बुरुडकाम : प्राचीन काळापासून जगातील बहुतेक सर्व समाजात चालत आलेला हस्तव्यवसाय. बुरूडकाम हा विशेषतः आदिवासींचा अत्यंत पुरातन व सार्वत्रिक स्वरूपाचा हस्तव्यवसाय असून जगातील बहुतेक सर्व विद्यमान आदिवासी जमातीत तो अजूनही टिकून आहे. पांरपरिक बुरूडकामासाठी प्रदेशपरत्वे वेगवेगळया वृक्षवनस्पतींचा वापर होत असल्याचे दिसून येते. विशेषतः ⇨ बांबू, ⇨वेत, लव्हाळे, बोरु, ताडमाड, वाळा तसेच विविध प्रकारचे गवत इत्यादींचा समावेश होतो. झाडांच्या साली, पाने, धागे वा तंतू, वाख यांचाही बुरूडकामासाठी उपयोग करतात. अशा वनस्पतिजन्य माध्यमातून अनेक प्रकारच्या वस्तू तयार करण्यात येतात. टोप-टोपल्या परड्या, करंड्या, पिंजरे, अन्नपाण्याची भांडी, कणग्या, हारे पेटारे यांसारख्या नित्योपयोगी वस्तूंप्रमाणेच घरासाठी तट्टया, छपरे, बैठकी, हाथरी शिकारीसाठी ढाली, शिरस्त्राणे व चिलखते लहान बालकांसाठी पाळणे, त्याचप्रमाणे पंखे, अंगरखे , गळपट्ट्या पादत्राणे व नानाविध बाहुभूषणे तसेच ढोल वाजविण्याच्या काठ्या व अंत्यविधीसाठी शवपेटिका यांसारख्या नानाविध वस्तू प्रदेशपरत्वे तयार केल्या जातात. इंग्रजीत बुरूडकामासाठी ‘बास्केटरी ’ ही संज्ञा रूढ असून तिचा अर्थ टोपल्या तयार करणे असाच आहे. तथापि लक्षणेने वर नमूद केलेल्या सर्वच वस्तूंचा निर्देश या संज्ञेने होतो. मराठी बुरूडकाम ही संज्ञाही अशीच व्यापक आहे. तिच्यामध्येही वेतकाम ( इंग्रजीत केन वर्क ) या प्रकाराचा अंतर्भाव करण्यात येतो. बुरूडकामाच्या या पारंपरिक माध्यमांत आधुनिक काळात प्लॅस्टिकसारख्या माध्यमाची भर पडली आहे. विशेषत खुर्च्यासांरख्या फर्निचर-वस्तूंसाठी प्लॅस्टिकच्या बारीक पट्ट्यांचा उपयोग करण्यात येतो.
ऐतिहासिक पार्श्वभूमी : बुरूडकामाचे प्राचीन नमुने त्याच्या नाशिवंत माध्यमांमुळे उपलब्ध नसले, तरी वाळवंटी प्रदेश वा कोरड्या गुहा यांतून काही नमूने आढळले आहेत. उदा., अमेरिकेतील नेव्हाडा आणि उटा ( इ.स.पू. ९००० ते ७०००) इराणमधील जर्मो (इ.स.पू५२७० ते ४६३०) व इजिप्तमधील फायूम( इ.स.पू. ४७८७ ते३९२९) येथेही असेच नमुने आढळले आहेत. त्या काळी गुंडाळी व वीण पद्धतीने बुरूडकाम केले जाई. चीनमधील इ.स.पू.३००० वर्षापूर्वीच्या नमुन्यावरून अशा वस्तूंना शेणमातीने लिंपून त्यांचा वापर द्रव पदार्थ ठेवण्याकडेही होत असल्याचे आढळते,तर यूरोप खंडातील इ.स.पू.२५०० ते २००० मधील बुरूडकामात सर्पिल वा जाळीदार वीण दिसून येते. या बुरडी वस्तूंचा वापर त्या काळात मुख्यतः फळफळावळे, मासे, अन्नधान्ये, पाणी इ. खाण्यापिण्याच्या वस्तू ठेवण्याकडेच होत असल्याची प्रथा सर्वत्र आढळत असली, तरी ग्रीसमध्ये पूजेची उपकरणे व रोममध्ये जडजवाहीर ठेवण्याकडे बूरडी वस्तू वापरीत असल्याचे निर्देश आढळतात. अमेरिकेतील इंडियनांचे बुरूडकाम प्रगत अवस्थेत होते. प्वेब्लो इंडियन लोकांत इ.स. १३०० पर्यंत ही कला टिकून होती.
