बेलफॉर : फ्रान्सच्या ऍल्सेस प्रांतातील बेलफॉर विभागाची इतिहासप्रसिद्ध राजधानी. लोकसंख्या ५७,३१७ (१९७५ अंदाज). हे म्यूलूझच्या नैऋत्येस ४० किमीवर वसलेले आहे. स्वित्झर्लंड – जर्मनीतून फ्रान्सकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावर व्होज व जुरा पर्वतांदरम्यानच्या `बर्गंडी’ गेटमध्ये वसलेले असल्याने लष्करी दृष्ट्या यास महत्व आहे.

प्राचीन गॉल – रोमन काळात हे शहर वसले. पूर्वी हे काउंट ऑफ मॉंबेल्यारच्या अखत्यारीत होते व चौदाव्या शतकानंतर हे ऑस्ट्रियाच्या ताब्यात आले. १६४८ मध्ये झालेल्या वेस्टफेलियाच्या तहान्वये हे ऑस्ट्रियाकडून फ्रान्सकडे आले. याचे लष्करी महत्व लक्षात घेऊन मार्शल मार्की दे व्होंबा याने शहरास तटबंदी केली (१६८६). फ्रॅंको-जर्मन युद्धात (१८७० – ७१) या शहरास जर्मनांनी १०८ दिवस वेढा घातला होता. तरीसुद्धा जर्मनांना ते घेण्यात यश मिळाले नव्हते. या वेढ्याच्या स्मरणार्थ येथे एफ. ए. बार्‌टॉल्डी या फ्रेंच शिल्पकाराने ११ मी. उंचीचा व २२ मी. लांबीचा `लायन ऑफ बेलफॉर’ हा भव्य पुतळा बोधला. या शहरास अनेक लढायांना तोंड द्यावे लागले. पहिल्या महायुद्धात जर्मनांना या शहराचा ताबा मिळवीता आला नव्हता, परंतु दुसऱ्या महायुद्धात मात्र त्यांनी बेलफॉर काबीज केले.

अन्नधान्ये, मद्य इत्यादींची ही एक बाजारपेठ आहे. येथे कापड, यंत्रसामग्री, विद्युतसाहित्य इ. उद्योग विकसीत झालेले आहेत. येथील संग्रहालय, फ्रॅंको-जर्मन युद्धाचे स्मारक म्हणून उभारलेला पुतळा, सेंट क्रिस्तॉफ चर्च (१७२७-५०), नगर भवन इ. गोष्टी उल्लेखनिय आहेत.

ओक, द. ह.