बृहद्‌भारत : व्यापार-उदीम, धर्मप्रसार, राज्यविस्तार इ. निमित्तांनी इ. स. दुसऱ्या शतकापासून इ. स. तेराव्या शतकाच्या दरम्यान भारतीय राजांनी अतिपूर्वेकडील देशात विशेषतः आग्नेय आशियात वसाहती व राज्ये स्थापन करून भारतीय संस्कृतीचा प्रसार व प्रचार केला. या विस्तारकार्यात भारतीय सागरी व्यापारी वर्गाने महत्वाची कामगिरी बजावली. या भारतीय संस्कृतीच्या प्रभावाखाली देशांचा निर्देश बृहद्‌भारत किंवा बृहत्तर भारत या संज्ञेने करण्यात येतो. हा संस्कृती प्रसाराचा स्त्रोत कंबोडिया व कंबुज (कांपुचिया), ब्रम्हदेश, मलाया, सुमात्रा, जावा, बाली (इंडोनेंशिया), सयाम (थायलंड), लाओस, बोर्निओ इ. प्रदेशात मुसलमानांच्या आक्रमणापर्यंत अखंडितपणे चालू होता.

साधने : बृहद्‌भारताच्या प्राचीन इतिहासाची माहिती मुख्यत्वे पुढील साधनांद्वारे उपलब्ध झाली आहे: (१) प्राचीन स्मारके उदा., बोरोबूदूर, अंकोरवात, बांटी श्री इ. प्राचीन मंदिरे, तसेच स्तूप, विहार, शिलालेख, ताम्रपट इ. (२) उत्खननांद्वारे उपलब्ध झालेले अनेक प्राचीन अवशेष आणि (३) अभिजात लेखकांचे तसेच परदेशीय प्रवाशांचे वृत्तांत. चौथ्या ते सातव्या शतकांत कोरलेले अनेक संस्कृत शिलालेख, थायलंड, मलाया, सुमात्रा बाली, जावा व बोर्निओ येथे सापडले असून प्राचीन चंपासारख्या लहान राजयात पन्नास व कंबोडियात१५० शिलालेख मिळाले. यांशिवाय तत्कालीन वाङ्मय व कायदेविषयक ग्रंथ तसेच परदेशीय व्यापारी व प्रवासी यांनी लिहिलेले वृत्तांत ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे आहेत.

राजकीय इतिहास : अतिपूर्वेकडील भारतीयांच्या वसाहतींबद्दल चिनी इतिहासावारून माहिती मिळते. जावा, सुमात्रा व मलाया यांच्याशी फार प्राचीन काळी भारताचा संबंध आला असावा कारण पुराणांमध्ये मलाया द्वीपकल्पाचा सुवर्णद्वीप म्हणून उल्लेख आढळतो. बोर्निओबाबतची माहिती त्रोटक असली, तरी तेथील संस्कृती निःसंशय भारतीय आहे.

इंडोनेशिया म्हणजेच भारतीयांच्या जावा व सुमात्रा येथील संस्कृतीचा प्रदेश. जावामधील जीवनाचे एकही अंग असे नाही, की ज्यावर भारतीय संस्कार झाले नाहीत. पूर्व जावामध्ये हिंदू राजे होते. मातारामचा राजा बलितुंग हा शैवपंथी होता. त्याने इ. स. ९१० पर्यंत राज्य केले. दक्षोत्तम, तुलोदोंग आणि शेवटचा राजा बवा यांनी हिंदू संस्कृतीची पुनःस्थापना करून अनेक देवालये बांधली. मातारामचे राज्य इतिहासजमा झाल्यावर इ. स. ९२९ पासून मध्य जावातील राजांनी (सिंडोक) पूर्व जावात सत्ता प्रस्थापिली. अनेक स्त्रियांनी जावामध्ये राज्य केल्याची उदाहरणे सापडतात. (उदा., श्री ईशानतुंग विजया). धर्मवंश नावाच्या वंशजाने जावातील कायद्याला सुसूत्र स्वरूप आणले. तो पराक्रमी होता. त्याने श्रीविजयच्या शैलेंद्र राज्यावर आक्रमण केले. त्याचा जावई ऐरलंगा याने इ. स.१०३० पर्यंत आपली सर्व सत्ता सर्व बाजूंनी वाढवून दरारा बसविला. त्याच्या कारकीर्दीत व्यापार, वाङ्मय व कला या क्षेत्रांत अत्यंत लक्षणीय प्रगती झाली. त्याने आपल्या राज्याची पंजलू वा केडिरी आणि जंग्गल अशा दोन प्रांतात विभागणी केली. केडिरीचे राज्य सामर्थ्यशाली होते. त्यात १० पोट राज्ये होती. केडिरीत कामेश्वर, जयभय आणि कृतजय असे सामर्थ्यशाली व कलांना उत्तेजन देणारे राजे होऊन गेले. केन अंगरोख याने केडिरीच्या शेवटच्या राजाचा पराभव करून सिंधसारीचे राज्य स्थापिले. सिंधसारी ही राजधानी होती. अंगरोख राजाने राजस हे नाव धारण करून सबंध पूर्व जावावर आपला अंमल बसविला व जंग्गल व केडिरीची राज्ये पुन्हा एकत्र केली. या राज्यात अनूशपती, तोहजय, आणि जय विष्णुवर्धन हे राजे होऊन गेले. कृतनागर हा सिंधसारीचा शेवटचा राजा होता. तो फार महत्वाकांक्षी होता. चीनच्या कूब्लाईखानाला तोंड देण्यासाठी त्याने आपली सत्ता बळकट केली. चीनचे सैन्य आणि केडिरी व सिंधसारी यांच्यात बऱ्याच लढाया झाल्या व शेवटी कृतनागरचा जावई राजपुत्र विजय याने चिनी सैन्याचा पराभाव करून मजपहित राज्य स्थापन केले. हे जावातील शेवटचे मोठे हिंदू राज्य होय. कृतराजसच्या कारकीर्दीत राज्यात शांतता नांदत होती. त्यानंतर गजमद (मजपहितचा मुख्यमंत्री) हा एक साम्राज्यवादी राजा झाला. त्याचे धोरण चढाईचे असून त्याने मजपहितचे राज्य हल्लीच्या इंडोनेशिया व मलाया यांतील बऱ्याच मोठ्या भूभागावर प्रस्थापित केले. त्याने मजपहितला साम्राज्य मिळवून दिले. जावाच्या राजकीय इतिहासात हयम बुरुक याच्या कारकीर्दीत इ. स.१३५० मध्ये बुबतचा रक्तपात घउला. गजमदाने सूंदाच्या राजास व त्याच्या लव्याजम्यास कपटाने ठार मारले. गजमदाची अंतर्गत कारभारावर कडक पकड होती. शेतीसुधारणा, रस्तेदुरुस्ती, कर वसुली, खानेसुमारी यांसारखी कामे व्यवस्थित पार पडत. सैन्याची व्यवस्था चोख होती. मजपहितचे मोठेपण म्हणजे गजमदाचे मोठेपण होय. इ. स. १४४७ मध्ये मजपहित राज्याचा शेवट झाला. याच सुमारास येथे इस्लाम धर्माचा प्रसार सुरू झाला.

सुमात्रामध्ये सातव्या व्या शतकात व्यापारी साम्राज्य निर्माण झाले. येथे श्रीविजय (विद्यमान पालेंबांग) हे सामर्थ्यशाली राज्य होऊन गेले. भारत व चीन दरम्यानच्या व्यापारी दळणवळणाच्या मार्गावरचे हे मोक्याचे स्थान असल्यामुळे श्रीविजय राज्याने व्यापारी क्षेत्रात वर्चस्व स्थापून पश्चिम जावा-मलावू जिंकले प्रांतांवर प्रांताधिकारी नेमले बंडाळी करणाऱ्यांना शासन केले. हे राजे बौद्ध धर्मीय होते. श्रीविजय हे मलायाच्या द्वीपकल्पातील राजकीयच नव्हे तर सांस्कृतिक केंद्र झाले होते. या सुमारास मध्य जावातील शैलेंद्र आणि श्रीविजयचा राजा या दोन्ही सत्ता धर्मसेतूनंतर एक झाल्या. त्यांनी चंपा व कंबुजवर वर्चस्व प्रस्थापित केले. शैलेंद्र राजांनी श्रीलंकेवरही आक्रमण केले होते.

मलाया राज्याची स्थापना पहिल्या शतकातच झाली असावी. 


 


चवथ्या-पाचव्या शतकांत तक्कोलसारखी राज्ये होऊन गेली त्यांचे व फूनानचे सांस्कृतिक संबंध होते. सातव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत मलाया हे श्रीविजय घराण्याच्या वर्चस्वाखाली होते. तेराव्या शतकात सयामच्या थाई घराण्याने आपले वर्चस्व प्रस्थापितकेले. त्यांनी आणि जावातील नव्या राजांनी श्रीविजयचे राज्य नष्ट केल्यामुळे आपोआपच मलायाच्या इतिहासातील महत्वाचे पर्व संपले.

चिनी इतिहासकारांनी उल्लेखिलेले पोली म्हणजे बाली होय. सहाव्या-सातव्या शतकांतील बालीचा इतिहास ज्ञात नाही. त्यानंतरच्या इतिहासासंबंधी ताम्रपटांवरून माहिती मिळते. येथे उग्रसेन, श्रीकेसरीवर्मदेव, धर्मवंश, उदयन, महेंद्रदत्ताराणी (गुणप्रियाधर्मपत्नी) आणि धर्मोदयवर्मन्‌ हे राजे होऊन गेले. बाराव्या शतकात श्री शूराधिप व श्री जयशक्ती या दोन राजांचा उल्लेख मिळतो. ‘पदुका श्री महाराज हाजी जय पंगुस’ हा सप्तमंडळावर (बाली द्वीपमंडळ) राज्य करतो असा उल्लेख आहे. बालीने जावातील बंडाळीचा व कूब्लाईखानाच्या आक्रमणाचा फायदा घेऊन स्वातंत्र्याची घोषणा केली. पुढे सु. पन्नास वर्षे बाली स्वतंत्र होता. जावातील प्रजा बालीत येऊन स्थायिक झाली.एकोणिसाव्या व्या शतकात डचांनी बाली जिंकून घेतले.

फूनान : भारतीय संस्कृतीचा पहिला आविष्कार फूनान या इंडोचायनामधील भागात झाला. फूनानचे राज्य इसवी सनाच्या पहिल्या शतकात कौण्डिण्य नावाच्या एका भारतीय ब्राह्मणाने स्थापन केले. त्याने नागकन्या सोमा हिच्याशी विवाह करून नव्या वंशाची स्थापना केली. त्याच्या एका वंशजाने (ह्यूएन बान हवांग) ९० वर्षांचा होईपर्यंत राज्य केले. यानंतर बान-बान, फान-ची-मान इ. पराक्रमी राजे झाले. त्यांनी दहा राज्यांवर आक्रमण करून सत्ता वाढविली आरमार सुसज्ज केले व सर्वांना मांडलिक बनविले मेकॉंग-दोन्नाइ दोआब व कामरांगचा उपसागर हे प्रदेश त्याच्याच राज्यात होते. त्याने जवळजवळ सर्व सयाम, कंबोडिया व मलायाचा काही भाग जिंकून घेतला होता.