बुरूडकामासाठी साधारणतः बांबू, वेत व गवत यांचा वापर करण्यात येतो. तथापि प्रदेश व परंपरा यांमुळे या माध्यमात विविधता आढळते. उदा., उष्ण कटिबंधीय प्रदेशात प्रायः पामिरा (ताड) अथवा रॅफिया (बास) तर भूमध्य समुद्राच्या परिसरात गुच्छघास (एस्पार्टोग्रास) वापरतात. जगप्रसिद्ध पनामा हॅट ही लॅटिन अमेरिकेतील जमेका, एक्वादोर व कोलंबिया येथील ताडपत्रापासून बनवितात. राय (Rye) या जंगली गवतापासून जोडटोपल्या बनविण्यात अल्यूशन बेटावरील स्त्रिया तरबेज आहेत. या जोडटोपल्यांची वीण व रंग विविध प्रकारचे असतात. प्राचीन इजिप्तमध्ये गव्हाची कांडे व स्वित्झर्लंडमध्ये अंबाडीची कांडे बुरूडकामासाठी वापरीत असत तर न्यूयॉर्कजवळील ‘ ॲरोक्लिस इंडियन’ हे यासाठी धान्याच्या टरफलाचा वापर करीत.
बुरूडकामातील कलात्मकता वउपयुक्तता : बुरूडकामासाठी गुंडाळी व वीण या दोन्ही पद्धती अवलंबिण्यात येतात. यांपैकी गुंडाळी पद्धत ही अधिक प्राचीन असल्याचे दिसते. या पद्धतीत विविध झाडांच्या डहाळ्या, पाने, साली, वेत, बोरु, लव्हाळे, वाख व गवत यासांरख्या माध्यमाची विविध प्रकारे गुंफण करून वस्तू तयार करण्यात येतात. गोलाकार , वक्राकार, छेंदयुक्त, मधुकोषसदृश, कंटकसदृश, चक्राभासीय यांसारखे गुफंणप्रकार रूढ आहेत. वीण पद्धतीत ताणा व बाणा तंत्राने चौकटी, सळीदार, गुंडाळी, सर्पिल आणि षट्कोनी इ. वीणप्रकार हाताळले जातात. या पांरपरिक तंत्रात अर्थात व्यक्तिगत कौशल्याला वाव असतोच. वस्तूचे अंतिम रूप सफाईदार प्रमाणबद्ध व आकर्षक राखण्यात कारागिराचे कौशल्य दिसून येते. काही आदिवासी जमातीच्या बुरडी वस्तूंतून नैसर्गिक पदार्थाची प्रतिकात्मकता साधलेली असते. उदा., काऴ्या पक्षाचे डोळे, कृमींची ओळ, उंदरांची वाट, लहान मासा इत्यादी. अमेरिकन इंडियन लोंकाच्या बुरूडकामात काळा, पिवळा व तांबडा या रंगांचाही वापर केला जाई. मूळ वनस्पतीचा रंग कायम राखणे हे त्यांतील कलात्मकतेचे वैशिष्ट्य.
