बेंद्रे, वासुदेव सीताराम:(१३ फेब्रुवारी १८९४ – ). व्यासंगी मराठी इतिहासकार. जन्म मुंबईत. प्राथमिक शिक्षण रायगड जिल्ह्यातील पेण ह्या गावी माध्यमिक शिक्षण मुंबईच्या विल्सन हायस्कूलमध्ये. घरच्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे मॅट्रिक होण्यापूर्वीच शिक्षण सोडून देऊन सरकारी नोकरीत शिरले. नोकरीत असताना लघुलेखनपद्धतीचा (शॉर्ट हॅंड) अभ्यास केला आणि पुढे तीत प्रावीण्य मिळविले. ह्याच अभ्यासाच्या आधारे शिक्षण संचालक के. जी. कॉव्हर्नटन ह्यांनी त्यांना आपल्या नोकरीत लघुलेखक म्हणूनघेतले. १९४९ पर्यंत केलेल्या ह्या नोकरीत त्यांना यथावकाश अधिकाऱ्याचा दर्जा मिळाला होता. १९१८ पासून भारत इतिहास-संशोधक मंडळात ते काम करू लागले. १९३७ मध्ये त्या वेळच्या मुंबई राज्याच्या शासनाने ऐतिहासिक संशोधनासाठी दोन वर्षांकरिता बेंद्रे ह्यांना शिष्यवृत्ती दिली. ह्या काळात इंग्लंडमधील इंडिया ऑफिस आणि ब्रिटिश म्यूझियममधील ऐतिहासिक साधनसामग्रीची टिपणे त्यांनी संगृहीत केली. १९४९ मध्ये मुंबई राज्याच्या शासनाने संशोधनकार्यासाठी बेंद्रे ह्यांना पेशवे दप्तर तपासण्याची परवानगी दिली. १९५२ मध्ये मद्रास सरकारने तंजावर येथील दप्तरखान्याची तपासणी करण्यासाठी त्यांची नियुक्ती केली. १९६३ मध्ये मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या इतिहाससंशोधन मंडळाचे संचालक म्हणून त्यांना नेमण्यात आले, तर महाराष्ट्र इतिहास परिषद ह्या संस्थेच्या प्रमुख कार्यवाहकपदाची जबाबदारी त्यांच्यावर १९६५ मध्ये टाकण्यात आली.
बेंद्रे ह्यांचा पहिला ग्रंथ साधनचिकित्सा (१९२८) हा होय. शिवशाहीच्या इतिहासाचा हा प्रास्तविक खंड असून इतिहाससंशोधनाच्या साधनांची मार्मिक चिकित्सा त्यात करण्यात आली आहे. त्यानंतर मराठी इतिहासावर त्यांनी बरीच पुस्तके लिहिली आहेत. तथापि छत्रपति संभाजी महाराज (१९६०) हा त्यांचा सर्वांत गाजलेला ग्रंथ होय. संभाजी महाराज हे एक तेजस्वी, कर्तबगार व पराक्रमी पुरुष होते निग्रही स्वराज्यनिष्ठेने आपल्या कारकीर्दीचा क्षण न् क्षण त्यांनी परकीय आक्रमणाशी झगडण्यात घालविला व शेवटी स्वतःचे बलिदान केले, असा निष्कर्ष बेंद्रे ह्यांनी ह्या ग्रंथात काढलेला आहे. त्यांनी बलिदान केले की त्यांचे बलिदान झाले याविषयी मतभेद होऊ शकेल, तथापि संभाजी महाराजांबद्दलच्या रूढ समजुतींना बेंद्रेकृत ह्या चरित्राने धक्का दिला.
संत तुकाराम महाराजांबद्दलही बेंद्रे ह्यांनी केलेले संशोधन फार मोलाचे आहे. १९५० मध्ये श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराजकृत श्रीमद्भगवद्गीतेचा अभंगात्मक अनुवाद अथवा मंत्रगीता त्यांनी संपादिली. ह्या मंत्रगीतेला त्यांनी लिहिलेल्या प्रदीर्घ प्रस्तावनेत तुकाराम महाराजांच्या चरित्रावर त्यांनी पुष्कळच नवीन प्रकाश टाकला आहे. तथापि मंत्रगीता संत तुकारामांची नाही, हेच मत ग्राह्य आहे. देहूदर्शन (१९५१), तुकाराम महाराज ह्यांचे संतसागाती (१९५८), तुकाराम महाराजांची गुरुपरंपरा (१९६०) आणि संत तुकाराम (१९६३) हे त्यानंतरचे त्यांचे ग्रंथ तुकाराम महाराजांचा कालखंड व त्यांचे जीवन ह्यांवर प्रकाश टाकण्याच्या दृष्टीनेमहत्त्वाचे आहेत. संतचरित्रकार महीपतिकृत चरित्राच्या आधारे लिहिलेल्या किंवा दंतकथांवर आधारलेल्या तुकारामांच्या परंपरागत चरित्रापेक्षा अगदी वेगळे असे हे चरित्र आहे. तुकारामांच्या जीवनाबद्दल व साहित्याबद्दल असलेल्या अनेक श्रद्धाळू कल्पनांना ह्या ग्रंथामुळे धक्का बसला तथापि तुकारामविषयक अभ्यासाला ह्या ग्रंथांनी शास्त्रशुद्ध बैठक प्रथमच दिली.
त्यांच्या अन्य ग्रंथांत सतराव्या शतकांतील गोवळकोंड्याची कृत्बशाही (१९३४), अ स्टडी ऑफ मुस्लिम इन्स्क्रिप्शन्स (१९४४), महाराष्ट्र ऑफ द शिवाजी पिरिअड (१९६०) व श्री छत्रपती शिवाजी महाराज (१९७२) इ. ग्रंथांचा त्यात समावेश होतो. तारीख–इ–इलाही (१९३०), राजाराम चरितम् (१९३१) हे त्यांनी संपादिलेले उल्लेखनीय ग्रंथ होत. लघुलेखनावरही त्यांनी मराठी ग्रंथलेखन केले आहे.
अदवंत, म. ना.
“