बोलन खिंड : पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील कीर्थर पर्वताच्या मध्य ब्राहूई पर्वतश्रेणीतील प्रसिद्ध खिंड. ‘बोलन पास’ (खिंड) या नावाचा जिल्हाही बलुचिस्तानात पूर्वी होता. बोलन खिंडीच्या दक्षिण टोकाला असलेले रिंडली हे २३० मी. किमान उंचीवर व उत्तर टोकाला असलेले कोलपूर हे सु. १,८०० मी. कमाल उंचीवर असून या दोन टोकांदरम्यानची खिंडीची लांबी सु. ९० किमी. आहे. मकच्या दक्षिणेस असलेले लालेजी मैदान, हा या खिंडीतील सर्वांत रुंद भाग होय. बोलन व नारी या नद्या या प्रदेशातून वाहतात. बोलन नदीवर सिबी मैदानात नारी-बोलन हे मातीचे धरण बांधण्यात आले असून त्यापासून सु. ९,७०० हे. क्षेत्राला पाणीपुरवठा होतो.

प्राचीन काळापासून हिंदुस्थानचे सुमेर, खाल्डिया, इराण इत्यादी प. आशियाई संस्कृतींशी होणारे दळणवळण बोलन खिंडीमार्गेच होई. म्हणूनच ‘हिंदुस्थानचे वायव्येकडील प्रवेशद्वार’ असा या खिंडीचा निर्देश करतात. पहिल्या महायुद्धाच्या अखेरपर्यंत हिंदुस्थानावर वायव्येकडून खैबर, कुर्रम, बोलन व गुमल या खिंडींतून आक्रमणे झालेली आहेत. इ. स. पू. पाचव्या-सहाव्या शतकांत बोलन व गुमल खिंडींचा वापर इराणच्या ॲकिमेनिडी वंशाच्या (इ. स. पू. ५४६-३३०) आक्रमकांनी केला. हिंदुस्थानवरील स्वारीनंतर (इ. स. पू. ३२७-३२६) अलेक्झांडरच्या सैन्याचा एक विभाग बोलन खिंडीतून बॅबिलनकडे परतला. शकांची आक्रमणे (इ. स.४०-८०) खैबर व बोलन खिंडींतून झाली. महंमूद गझनीने गुमल खिंडीतून आक्रमणे केली. बोलन खिंड व गुमल खिंड यांमधील प्रदेश ‘डेरा जाट’ (स्वारांचा छावणी प्रदेश) म्हणून ओळखला जातो. पहिल्या (१८३८-४२) व दुसऱ्या (१८७५-७९) इंग्रज-अफगाण युद्धांत ब्रिटिश सैन्याचा एक विभाग बोलन खिंडीतून कंदाहारकडे गेला. या युद्धानंतर गंडमकच्या तहाने (१८७९) बोलन खिंड व जिल्हा ब्रिटिशांच्या ताब्यात आला. सैनिकी हालचाली सुकर होण्यासाठी ब्रिटिशांनी या प्रदेशात लोहमार्ग व रस्ते बांधले. त्यांपैकी सक्कर ते क्वेट्टा लोहमार्ग व रस्ता या खिंडीतून जातो. पाकिस्तान, अफगाणिस्तान, रशिया व भारत या देशांच्या दृष्टीने बोलन खिंडीचे भूराजनैतिक महत्त्व मोठे आहे. आधुनिक सैनिकी विज्ञान आणि तंत्र यांच्या उदयामुळे या खिंडीचे एकेकाळचे लष्करी महत्त्व कमी झाले असले, तरी भूसेनेच्या हालचालींच्या दृष्टीने ही खिंड मोक्याचीच ठरते.

संदर्भ : Yapp. A. E. Strategies of British India : Britain, Iran and Afghanistan 1778-1850, Oxford, 1980.

चौधरी, वसंत दीक्षित, हे. वि.