बुर्कहार्ट, याकॉप क्रिस्टोफ : (२५ मे १८१८- ८ आगॅस्ट १८९७). प्रसिद्ध स्विस इतिहासकार व
इटालियन प्रबोधनाचा एक श्रेष्ठ मीमांसक. बाझेल (स्वित्झर्लंड) येथे एका धनगर कुंटबात जन्म. त्याचे वडील धर्मोपदेशक होते. बाझेल येथे ख्रिस्ती धर्मविद्येचे अध्ययन करून त्याने पुढील शिक्षण बर्लिन बॉन विद्यापीठातं घेतले.त्याने मुख्यत्वे धर्मशास्त्र, भाषाशास्त्र व इतिहास या विषयांचा अभ्यास केला व डॉक्टरेट ही पदवी संपादन केली. विद्यार्थिदशेतच त्याच्यावर योहान गुस्टाफ ड्रॉइझेन, फ्रांटस कूग्लर, आउगुस्ट बक व लिओपोल्ट रांके ह्यांच्या विचारसरणीचा प्रभाव पडला होता. (Basler Zeitung) या वृत्तपत्राचा काही दिवस तो संपादक होता पंरतु दोन वर्षानीतो वृत्तपत्रव्यवसाय सोडून इटलीस गेला( १८४७). पुन्हा तो सीसेरोन या पुस्तकाच्या लेखनसामग्रीसाठी १८४८ च १८५३ मध्ये इटलीस जाऊन आला. इटलीत त्याने अनेक स्थळांना भेटी दिल्या आणि शिल्पकला व वास्तुकला यांचा अभ्यास केला. १८४४ पासून बाझेल येथे त्याची प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. मध्यंतरीची झुरिक येथील तात्पुरती नोकरी सोडता उर्वरित आयुष्यात १८९३ मध्ये निवृत्त होईपर्यंत तो बाझेल विद्यापीठात इतिहासाचा प्राध्यापक होता. बर्लिन विद्यापीठात १८७२ मध्ये रांके निवृत्त झाल्यांनतर तेथील इतिहासप्रमुखाची प्रतिष्ठेची जागा त्यास देऊ केली होती पण प्रशियाबद्दलच्या आकसामुळे त्याने ती नाकारली. निवृत्तीनंतर त्याने लेखन-वाचनात अधिक लक्ष केंद्रित केले. तो बाझेल येथे मरण पावला.
बुर्कहार्टने वृत्तपंत्रातील लेखनाव्यतिरिक्त स्फुटलेखनाबरोबर ग्रंथलेखनही केले. त्याच्या ग्रंथांपैकी द सिव्हिलायझेशन ऑफ द रिनेसन्स इन इटली (१८६० इं.भा ), द एज ऑफ कॉन्स्टंटीन द ग्रेट(१८५२) व सीसेरोन (१८५४) हे तीन ग्रंथ प्रसिद्ध आहेत. द सिव्हिलायझेशन. . . इटली ही त्याची अभिजात साहित्यकृती व इतिहासलेखनाचा आदर्श. या ग्रंथाने इतिहासज्ञांत तसेच साहित्यिकांत त्याचा नावलौकिक वाढला. या ग्रंथात त्याने मुख्यत्वे प्रबोधनकाळाचे (१४ व १५ वे शतक ) राजकीय व सांस्कृतिक रहस्य उलगडून दाखविले आहे. त्याच्या भाष्याविषयी इतिहासज्ञांत मतभेदही आहेत मध्ययुगात पोपसत्ता आणि रोमन साम्राज्य यांमधील संघर्षामुळे नैतिक तत्त्वांची अधोगती झाली त्यामधूनच आधुनिक राज्यसंस्थेचा आणि विशेषतः व्यक्तिवादाचा उदय झाला व प्रबोधनयुगात आधुनिक मानवाचा जन्म झाला. ‘राज्य ही कला आहे’ हे प्रबोधनाने दाखविले, असे तो सांगतो. प्रबोधनयुग हे अगदी नवे व पूर्वकालापेक्षा वेगळे आहे, या त्याच्या सिद्धांताबद्दल अनेक इतिहासतज्ञांचा त्याच्याशी मतभेद आहे. त्यांच्या मते मध्ययुगातच प्रबोधनाची बीजे रोवली गेली, हे बुर्कहार्टला मान्य नव्हते. बुर्कहार्टला प्रबोधनकाळातील मानवतावादात ग्रीकांच्या अभिजातवादाचेही पुनरुज्जीवन दिसले या युगाला त्याने मानवाच्या अत्युच्च आनंदाचा शोध लागलेला काळ असे संबोधिले. त्याच्या मते इतिहास हा मानवी चैतन्यशक्तीचा अविष्कार असून तो काव्य, कला, वाङ्मय आणि तत्त्वज्ञान यांमधून व्यक्त होतो. या अभिव्यक्तीमधून गर्भित असलेल्या त्या चैतन्य तत्त्वाचा शोध घेणे, हे इतिहासकाराचे खरे काम असते, असे तो म्हणतो. मानवी इतिहासविषयक हा सांस्कृतिक दृष्टिकोन राजकीय घटनांवर भर देणाऱ्या पांरपरिक ऐतिहासिक दृष्टिकोनाहून वेगळा ठरला.
द एज ऑफ कॉन्स्टंटीन. . . या ग्रंथात त्याने ग्रीक-रोमन काळापासून मध्ययुगापर्यंतच्या संक्रमणकाळाचे विश्लेषण केले असून सीसेरोन या ग्रंथात इटलीमधील प्रेक्षणीय स्थळांचा आढावा घेतला आहे. ऐतिहासिक घटनांकडे पाहण्याची बुर्कहार्टची दृष्टी कलात्मक होती. त्यामुळे प्रबोधनकाळातील चकित करून सोडणाऱ्या तपशीलाकंडे तो सहजतःच आकृष्ट झाला. इटलीतील प्रबोधनाचा एक श्रेष्ठ भाष्यकार म्हणून तो प्रसिद्ध आहे.
त्याची इतिहासाच्या तत्त्वज्ञानाविषयीची भाषणे पुढे समग्ररीत्या प्रसिद्ध झाली (१९०५). फ्रीड्रिख नीत्शेसारखे (१८४४-१९००) प्रसिद्ध जर्मन तत्त्वज्ञही बुर्कहार्टच्या विचारांनी प्रभावित झाले.
संदर्भ:1.Gooch, G.P.History and Historians in the Nineteenth Century. Boston 1959.
2., Kohn. Hans, The Mind of Germany: the Education of a Nation, Toronto, 1960.
देशपांडे, सु. र.
“