बेडेकर,दिनकर केशव : (८ जून १९१०-२ मे१९७३). श्रेष्ठ मराठी समीक्षक व विचारवंत. जन्म सातारचा. आरंभीचे शिक्षण तेथेच झाले. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून इंटर सांयन्सची परीक्षा देऊन अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी ते कराचीस गेले. तथापि हे शिक्षण अर्धवटच सोडून चित्रकलेच्या अभ्यासासाठी ते शांतिनिकेतनात दाखल झाले (१९२९)पंरतु हा शिक्षणक्रमही ते पूर्ण करु शकले नाहीत. प्रकृती बिघडल्यामुळे ते बनारसला आले आणि तेथील हिंदू विश्वविद्यालयाची तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्र ह्या विषयांतील पदवी त्यांनी घेतली (१९३२). तेथे शिकत असतानाच, १९३० मध्ये, महाराष्ट्रात येऊन मुळशी सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता. पुढे मुंबईत येऊन ते कामगार चळवळीत सहभागी झाले. १९३३ साली, कम्युनिस्ट पक्षाच्या बोल्शेव्हिक गटात ते सामील झाले, हा गट पुढे लवकरच कम्युनिस्ट पक्षात विलीन झाला. १९४० मध्ये त्यांना अटक होऊन दोन वर्षे तुंरुगवास भोगावा लागला. पुढे कम्युनिस्ट पक्षाशी मतभेद झाल्यामुळे त्या पक्षाचा राजीनामा देऊन ते राजकीय कार्यापासून अलग झाले (१९५०). १९५४ साली तत्त्वज्ञान हा विषय घेऊन ते एम.ए. झाल्यानंतर पुणे येथील गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या अर्थविज्ञान ह्या त्रैमासिकाचे संपादन त्यांनी केले. अल्पकाळ ते नाशिकाच्या हं.प्रा.ठा. महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते (१९५४-५६). १९६२ ते १९६४ ह्या काळात मराठी विश्वकोशाच्या कार्यालयात विभाग संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले त्र १९६८-६९ मध्ये गोखले अर्थशास्त्र संस्थेत मराठी ग्रंथसंपादनाचे कार्य त्यांनी केले. त्यांनतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठात ते तत्त्वज्ञानाचे अध्यापन करीत असत. मुंबई येथे त्यांचे निधन झाले. मरणोत्तर आपला देह वैद्यकीय अभ्यासासाठी देण्यात यावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती व त्याप्रमाणे केले गेले.

बेडेकरांनी १९३६ च्या आसपाच कथा, तसेच राजकीय वाङ्मयीन स्वरूपाचे लेखन करावयास सुरुवात केली होती. तथापि त्यांचे सर्व महत्त्वाचे लेखन १९५० नंतरच्या कालंखडातच झाले. नवकाव्य, नवकथा, नवे साहित्यविचार, सौंदर्यशास्त्रीय मीमांसा, अस्तित्ववादासारख्या विचारप्रणाली ह्यांचा हा काळ होता आणि ह्या काळाची आव्हाने व आवाहने साक्षेपाने स्वीकारुन बेडेकर समीक्षेच्या क्षेत्रात उतरले. साहित्य : निर्मिती व समीक्षा (१९५४), साहित्यविचार (१९६४), केशवसुतांची काव्यदृष्टी (१९६६), आधुनिक मराठी काव्य : उदय, विकास आणि भवितव्य (१९६९) ह्यांसारख्या ग्रंथांतून मोजकाच परंतु मौलिक साहित्यविचार त्यांनी माडंला. समाजचिंतन (१९६९), विचारयात्रा ह्यांसारख्या ग्रंथातून त्यांच्या सामाजिक विचाराची ओळख होते.