फान – ची मॉननंतर फान चॅँग (कार. इ. स. २२५ ते २५०) या त्याच्या सेनापतीने२५ वर्षे राज्य केले. त्याने आपले वकील भारतात पाठविले होते. नंतरच्या फान – सिऊनच्या दरबारी चीनमधून वकील आले होते. फूनानच्या सर्व शहरांना कोट होते. शहरात राजवाडे, ग्रंथालये व दफ्तरखाने होते. सोने, चांदी, मोती, अत्तरे या रूपांत कर दिले जात. फान सिऊनने इ. स. २८७ पर्यंत राज्य केले. त्याने चंपाचा राजा फान सीऊंग याच्याशी सख्य करून टाँकिन या चिनी प्रांतावर आक्रमण केले. येथून पुढे पाऊणशे वर्षापर्यंतचा फूनानचा उल्लेख सापडत नाही.

नंतर चंदन याचा उल्लेख मिळतो. त्याने चीनला वकील पाठविले होते. चौथ्या शतकात कौण्डिण्य नावाचा दुसरा एक ब्राह्मण, पहिल्या कौण्डिण्याप्रमाणेच, ‘ईश्वरी संकेत’ मिळाल्यामुळे फूनानला येतो, अशी एक दंतकथा प्रचलित आहे. फूनानचे लोक त्याला राजा करतात. या दुसऱ्या वसाहतीने फूनानला संपूर्ण भारतीय करून टाकले.यानंतरच्या राजांची नावे पूर्णतः भारतीय आढळतात. इंद्रवर्मन्‌(श्रेष्ठवर्मन्) याने चिनी बादशहाकडे वकील पाठविले. यानंतरचा दुसरा राजा जयवर्मन्‌ याचे नाव संस्कृत शिलालेखात सापडते. याने इ. स. ४८४ ते ५१४ पर्यंत राज्य केले. फूनानमधील चेन-ला राज्याचे मांडलिक राजे बलवान झाल्यामुळे त्यांच्या पुढे फूनानची सत्ता टिकाव धरू शकली नाही. दंतकथेनुसार कंबुज राज्याचा संस्थापक कंबू स्वयंभू हा आर्यदेशाचा (भारत) राजा होता व कंबोडियास तो जीव देण्याच्या हेतूने गेला होता. तेथे एका नागराजाने जीव देण्यापासून परावृत्त करून आपल्या कन्येशी त्याचा विवाह लावला. या दोघांनी नवा वंश स्थापन केला.

कंबोडियाचा संस्थापक कौण्डिण्य. चेन-लाच्या गादीवर प्रथम आलेल्या भववर्मनच्या कारकीर्दीत राज्याच्या सीमा वाढू लागल्या. यानंतर महेद्रवर्मन् व ईशवर्मन् यांनी पश्चिमेकडे राज्य वाढविले. वायव्य कंबुजमधील चक्रकंपुरा, अमोघपुरा आणि भीमपुरा या तीन प्रदेशांत व द्वारावतीपर्यंत आपली सत्ता प्रस्थापित केली. यानंतर पहिला जयवर्मन्‌ याने ४० वर्षे राज्य केले. याने लाओसचा बराचसा भाग जिंकून घेतला. त्याच्या मृत्युनंतर जवळजवळ शतकभर अराजक माजले. चेन-लाची दोन वेगवेगळी राज्ये झाली. दक्षिण चेन-लावर श्रीविजयच्या राजाने आक्रमण केले.

दुसरा जयवर्मन्‌८०२ मध्ये राज्यावर आल्यावर त्याने चेन-लाच्या राज्याची विस्कटलेली घडी परत नीट बसविली. इंद्रपूर हि त्याची राजधानी होती. त्याने हरिहरालय हे नगर वसविले. यानंतर तिसरा जयवर्मन्‌ व यशोवर्मन्‌ हे महत्वाचे राजे झाले. पाचवा जयवर्मन्‌(कार. इ. स. ९६८ – १००१) याने बांटी श्रीचे सुंदर देवालय बांधले. दुसऱ्या सूर्यवर्मनने अंकोरवातची जगप्रसिद्ध अमर कलाकृती निर्माण केली. ख्मेर काळच्या वैभवाचे हे अमर स्मारक होय. याच काळात चंपा व कंबुज यांच्यामधील संबंध बिघडले. कंबुजच्या राजांनी सत्ता बळकट करून चंपाचा पराजय केला. पंधराव्या शतकात सयामच्या थाई लोकांचे आक्रमण सुरू झाल्यावर या राज्याचा ऱ्हास झाला.

श्रीविजय व शैलेंद्र : फूनानच्या ऱ्हासानंतर आग्नेय आशियात राजकीय पोकळी निर्माण झाली. फूनानबरोबर फूनानचे आरमारही नष्ट झाले व एक व्यापारी साम्राज्य कोसळले. ही उणीव सुमात्रामध्ये सातव्या शतकात श्रीविजयच्या साम्राज्याने भरून काढली. श्रीविजय म्हणजे सुमात्रामधील पालेंबांग. भारतामध्ये जाताना लागणारे मलायू हे श्रीविजयचाच एक भाग होता. श्रीविजय-मलायाची सामुद्रधुनी व सूंदाची सामुद्रधुनी या दाहोंमध्ये ते होते. श्रीविजयने भारत व चीन या दोन्ही देशांशी मित्रत्वाचे संबंध ठेवले आणि या दोहोंमधील दळाणवळणाच्या मार्गावरील मोक्याचे स्थान असल्याने व्यापारक्षेत्रात आपले वर्चस्व स्थापन केले. श्रीविजयचा पहिला उल्लेख चौथ्या शतकात सापडतो. सातव्या शतकाच्या अखेरीपर्यंत श्रीविजयने पश्चिम जावाचा काही भाग जिंकून घेतला. त्याच्या आक्रमक धोरणामुळे जवळजवळ सर्व सुमात्रा व बंका हे प्रदेश त्याच्या अंमलाखाली आलले होते.


श्रीविजयची राजधानी पालेंबांग. श्रीविजय हे मलाया द्वीपकल्पातील सांस्कृतिक केंद्र होते. येथे महायान पंथाचा व तंत्रयान बौद्ध धर्माचा प्रसार झाला. भारतीय समुद्र व चिनी समुद्र यांच्यातील व्यापार काबीज करण्याचा श्रीविजयचा हेतू होता. श्रीविजयच्या वाढत्या महत्वाकांक्षेचा पहिला बळी मलायू.

आठव्या शतकात श्रीविजयाच्या या राजपुत्राने चिनी बादशाहाला दोन बुटकी माणसे, एक निग्रो नर्तकी, काही वादक व पांच रंगीत पोपअ दिल्याचा उल्लेख आहे. शेवटची वकीलात इ. स. ७४२ मध्ये चीनला गेली होती. इ. स. ७७५ मध्ये खोदलेली एक शिळा लिगोर येथे सापडली आहे. या शिळेच्या दोन्ही बाजूंना लेख कोरलेले आहेत. एका बाजूला श्रीविजय घराण्याबद्दल मजकूर आहे. श्री विजयेंद्रराज याच्या आधिपत्याखाली आजूबाजूच्या देशांतील राजे राहत, असे त्यात म्हटले आहे. श्रीविजयच्या राजाची इंद्राशी तुलना केली आहे. श्रीविजयने अवलंबिलेले चढाईचे धोरण यशस्वी झाले आणि एका शतकातच हे राज्य खूप पसरले. सुमात्रा, वंका व पश्चिम जावाचा काही भाग या राज्यात या वेळी होता. श्रीविजयचा हा उत्कर्षाचा काळ होता. हे शिलालेख संस्कृतमिश्रित आहेत.

श्रीविजयचे आधिराज्य मलायाच्या दोन्ही सामुद्रधुनीत व पश्चिम जावात पसरले होते. त्यावेळी मध्य जावामध्ये शैलेद्रांचे राज्य होते. श्रीविजय व शैलेंद्र यांच्यात मैत्रीचे संबंध होते. लिगोरच्या शिलालेखातील दुसऱ्या बाजूला शैलेंद्रांचा उल्लेख आहे पण श्रीविजयचा नाही. यातच या दोघांनी एकत्र येऊन इंडोचायना वगैरे ठिकाणी आक्रमण केल्याचा उल्लेख आहे. या दोन सत्ता एकत्र येऊन त्यांनी आपले आधिराजय कंबुज व चंपा यांवर काही काळपर्यंत प्रस्थापित केले. लिगोरच्या शिलालेखात शलेंद्र राजाची तुलना सूर्य, मदन, विष्णू यांच्याशी केली आहे. श्रीविजयचे महाराज शैलेंद्र वंशाचे आहेत, असे म्हटले आहे. शैलेंद्र कोण होते, याबद्दल एकमत नाही. मध्य जावामध्ये शैलेंद्रांचे कलदन, केडू इ. स्थळी शिलालेख सापडतात. त्यांवरून शैलेंद्र म्हणजे पर्वताचे राजे मानले जात. ते कलिंगमधून जावात गेले असावेत कारण दक्षिण भारतातील पांड्य राजे स्वतःला ‘मिनांकित’ शैलेंद्र म्हणवीत. पूर्वेचे गंग राजे, शैलोद्‌भव व शैल राजे हे सर्व शैलेंद्र असावेत. केडूच्या शिलालेखात संजय राजाचा व त्यानंतरच्या आठ राजांचा उल्लेख आहे. त्यांनी इ. स. ८७९ पर्यंत राज्य केले यानंतर शैलेंद्रांची सत्ता मध्य जावात दिसत नाही. संजयच्या घराण्यातील राजे पूर्व जावामध्ये गेले होते. केडूच्या यादीतील सर्व राजेही एकाच वंशाचे असल्याचे दिसत नाही. हे शैलेंद्र घराणे पुढे श्रीविजयचे घराणे बनले.

श्रीविजयचा राजा धर्मसेतू याच्या मृत्यूनंतर त्याचा नातू बालपुत्र हा श्रीविजयचा राजा झाला. बालपुत्र आपल्या आजाचा जावातील शैलेंद्र राजा असा उल्लेख करतो. बालपुत्राच्या काळापासून श्रीविजयवर शैलेंद्र राजे राज्य करू लागले.

शैलेंद्राच्या काळात श्रीविजयमध्ये एक नवे युग सुरू झाले. याकाळात नाट्यशास्त्र, ज्योतिष, पुराणे, स्थापत्य, शिल्प व इतर अनेक शास्त्रांचा आणि कलांचा विकास झाला. शैलेंद्रांनी आपले आरमार बळकट करून चंपा व कंबुजवर आक्रमण केले. नवव्या शतकाच्या मध्यास त्यांचे वर्चस्व संपुष्टात आले. कंबुजच्या दुसऱ्या जयवर्मनने शैलेंद्र राजांची सत्ता झुगारून दिली. चीन व दक्षिण भारतातील राजांशी शैलेंद्रांना सामना द्यावा लागला. या राज्याचा उल्लेख अरब इतिहासकार ‘झाबग’ असा करतात. झाबगच्या राजाला ‘महाराज’ म्हणत. त्यांच्या सार्वभौमत्वाखाली १,००० ‘पुरसंग’ एवढीच विस्तृत राज्ये आहेत व त्यांपैकी दोन ‘श्रीबुझा’ (श्रीविजय) व ‘रामी’ ही आहेत. शैलेंद्राचे साम्राज्य ‘झाबग’ यावर इ. स. १००० मध्ये चिनी लोकांनी आक्रमण करून लूटमार केली.

