बेकलॅंड, लेओ हेंड्रिक : (१४ नोव्हेंबर १८६३ – २३ फेब्रुवारी १९४४). बेल्जियममध्ये जन्मलेले अमेरिकन उद्योगरसारयनशास्त्रज्ञ. बेकेलाइट या प्लॅस्टिक रेझिनाचे संशोधक व उत्पादक. त्यांचा जन्म गेंट (बेल्जियम) येथे झाला. त्यांनी १८८० मध्ये तेथील म्युनिसिपल स्कूलमधील शिक्षण पुरे करून गेंट विद्यापीठात प्रवेश केला व १८८२ मध्ये ते पदवीधर झाले. तेथेच रसायनशास्त्र व भौतिकी या विषयाचे अध्यापन ते करू लागले आणि १८८४ मध्ये त्यांनी निसर्गविज्ञानाची डॉक्टरेट पदवी मिळविली. १८८९ मध्ये ते अमेरिकेस गेले व तेथेच स्थायिक झाले. प्रथम काही वर्षे नोकरी केल्यावर त्यांनी स्वतंत्रपणे संशोधन सुरू केले व ‘व्हेलॉक्स’ नावाचा छायाचित्रणासाठी उपयोगी पडणारा नवीन तऱ्हेचा कागद शोधून काढला व त्याचे उत्पादनही सुरू केले. या कागदामुळे छायाचित्रणाच्या फिल्मवरील व्यस्त (निगेटिव्ह) प्रतिमेवरून कागदावर यथातथ्य प्रतिमा उमटविण्यासाठी कृत्रिम प्रकाश वापरता येऊ लागला, हे त्याचे वैशिष्ट्य होते. कागदाची उपयुक्तता जाणून ईस्टमन कोडॅक कंपनीने १८९९ मध्ये तो तयार करण्याची कृती बेकलँड यांच्याकडून विकत घेतली. त्या पैशातून बेकलॅंड यांनी एक औद्योगिक संशोधन प्रयोगशाळा स्थापन केली व औद्योगिक सल्लागार व संशोधक हा व्यवसाय सुरू केला. या प्रयोगशाळेत त्यांनी विद्युत् रसाय‌नशास्त्रविषयक औद्योगिक संशोधन केले व अनेक एकस्वे (पेटंटे) मिळविली. तेथेच १९०५ मध्ये त्यांनी लाखेसारखा पदार्थ कृत्रिम तऱ्हेने बनविण्यासाठी फिनॉल व फॉर्माल्डिहाइड या रासायनिक पदार्थांच्या विक्रियांचे संशोधन आरंभिले. अशा विक्रिया १८७२ मध्ये फोन बेयर यांनी करून पाहिल्या होत्या व त्यांपासून व्यवहारात उपयोगी पडेल असा पदार्थ मिळत नाही, असा त्यांचा अनुभव होता. बेकलॅंड यांनी या विक्रियांचा सखोल अभ्यास केला व असे दाखविले की, विशिष्ट परिस्थितीत त्या टप्प्याटप्प्याने घडवून आणता येतात. तसेच मध्यंतरीच्या एका टप्प्यावर विक्रिया स्थगित केली असता जो पदार्थ मिळतो. तो साच्यांच्या योगाने वस्तू बनविण्यासाठी उपयुक्त असतो. विक्रियेचा शेवटचा टप्पा वस्तू बनताना साच्यातच पूर्ण होतो व योग्य गुणधर्माची वस्तू तयार होते. या विक्रियेपासून मिळणाऱ्या रेझिनाला त्यांनी बेकेलाइट हे नाव दिले. फिनॉल व फॉर्माल्डिहाइड या साध्या रसायनांपासून बनविलेले हे आद्य मानवनिर्मित प्लॅस्टिक होय व म्हणून त्याला महत्त्व आहे. हे ऊष्मादृढ (प्रथम तापविले असता मऊ व प्रवाही बनणारे पण त्यानंतर कायमचे कठीण होणारे) प्लॅस्टिक उत्कृष्ट विद्युत् निरोधक असल्यामुळे लाख, कठीण रबर, अंबर इत्यादींच्या ऐवजी वापरण्यासाठी फार उपयुक्त ठरले आहे [⟶ प्लॅस्टिक व उच्च बहुवारिके]. त्यांनी १९०६ मध्ये बेकेलाइट बनविण्याचे एकस्व मिळविले आणि बेकेलाइट कॉर्पोरेशन नावाचा कारखाना काढून मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले. तसेच विद्युत् निरोधन, विद्युत् विच्छेदन (विजेच्या साहाय्याने रेणूचे तुकडे पाडण्याची क्रिया) इ. विषयांवर संशोधन करून त्यांनी अनेक एकत्वे मिळविली. शास्त्रीय संशोधनाचा उपयोग उद्योगधंद्यांस साहाय्यक व्हावा, या विचाराचे ते पुरस्कर्ते होते. त्यांना निकल्स (१९०९), जॉन स्कॉट (१९१०), विलार्ड गिब्ज (१९१३), चॅंडलर (१९१४) व पर्किन (१९१६) ही पदके आणि अनेक सन्माननीय पदव्या मिळाल्या. ते बेकेलाइट कॉर्पोरेशन या कारखान्याचे व अमेरिकन केमिकल सोसायटी या शास्त्रीय संस्थेचे अध्यक्ष आणि नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेचे सदस्य होते. बीकन (न्यूयॉर्क) येथे ते मृत्यू पावले.

फाळके, धै. शं.