एकेकाळी केंटकी व नॉर्थ कॅरोलायना येथील गिरिजनांचे बुरूडकामातील कौशल्य अप्रतिम समजले जाई पंरतु दुसऱ्या महायुद्धानंतर या हस्तव्यवसायाला एकदमच उतरती कळा लागली. बुरडी वस्तूंच्या तुलनेने अधिक स्वस्त व सुंदर, टिकाऊ व कमी किंमतीच्या लाकडी , पुठ्याच्या, ॲल्युमिनीयमच्या व प्लॅस्टिकच्या वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्यामुळे व बुरूडकामातील कमी मिळकतीमुळे बुरूडकाम करणाऱ्यांची संख्या घटू लागली. अंपग, हौशी लोक व औद्योगिक शाळातील विद्यार्थी यांच्यापुरताच हा हस्तकलाव्यवसाय उरला. तथापि अशाही परिस्थितीत अमेरिकेतील निग्रो व चेरोकी इंडियन लोकांत तसेच यूरोपातील जर्मनी, पोलंड, यूगोस्लाव्हिया,इटली आणि ब्रिटन या देशांत बुरूडकामनिर्मिती चालू होती. लंडन येथे तर एका जुन्या काळचे बुरूडनिर्मितीचे केंद्र अजूनही चालूच आहे. लँकाशर, बर्मिगंहॅम, समरसेट येथेही बुरूडकाम टिकून आहे. ब्रिटनमध्ये बुरूडकामासाठी तीन वर्षे उमेदवारी करावी लागते. या व्यवसायात अपंग व्यक्ती अधिक आहेत. बुरूडकामासाठी तेथे प्रायः वाळुंज (विलो) वृक्षांच्या फांद्यांचा वापर करण्यात येतो. त्या फांद्या प्रथम हिवाळयात तोडतात. त्यांची प्रतवारी करून त्या थंड पाण्याच्या मोठ्या हौदात प्रदीर्घ काळ भिजत ठेवतात. नंतर त्यांची सालटी काढून त्यापासून लहानमोठ्या करंड्या, हारे, पेटारे, खुर्च्या, मेज, उद्यानफर्निचर, मासे ठेवण्याच्या टोपल्या, कुत्र्या मांजरांच्या टोपल्या, खुराडी इ.विविध वस्तू तयार करतात. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटनमध्ये बनविलेले पेटारे इतके मजबूत होते, की ते विमानातून हवाई छत्रींच्या साहाय्याशिवाय जमिनीवर उतरविले जात.
मेक्सिकोमध्ये मात्र निकृष्ट प्रतीचा बोरू व माड यांपासून नैसर्गिक रंगात विविध प्रकारच्या वेधक भेटवस्तू व शोभेच्या वंस्तूंची निर्मिती केली जाते. कधीकधी त्यांना विविध प्रकारचे भडक रंगही देण्यात येतात. या वस्तूंचे आकर्षण अमेरिकन लोकांना फार आहे.
चीन व जपानमध्ये अनेक तऱ्हेच्या सुंदर वस्तू व कलापूर्ण फर्निचर तयार करण्यात येते. जपानी वेत-फर्निचर आणि हॉंगकाँग वेत-फर्निचर तसेच ललनांच्या जपानी हस्तमंजुषा परदेशातही निर्यात केल्या जातात. अमेरिकेत बुरडी वस्तू, विशेषतः लाकडाच्या व धातूच्या प्रमाणशीर आकार प्रकारांच्या करंड्या, निर्माण करणारी यंत्रसामग्री तयार करण्याचे प्रयत्न गेल्या शतकाच्या मध्यापासूनच होत आहेत. या वस्तूंचा निर्देश ‘बास्केटरी’ याच संज्ञेने होत असला तरी, पंरपरागत बुरडी हस्तकलेचे तंत्र त्यांतून आढळत नाही. बुरडी वस्तुनिर्मितीचे यांत्रिक तंत्र. अजूनही पूर्णावस्थेत गेले नाही. बुरूडकला ही अखेर एक हस्तकला म्हणूनच तेथेही टिकून आहे.
भारतीय बुरूडकाम : ‘बुरूड’ ही ज्ञातिसंज्ञा अत्रिस्मृतीमध्ये आढळते.‘बुरूड’ वा ‘बुरूड’ हा शब्द वैदिक वाङमयातील ‘विदलकारी’ किंवा ‘बिदलकारी ’ या शब्दापासून आलेला असावा. विदलकारी म्हणजे वेळू चिरणारी स्त्री, असा निर्देश वैदिक वाङ्मयात (वाजसनेयि संहिता ३०.८ व तैत्तिरीय ब्राह्मण ३.४.५.१) आढळतो.