दहाव्या शतकात श्रीविजयचे बरेच वकील चीनला गेले. इ. स. १००३ मध्ये शैलेंद्र राजांनी आपला वकील चीनला पाठविल्याचा उल्लेख मिळतो. शैलेंद्र राजे श्रीविजयवर राज्य करीत असतानाच इ. स.९८८ मध्ये श्रीविजयच्या राज्यावर गंडांतर आले. जावामधूनच हे आक्रमण झाले होते. जावाचा राजा धर्मवंश याने श्रीविजयचा पराभव केला परंतु त्याचे हे यश तात्कालिक होते. नंतरच्या काळात चूडामणीवर्मन्, मार-विजयोतुंगवर्मन्‌ हे बलाढ्य शैलेंद्र राजे होऊन गेले. चूडामणीवर्मन् मलायात राज्य करीत असताना दक्षिण भारतातील चोल राजा राजराज (इ. स. ९८५ ते १०१८) याच्याशी त्याचा संबंध आला. चूडामणीवर्मन् नागपट्टण येथे एक बौद्ध विहार बांधत असता चोल राजाने त्याला एक खेडे दान म्हणून दिले. विहाराच्या बांधणीचे काम चूडामणीवर्मन्‌चा मुलगा मार-विजयोतुंगवर्मन् याने पुरे केले. त्यावेळी राजेंद्र चोल हा राज्य करीत होता. यावेळपावेतो शैलेंद्र व चोल राजे यांचे संबंध सलोख्याचे होते परंतु पुढे हे संबंध बिघडले आणि राजेंद्र चोलाने श्रीविजयच्या शैलेंद्रांवर स्वारी करून त्यांचा पराभव केला. या आरमारी आक्रमणाचा उल्लेख चोल ताम्रपटांत सापडतो. राजेंद्र चोलाने पूर्व सुमात्रा, मध्य व दक्षिण मलाया, कटाह व श्रीविजय एवढा सर्व प्रदेश पादाक्रांत केला (इ. स. १०२५).

दक्षिण भारतातील चोल राजांना मलाया द्विपकल्पाचे मोठे आकर्षण होते. जावा व सुमात्रा या ऐश्वर्यसंपन्न प्रदेशांचा कबजा मिळावा, अशी चोलांची मनीषा होती. श्रीविजयचे साम्राज्य कबजात आल्यावर भारत-चीनचा सर्व व्यापार त्यांच्या ताब्यात येणार होता. आग्नेय आशियामध्ये संचार करणाऱ्या बहुतेक जहाजांना श्रीविजयला कर द्यावा लागे.

पुढे श्रीविजयचे साम्राज्य युद्ध करून जिंकता आले असते तरी हे समुद्रापलिकडचे साम्राज्य टिकविणे अत्यंत अवघड होते. जोपर्यंत चोलांना आपली सत्ता दक्षिण भारतामध्ये टिकवून धरता आली तोपर्यंत हे साम्राज्य त्यांना टिकवून धरता आले. परंतु ज्यावेळी त्यांची दक्षिण भारतामधील सत्ताच मोडकळीस आली, त्यावेळी त्यांना हे साम्राज्य टिकविता येणे अशक्य झाले. राजेंद्र चोलाचा मुलगा राजाधिराज याच्या कारकिर्दीतच राज्याला तडे जावयास सुरवात झाली. घरभेदेपणामुळे कलिंग देश स्वतंत्र झाला व चोलांचे आरमारी बळ कमी झाले.

चोलांशी झालेल्या झगड्यात श्रीविजयचे साम्राज्य खिळखिळे झाले. यावेळचा श्रीविजयचा शैलेंद्र राजा चंद्रभानू याच्या राज्यात सुमात्रा बरोबर जावा, मलाया व श्रीलंका यांचा समावेश होता. श्रीवजयच्या चंद्रभानूने श्रीलंकेवर केलेल्या आक्रमणाचे वर्णन वाङ्मयात मिळते. सुरुवातीला यश मिळाले असले, तरी श्रीलंकेच्या राजप्रतिनिधीने आपले सर्व सामर्थ्य एकवटून जावाच्या सैन्यावर हल्ला केल्यामुळे चंद्रभानूला शेवटी अपयश पतकरावे लागले. चंद्रभानू हा श्रीविजयचा अखेरचा मोठा राजा. श्रीलंकेवरील स्वाऱ्यांमुळे त्याच्या सत्तेचा ऱ्हास झाला. तेराव्या शतकात जावा व थायलंड ही दोन्ही राज्ये उदयाला आली. या दोहोंच्या आक्रमणामुळे श्रीविजयची सत्ता नामशेष झाली (चौदावे शतक).


बोर्निओ : चौथ्या शतकाच्या अगोदरच बोर्निओमध्ये हिंदू राज्ये अस्तित्वात आली होती. राजा कुडुंघ याने नवा वंश स्थापन केला व राजा मलवर्मन् याने ‘बहु – सुवर्णक’ नावाचा यज्ञ करून ब्राम्हणांना २०,००० गाईंचे दान केले. इ. स. ६६९ मध्ये पॉनीचा राजा स्वतःला ‘महाराज’ म्हणवीत असे. पॉनी (पश्चिम बोर्निओ) व चीलन यांचे व्यापारी संबंध होते. येथे बुद्धपूजा प्रचलित होती. इ. स. पंधराव्या शतकात बोर्निओच्या राजांनी चीनला भेट दिली आणि तेथील बादशहाला नजराणे दिले.

ब्रह्मदेश : ब्रह्मदेशाचा भारताशी प्राचीन काळापासून संबंध होता. ब्रह्मदेशात सुरवातीला `प्यू’ नावाच्या जमातीचे लोक रहात. प्यू राज्य मोठे असून त्याच्या वर्चस्वाखाली १८ उपराज्ये असल्याचा उल्लेख आहे. यातील प्यूंच्या मोझा या राजधानीत १०० संघाराम होते. प्यू बौद्ध धर्मीय होते परंतु या राज्यात हिंदू व बौद्ध या दोन्ही धर्मांचे लोक एकत्र राहत. ब्रह्मदेशात नवव्या शतकात तीन बलशाली राज्ये होती : रमण्ण देशांत (मॉन देश) रमापती, हंसावती, श्रीक्षेत्र, द्वारावती अशी लहान राज्ये होती. उत्तरेला पगानचे राज्य इरावती व चिंद्‌वीन या नद्यांच्या खोऱ्यात वसलेले होते. तिसरे राज्य कोसंबीचे होते.

पगानच्या राज्यात मॉन संस्कृतीचे प्राबल्य होते. अनव्रथ (कार. इ. स. १०४४-७७)  राजाने थाटोन राजधानी जिंकली. पगानच्या राजाने मॉनचे राज्य जिंकले असले, तरी मॉनच्या संस्कृतीने पगानला जिंकले. लॉपबुरीच्या मॉन राजाची मुलगी आपल्या पतीला सोडून उत्तर सयामला गेली. तिथे तिने एक बौद्ध धर्मीय राज्य स्थापन केले. ते तेराव्या शतकापर्यंत अस्तित्वात होते. इ. स. ८०० पासून जुन्या प्रोमचे (मॉन) राज्य अंतःस्थ कलहामुळे मोडकळीस येऊ लागले. इ. स. ९१३ ते ९६४मध्ये पगानच्या राजाने पॅगोडांचा अभ्यास करण्याकरिता मुद्दाम थाटोन येथे माणसे पाठविली व त्यांच्या करवी पाच देवालये बांधली. श्वेझिगॉनचा पॅगोडा (इ. स. १०५९) हे ब्रॅहदेशातील सर्वात महत्वाचे धार्मिक स्थळ होय. क्यांझित्थ या राजाने सुप्रसिद्ध आनंद देवालय बांधले व अपुरी देवालये पुर्ण केली. त्याचा नातू अलौंगसिथू हा धार्मिक असून त्याने देशभर शिलालेख खोदविले.

इ. स. ११७३ मध्ये गादीवर आलेल्या नरपतीसिथूने पॅगोडे बांधून सिंहली बौद्ध धर्माचा प्रसार केला. पुढे बौद्ध धर्म ब्रह्मदेशाचा राष्ट्रीय धर्म बनला. नंर्तौगम्या (कार. इ. स.१२१०-१४) राजाला धर्माचे फार आकर्षण होते. त्यामुळे राज्यकारभाराकडे आपले दुर्लक्ष होईल, म्हणून त्याने राज्यकारभार आपल्या चार भावांकडे सोपविला.

पगानचा शेवटचा राजा नरथिहपती अत्यंत विलासी होता. कुब्लाईखानाने याच्या कारकिर्दीत स्वारी करून ब्रह्मदेशाचे राजकीय व सांस्कृतिक ऐक्य नष्ट केले (१२८७). त्यामुळे ब्रह्मदेशाची राजकीय घडी विस्कटली. सोळाव्या शतकापर्यंत ब्रह्मदेशात एकछत्री अंमल पुढे आला नाही.

सयाम : निसर्गतः उत्तर, मध्य, नैर्ऋत्य व दक्षिण असे सयामचे चार भाग पडतात. उत्तर व मध्य सयाममध्ये प्रथम अमरावती, नंतर मॉन व पुढे कंबुजमधील ख्मेर संस्कृतीचा प्रभाव होता. नैर्ऋत्य सयाम हा फूनानच्या हिंदू राज्याचाच एक भाग होता.

आठव्या व नवव्या शतकांत त्यांच्यावर कलिंग व पाल राजांचा प्रभाव होता. तेराव्या शतकापर्यंत थाई संस्कृती येथे पोहोचलेली नव्हती. थाई राजांनी सयाममध्ये मोठ्या परिश्रमाने देवालये बांधून मूर्ती खोदल्या. मध्य सयाममध्ये द्वारावतीचे राज्य दहाव्या शतकापर्यंत होते. तो-ली-पो-ती-चे राज्य असा त्याचा उल्लेख सापडतो. येथील सुरुवातीच्या वसाहती वैष्णवांच्या असून तेथील रहिवासी मॉन होते. चौथ्या शतकात हिंदूंनी तेथे वसाहती केल्याचा उल्लेख आहे. इ. स. १००२ मध्ये शेवटच्या मॉन राजाची हकालपट्टी होऊन ख्मेर राजे लॉपबुरीच्या गादीवर आले. ख्मेर व द्वारावतीच्या संस्कृतींचा मिलाप ख्मेर राजांच्या काळात झालेला दिसतो. ख्मेर राजे हिंदू होते. त्यांच्या राज्यात बौद्ध पॅगोडे व वास्तू विपूल होत्या. ते हीनयान व महायान पंथीयांना स्वातंत्र्य देत. मात्र धार्मिक विधी हिंदू पद्धतीने करीत. मध्य सयाममध्ये ख्मेर राजांनी तीन शतके राज्य केले. तेराव्या शतकात थाई लोकांची चीनमधून हकालपट्टी झाली व त्यांनी ख्मेर राज्य जिंकून घेतले. [⟶ ख्मेर संस्कृती].