साहित्य : निर्मिती व समीक्षा ह्या ग्रंथात साहित्यसमीक्षेचे स्वरुप नेमकेपणाने विशद करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. कलावंताचे व्यक्तिमत्व व बाह्य वास्तव ह्यांच्या द्वंद्वात्मक प्रक्रियेतून अवतरणारी कलात्मक विकल्पना म्हणजे कलाकृती होय कलावंताचे व्यक्तिमत्व व वास्तवता समाजसापेक्ष असल्यामुळे कलाकृतीला अप्रत्यक्षपणे सामाजिक सांस्कृतिक संदर्भ प्राप्त होतो, म्हणून कलाकृतीची समीक्षा करीत असताना कलावंताचा काळ, पराक्रम, सामाजिक वर्ग ह्यांचा विचारआवश्यक ठरतो व ह्यासाठी सामाजिक शास्त्रांची मदत घेणेही इष्ट ठरते, असे विचार त्यांनी मांडलेले आहेत. मार्क्सच्या द्वंद्वात्मक जडवादाचा त्यातीलऱ्हेगेलप्रणीत आशयाशी इमान राखणाऱ्या अशा स्वरूपात-प्रभाव बेडेकरांच्या ह्या साहित्यविचारांवर पडलेला दिसतो. सौंदर्य या कल्पनेवर ज्याची निष्ठा आहे, तो साहित्याचा किंवा कलेचा समीक्षक होऊ शकतो अशी त्यांची धारणा त्यांनी साहित्यविचारात व्यक्तविली आहे. तथापि सौंदर्यमूल्ये ही इतिहासनिष्ठ असून सामाजिक पंरपरेतूनच ती निष्पन्न होत असल्यामुळे ती अखेरीस संस्कृतिसापेक्षच ठरतात, हा महत्त्वाचा विचारही त्यांच्या भूमिकेत गर्भित आहेच. साहित्यविचाराबरोबरच चित्रशिल्पादी ललितकलांचा विचारही बेडेकरांनी केला होता. एखादे सर्वंकष व सर्वसमावेशक असे जीवनवादी सौंदर्यशास्त्र मात्र त्यांच्या हातून उभे राहू शकलेले नाही. केशवसुतांची काव्यदृष्टी ह्या पुस्तकात बेडेकरांचे सौंदर्यप्रेम आणि जीवनप्रेम ह्या दोहोंचाही उत्कट प्रत्यय येतो. आपले समीक्षाविषयक विवेचन केवळ तात्विक चर्चेपुरतेच मर्यादित न ठेवता त्या चर्चेला पूरक अशी प्रत्यक्ष साहित्यकृतींची जी परीक्षणे त्यांनी लिहिली, त्यांचे हे पुस्तक म्हणजे एक उत्तम उदाहरण होय. केशवसुतांच्या कवी म्हणून असलेल्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत प्रभावी असा वेध त्यानी ह्या पुस्तकात घेतला आहे. प्राचीन भारतीयांच्या सौंदर्यशास्त्राचे अनेकांगी स्वरुप मुळात कसे होते, हे मांडण्याचा प्रयत्नही बेडेकरांनी आपल्या लेखातून केला. विशेषतः रससिध्दांताचे विस्तृत संशोधन आणि विवरण त्यांनी केले. रसविचार हा प्राचीन संस्कृतीच्या व कलानिर्मीतीच्या संदर्भात समजावून घेण्याची आवश्यकता बेडेकरांनी मांडली. वाङ्मयेतिहासलेखनाबाबतही त्यांची स्वंतत्र दृष्टी होती. ह्या इतिहासातून वाङ्मयातील प्राणरुप तत्वांच्या विकासाचा शोध घेतला पाहिजे व त्या आधारेच वाङ्मयाचा अवस्थाक्रम निश्चित केला पाहिजे, असे त्यांना वाटे.‘मराठी वाङ्मयाची सामाजिक पार्श्वभूमी ’ हा त्यांचा लेख त्या दृष्टीने लक्षणीय आह. हेगेल जीवन आणि तत्त्वज्ञान (१९६६) आणि अस्तित्ववादाची ओळख (१९७२) ही त्याची तत्त्वज्ञानात्मक पुस्तके उल्लेखनीय आहेत. त्यापैकी पहिल्या पुस्तकात हेगेलच्या तत्त्वज्ञानाची रुपरेषा त्यांनी समजावून सांगितली असून आधूनिक तत्त्वज्ञानातील अस्तित्ववाद ह्या एका प्रमुख व प्रभावी विचारसरणीचा परिचय दुसऱ्या पुस्तकात करून दिलेला आहे. भारतीय प्रबोधन: समीक्षण व चिकित्सा (१९७३) ह्या नावाने निघालेल्या शंकरराव देव गौरवग्रंथाचे संपादन त्यांनी भा.श.भणगे ह्यांच्या समवेत केले होते. मात्र हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रसिद्ध झालेला आहे. हिंदी उद्योगधंद्यात राबणाऱ्या स्त्रिया व मुले (१९३६), संयुक्त महाराष्ट्र (१९४७), सुमित्रानंदन पंत (१९४८), अणुयुगातील मानवधर्म (१९७१) , टूवर्डस अंडरस्टॅंडिग गांधी (१९७५), धर्मचिंतन (१९७७) आणि धर्मश्रध्दा: एक पुनर्विचार (१९७७) ही त्यांची महत्त्वाची अन्य पुस्तके. समाजवाद प्रेरणा व प्रक्रिया हा बेडेकरांच्या गौरवार्थ काढण्यात आलेला ग्रंथ १९७१ मध्ये प्रसिद्ध झाला. बेडेकरांच्या सर्व लेखनाची सूची त्यात अंतर्भूत आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील एक आघाडीचे तत्त्वचिंतक समीक्षक ह्या नात्याने त्यांनी मांडलेल्या प्रमेयांना कायमची विचारार्हता लाभलेली आहे.

जाधव, रा.ग.