पुरातत्त्वविद्या विशारंदाच्या दृष्टीने भारतीय बुरूडकामाचे अस्तित्व पाषाणयुगापासून (इ.स.पू. ५०००)असून त्यासंबंधीचा सर्वांत प्राचीन नमुना मोहें –जो-दडो येथील उत्खननात सापडलेली भांडयावरील चटईची प्रतिकृती हा होय. (इ.स. पू. ३०००). वेदकाळातही बुरूडकामाचे अनेक उल्लेख पहावयास मिळतात. उदा., ऋग्वेदामधील दानस्तुतीत आढळणारा ‘बल्बज’ या गवताच्या टोपल्यांचा निर्देश, सूप वा चाळणी या अर्थी ‘तितउ’(ऋग्वेद १०.७१.२), (अथर्ववेद १४.२.२२) काथ्याचे आसन म्हणजे ‘कशिपु’ (अथर्ववेद ६.१३८.५), मांस ठेवण्याची टोपली ‘ सूना’ (ऋग्वेद १.१६१.१०), वेताची चटई म्हणजे ‘ कट’ ( तैत्तिरीय संहिता ५३.१२.२) , गवंताची उशी या अर्थी ब्रृसी (ऐतरेय आरण्यक १.२.४ १०३ ३०२), गवताची विणलेली टोपली म्हणजे ‘मूत’ (काठक संहिता ३६.१४) आणि लहान टोपली म्हणजे ‘मूतक’ (शतपथ ब्राम्हण २.६.२.१७)इत्यादी. वैदिक वाङ्मयाप्रमाणेच विष्टरासन (दर्भासन) चीर (गवताचे विणलेले वस्त्र), कुशचीर ( गवताची ताटी), कुशास्तरण किंवा कुशसंस्तरण (कुशनामक गवताची चटई) आणि दर्भासन (दर्भ गवताचे आसन) इ. रामायण महाभारतकालीन शब्द तसेच इतर संस्कृत साहित्यांतील ‘ वेत्रासनादी ’शब्दत्या त्या काळातील बुरडी कलेचे निदर्शक ठरतात. शुक्रनीतिसार, भागवतपुराण व वात्सायनाचे कामसूत्र या ग्रंथातील अनुक्रमे ‘वेणुतृणादीना पात्राणांकृति:’ आणि ‘पट्टिकावेत्रवानविकल्पा:’ या निर्देशांनी बुरूडकामाचा अंतर्भाव चौसष्ट कलांमध्ये केलेला दिसतो.
भारतीय बुरूडकामाचे सद्यस्वरूप : भारतात सर्वत्र आढळणारा व प्राय: ग्रामीण स्तरावर चालणारा हा व्यवसाय प्रामुख्याने स्थानिक स्वरूपात चालतो. विविध प्रकारची गवते, वेळू (बाबूं), वेत (वेत्र), बोरु, लव्हाळे, ताड, माड, शिंदी, वाख, पाने अशा नानाविध वनस्पती व वनस्पतीपासून मिळणाऱ्या वस्तू माध्यम म्हणून उपयोगात आणून बुरूडकाम केले जाते. या वस्तूंपासून तट्टे, पंखे, कणग्या, टोपल्या, परड्या-दुरड्या, सूप-सुपल्या, पेट्या पेटारे, पिंजरे, आसने, चटया, खुर्च्या, मेज, करंड्या, रोवळया इ. प्रकारच्या नित्योपयोगी वस्तू तयार करण्यात येतात. या वस्तू तयार करताना ओल्या बाबूंच्या पट्ट्या गुंडाळून वा एकमेंकात गुंफून त्यांतून वेधक आकृतिबंध व आकर्षक रंगसंगती साधली जाते, तसेच त्यांतून प्रादेशिक वैशिष्ट्येही राखली जातात. [⟶भारत (हस्तव्यवसाय)].
पूर्वी महाराष्ट्रामध्ये वेळूच्या करंड्यावर कापड चढवून त्यावर नक्षीकाम करण्यात येई. कधीकधी नक्षीकामावर लाखकामही करण्यात येई. हे काम प्रामुख्याने सावंतवाडी येथे चाले तर पुणे,मुंबई व सावंतवाडी येथे वाळ्याचे डबे करून त्यांवर कलाबतू किंवा टिकल्यांची वा माशांच्या पंखांची नक्षी काढण्यात येई.हे पंखे पाश्चिमात्यांना फार प्रिय असत. याखेंरीज वेळूच्या पेटा ऱ्याना आतून चामड्याचे अस्तर लावण्यात येऊन त्यांचा वापर कपडेलत्ते ठेवण्याकडे केला जाई.[⟶ महाराष्ट्र ( हस्तव्यवसाय)].