मुसलमानांची आक्रमणे : बाराव्या शतकानंतर येथील राज्यांना मुसलमानांच्या आक्रमणाला तोंड द्यावे लागले. परिणामतः काही राज्ये नामशेष झाली आणि काही ठिकाणी इस्लामी संस्कृतीचा प्रसार झाला. बाराव्या शतकात चंगीझखान याने आशिया व पूर्व यूरोप येथील प्रदेश जिंकले. त्याच्या नंतरच्या खानांनी चीनचा काही भाग जिंकला. पीकिंग ही राजधानी करून तेथील सुंग घराण्याला संपुष्टात आणून चंपातील राजांना त्याने जहाजावरील कर भरावयास लावले. कालांतराने चंपा प्रदेशाला चीनच्या राज्याचा एक भाग मानू लागले तथापि टाँकिन व चंपामध्ये खानाला अपयश आले. इ. स. १२८३ मध्ये खानाने प्रतिनीधी जावातील कृतनागरच्या दरबारी आले. कृतनागरने मंगोलांच्या वाटेवरील सर्व महत्वाच्या व मोक्याच्या जागा जिंकून घेण्याचा सपाटा लावला परंतु बोर्निओच्या किनाऱ्यावर कूब्लाईचे आरमार अडविण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. स्थानिक राज्य केडिरी फितूर झाल्यामुळे चिनी फौजांना तोंड देणे कृतनागरला कठीण गेले. पुढे त्याच्या जावयाने मुत्सेद्देगिरीने डावपेच लढवून कूब्लाईखानाचा पराभव केला व सबंध मलाया द्वीपकल्पावर ताबा मिळविला. यानंतर येथे मुसलमानी आक्रमण झाले नाही.

कूब्लाईखानच्या स्वारीची झळ ब्रह्मदेशाला सर्वात जास्त लागली. त्याने आग्नेय आशियातील राजांना आपले सार्वभौमत्व मान्य करावयास सांगितले. बंह्मदेशाने याला विरोध केला. पगानचा शेवटचा राजा नरथिहपती याच्या सैन्याचा पराभाव होताच तो पळून गेला. कूब्लाईखानच्या नातवंडाने पगानचे राज्य पादाक्रांत केले. ब्रह्मदेशाची संस्कृती ह्मस पावली आणि राज्य खिळखिळे झाले व ब्रह्मदेशाची शकले झाली. येथे चिनी संस्कृती प्रभावित झाली.

हिंदू संस्कृती असलेले थाई राज्यही कूब्लाईखानच्या तावडीत सापडले. गंधारचे राज्य सर्व शक्तिनिशी मुसलमानांशी लढले परंतु सरते शेवटी १२५३ मध्ये शेवटच्या राजाने शरणागती पतकरली व १३ व्या शतकानंतर मलाया द्वीपकल्पात इस्लामचा प्रसार झाला.


सामाजिक स्थिती : भारतीय संस्कृतीतील धर्मशास्त्र, सूत्रवाङ्मय, उपनिषदे, उपवेद, वेदांगे, चातुर्वर्ण्य, आश्रमपद्धती यांचा प्रसार बृहद्‌भारतात झाला आणि त्याचे पडसाद सामाजिक परिस्थितीवर उमटले. हिदू समाजाची उभारणी ज्या मूलभूत व्यवस्थांवर अवलंबून होती, त्या व्यवस्था येथेही रूढ झाल्या. अगदी सुरुवातीच्या पुराव्यांवरून असे दिसते की, येथे चातुर्वर्ण्य रूढ होता. वाङ्मयातून व शिलालेखातुन ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचे उल्लेख येतात. पहिले तीन वर्ण द्विज समजले जात व शूद्र एक-जातीय समजले जात. ब्राह्मणांमध्ये दोन गट पाडलेले होते : एक, शिवाची पूजा करणारे व दुसरे, बुद्धांची पूजा करणारे. या पहिल्या गटाची विभागणी लग्नसंबंधावरून पुन्हा पाच उपजातींमध्ये केलेली होती. वैश्यांमध्ये मात्र उपगट नव्हते. बालीतील राजे वैश्य होते. शूद्र कौल या नावाने संबोधिले जात परंतु त्यांना अस्पृश्य व अपवित्र मानत नसत. विशिष्ठ जातींकडे विशिष्ठ धंदे नव्हते शूद्र शेती करत व शेतीशिवाय इतर कारागिरी व धंदेही करीत. बालीमध्ये आणखी एक वैशिष्ट्य दिसते. ते म्हणजे वरिष्ठ जातींच्या लोकांना न्यायमंदिरात विशिष्ठ सवलती होत्या. शिक्षांचे प्रमाण एकाच गुन्ह्यासाठी जातीनुरूप कमी अधिक असे.

त्या त्या जातीत विवाह होत परंतु पुरुषाला त्याच्याहून कनिष्ठ जातीतील मुलीशी विवाह करण्याची जी मूभा होती ती स्त्रीला नव्हती. म्हणजे अनुलोम पद्धती होती. उच्चजातीतील स्त्रीने कनिष्ठ जातीतील पुरूषाशी विवाह केला, तर त्या गुन्ह्याला देहान्त शासनाची शिक्षा सांगितलेली होती. म्हणजे प्रतिलोम पद्धती निषिद्ध होती. बालीमध्ये सतीची चाल रूढ होती. सुरूवातीला शूद्र सोडून इतर सर्व जातींतील स्त्रियांना सती जाणे सक्तीचे होते. नंतरच्या काळात ही चाल फक्त राजघराण्यातील स्त्रियांनाच लागू होती. दोन प्रकारच्या आत्माहुती सांगितलेल्या होत्या : पहिल्या प्रकारात विधवा झालेली स्त्री स्वतःहून तलवारीने मारून घेई व तिचा देह पतीच्या चितेजवळ ठेवला जाई. दुसऱ्यात, पतीच्या चितेमध्ये सती स्वतः उडी घेई. काही ठिकाणी गुलाम स्त्रिया आणि वेश्या याही मृताबरोबर स्वतःला जाळून घेत असत.

बालीमध्ये गुलामांची पद्धती होती. गुलामगिरी (१) जन्मावरून, (2) कर्ज वा दंड न फेडल्याबद्दल, (३) लढाईत पराभूत झाल्याबद्दल किंवा (४) दारिद्र्यावरून ठरविली जात असे. पळून जाण्याचा प्रयत्न केल्याबद्दल वा अन्य गुन्ह्याबद्दल गुलामांना निघृणपणे शिक्षा केल्या जात.

राजकीय हक्क आणि समाजातील स्थान या दृष्टींनी जावातील स्त्रियांची स्थिती समाधानकारक होती. कित्येक स्त्रियांनी राज्य केले. अधिकृत अहवालामध्ये गुणप्रियाचे धर्मपत्नी या नात्याने नाव पतीच्या खालोखाल असे. जयनागरनंतर ‘राजपत्नी’ गादीवर आली आणि तिच्या मुलीचा मुलगा असूनही तिच्या मुलीनेच तिला राज्यकारभारात मदतनीस म्हणून साहाय्य केले. राजाकडून नजराणे मिळण्याच्या प्रसंगी पतीबरोबर पत्नीलाही नजराणा मिळे. आणि शिलालेखांतही त्यांच्या नावांची नोंद केली जाई. पडदा वा गोषापद्धती अस्तित्वात नव्हती व स्त्रिया पुरुषांबरोबरीने काम करीत. स्वयंवराचे काही उल्लेख सापडतात. स्त्रियांना पती निवडण्याचे स्वातंत्र्य होते. जयनागरच्या विवाहावरून असे दिसते की सावत्र बहिणीशी विवाह होऊ शकत असे. लग्नाच्या विधीसाठी नवऱ्या मुलाला नवऱ्या मुलीचे घरी जाऊन तीन दिवस रहावे लागे व सर्व सोहळा उरकल्यानंतर तिला घेऊन तो स्वगृही परत येत असे. नाच, गाणी, नाटके आणि इतर करमणूक केल्याशिवाय लग्नसमारंभ पार पडत नसत. चंपा व कंबुन देशांमध्ये विवाहपद्धती संपूर्णतः भारतीय पद्धतीशी मिळती जुळती होती. नक्षीकाम व कलाकुसर केलेले तऱ्हेतऱ्हेचे कर्णकुंडले, बांगड्या, गळ्यातील हार, पैंजण, कमरपट्टा, अंगठी इ. विविध प्रकारचे दागिने असत. चंपामधील लोक केशभूषेला फार महत्त्व देत. त्यांतील अनेकविध तऱ्हा शिल्पकलेच्या रूपाने अवशिष्ट आहेत. चंपामध्ये विशिष्ट जातीचे लोक विशिष्ट पोषाख करीत. विशिष्ट पोषाख करणे व विशिष्ट वाहनांचा वापर करणे वा राजाजवळची जागा मिळविणे, या गोष्टी प्रतिष्ठेच्या द्योतक समजल्या जात.

बाली, सुमात्रा, जावा इ. ठिकाणी मृतांच्या बाबतींत जाळणे, नदीत वा समुद्रात फेकणे आणि जंगलात टाकूण देणे, यांपैकी कोणत्याही पद्धतींचा अवलंब केला जात असे. तिसऱ्या प्रकारात, मृताचा देह जंगलात वा उघड्या जागेत फेकून दिला जाई व गिधाडे, कुत्री, लांडगे वा अन्य पशूंमार्फत प्रेताची विल्हेवाट लावण्यात येत असे. बालीमध्ये मृताच्या तोंडात सोने भरण्यात येई. पायांत आणि हातांत सोन्याची कडी अडकवीत, कापूराचे तेल ओतीत व कापूर, चंदन इ. सुवासिके अंगभर लावून त्याला जाळीत. मलाया द्वीपकल्पात प्रेतांना अग्नी दिल्यानंतर ती पूर्ण जळल्यावर राख गोळा करून सुवर्णकलशात भरून समुद्रात सोडून देत असत. ही पद्धत अद्यापही बालीमध्ये प्रचारात आहे.

अंत्यविधी अत्यंत महाग व दीर्घकाल चालणारा होता. मृताला सुवासिक पदार्थांबरोबरच मसाले, नाणी, कपडे, चटया, रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या वस्तू आणि तीर्थक्षेत्राहून आणलेले पवित्र पाणी अर्पण करून तो देह तीन दिवसांपर्यंत तसाच ठेवला जाई. नंतर रथातून वा गाडीतून मृतदेह मिरवत स्मशानभूमीकडे नेण्यात येई आणि अग्नि दिला जाई. समयोचित संगीत वाजविले जाई. पुरोहितांकडून मंत्रोच्चार होई आणि दोन दिवसानंतर अस्थी समुद्रात विसर्जित केल्या जात असत. हा समारंभ कमी अधिक प्रमाणात आर्थिक ऐपत आणि सामाजिक प्रतिष्ठा यानुसार पार पाडला जाई.

कंबुज देशातील ताम्रपटांवरून येथील शिक्षणाची केंद्रे भारतीय आश्रमांप्रमाणे होती असे आढळते. या आश्रमांमध्ये धर्मगुरूंच्या व विद्वान पंडितांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिष्यगण अभ्यास करीत. कंबुज देशातील कितीतरी राजे आपला वेळ ज्ञानसंपादनात घालवीत. एकट्या यशोवर्मन राजाने शंभराहून अधिक आश्रम बांधले. या आश्रमांची व्यवस्था, कार्य आणि स्वरूप यांबाबत राजांनी आचारसंहिता तयार केलेली होती. या आश्रमातील धर्मगुरू व पुरोहित यांना समाजात मानाचे स्थान असे.

