बेलेम्नाइट : पूर्वीच्या काळातील समुद्रात मोठ्या संख्येने राहाणाऱ्या व आता फक्त जीवाश्मरूपात (शिळारूप अवशेषांच्या रूपात) आढळणाऱ्या प्राण्यांच्या एका गटाचे नावे. ⇨ सेफॅडोपोडा
वर्गातील डायब्रॅंकिएटा उपवर्गाच्या डेकॅपोडा गणात (→ डेकॅपोडा – १) या गटाचा समावेश केला जातो. डायब्रॅंकिएटा उपवर्गाचे अनेक प्रकारचे व विपुल प्राणी आजच्या समुद्रात आढळतात. त्यांच्यापैकी ⇨ ऑक्टोपसासारख्या कित्येकांना सांगाडे नसतात व इतर कित्येकांना नाजूक किंवा लहान सांगाडेच असतात पण बेलेम्नाइटांना टिकाऊ सांगाडा असे व त्यांचे पुष्कळ जीवाश्म सापडतात.
सांगाडा : बेलेम्नाइटांच्या सांगाड्याचे (१) रक्षक किंवा मंच, (२) वृत्तशंकू व (३) अग्रकवच असे तीन टक्के असतात.
रक्षक : हा आकाराने चिरूटासारखा किंवा दांडूसारखा असतो. त्याच्या एका टोकाच्या शेवटाकडला भाग निमुळता व अखेरीस टोकदार असतो, दुसऱ्या व रुंद टोकाजवळच्या भागात शंकूच्या आकाराची उखळी असते व तिला गर्त म्हणतात. गर्त असलेले टोक पुढे म्हणजे प्राण्याच्या मुखाच्या दिशेकडे व निमुळते टोक मागे असते. गर्ताचा थोडासा भाग सोडला, तर रक्षकाचा इतर सर्व भाग भरीव असतो. रक्षकाचे छेद तपासून पाहिले म्हणजे त्याची बांधणी कळून येते. एका अक्षाभोवती कॅल्साइटाचे (चुनखडी खनिजाचे) एकावर एक लेप बसून रक्षक तयार झालेला असतो व कॅल्साइटाचे सूक्ष्म, स्तंभाकार स्फटिक अक्षाला लंब असतील असे रचलेले असतात. त्यामुळे रक्षकाच्या अनुप्रस्थ (आडव्या) छेदाची रचना घागे अरीय (त्रिज्यीय) रचावे अशीदिसते. बांधणीचा अक्ष मध्याजवळ पण मध्यभाग नसतो. रक्षकाचा अनुप्रस्थ छेद वर्तुळाकार किंवा कधीकधी दीर्घवृत्ताकार असतो. रक्षकाचे आकार, आकारमान व पृष्ठ ही जातिपरत्वे निरनिराळी असतात. रक्षकाची लांबी २.५ ते ३० सेंमी. इतकी असते. पृष्ठ गुळगुळीत असते किंवा त्याच्यावर पुटकुळ्या किंवा रक्तवाहिन्यांचे वण असतात. काही रक्षकांच्या खालच्या किंवा दोन्ही बाजूंच्या किंवा वरच्या पृष्ठावर कमीअधिक लांबीची खोबण असते. काही रक्षकांतील गर्त चिंचोळ्या शंकूसारखे, तर काहींतील रुंद शंकूसारखे असतात.
वृत्तशंकू : हा पोकळ शंकूसारखा असतो व त्याच्या आत त्याच्या रुंद तोंडाकडे अंतर्वक्र असे अनेक अनुप्रस्थ पट असतात. त्यामुळे त्याच्यात अनेक प्रकोप (कप्पे) झालेले असतात. पटांच्या खालच्या कडेजवळ एकेक छिद्र असते व त्या सर्व छिद्रांतून प्राण्याची निनालिका (मऊ शरीराचा सुतासारखा जिवंत फाटा) जात असे. वृत्तशंकूच्या निमुळत्या टोकाशी प्राण्याचे बारीक मण्यासारखे आदिकवच (आद्यकवच) असते. वृत्तशंकूच्या निमुळत्या टोकाकडचा कमीअधिक भाग रक्षकाच्या गर्तात बसविलेला असतो. सेफॅलोपोडा वर्गातील ⇨ ॲमोनॉइडिया व ⇨ नॉटिलाइडिया या गणांतील प्राणी हे बेलेम्नाइटांचे दूरचे पण आप्त होत. त्या प्राण्यांना सप्रकोष्ठ कवचाचा बाह्य सांगाडा असे. बेलेग्नाइटांचा वृत्तशंकू हा ॲमोनॉइडिया किंवा नॉटिलॉइडिया यांच्या प्राण्यांचे जे एकूण कवच असते त्याच्याशी सदृश असतो.