बंगालमध्ये पूर्वी कर्दळी वा केळीच्या सोपट्याच्या चटया करण्याची प्रथा होती. त्यांना ‘सीतलपट्टी’ म्हणत. त्या फारच गुळगुळीत असून थंड असत. एका सीतलपट्टीची किंमत त्याकाळी पाच रुपयांपासून शंभर रुपंयापर्यंत असे. आजही पश्चिम बंगाल येथे तळाशी सपाट आणि वर गोलसर अशा टोपल्या तयार करण्यात येतात तथापि त्याहीपेक्षा बंगालच्या ‘ लक्ष्मी’ टोपल्या पूर्वीपासूनच फार प्रसिद्ध आहेत. त्यांना आतून वेत व बाहेरुन वेळू अशी दुहेरी वीण असते तर ‘कोरा’ आणि ‘जाकी’ या विशिष्ट गवतांपासून तयार केलेल्या विशिष्ट आकाराच्या टोपल्या म्हणजे बंगालचे भूषण होय. त्यांचा वापर मासेमारीसाठी करण्याची पूर्वापार प्रथा आहे.
आसाममध्ये चौकोनी तोंडाच्या व खाली निमुळत्या होत जाणाऱ्या उभट टोपल्या तयार करतात. त्या टोपल्या चहाची पाने गोळा करण्यासाठी उपयोगात आणतात. याशिवाय वेत-बांबूचे फर्निचरही येथे तयार करण्यात येते. त्रिपुरा येथील हलणारे जाळीचेपडदे हुबेहूब हस्तिदंती पडद्यासारखे भासतात. आसाममधील या व्यवसायाची प्रमुख केंद्रे म्हणजे कामरुप, शिवसागर, नौगॉंग व काचार ही होत. काचार व मिदनापूर येथील सीतलपट्टीही प्रसिद्ध आहे. हिरव्या रंगाच्या व हिरव्याच कळकाच्या या चटया गारवा देणाऱ्या असतात. पूर्वी मोंघीर येथे सिक्की, सर व मुंज गवताच्या चटया तयार करण्यात येत. त्याही उत्कृष्ट असत. नागॉलंडमधील परंपरागत बुरूडकाम उत्तम प्रतीचे मानले जाते. एक प्रमुख कुटिरोद्योग म्हणून त्याला महत्व आहे.
मणिपूरच्या टोपल्याही वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्या आयताकृती व खूप मोठ्या आकाराच्या असून त्यांचे झाकण घुमटाकार असते. तसेच त्यांना चार पायही असतात. त्यांचा वापर लहानसहान वस्तू वा कपडे ठेवण्याकडे करण्यात येतो. ओरिसामध्ये बनविण्यात येणा ऱ्याटोपल्या ‘खसखस’ या झाडापासून तयार करण्यात येत असून त्या गर्द पिवळया रंगाच्या तसेच अतिशय नाजूक असतात. या टोपल्या एकात एक बसणा ऱ्या लहानांत लहानापासून मोठ्यात मोठ्या आकारापर्यंत असतात. लहान टोपल्या म्हणजे लहान बांगडया ठेवण्याची छोटीशी डबीच असते. काश्मीरमध्ये वाळुंज (विलो) वृक्षापासून टोपल्या बनविण्यात येत असून त्यांना उचलण्यासाठी मधोमध दांडी असते व दोन्हीकडे दोन कप्पे आणि त्यावंर झाकणे असतात. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद, बरेली, वाराणसी तसेच दिल्ली ही गावे रॅफिया गवताच्या वस्तूंबद्दल फार प्रसिद्ध आहेत. बिहारमधील सिक्की गवताच्या टोपल्या हा एक वेगळाच प्रकार आहे. या टोपल्यांना पशुपक्ष्यांचे निरनिराळे आकार देऊन पानदाने, अलंकारमंजुषा वा लहानमोठ्या वस्तू ठेवण्याच्या पेट्या, कपड्यांचे स्टॅंड अशाविविध उपयुक्त वस्तू बनविण्यात येतात. तेथील वधूला ही कला अवगत असणे, ही एक आवश्यक रूढी मानली जाते.