धार्मिक स्थिती : मलाया द्वीपकल्पात पूर्वजपूजा, मूर्तिपूजा व लिंगपूजा रूढ होती. बालीमध्ये घरोघर सूर्यपूजा केली जाई. सूर्य म्हणजे शिवाचेच एक रूप मानीत. हिंदू गृह्यसूत्रातले बहुतेक सर्व विधी प्रचारात होते. देवपूजा करताना संस्कृत मंत्रच म्हणत. आजही बालीमध्ये प्रार्थना संस्कृतातूनच म्हटली जाते. सूर्यपूजा करताना सप्तनद्यांचे स्मरण करीत. घंटा वाजवून मंत्रघोष करीत. त्रिमूर्तींचे स्मरण करून प्रार्थना म्हणत. गंध, अक्षता, पुष्प, धूप, दीप यांना नमन करीत. यज्ञोपवीत धारण करीत. जपाकरता १०८ मण्यांची अक्षमाला प्राचीन काळापासून वापरीत.


ऐरलंग्गाच्या वेळी शैव महायान व ऋषिधर्म हे सर्वत्र प्रचलित होते. वरच्या थरांतील लोक तांत्रिक महायान पंथाचे पालन करीत. तंत्रपुजेची परिणती बहुतेक चक्रपूजेत होत असे. महायान पंथाचे स्थान शैवापेक्षा श्रेष्ठ मानल्यामुळे निर्वाणाप्रत जाण्याकरता शैवधर्म ही पहिली पायरी व महायान ही नंतरची पायरी मानली जात असे. शैव आणि बौद्ध धर्मगुरूंचे येथील समाजजीवनावर फार प्राबल्य होते. त्यांची सत्ता मर्यादित ठेवणे राजांनाही कठीन जाई. ऐरलंग्गाने मात्र सुरूवातीपासून धर्मगुरूंवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते.

पुर्वजपूजा जावामध्ये फार पुरातन काळापासून प्रचलित होती. हे पूर्वज कोणत्यातरी चंडीत (देवालयात) निवास करीत, अशी समजूत होती. राजा ऐरलंग्ग चंडीत जाऊन पूजाअर्चा करीत असे, ही परंपरा त्याच्या वंशजानीही चालू ठेवली. भारतीय संस्कृतीचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी जुन्यानव्याची सांगड घातली. फूनान व कंबुज यांत हिंदू व बौद्ध हे दोन्ही धर्म प्रचारात होते. हिंदूंमध्ये विशेषतः शैव व वैष्णव लोकप्रिय होते. शिव व विष्णूची शिल्पे बौद्ध शिल्पानंतरची आहेत.

फूनानचा राजा जयवर्मन याच्या व्यापाऱ्यांबरोबर कॅंटनहून एक बुद्ध भिक्षू आला. त्याचे नाव नागसेन होते. त्याने चीनच्या राजाला आपल्या देशाचा महेश्वर हा प्रमुख पंथ आहे असे सांगितले. फूनानमध्ये वैष्णव पंथीयांचे शिलालेख आहेत. विष्णूच्या पादुकांची पूजा केल्याचे उल्लेखही सापडतात.

 

कंबुजमध्ये शिवाच्या पादुकांनाही विष्णूच्या पादुकांइतकेच महत्त्व होते. शिवमूर्ती आणि लिंगाचे उल्लेख सर्वत्र आढळतात. पाशुपत भागवत धर्म, त्रैलोक्यसार यांचे उल्लेख सातव्या शतकातील शिलालेखांत सापडतात. देवालये बांधताना वर्षासने द्यावयाची पद्धत होती. या वर्षासनांमुळे मंदिरांची जोपासना होई. हिंदूंच्या त्रिमूर्तींपैकी चंपामध्ये शिवमूर्तीला फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. चंपाच्या प्राचीन शिलालेखांत धर्माचा उल्लेख नाही. यानंतरचे सहा शिलालेख शैवपंथीयांचे आहेत. इ.स. चौथ्या शतकांत राजा भद्रवर्मन याने एक शिवमंदिर बांधले व त्याचे नाव ‘भद्रेश्वरस्वामी’ असे ठेवले. हे देवालय पुढे सबंध चंपाचे राष्ट्रीय देवालय बनले. इ.स. सहाव्या किंवा सातव्या शतकांत शंभुवर्मनने या देवालयात शिवमूर्तींची पुन्हा स्थापना केली. भद्रवर्मनच्या शिलालेखात प्रथम उमा-महेश्वराची प्रार्थना केली असून पुढे पृथ्वी, आप, तेज, वायू व अग्नी यांना नमस्कार केला आहे. वैष्णव धर्माचा उल्लेख प्रकाशधर्म राजाच्या काळात सापडतो कारण त्याने एक विष्णूचे व दुसरे वाल्मीकीचे अशी दोन देवालये बांधली. जगत्‌गुरु म्हणून विष्णूचा आणि संपूर्ण विश्वाचा एकमेव ईश्वर म्हणून शिवाचा उल्लेख त्यांच्या लेखांत सापडतो. एकंदरीत चंपामध्ये शैव धर्माचे प्राबल्य बरेच होते, हे तेथील शिवमंदिरांवरून स्पष्ट होते.

 

बौद्ध धर्माचा पहिला उल्लेख इ.स. ८७५ च्या शिलालेखात मिळतो. बुद्धाचे एक शिल्प डाँग-डांग येथे मिळाले आहे. सयाममध्ये काही राज्ये हिंदूंची होऊन गेली व भारतीय संस्कृतीचा तेथे प्रसार झाला. इ.स. पहिल्या शतकापासून ते सहाव्या-सातव्या शतकापर्यंत येथे बौद्ध धर्माचा प्रसार होत होता. पहिल्या तीन शतकांतच अमरावतीच्या बौद्ध धर्मीयांनी येथे चंचू प्रवेश केला. मॉन व ख्मेर राजे हिंदू धर्मीय होते, तथापि त्यांच्या राज्यात बौद्ध धर्माच्या प्रसाराची कल्पना येते. राजदरबारी हिंदू धर्माचे प्राबल्य आणि सर्व धार्मिक विधी हिंदू पद्धतीनेच होत असले तरी ख्मेर राजे हीनयान व महायान पंथीयांना स्वातंत्र्य देत असत. काही बुद्धाच्या मूर्तींवर हिंदू कल्पनांचा प्रभाव पडलेला दिसतो.

 

ब्रह्मदेशातील धार्मिक अवशेष मिश्र स्वरूपाचे आहेत. विष्णूची दगडाची शिल्पे, अवलोकितेश्वर व इतर बोधिसत्वांच्या तांब्याच्या मूर्ती व पाली शिलालेख यांवरून येथील लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा मिळाली होती असे दिसते. येथील प्यूराजे बौद्ध धर्मीय होते. मौऊंगन येथे सोन्याच्या पत्र्यावर बौद्ध धर्माची तत्वे कोरलेली आहेत. ती कदंब लिपीतली असून त्यांवरून तेथे हीनयान संप्रदायाचा प्रसार झाला असावा असे वाटते. काही पाल छापाच्या बोधिसत्वांच्या प्रतिमा सापडतात. बुद्धाच्या दगडी मूर्ती काही ठिकाणी असून त्यांवर गुप्तकलेची छाप दिसते यांवर संस्कृतलेखही आहेत. त्यांवरून महायान संप्रदाय येथे पसरला होता असे दिसते. बहूतेक बौद्ध स्तूपांत हिंदू देवांची शिल्पे कोरली गेली. याशिवाय पगान येथे एक संपूर्णतः हिंदू देवालय सापडले. ते विष्णूचे असून त्याच्या दशावतार शिल्पात बुद्ध नववा अवतार म्हणून दाखविला आहे. या देवालयावर पल्लव शैलीचा प्रभाव दिसतो. राजा अनव्रथाने पॅगोडा बांधला. राजा अलौंगसिथू हा धार्मिक राजा होता. त्याने खूप देवालये बांधली. तेराव्या शतकात न्याँग येथे भिक्षूंना दीक्षा देण्याकरता एक केंद्र स्थापन झाले. नंर्तौगम्य याच्या काळात बौद्ध धर्माचा फार प्रसार झाला. बोर्निओमध्ये बहुतेक मूर्ती शिव, गणेश, नंदी, महाकाल या हिंदू देवतांच्या आहेत. येथील लोक बुद्धाची पूजा करीत असत. त्यावरून येथे हिंदू व बौद्ध हे दोन्ही धर्म प्रचलित होते, असे दिसते.

 

जावामध्ये चौथ्या-पाचव्या शतकांपासून हिंदू धर्म व बौद्ध धर्म यांचा प्रसार झाला. बहुसंख्य लोक हिंदूधर्मीय होते. हिंदू त्रिमूर्तींचे वर्णन जागोजाग आढळते. वेगवेगळी शिल्पे सापडली ती शिवाची व शिवकुटुंबाची. शिवाची अर्धनारीनटेश्वर रूपातील मूर्ती जावात आहे. शिवलिंगाची पूजा तर सर्वत्रच रूढ होती. जावा व बालीमध्ये हिंदू धर्म व हिंदू धार्मिक विधी सर्वसामान्य जनतेपर्यंत जाऊन पोहोचले होते.

 

जावामध्ये हीनयान बौद्ध धर्मीयांचा प्रसार सातव्या शतकापर्यंत सर्वत्र झाला होता. पुढे शैलेंद्रांच्या काळात महायान पंथाला राजाश्रय मिळाला. बंगालमधील भिक्षूंनी तेथे प्रथम बौद्ध धर्माचा प्रसार केला. कालांतराने महायान पंथाचा कायापालट होऊन हिंदू धर्मातील देवांना बौद्धांनी सामावून घेतले. बालीमधील राजे व जनता सहाव्या शतकापासून ते आजपर्यंत हिंदू धर्मीयच राहिली. सहाव्या शतकात येथे बौद्ध धर्म आला तरी त्याला लोकप्रियता लाभली नाही. बहुतेक लोकशैवपंथीय राहून शिव-बुद्धाचे उपासक बनले. ‘य शिव,य बुद्ध’जो शिव तोच बुद्ध. शिवाचे महत्त्व कालांतराने बरेच वाढले. हिंदू विधी बालीमध्ये केले जात.


सुमात्रामध्ये जावाप्रमाणेच धर्मव्यवस्था होती व बुद्ध, बोधिसत्वे यांच्या पाषाण मूर्ति बुद्ध लोकनाथ यांच्या तांब्याच्या मूर्तींबरोबरच तेथे शिव, गणेश, नंदी, ब्रम्हा यांच्या पाषाण मूर्ती व गणेश कुबेर यांच्या तांब्याच्या मूर्ती सापडल्या.

 

मलायामध्ये सातव्या शतकापासून बौद्ध व हिंदू धर्म अस्तित्वात होते. महायान पंथाचे उल्लेख जास्त आढळतात. काही देवालयांतील शिल्पे हिंदू व बौद्ध आहेत. लिगोर येथील ‘नरवोन श्री थमरात’ वरून असे दिसते की भगवान बुद्धाचे निर्वाण झाल्यावर तो तेथे प्रकट झाला होता, अशी समजूत असावी. याच जागेच्या सान्निध्यातील हिंदू देवालयात नटराज, गणेशमूर्ती इ. देवतांच्या मूर्ती सापडल्या आहेत.