अग्रकवच : वृत्तशंकूच्या गर्ताजवळच्या वरच्या काठाची पुढे वाढ होऊन लांब चोचीसारखा प्रक्षेप तयार केलेला असतो त्याला अग्रकवच म्हणतात. त्याच्या टोकाच्या पुढे प्राण्याचे शिर असे.
वृत्तशंकू व अग्रकवच ही पातळ व नाजूक असतात व ती सुरक्षित राहिलेले जीवाश्म विरळाच आढळतात. रक्षक मात्र भक्कम असता व बेलेम्नाइटांच्या जीवाश्मांचे बहुतेक नमुने कमीअधिक सुरक्षित राहिलेल्या रक्षकांचे असतात पण मूळ शरीराच्या मऊ भागांचे लवलेश किंवा ठसे ज्यांच्यात टिकून राहिलेले आहेत, असेही काही नमुने मिळालेले आहेत व त्यांच्यावरून बेलेग्नाइटांच्या शरीराच्या रचनेची कल्पना येते. त्यांचा सांगाडा आंतरिक (अंतर्गत) असे आणि अग्रकवच, वृत्तशंकू व रक्षक यांची स्थाने सोबतच्या (ई) आकृतीत दाखविल्याप्रमाणे असत. एकूण शरीराच्या लांबीच्या मानाने रक्षकाची लांबी थोडी असे व शरीराचा फारच थोडा भाग सप्रकोष्ठ कवचात सामावलेला असे. आजच्या ⇨ माखलीच्या शरीरात असते तशी शाईची पिशवी व तिच्या मुखाभोवती असतात तसे अनेक बाहू बेलेग्नाइटांना असत. माखलीच्या बाहूंवर शृंगमय पदार्थांचे आकडे नसतात पण बेलेग्नाइटांच्या प्रत्येक बाहूवर तशा आकड्यांची एक जोड रांग असे. आतापर्यंत सापडलेल्या जीवाश्मांत असे आकडे असलेल्या आठच बाहूंचे अवशेष मिळालेले आहेत. त्यांना आणखी दोन बाहू असत किंवा नसत, हे निश्चित सांगता येत नाही.
रक्षकांचा आकार व पृष्ठाचे स्वरूप, वृत्तशंकूचा आकार इ. लक्षणांवरून बेलेग्नाइटांच्या अनेक जाती किंवा वंशही ठरविण्यात आलेले आहेत पण त्यांच्या वर्गीकरणाची सामान्यत: मान्य अशी योजना झालेली नाही. बेलेग्नाइटांच्या गटाचा आयुकालावधी पूर्व-जुरासिक कल्प ते उत्तर क्रिटेशस कल्पातील (सु. १८.५ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) आहे. ट्रायासिक (सु. २३ ते २० कोटी वर्षांपूर्वीच्या) किंवा त्याच्या आधीच्या कल्पातील बेलेग्नाइटांच्या पूर्वजांचे काही जीवाश्म आढळलेले आहेत. ते बेलेग्माइटांच्या सांगाड्यासारखे पण विस्तरश: निराळे असतात. असे पूर्वज व बेलेम्नाइटे मिळून होणाऱ्या गटास बेलेम्नॉइडे (बेलेम्नॉइडिया गण) असे कधीकधी म्हणतात.
संदर्भ : 1. Davies, A. M. An Introduction to Palaeontology, London, 1961.
2. Woods, H. Palaeontology : Invertebrate, Cambridge, 1961.
केळकर, क. वा.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..