दक्षिण भारतातील ताडपत्रांच्या वस्तूंसाठी रामनाथपुरम्, तिरुनेलवेली, कन्याकुमारी व मनपड ही गावे प्रसिद्ध आहेत. मनपडला विविध फळफळावळे ठेवण्याच्या खास टोपल्या तयार करण्यात येतात तर रामनाथपुरम् येथे तयार होणाऱ्या टोपल्यांत विविध रंगसंगती साधलेली असून त्यांचा आकार व त्यावरील पक्ष्यांचे अलंकरण वैचित्र्यपूर्ण असते. पालघाट व तिरुनेलवेली येथे चटयांत नक्षीकामासाठी लव्हाळ्यांचा वापर करण्यात येतो तर वेल्लोर येथे मागावरील ‘ताणा ’ सुताचा आणि ‘बाणा’ लव्हाळयांच्या बारीक चिपाडांचा असतो. या चिपाडाला कधीकधी विविध रंगही देण्यात येतात. त्यांपैकी काळा रंग लोखंड, मायफळ व बाभळीच्या शेंगा यांपासून तयार करतात. ही चिपाडे रक्तचंदनाच्या पाल्याच्या काढ्यात उकळली की तांबडी होतात. पिवळा रंग हळदीपासून तयार करतात. मद्रास येथे वेळू (बांबू), वेत, ताडपत्र, खर्जुरपत्रे, केवड्याची पाने व लव्हाळे यांपासून चटया बनवितात, तर पंख्यांची निर्मिती वेळू, वाळा, गुंजगवत, खजूरी, मोरपिसे, हस्तिदंत, अभ्रक व कागद इत्यादींच्या साहाय्याने तयार करण्यात येतात. त्यावर प्रायः टिकल्यांची नक्षी केलेली असते, तर कधी कलाबतू, बेगड, टिकल्या इत्यादींनी त्यांची सजावट करण्यात येते. त्यांच्या मुठी हस्तिदंती असतात. या पंख्याना झालर लावण्याचीही प्रथा असून म्हैसूर येथे मोरपंखाची, तर तंजावरला अभ्रकाची आणि मद्रासला रंगीबेंरगी काचतुकड्यांची असते. मद्रासच्या ताडपत्री छत्र्या प्रसिद्ध आहेत तर केरळ, पॉंडिचेरी व नागोरे येथील विणीच्या पिशव्या आणि जपानी पद्धतीचे कोरा गवताचे वैशिष्ठ्यपूर्ण पंखे अतिशय प्रख्यात आहेत. केरळच्या विविध आकाराच्या केवड्याच्या पानांसारख्या वाटणाऱ्या चमकदार,मउ व लवचिक चटया तसेच काळया व पांढऱ्या विणीचे चौकडे आणि काठ असलेल्या मुलपट्टीनामक टोपल्याही बऱ्याच लोकप्रिय ठरल्या आहेत. बुरूडकाम हा एक ग्रामोद्योग असला, तरी अलीकडे प्लॅस्टिक-वेत व नायलॉनचे धागे यांनी त्याची जागा घेण्यास सुरुवात केली आहे त्याशिवाय प्लॅस्टिकची विविध स्वरूपाची उपकरणे आल्यामुळेही बुरडी वस्तू मागे पडत आहेत. तथापि भारतातील आदिवासींच्या या कुटिरोद्योगाला तंत्रज्ञान, अर्थसहाय्य, वितरण, विक्री व निर्यात याबाबतींत आदिवासी विकास योजनांतर्गत शासकीय पातळीवरून विविध प्रकारे साहाय्य देण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय बुरडी वस्तूंना परदेशांतही लोकप्रियता व मान्यता लाभली आहे.
पहा: हस्तव्यवसाय.
संदर्भ: 1.Alblon Leonard, Basic Basketry, London, 1961.
2. Chattopadhyay, Kamaladevi, Handicrafts of India, New Delhi, 1975.
3 .Crampton, Charles, Canework, Leicester, 1964.
4. Lee, Martha, L. Basketry and Related Arts, New Jersey, 1948.
5. Mehta, Rustam, J.The Handicrafts and Industrial Arts of India. Bombay, 1960.
6. Mukharji.T.N. Art-Manufactures of India, New Delhi, 1974.
7. Wright Dorothy, Baskets and Basketry, London 1959.
जोशी, चंद्रहास
“