 

तेराव्या शतकानंतर मलाया द्विपकल्पात इस्लाम धर्मांचा प्रसार झाला, तरी भारतीय संस्कृतीचा प्रभाव कमी झाला नाही. मलायात भारतीय धर्मांचे अस्तित्व नसले, तरी तेथील वाङ्‌मयावर भारतीय वाङ्‌मयाची छाप आहे. सयाम, लाओस, कंबोडिया, ब्रह्मदेश या भागांत आजही बौद्ध धर्माचे प्राबल्य आहे.

सांस्कृतिक प्रगती : स्थापत्य व शिल्पकला : फूनान, कंबुज-चंपा या राज्यांमध्ये अनेक संस्कृत ग्रंथ, ग्रंथालये आणि दप्तरखानेही होते. कांगताई या चिनी वकिलाने लिहिलेल्या वृत्तांतावरून येथील सांस्कृतिक प्रगतीची कल्पना येते.

 

ऐरलंग्ग स्वतःला विष्णूचा अवतार मानीत असे. त्याच्या चंडी बेलहनमध्ये त्याची स्वतःची विष्णुपुरातील गरूडावर विराजमान झालेली मूर्ती आहे. चंडी म्हणजे देवालय. येथील सर्व राजे देवराज पंथाचे असल्यामुळे ते आपल्या हयातीत आपली चंडी बांधून ठेवीत.

 

एकोणिसाव्या-विसाव्या शतकांतील उत्खननाद्वारे बृहद्‌भारतातील प्राचीन अवशेष उजेडात आले आहेत. अवशिष्ट वास्तूंत अनेक कलाकृती आढळतात. कंबुज देशातील दहाव्या शतकातील ख्मेरचा इतिहास हा स्थापत्याचा उत्कर्षकाल होता. मंदिर बांधून त्यात राजाराणींची शिल्पे ठेवली जात. सर्वांत मोठे स्मारक म्हणजे ⇨ अंकोरवातचे देवालय. शेकडो हेक्टर विशाल भूभागावर ते पसरले आहे. अंकोरच्या ईशान्येला सु. २३ किमी. वर बांटी श्रीचे शिवमंदिर आहे. येथील त्रिकोणी पर्णाकृतींमध्ये सुंदर कलाबतू असून ती लक्ष वेधून घेते. एका चित्रात तिलोत्तमेच्या बाजूला सुंद व उपसुंद हे राक्षस उभे आहेत, तर दुसऱ्यात त्यांची लढाई व तिसऱ्यात रावण कैलासपर्वत हलवीत आहे, हे दृश्य दाखविले आहे. देवालयाच्या आतल्या आवारात गर्भगृहे आहेत व पूर्व-पश्चिमेला दोन गोपुरे आहेत. तिसरे स्मारक म्हणजे प्राविहारचे देवालय होय. दुसरे महत्त्वाचे देवालय म्हणजे ⇨ अंकोरथोम येथील बेऑनचे देवालय होय. या देवालयावर शिखरांची इतकी गर्दी झाली आहे, की ही शिखरे नसून दगडांच्या राशीच्या राशी रचून ठेवल्या आहेत असे वाटते. गर्भगृहे, गोपुरे, शिखरे, देवालयाभोवतीचे प्रचंड तट आणि चारी बाजूंना मनोरे ही या काळच्या एकूण स्थापत्यकलेची वैशिष्ट्ये होत.

 

चंपातील कलेचा उत्कृष्ट नमुना भद्रेश्वरस्वामी देवालय होय. हे चंपाचे राष्ट्रीय देवालय असून त्यात शिवमूर्ती होती. एक हजार वर्षे ते टिकून राहिले. पहिल्या शतकातील बुद्धाची एक सुंदर मूर्ती येथे सापडली आहे. ती तांब्याची असून तिची बनावट मुलायम अशी आहे. ही मूर्ती अमरावती शैलीची आहे.

 

इ.स. ६०५ मध्ये चिनी फौजांनी चंपाचा पूर्णपणे पराभव करून लूटालूट केली. त्या वेळी त्यांनी चंपाच्या १८ राजांची सुवर्णपत्रे आणि १,३५० बौद्ध ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती चीनला नेल्या व फूनानहून जाताना दरबारी गवय्ये व संगीतकार नेले.

 

सयाममधील शिल्पे भारतीय छापाची आहेत. अमरावती शैलीच्या तांब्याच्या मूर्ती येथे सापडतात. एक ग्रेको-रोमन पद्धतीचा दिवाही सापडला आहे. प्रोमटोमच्या देवालयात बरेच अष्टकोनी स्तंभ आहेत. या स्तंभाचे वरचे टोक घनाकार असून त्यांत मॉन लिपीतील लेख आहे. बॅंकॉकच्या एका देवालयात बाहेरील बाजूला बौद्धाचे एक शिल्प आहे. हे लंबवर्तुळाकार चेहऱ्याचे व कुरळ्या लांब केसांचे आहे. ही लॉपबुरीतील शिल्पे जरी गुप्तपद्धतीची असली, तरी ती सयामी शिल्पकारांनीच घडविली असल्यामुळे त्यांत त्यांचा आगळेपणा दिसून येतो. ही सर्व शिल्पे काळ्या चुनखडीची आहेत. मॉन शिल्पांमध्ये बुद्धाचे काचमण्याचे एक डोके सापडले आहे. दुसरी एक मूर्ती तीन मीटर उंचीची निळ्या चुनखडीची आहे. मध्ये सयाममधील द्वारावतीकालीन (सातवे-आठवे शतक) शिल्पे अस्तित्वात आहेत. स्थापत्याचे नमुने मात्र राहिले नाहीत कारण पाँग-टुकसारखी देवालये जवळजवळ नामशेष झाली आहेत.

 

लॉपबुरीची ख्मेरकला व द्वारावतीची मॉनकला यांत फरक असला, तरी महातातची बुद्धमूर्ती ताडून पाहिल्यास त्यात या दोन्ही कलांचा मिलाफ दिसून येतो. ख्मेरांनी बुद्धाला मानवाचे स्वरूप दिले, म्हणून पाश्चिमात्यांना त्यांच्या कलेचे जास्त आकर्षण वाटते.


ब्रह्मदेशात अनेक स्तूप आहेत. श्रीक्षेत्राजवळील तीन मोठ्या बौद्ध स्तूपांतील एक ४६ मी. उंच असून स्तूपाच्या आत खोल्या आहेत. त्यांत गुप्तशैलीची शिल्पे, सुटी शिल्पे, चांदीची नाणी, भाजलेल्या मातीच्या वस्तू वगैरे मिळतात. बोधिसत्वांच्या मूर्ती तांब्याच्या आहेत. मोझा येथे सोन्याच्या दोन बुद्धमूर्ती, एक चांदीच्या स्तूपाच्या आकाराची पेटी, एक चांदीची चौकोनी पेटी, दोन चांदीचे द्वारपाल आणि काही सोन्याच्या पत्र्यांवरील लेख मिळाले आहेत. झोकथोक खेड्यातील तिझाउंग पॅगोडा शंकूच्या आकाराचा असून त्याचा जोता अष्टकोनी आहे. तो लॅटेराईट दगडाचा आहे व त्याच्या चारही बाजूंना जिने आहेत. थाटोन व प्रोम येथे दहाव्या शतकातील राजाने देवालयाच्या रचनेचा अभ्यास करण्याकरिता काही माणसे पाठवली होती. आनंद देवालय पगानमधील अत्यंत प्रेक्षणीय स्थळ असून देवालयाचे विधान क्रुसाकार आहे. आतील लांबलचक दालनांमध्ये सूर्यकिरण कधीच पोहोचू नयेत, अशी व्यवस्था आहे. या चार दालनांच्या टोकाला चार गर्भगृहे असून प्रत्येकात बुद्धाची उभी प्रचंड मूर्ती आहे व बूद्ध मूर्तीच्या तोंडावर व खांद्यावर सूर्याची किरणे पडतील, अशी व्यवस्था वास्तुरचनेत आहे. आतील दालनात ८० कोनाडे असून त्यांमध्ये बुद्धाचे बालपण रंगविले आहे. थतपिन्यू हे देवालय बरेचसे आनंद देवालयाच्या धर्तीवर आहे. अलौंगसिथूचा शिलालेख म्याझेडी पॅगोडामध्ये आहे. हा शिलालेख प्यू, मॉन व पाली भाषांत लिहिला आहे. याशिवाय गौडा-पलिन, सुलामनी, महाबोधी, हतिलोमिनलो इ. देवालये प्रसिद्ध होती.

 

बोर्निओत मौर कमन येथील शिलालेख स्तंभांवर कोरलेले आहेत. येथे विष्णूची एक सोन्याची मूर्ती सापडली आहे. कोंबेंग नावाच्या गुहेत दोन खोल्या आहेत. येथे कोरीव काम केलेले काही दगड व लाकडाचे व लोखंडाचे स्तंभ सापडले आहेत. येथील सर्व मूर्ती अलग आहेत. प्रत्येक मूर्तीच्या खाली एक एक खिळा आहे. हे खिळे या मूर्ती कोनाड्यांत बसविण्याकरता उपयोगी पडत. बहुतेक मूर्ती हिंदू देवतांच्या आहेत. या काळातील मंदिरे लाकडी असल्यामुळे त्यांचे अवशेष आज उपलब्ध नाहीत. शैलेंद्र राजा चूडामणिवर्मनच्या काळात अनेक बौद्ध विहार येथे बांधले गेले आणि बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी बौद्ध स्मारके उभारली गेली.

 

शैलेंद्रांच्या काळात जावामध्ये एक नवे युग सुरू झाले. राज्यात शेकडो देवालये बांधली गेली. प्रामबानानजवळचे शिवमंदिर रामायणातील प्रसंगांच्या उत्कृष्ट चित्रणाबद्दल प्रसिद्ध आहे. लाराजोंग्रांगच्या देवालयात राजा, राणी व त्यांचे नातेवाईक यांची स्मारके आहेत. लाराजोंग्रांग म्हणजे ‘सडपातळ तरूणी’ हे नाव स्थानिक असून ते दुर्गेच्या एका सुंदर मूर्तीला दिलेले आहे. मातारामची देवालये स्थापत्य व कलाकुसर यांत सरस आहेत.

 

मलायातील शिल्पे गुप्तछायाची आहेत. विंग श्री येथे विष्णूची एक भव्य मूर्ती आहे. ती अलंकाररहित असून पल्लवपद्धतीची आहे. बॅंकॉकच्या वस्तुसंग्रहालयात बोधिसत्व अवलोकितेश्वराची तांब्याची एक मूर्ती आहे. मुकुट तुटला असला, तरी ही मूर्ती सुबक व सुंदर आहे. अवलोकितेश्वराची दुसरी कमलपुष्पावर बसलेली एक मूर्ती आहे. डोक्यावर जटामुकुट आहे. अंगावर अलंकार कोरून काढल्यासारखे वाटतात. तांब्याच्या घडविलेल्या मूर्ती मध्ये व ईशान्य सयाममध्ये बहुधा मिळत नाहीत. मलायात कथिल विपुल मिळत असल्याने तांबे व कथिल यांच्या संमिश्र मूर्ती घडवीत असत. सयामच्या आधीच येथे शिल्पकलेचा प्रवेश झाला होता. बॅंकॉकमधील एका शिल्पात बुद्ध एका प्रचंड नागावर बसला असून नागाच्या खाली लेख कोरलेला आहे. ही मूर्ती ११८३ साली पूर्ण झाली असावी, असे लेखावरून दिसते.

