग.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..