बोन : विद्यमान नाव ॲन्नाब. अल्जीरिया देशाच्या ॲन्नाब प्रांतातील इतिहासप्रसिद्ध शहर व बंदर. लेकसंख्या ५,००,००० (१९८० अंदाज) अल्जिअर्स शहराच्या पूर्वेस हे ४२० किमी. व कॉन्स्टंटीनच्या ईशान्येस १५६ किमी. अंतरावर भूमध्य समुद्रास मिळणाऱ्या वेड सेबूझ नदीमुखावर वसलेले आहे.

‘हिपो रीजस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राचीन रोमन नगरीच्या अवशेषांजवळ सातव्या शतकात अरबांनी एक मोक्याचे स्थान म्हणून बोन वसविले. तत्पूर्वी कार्थेजियन व्यापाऱ्यांनी हे शहर वसविले होते, असा उल्लेख आहे. व्हँडॉल आक्रमकांनी इ. स. ४३१ मध्ये या शहराचा विध्वंस केला होता. आफ्रिकेतील ख्रिस्ती धर्मियांचे पहिले धर्मपीठ येथे होते व ते सेंट ऑगस्टीन याच्या नावाने ओळखले जात असे. अरब अंमलात या बंदराची भरभराट झाली. सतराव्या-अठराव्या शतकांत ते उत्तर आफ्रिकेतील व्यापाराचे एक प्रमुख केंद्र होते. १८३२ नंतर ते फ्रेंचांच्या ताब्यात गेले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात येथे दोस्त राष्ट्रांचा लष्करी व नाविक तळ होता. ⇨ अल्जीरिया स्वतंत्र झाल्यावर त्याचे ‘ॲन्नाब’ असे नामांतर करण्यात आले (१९६२).

याच्या आसमंतात, विशेषतः अल्जीरियाच्या ईशान्य भागात, लोह, फॉस्फेट, जस्त इ. धातुकांच्या खाणी असल्यामुळे येथे पोलाद, ॲल्युमिनियम, रसायने इ. उद्योग विकसित झालेले आहेत. या बंदरात परदेशांतून मुख्यत्वे यंत्रसामग्रीची आयात केली जाते, तर लोखंड, फॉस्फेट, लोकर, कातडी, एस्पार्टो गवत, दारू, बुचे, मध यांची या बंदरातून निर्यात होते. फ्रेंच व रशियन आर्थिक-तांत्रिक साहाय्याने सुरु असलेला येथील ‘एल् हाजार’ हा पोलाद कारखाना प्रसिद्ध आहे. खनिज तेलशुध्दीकरण कारखाना येथे सुरु करण्याचा शासनाचा विचार असून हळूहळू रासायनिक पदार्थांची निर्मितीही होत आहे. अल्जिअर्स व ओरान या बंदरांच्या खालोखाल बोनचे महत्त्व असून एक पर्यटनस्थळ म्हणूनही त्याचे आकर्षण वाढत आहे. येथील हिपो संग्रहालय, सेंट ऑगस्टीन कॅथीड्रल आणि सिदी बाऊ मेरोउअन मशीद ह्या वास्तू प्रेक्षणीय आहेत.  

गाडे, ना. स.