 

मध्ये व पूर्व जावामध्ये हिंदू व बौद्ध देवालये जागोजागी दिसून येतात. हिंदूंची देवालये डीएंगचे पठार व प्रामबानानच्या दरीत आढळतात तर बौद्ध स्तूप प्रामबानानची दरी व केडूच्या सपाट प्रदेशात दिसतात. ही देवालये विविध काळात बांधली गेली असली, तरी त्यांच्या स्थापत्यशैलीत साधर्म्य आढळते. देवालयाचा जोता वा पाया, मुख्य देवालय आणि शिखर हे तीन भाग प्रामुख्याने लक्षात येतात. देवालयांचे शिखर वर निमुळते होत जाऊन एकावर एक मजले बांधावेत तसे त्याचे स्वरूप दिसते. शिखरावर लहान लहान देवालये कोरलेली दिसतात. काही देवालयांची शिखरे अष्टकोनी आहेत. या शिखरांवरील आमलक तुटलेले आहेत.

 

बहुतेक देवालयांवर वेलबुट्टी, फुलांचे हार, गुलाबाकृती, फुलांचे गुच्छ व नक्षीकाम केलेले आढळते. देवालयांवर भारतीय पक्षी व प्राणी खोदलेले आहेत. जावाच्या देवालयांतील शिल्पांत नेहमी आढळणारा प्राणी म्हणजे कालमकर. पुष्कळ ठिकाणी काल आणि मकर यांच्या आकृती भिन्न आहेत. कालाचे मुख उग्र दाखवले असून ते शिवाच्या रूद्र रूपाचे प्रतीक मानले जाई. हे काहींच्या मते कीर्तिमूख आहे.

 

मध्य जावामधील मंदिरांत शिल्पांची अथवा नक्षीकामांची रेलचेल आणि स्तंभ नाहीत. वास्तूच्या कमानी सरळ भिंतीवर घेतल्यामुळे त्यांचा आकार फारसा भव्य दिसत नाही. डीएंगच्या पठारावर चंडी अर्जुन, चंडी श्रीखंडी, चंडी पुंतदेव व चंडी सेंबद्र ही चार पश्चिमाभिमुख देवालये आहेत. पाचवे चंडी सेमार हे पूर्वाभिमुख आहे. या देवालयांचे शिल्पकाम उल्लेखनीय असून प्रत्येक बाजूच्या मध्यभागी कोनाडे आहेत. त्यांभोवती शिल्पांकन असून कोनाड्यांत मूर्ती आहेत.

 

प्रामबानानच्या दरीतील मुख्य देवालयांचा समूह म्हणजे लाराजोंग्रांगचा. येथे लहानमोठी १५६ मंदिरे आहेत. या मंदिर समूहातील दुर्गामूर्ती, उप-देवदेवतांची शिल्पे, अर्ध स्तंभांवरील गंधर्व मिथूने व एक शिवमंदिर इ. प्रेक्षणीय असून काही शिल्पपट उल्लेखनीय आहेत. यांमध्ये कमलपत्रे कोरलेली आहे. जोत्यांवरील कंगोरा नागमोडी वळणाचा आहे व त्याच्या वर नक्षीकाम आहे. कंगोऱ्याच्या खाली एक पट्टा आहे व त्यावर फूलहार खोदलेले आहेत. प्रामबानानच्या दरीतील बौद्ध देवालयांच्या प्रवेशद्वारावर कालमकर आहेत. व ते हत्तींवर आरूढ झालेले आहेत. हत्ती गुडघे टेकून बसले आहेत. त्यांच्या मुखांत पक्षी दिसत आहेत.

 

केडूच्या सपाट भूमीतील देवालये भव्य आहेत. यांतील बोरोबूदूर हे मोठे असून चंडी पवोन व चंडी मेंदूत ही मंदिरे उल्लेखनीय आहेत. मेंदूत, पवोन व बोरोबुदूर ही तिन्ही पूर्वी एकाच रस्त्याने जोडलेली होती. पवोनचे देवालय लहान असून त्याच्या जोत्याला नागमोडी वळणे आहेत. चारही बाजूंना प्रदक्षिणापथ आहे. भिंतींवर महिरपीमध्ये शिल्पे कोरलेली आहेत.


बोरोबूदूर म्हणजे जावातील स्थापत्यकलेचा सुंदर नमुना. येथील स्तूप प्रचंड आहे. हा स्तूप इ.स. ८५० मध्ये एका डोंगरावरील मध्यभागी असलेल्या खडकात कोरलेला आहे. स्तूपाला एकावर एक असे ९ सज्जे आहेत. अगदी शेवटच्या सज्जावर मध्यभागी घंटेच्या आकाराचा स्तूप आहे. ९ सज्जांपैकी ६ चौकोनी व वरचे ३ गोलाकार आहेत. सर्वांत खालच्या सज्जाचा व्यास १२० मी. असून, सर्वांत वरच्या सज्जाचा व्यास २८ मी. आहे. प्रत्येक स्तूपावर बुद्धमूर्ती आहे. बोरोबूदूरचा पहिला जोता मोठा (३.५ मी. उंच व १०५ मी. लांब) असून प्रेक्षणीय आहे. याच्या वरच्या भागात एक शिल्पपट्ट आहे. जोत्यावरही तीन शिल्पपट्ट आहेत. ही शिल्पे दोन छोट्या अर्धस्तंभामध्ये कोरलेली असून ती गणेशपट्टीने जोडलेली आढळतात. सज्जाच्या कठड्यावरील कमानीवर पत्रपल्लवी व फुलांचे कोरीव काम आहे. पाचव्या सज्जावरील कोनाड्यात चारही बाजूंनी बैरोचन मूर्ती कोरलेल्या आहेत. कठड्याच्या आतल्या भागावरदेखील शिल्पे व नक्षीकाम आहे. दोन शिल्पांच्या मध्ये कल्पवृक्ष अथवा किन्नर कोरलेले आहेत. प्रवेशद्वारावरील कमानीचे नक्षीकाम प्रेक्षणीय असून ही कमान एकावर एक दगड रचून केलेली आहे. प्रवेशद्वाराच्या कमानीवर लहानसे शिखर आहे व प्रत्येक सज्जावर पाणी जाण्याकरता स्वतंत्र राक्षसमुखे योजली आहेत. सज्जे गोलाकार असून त्यांवर नक्षीकाम नाही तथापि त्यांवर अनुक्रमे ३४, २४ व १६ स्तूप आहेत. या स्तूपांची रचना सारखी आहे. शेवटच्या सज्जावरील स्तूप कमलासनावर अधिष्ठित असून त्या भोवती फुलांचा हार लोंबकळताना दिसतो. [⟶ बोरोबूदूर].

वाङ्‌मय, तत्त्वचतुष्टयी इ. : सुरूवातीपासून येथे संस्कृत भाषा व वाङ्‌मय यांचा प्रसार झाला. चौथ्या ते सातव्या शतकांमध्ये कोरलेले सर्व संस्कृत शिलालेख काव्यात आहेत. यांतील काही श्लोक शार्दूलविक्रीडित वृत्तात आहेत. या काळातील चंपाच्या शिलालेखात संस्कृत भाषेतील उपमा, उत्प्रेक्षादी अलंकारांचा साज दिसून येतो. राजेंद्रवर्मनचा शिलालेख म्हणजे एक महाकाव्यच आहे. त्यात २१८ श्लोक आहेत ते शार्दुलविक्रीडित अथवा स्रग्धरा वृत्तात लिहिले आहेत. कवींना संस्कृत भाषेच्या प्रत्येक छंदाची माहिती होती. पाणिनीचे व्याकरण त्यांना अवगत होते. सिंहावलोकितन्याय, गौतमाचे न्यायशास्त्रयोगसार तत्त्वज्ञान परिचित होते.

 

कंबुज देश संस्कृतचे माहेरघर होते. येथील किती तरी राजे आपला वेळ ज्ञानसंपादनात घालवीत. चंपाचा राजा भद्रवर्मन् हा चारही वेदांत पारंगत होता, तर सातवा जय इंद्रवर्मदेव व्याकरण, ज्योतिष व धर्मशास्त्र वगैरेंचा मोठा अभ्यासक होता. चंपाच्या तिसऱ्या इंद्रवर्मनला पाणिनीचे व्याकरण, शैवांची काशिका आख्यान आणि मीमांसा षटतर्क अवगत होते. चंपामध्ये हिंदूकाव्ये, पुराणे आदींचा प्रसार झाला होता.

 

ब्रह्मदेशातील साहित्यामध्ये बौद्ध आख्यायिकांचा प्रामुख्याने उल्लेख येतो. यांतील लिपी कदंब आहे. ‘प्यू’ भाषेचा प्रसार बराच झाला होता कारण बहुसंख्य शिलालेख प्यू भाषेत आहेत. प्यूबरोबरच संस्कृत भाषेच्या अध्ययनाचे काम चाले. महायान संप्रदायाच्या अस्तित्वावरून संस्कृतच्या प्रसाराची कल्पना येते. मूलसर्वास्तिवादी पंथीयाचे लोक आपले लेख संस्कृतातच लिहीत. पगानच्या राज्यात पाली भाषेचा प्रसार झाला. मॉन ही ब्रह्मदेशाची भाषा बनली. हीनयान पंथाच्या शिरकावाबरोबरच पाली भाषेतील ग्रंथ पुढे आले. अनव्रथ राजाने थाटोनहून पाली त्रिपिटकांची हस्तलिखिते आणली. आनंदच्या देवालयाच्या बाहेरच्या बाजूला १,५०० शिल्पपट आहेत. यांमध्ये बुद्धाच्या पूर्वायुष्यातील जातककथा कोरलेल्या आहेत. प्रत्येक शिल्पपट्टाखाली पाली किंवा मॉन लिपीतील लेख आहेत. अलौंगसिथूच्या काळातील बरेच शिलालेख काव्यात आहेत.

 

ब्रह्मदेशात अनेक प्रसिद्ध स्तूप आहेत. श्रीक्षेत्राजवळील तीन मोठ्या बौद्ध स्तूपांतील एक सु. ४६ मी. उंच आहे. तेथे बुद्धाच्या धर्मग्रंथांचा अभ्यास होत असे. धर्मगुरूंच्या मार्फत धर्माचे शिक्षण दिले जाई. श्रीविजय राज्यातील शैलेंद्रांच्या काळात बोरोबूदुर व चंडी कलसानसारखी भव्य स्मारके निर्माण झाली. त्यांनी नागरी लिपीचा पुरस्कार केला. वाङ्‌मयाला उत्तेजन दिले. नाट्यशास्त्र, काव्यशास्त्र, व्याकरण, ज्योतिष, पुराणे, स्थापत्य यांच्या प्रगतीसाठी कलाकारांना आश्रय दिला. त्यांच्या काळात बौद्ध वाङ्‌मयाबरोबर हिंदू वाङ्‌मयालाही प्रोत्साहन मिळाले. धर्मवंशाने जावामधील कायद्याला सुसूत्र स्वरूप दिले. त्यानं महाभारताचा व अन्य संस्कृत ग्रंथांचा जावानीज भाषेत अनुवाद करवून घेतला. या ग्रंथात जागोजागी संस्कृत श्लोक उद्‌धृत केले आहेत. धर्मवंशाचा जावई ऐरलंग्ग याच्या काळात वाङ्‌य व कला यांना जो बहर आला, त्यामुळे त्याचे नाव चिरस्मरणीय झाले आहे. राजकवी मपु कण्व याने त्याला आपल्या महाकाव्याचा नायक केला. त्याने अर्जुन-विवाह नावाचे महाकाव्य रचले. यातला अर्जुन म्हणजे खुद्द ऐरलंग्ग व सुभद्रा म्हणजे श्रीविजयची राजकन्या. या दोघांचा विवाह ही या काव्याची कथा व पार्श्वभूमी असून महाभारतातील संन्यासी अर्जुनाची भूमिका ऐरलंग्गाने पार पाडली आहे. याच कथेत थोडाफार फेरफार करून ते छायानाट्य (वायांग) करताना जावामध्ये वापरतात.

