बेनाव्हेंते ई मार्तीनेथ, हाथींतो : (१२ ऑगस्ट १८६६-१४ जुलै १९५४). श्रेष्ठ स्पॅनिश नाटककार. माद्रिद शहरी जन्मला. El nido ajeno (१८९४) ही त्याची पहिली नाट्यकृती. ती धरून त्याने लिहिलेल्या एकूण नाट्यकृतींची संख्या सु. १७० आहे. ‘सॅटरडे नाइट’ (१९०३, इं. शी.), ‘ऑटमल रोझीस’ (१९०५, इं. शी.), ‘बाँड्स ऑफ इंटरेस्ट’ (१९०७, इं. शी.), ‘द पॅशन फ्लॉवर’ (१९१३, इं. शी.), ‘द ईव्हिल दॅट मे डू टू अस’ (१९१९, इं. शी.) ही त्याची काही उल्लेखनीय नाटके होत. आपल्या नाट्यकृतींतून तत्कालीन समाजातील अनेक अपप्रवृत्तींवर त्यांन उपरोधप्रचुर टीका केली. त्याच्यातला नीत्युपदेशक त्याच्या अनेक नाटकांतून प्रकर्षाने प्रत्ययास येतो. त्याच्या सर्वच नाटकांची कलात्मकता एकसारखी नसली, तरी सामाजिक टीकेच्या अंगाने स्पॅनिश नाटकांतील वास्तववादाचा प्रवाह जोमदार करण्याचे श्रेय त्याला दिले जाते. स्पॅनिश नाटकांतील अतिनाट्यात्मक प्रवृत्तीही त्याने आपल्या नाटकांत येऊ दिल्या नाही. तल्लख संवाद हे त्याच्या नाटकांचे एक लक्षणीय वैशिष्ट्य. १९२२ साली साहित्याचे नोबेल पारितोषिक देऊन त्याच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. बेनाव्हेंतेच्या तेरा नाट्यकृतींचा इंग्रजी अनुवाद प्लेज ऑफ हाथींतो बेनाव्हेंते (४ खंड, १९१७-२४) ह्या नावाने प्रसिद्ध झालेला आहे. माद्रिद येथे तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.