बेनिडिक्ट, रूथ फुल्टन : (५ जून १८८७ -१७ सप्टेंबर १९४८). प्रसिद्ध अमेरिकन मानवशास्त्रज्ञ. न्यूयॉर्क येथे सधन घराण्यात जन्म. वडील फ्रेडरिक रूथ फुल्टन बेनिडिक्टफुल्टन हे शल्यचिकित्सक होते पण ते तिच्या लहानपणीच वारले,रूथ फुल्टन बेनिडिक्ट त्यामुळे आईने तिचा सांभाळ केला. रूथेने न्यूयॉर्क येथे शिक्षण घेऊन पदवी मिळविली (१९०९) आणि विवाहापर्यंत शिक्षिकेचा पेशा स्वीकारला. स्टॅन्ली वेनेडिक्टशी तिचे लग्न झाले (१९१४) व आठ वर्षांनी ती विधवा झाली. लग्नानंतर तिने शिक्षिका म्हणून अध्यापन करीत असताना धर्मादाय संस्था व सामाजिक संस्था यांतही कार्य केले. तिचा मूळचा पिंड कवयित्रिचा होता. तिने या वयात काही कविताही केल्या पण पतीच्या निधनानंतर १९२१-२२ मध्ये मिने कोलंबिया विद्यापीठात फ्रँट्स बोॲस यांच्या हाताखाली मानवशास्त्रीय संशोधनास वाहून घेतले आणि डॉक्टरेट ही पदवी मिळविली (१९२३). पुढे ती तेथेच मानवशास्त्र विषयाची प्राध्यापिका झाली. तिने आपले उर्वरित आयुष्य वाचन-लेखन-संशोधन यांत व्यतीत केले. पिमा अमेरिकन इंडियन जमातीसंबंधी तिने सर्वेक्षण केले (१९२७). या वेळी तिला जर्नल ऑफ अमेरिकन फोकलोअर या नियतकालिकाचे संपादकत्व मिळाले. त्यातून ती स्फुटलेखन करू लागली. या काळात फ्रँट्स बोॲस व जेम्स फ्रेझर यांच्या पुस्तकांचा फार गवगवा झाला होता. रूथने आपले संस्कृतीविषयीचे समग्र विचार पॅटर्न्स ऑफ कल्चर (१९३४), झ्यूनी मायथॉलजी (१९३५), कॉन्सेप्ट ऑफ द गार्डिअन स्पिग्टि इन नॉर्थ अमेरिका (१९४३), द किसनथिमम् अँड द सोअर्ड : पॅटर्न्स ऑफ जॅपनीज कल्चर (१९४६) इ. ग्रंथांतून प्रभावीपणे मांडले. या ग्रंथांत तिने सांस्कृतिक समानता. राष्ट्रीय चारित्र्य व प्रत्येक मानवाचे व्यक्तिमत्त्व घडविण्यातील संस्कृतीचा वाटा या संकल्पनांवर भर दिला. तिने मानवशास्त्र व रूढी यांचा समन्वय करून वेगवेगळ्या जमातींच्या संस्कृती तपासल्या व संस्कृतींना विशिष्ट आकृतिबंध असतात, असे मत प्रतिपादिले. पॅटर्न्स ऑफ कल्चर या ग्रंथने तिला जगाच्या मानव शास्त्रज्ञांत उच्य स्थान प्राप्त करून दिले. या संशोधनाचा उचित गौरव तिला १९४८ मध्ये मानवशास्त्र विभागाचे कोलंबिया विद्यापीठातील प्रमुख पद देऊन करण्यात आला पण त्यानंतर लवकरच ती हृदयविकाराच्या झटक्याने न्यूयॉर्क येथे मरण पावली. तिचे समग्र साहित्य आणि संक्षिप्त चरित्र मार्गारेट मीडने प्रसिद्ध केले आहे.

संदर्भ : Mead, Margaret, Ruth Benedict, New York, 1974.

भागवत, दुर्गा