 

जावातील सर्वांत जुना ग्रंथ अमरमाला. हा संस्कृतमधील अमरकोशावरून स्फुरलेला दिसतो. यात देवादिदेवांची विविध नावे दिली आहेत. सर्वांत महत्त्वाचा ग्रंथ रामायण, हा मूळ रामायणापेक्षा निराळा आहे. राम-सीतेची शेवटी युती वा मीलन दाखविलेले आहे.

केडिरीच्या राज्यात राजा कामेश्वर याचा विवाह जंग्गालची राजकन्या किरण हिच्याशी झाला. या विवाहावर स्मरदहन हे अमर काव्य लिहिले गेले. पुढे जयभयच्या कारकीर्दीतील प्रसिद्ध सरस महाकाव्य म्हणजे मपु सेडह रचित भारतयुद्ध. हे मपु पनुल्लहने पुरे केले. पनुलुहचे आणखी एक काव्य म्हणजे घटोत्कचाश्रय. या काव्यात त्याने राजा जयाकृत असा उल्लेख केला आहे. केडिरीच्या राजवटीत अनेक वाङ्‌मयकृती निर्माण झाल्या. मपु सेडहच्या अपूर्ण राहिलेल्या भारतयुद्धाची तुलना ग्रीक महाकाव्याबरोबर केली जाते. याची नवी आवृत्ती व्रतजुद या नावाने प्रसिद्ध आहे. तनकुंग व धर्माय या दोन कवींनी वृत्त-संचयलुब्धक ही दोन काव्ये लिहिली. वृत्त-संचयात त्यानं छंदाविषयीचे नियम सांगितले आहेत. कामेश्वराच्या काळातील दुसरे काव्य म्हणजे भीमकाव्य. यात इंद्र व पृथ्वी-पुत्र भीम यांचे युद्ध चित्रित केले आहे. याशिवाय राजपति-गुंडल हा ग्रंथ व ककविन कृष्णान्तक या काव्यात श्रीकृष्णाचा अंत व यादव घराण्याचा शेवट निवेदिला आहे.

 

मजपहित काळातील मोठे काव्य म्हणजे पराक्रमी राजा हयम वुरूक याच्या जीवनावर आधारलेले नगरकृतगम हे होय. याच काळात बौद्ध धर्मीय पुतंनुलर याने अर्जुनविजय नावाचे काव्य रचले. जावामधील हिंदू व बौद्ध हे किती एकरूप झाले होते, याचे अर्जुनविजय हे निदर्शक आहे. जावामधील काव्याला ककविन असे म्हणतात. ही सर्व काव्ये जावाच्या तत्कालीन भाषांत लिहिली असून ती भारतीय महाकाव्यावर आधारलेली आहेत.


याशिवाय जावामध्ये इंद्रविजय, पार्थयज्ञ, विघ्नोत्सव, हरिश्रय, हरिविजय, कालयवनान्तक इ. काव्ये रचली गेली. हरिविजयमध्ये अमृतमंथनाची कथा गुंफलेली आहे. कालयवनान्तक ही गोष्ट विष्णुपुराणातून घेतली आहे. कंसाच्या मृत्यूचा सूड घेण्याकरता कालयवन द्वारकेत प्रवेश करतो. रामविजयमध्ये परशुरामाने सहस्त्र बाहूंच्या अर्जुनाचा पराभव केल्याची कथा सांगितली आहे. पार्थविजय महाभारतावरील एका कथेवर आधारलेले आहे. एका अपूर्ण काव्यात राजा उदयन व वासवदत्ता यांची कथा गुंफली आहे.

 

जावामध्ये जी वाङ्‌यनिर्मिती झाली, ती प्रामुख्याने काव्यबद्ध असली तरी तात्विक चिंतनाचे तिला अगदीच वावडे नव्हते. धर्मसवितासारख्या ग्रंथात तात्विक चिंतन आहे. छन्दावर छन्दकिरण, वृत्त-संचय, वृत्तायन वगैरेंसारखे कोश तयार झाले होत. नीतिशास्त्रकविन नावाचे काव्य लिहिले गेले होते. कोरवाश्रम या ग्रंथात कौरवांच्या पराभवानंतर त्यांना व्यासमुनींनी परत जिवंत केले व या कौरवांना पितामह भीष्मांनी पांडवांचा सूड घेण्याकरता खूप तपश्चर्या करण्याचा उपदेश केला. असे लिहून मूळ महाभारतातच बदल केलेला आढळतो. महाभारतातील काही पर्वांची भाषांतरे झाली. अनुशासनपर्वावर सारसमुच्च्य हा ग्रंथ तयार झाला. रामायणाच्या उत्तरकांडाचे भाषांतर झालेले सापडते. ब्रह्मांडपुराणात सृष्टिनिर्मितीची चर्चा आहे. ब्रह्माने अंडे निर्मिले व त्यातून ४ ऋषी, ९ देवऋषी आणि परमेश्वर निर्माण झाले देव, असुर, पितर व मानव जन्माला आहे, जाती निर्माण झाल्या शतरूपा आणि स्वयंभू मनू झाला. तेथपासून ते मृत्यू, राजा वगैरे सर्व गोष्टींचे वर्णन मूळ पुराणाप्रमाणे यातही आहे. या पुराणाच्या बऱ्याच प्रती बालीमध्ये उपलब्ध झाल्या. जावामधील अगस्त्यपर्वात बऱ्याच हिंदू देवदेवतांची नावे आलेली आहेत.

 

जावामध्ये धार्मिक वाङ्‌मयाबरोबर इतर प्रकारचे तत्त्वचतुषअटयीही निर्माण झाले. कलीन-अरंग या ग्रंथात राजा ऐरलंग्गाची व त्याच्या पुत्राची कथा आहे. कृतिवास, चंतकपर्व, आदीश्वर, एकलव्य या कोशांमधून इंद्र, अग्नी, वायू, काम, चंद्र, यम व बृहस्पती यांची अनेक नावे दिलेली आहेत. अंडउसद हे वैद्यकीय ग्रंथ स्मरतंग, अंगुलीमवेश, स्मररचन वगैरे प्रणयासंबंधीचे शृंगारिक ग्रंथ आणि संगीत, पक्षीदर्शन वगैरे संबंधीचे ग्रंथ जावामध्ये उपलब्ध होते.

 

नंतरच्या काळात लिहिलेल्या पररतोन या ग्रंथात जावाच्या ३०० वर्षांच्या इतिहासाची नोंद आहे. उसन जावा या ग्रंथात बालीच्या इतिहासासंबंधीच्या कथा सापडतात. या काळात सर्वांत अधिक लोकप्रिय झालेला ग्रंथ म्हणजे पंजी राजपुत्राची कथा, पंजी चंद्रकिरण या प्रेयसीच्या प्राप्तीकरता तो जीवाचे रान करतो. त्याच्या प्रणयकथा अत्यंत रोमहर्षक असल्याने त्या जावा, सुमात्रा, बोर्निओ, सेलेबीझ, मलाया, इंडो-चायना या सर्व ठिकाणी लोकप्रिय झाल्या. मलायातील वाङ्‌मयात लवकुश, सीतेचे अग्निदिव्य, जटायूचा वध वगैरे कथा आढळतात. महाभारतावर आधारलेली पांडव लीमा, पांडव जय वगैरे काव्ये निर्माण झाली. मलायातील प्रेम काव्याच्या नायक-नायिकांची नावेदेखील भारतीय आहेत. हितोपदेशपंचतंत्र यांवर आधारित असलेली तंगी केडिरी, तंगी डेमुंग काव्येही झाली.

 

जावातील वाङ्‌मयनिर्मितीचा आढावा बौद्ध वाङ्‌मयाचा निर्देश केल्याशिवाय पुरा होऊ शकत नाही. सर्वांत जुने बौद्ध ग्रंथ म्हणजे सॅंग हिआँग कमहायानन मंत्रनयसॅंग हिआँग कमहायानीकन हे दोन्ही ग्रंथ महायान पंथाचे आहेत. यांतील प्रथम नमूद केलेल्या ग्रंथात प्रथम संस्कृत श्लोक देऊन नंतर त्याचे स्थानिक भाषेत भाषांतर केले आहे. दुसऱ्यामध्ये जावातील रुढ तत्त्वज्ञानाची माहिती मिळते. निकोप प्रकृतीच्या माणसाला निर्वाणप्रत लवकर जाता येते. मनुष्याने काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर वगैरे षड्‌रिपूंवर विजय मिळविला पाहिजे. षड्-पारमिता (दान, शील, शांती, वीर्य, ध्यान व प्रज्ञा हे सहा गुण) संपादिल्या पाहिजेत असे यात सांगितले आहे. जावातील बौद्ध तत्त्वज्ञानात चार योग, चार भावना व चार आर्यसत्ये सांगितली आहेत. यांशिवाय पाच स्कंध (रुप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान) पाच विजाज्ञर (होम, हमू, त्रमू, हरिह, अह) राग, द्वेष, मोह हे त्रिखल अर्थ, काम, शब्द ही त्रिमाला काया, वाक् व तित् ही त्रिकाया तसेच पंच धातू, पंचरूप, स्कंध आणि पंचज्ञान या सर्वांचे विवेचन केले आहे. ग्रंथाच्या शेवटी बुद्धाच्या शक्तींची नावे दिली आहेत.

 

महायान पंथीय ग्रंथांत वज्रयान किंवा तंत्रयान पंथीयांची तत्वे प्रतिपादिली आहेत. ज्या भक्ताने प्रज्ञा प्राप्त केली आहे, त्याने निर्धास्तपणे पाच सुखांचा (पंचमकार) उपभोग घ्यावा आणि तंत्रयानांची चक्रपूजा (मद्य, मांस, मुद्रा, मत्स्य व मैथुन) करावी हे तत्त्वज्ञान सांगितले आहे.

 

जावा व मलायामधील वाङ्‌यनिर्मितीच्या आढाव्यावरून येथील शैक्षणिक प्रगती आणि भारतीय संस्कृती यांच्या प्रभावाची कल्पना येते.

 

संदर्भ : 1. Brown, Percy, Indian Architecture (Buddhist and Hindu Periods), Bombay, 1959.

           2. Frederic, Louis,TheArt of South East Asia, New York, 1967.

           3. Majumdar, R.C. Hindu Colonles in the Far East, Bombay, 1960.

           4. Majumdar, R. C. Ed. The History and Culture of the Indian People Vols. 2. to 5 Bombay, 1971.

           5. Majumdar, R.C. Ancient Indian Colonies in the far East. Vol.I-III, Calcutta, 1937. 38 &amp 44.

           6. Shastri, K. A. N. History of Sricijaya, Madras, 1949.

           ७ गुप्ते, र. शं. बृहत्तर भारत, औरंगाबाद, १९६०

 

गुप्ते, र. शं.

 


 

     

आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..

Skip to content